मी म.न.से. चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याची बातमी चुकीच्या तपशिलांसह ‘लोकसत्ता’मध्ये (१० डिसेंबर रोजी) छापण्यात आली. तेच तपशील ११ डिसेंबरच्या ‘अन्वयार्थ’मध्येही आले, त्यामुळे याबद्दलची वास्तविकता आणि माझं मत वाचकांपर्यंत पोहोचवण्याकरिता हा पत्रप्रपंच करीत आहे.
दिनांक ९ डिसेंबर रोजी राजगड या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात मी म.न.से. चित्रपट कर्मचारी सेनेच्या ‘प्राथमिक सभासदत्वा’चा स्वीकार केला आणि चित्रपट क्षेत्रातील एक ज्येष्ठ कलाकार या नात्याने म.न.से. चित्रपट सेनेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षांना माझ्या हस्ते पद-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
म.न.से. या राजकीय पक्षाची, केवळ चित्रपट क्षेत्रातील कामगार- कलाकार व तंत्रज्ञांसाठी कार्यरत असणारी म.न.से. चित्रपट कर्मचारी सेना ही एक शाखा असून त्या शाखेचे ‘प्राथमिक सभासदत्व’ मी स्वीकारले आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रात गेली ५० वर्षे कार्यरत असलेली ज्येष्ठ व्यक्ती आणि कलाकार म्हणून अशा प्रकारे चित्रपटांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्यच समजतो. अशा प्रकारे चित्रपटातील व्यक्तींसाठी काम करणाऱ्या इतरही विविध विचारसरणी आणि भूमिका असलेल्या अनेक संस्थांचादेखील मी सभासद आहे. उदा. शिवसेना चित्रपट शाखा, सिन्टा, मराठी चित्रपट महामंडळ, इम्पा, इम्पडा इत्यादी संस्थांचादेखील मी सभासद असून भविष्यातही निर्माण होणाऱ्या अशा प्रकारच्या संस्थांचा मी सभासद राहीन. तथापि, राजकारणात प्रवेश करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. कारण तो माझा प्रांत नाही. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार मी करू इच्छित नाही.
माझी बांधीलकी ही फक्त माझ्या प्रेक्षकांशी आहे. कारण त्यांनीच मला ‘अभिनेता’ ही उपाधी दिली आहे. तेव्हा त्यातली आधीची दोन अक्षरं वगळून जगण्यात मला कोणतंही स्वारस्य नाही. भारतीय चित्रपट क्षेत्राच्या भल्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्था आणि व्यक्तींच्या मी सदैव सोबत राहीन.
सचिन पिळगांवकर, मुंबई.
कोणत्याही पक्षाचा प्रचार करू इच्छित नाही
मी म.न.से. चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याची बातमी चुकीच्या तपशिलांसह ‘लोकसत्ता’मध्ये (१० डिसेंबर रोजी) छापण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-12-2013 at 04:25 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not want to promote any party