‘कट प्रॅक्टिस आणि खर्चाचे दुष्टचक्र’ हा लेख (११ जुलै) आवडला. डॉ. शाम अष्टेकर यांनी या आजारावरील चिकित्साही काही प्रमाणात सांगितली आहे. या बाबतीत एक साधा (म्हणूनच कदाचित अवघड) उपाय एक सामान्य चिकित्सक या नात्याने मला सुचवावासा वाटतो.
वैद्यकीय व्यवसायातील वैद्य आणि रुग्ण हे दोन महत्त्वाचे बिंदू आहेत. दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे ते बिंदू जोडणारी सरळ रेषा हे गणितीय सत्य या बिंदूंनाही लागू पडते. रुग्ण आणि वैद्य यांमध्ये औषधी निर्माण कंपन्या, विशेष तपासणी केंद्रे, रुग्णालये व विशेष चिकित्सक हे चार बिंदू आल्यास वक्र रेषा तयार होते. अर्थात हे येऊ न देता रुग्ण व वैद्य यांमध्ये सरळ व्यवहार करणे शक्य असते.
रुग्णालये, विशेष तपासणी केंद्रे या सर्वाचे पीआरओ (दलालाचे गोंडस नाव) वैद्यांशी दलाली (कमिशन) संदर्भात बोलणी करतात. या वेळी वैद्य ‘मला देण्यात येणारी दलाली रुग्णाच्या बिलातून कमी करा’ अशी अट घालू शकतो आणि ती अमलातही आणू शकतो. असे केल्यास वैद्यकीय खर्चावर थोडा फार आळा बसू शकतो.
टाळी एका हाताने वाजत नाही हे जितके सत्य तितकेच टाळीसाठी हात पुढे न केल्यासही टाळी वाजत नाही हेदेखील सत्यच आणि असा हात पुढे न करणे हे निश्चितच वैद्याच्या हातात असते.
या धोरणानुसार आजही अनेक सामान्य चिकित्सक स्वाभिमानाने आणि ताठ मानेने या क्षेत्रात कार्यरत आहेत असा माझा या क्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव आहे.
डॉ. उमेश करंबेळकर, सातारा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा