ग्रामीण आणि शहरी भागातील जगण्यात कमालीचा फरक आहे, दोन वेगवेगळ्या वाटाच आहेत या. एका वाटेवर खाचखळगे आणि दगडधोंडेच जास्त, तर दुसरी वाट सरळसोट. म्हणून दगडधोंडे असलेल्या या वाटेवर मुलींना जोडीदारासोबत चालणे नको वाटते.
आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याच्या काहीएक कल्पना मुली मनाशी बांधतात. आपआपल्या परीने सुखी संसाराची स्वप्ने रेखाटतात. त्यातल्या काहींची स्वप्ने प्रत्यक्षात साकारतात, तर काहींच्या स्वप्नांचे रंगीत फुगे वास्तवाच्या खडकावर फुटतात. अशी स्वप्ने पाहण्यामागे भविष्यातल्या चांगल्या जगण्याची आस असते. लग्नाच्या टप्प्यावर आलेल्या मुलींना नवऱ्याबाबतच्या अपेक्षेसंबंधी विचारले, तर कुणी डॉक्टर सांगेल, कुणी इंजिनीअर, कुणी प्राध्यापक, तर कुणी आणखी काही. आपण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. हुंडय़ाच्या बाजारात आपला बाप टिकू शकणार नाही, त्यामुळे फार मोठी स्वप्ने पाहता येणार नाहीत याचे भान असणाऱ्या मुलींचीही शिक्षक, कारकून यांना पसंती असते, पण शेतकरी नवरा ही कल्पनासुद्धा त्या करणार नाहीत. शेतकरी नवरा हवा असे चुकून कुणाच्या स्वप्नातही येणार नाही. सध्या चत्र, वैशाख महिन्यांत खेडय़ापाडय़ांत लग्नांची धूम चाललेली असते. एक तर उन्हाळ्यात फारशी शेतीची कामे नसतात आणि हंगामाच्या शेवटी कुटुंबात चार पसे आलेले असतात. त्यामुळे लग्नासाठी चांगला हंगाम हाच.
..का नको आहे शेतकरी नवरा? छोटय़ा पडद्यावर झळकणाऱ्या दहा सेकंदांच्या जाहिरातीत तर किती रुबाब असतो या नवऱ्याचा. कधी कापसाने भरलेल्या ट्रॉलीजवळ नोटांचे बंडल मोजणारा, तर कधी कुठल्या तरी पाइपने शेतात पाणी आणून सोन्यासारखे शेत पिकवणारा आणि पुन्हा बायकोलाही सोन्याच्या दागिन्यांनी मढविणारा. त्याची कारभारीनही आपल्या या नवऱ्याच्या कामगिरीवर, शेतीतल्या त्याच्या कर्तबगारीवर लुब्ध होणारी. ट्रॅक्टर चालविणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या बाजूला खेटूनच बसलेली असते ती. अशा चित्रांना प्रत्यक्षात मुली का नाकारतात? हे जरा पाहिले पाहिजे.
शहरात वाढलेली, मध्यमवर्गीय कुटुंबात मोठी झालेली मुलगी चुकूनही शेतकरी नवऱ्याला पसंती देणार नाही, कारण लग्न झाल्यानंतर तिला गावी जावे लागेल. पण शहरातल्याच नाही तर ग्रामीण भागातल्या मुलींनाही शेतकरी नवरा नको आहे. गेल्या दहा वर्षांत खेडय़ात शिक्षणाचे प्रमाण वाढले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी आता तालुक्याला जायची गरज नाही, ते गावातही मिळू शकते किंवा नजीकच्या मोठय़ा गावात जाऊनही ते घेता येते. अशा शिकत असलेल्या मुलींनाही लग्न होऊन एखाद्या गावात जाणे नको वाटते. शहराकडे, तिथल्या सोयीसुविधांकडे पळण्याची घाई सर्वानाच झाली आहे. जाहिरातीत कुठल्या तरी कंपनीच्या पाइपलाइनने आणलेल्या पाण्याने अथवा ठिबक सिंचनाने शेती हिरवी झालेली दिसत असली तरी पाणी विहिरीतून बाहेर काढायला वीज लागते.  बऱ्याचदा वीज नाही म्हणून उभी पिके जळताना पाहावी लागतात. आज तर वीज जणू श्वास झालेली. शहरात सकाळी उठल्यानंतर पाणी तापवायला वीजच असते. खेडय़ात पावसाळ्यात चूल पेटत नाही म्हणून सगळा धूर कोंडतो. दिवसाची सुरुवात होते ती अशी. शहरात तोटी फिरविली की पाणी, पाण्यासाठी वाट पाहण्याचे कामच नाही. इथे गावाकडे पाण्यासाठी दररोजच पायपीट आणि उन्हाळ्यात तर कामधंदा बुडवून पाण्यासाठीचीच भटकंती. कोण येईल अशा गावांमध्ये पुढच्या आयुष्याची स्वप्ने रेखाटायला?
शहरात नोकरी म्हणजे खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग. दर महिन्याला हक्काचा पगार. नवरा कामावरून घरी परतल्यानंतर दोघेही बाहेर फिरायला जाणार.  पार्कात मुलाबाळांसह चक्कर. खेडय़ात भर पावसाळ्यात रस्त्यावर जसा चिखलाचा राडा होतो तसा शहरात नाही. शहरांच्या सडका डांबरी. शहरातल्या शाळा वेगळ्या, मुलं शाळेत जाणार म्हणजे ऑटोरिक्षा किंवा व्हॅन किंवा बसमधून. या मुलांना शाळा सुटल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या विषयांच्या शिकवण्या. गावाकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत किती हाल शिक्षणाचे. एकच गुरुजी दोन-तीन विषय शिकवणार. कुठे वर्गखोल्या कमी तर कुठे शिक्षक कमी. कधी कधी बाहेरगावाहून शिक्षक जाणे-येणे करणार. गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांची लेकरे तालुक्याच्या शाळेत शिकायला, गावात शिकणार फक्त शेतकऱ्यांची, गोरगरिबांची पोरे. अशा वेळी खेडय़ात मुली का म्हणून येतील आणि आई झाल्यानंतर आपल्या पुढच्या पिढय़ांच्या वाटा स्वत:च्या हाताने बंद करतील? दोन्ही जगण्यात कमालीचा फरक आहे, दोन वेगवेगळ्या वाटाच आहेत या. एका वाटेवर खाचखळगे आणि दगडधोंडेच जास्त, तर दुसरी वाट सरळसोट. म्हणून दगडधोंडे असलेल्या या वाटेवर मुलींना जोडीदारासोबत चालणे नको वाटते. शिपाई असला तरी चालेल, पण शहरातला नवरा हवा अशी बहुतेकींची अपेक्षा असते.
खेडय़ापाडय़ात कर्जबाजारी होऊन मुलींची लग्ने लावली जातात. कर्ज फेडायला पुढची दोन-तीन वष्रे जातात किंवा जमिनीचा एखादा तुकडा विकावा लागतो. डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल, पण मुलगी नोकरीवाल्याच्याच घरात देऊ असा विचार केला जातो. शहरात पगारदार नोकरीवाल्याला मुलगी दिल्यानंतर बापाची प्रतिक्रिया असते, ‘दोन-तीन लाख जास्त लागले, फेडता येतील एक-दोन वर्षांत, पण पोरीचं भलं झालं, चांगलं घर मिळालं.’ यात कधी कधी फसवणूकही होते. कुठल्या तरी साखर कारखान्यात, सहकारी बँकेत मुलगा नोकरीला आहे म्हणून रग्गड हुंडा दिला जातो. प्रत्यक्षात ग्रामीण महाराष्ट्रात अनेक भागांत सहकाराची वाट लागल्यानंतर नोकरीवर असलेल्या या पोरांना गाव गाठावा लागला किंवा शहरातच छोटी-मोठी रोजगाराची साधने पाहावी लागली.  सुखी संसाराची काही स्वप्ने असतात, जगताना काही अपेक्षा उराशी बाळगलेल्या असतात. किमान सुख लाभावे ही इच्छा असते. रात्रंदिवस मरमर करताना जिथे आकांक्षा माराव्या लागतात, अनेक गरजांना मुरड घालावी लागते. पुढच्या पिढय़ांसाठी कोणताच मुक्तीचा मार्ग दिसत नाही. अशा वेळी ही दगडधोंडय़ांची वाट नकोशी वाटते. ग्रामीण भागात प्रश्नांचे असंख्य भुंगे जन्म घेतात. चांगले शिक्षण नाही, स्वच्छ पाणी नाही, किमान आरोग्याच्या सुविधा नाहीत. एखादी अडलेली गरोदर बाई असेल तर प्रसूतीसाठी तिची प्राणांतिक तगमग असतानाही खेडय़ात काहीच करता येत नाही. आज खेडय़ापाडय़ांत शाळा-कॉलेजात शिकत असलेल्या मुली हे सगळे जगणे बालपणापासून पाहात असतात. पावलोपावली मन मारायला लावणारा कोंडवाडा त्यांनाही नको वाटतो. शहरात छोटय़ा-मोठय़ा पगाराची नोकरी करणाऱ्याच्या बायकोला तिच्या घरात जे मिळते ते खेडय़ात शेतजमीन असलेल्या शेतमालकाच्या बायकोलाही मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी नवरा आता ग्रामीण भागातल्या मुलींनाही नको वाटतो. चांगलं घर, बसायला गाडी, मुलं चांगल्या शाळेत, मनाजोगतं राहणीमान या गोष्टी आडवळणाच्या खेडय़ात कुठून मिळणार? सध्या खेडय़ात प्रचंड खर्च करून जे मोठे लग्न लावले जाते, तिथे हे समजायचे की मुलगी एखाद्या खात्रीशीर उत्पन्न असणाऱ्या अथवा नोकरी करणाऱ्या मुलाच्या घरात दिलेली आहे. जी लग्ने साधारण आणि बेतास बेत होतात ती दोन्ही बाजूंनी शेतकरी असणाऱ्यांची. लग्नाचा मंडप, बॅण्ड, वऱ्हाडी मंडळींच्या अंगावरच्या कपडय़ांवरूनही हे ओळखणे अवघड नाही. ..अर्थात अनेकांना हे आवडणार नाही. शेती हा केवळ व्यवसाय नाही तर ती संस्कृती आहे. शिवाय शेतकरी म्हणजे मनाचा राजा, गुलामीची बेडी त्याला नाही असे मानणारे अजूनही खूप लोक आहेत. हायवेलगत असलेल्या शेतामध्ये हुरडा खाणारे किती लोक जाणीवपूर्वक आपली मुलगी शेतकरी कुटुंबात देतील? जरा विचार करा. आजूबाजूला तशी काही उदाहरणे सापडतात काय याचा शोध घ्या. असे उदाहरण सापडण्याची शक्यता दुर्लभ आहे हे मात्र नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा