भविष्यकाळात हजारो लोकांचे प्राण वाचवणारी पहिली शस्त्रक्रिया त्यांनी ज्या ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये केली  त्या कर्मभूमीतच त्यांनी देह ठेवला. असा योग फार थोडय़ांच्या वाटय़ाला येत असेल. अनेकांसाठी जीवनदाता ठरलेले हे डॉक्टर म्हणजे जोसेफ मरे. त्यांनी जगातील पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ब्रिगहॅम रुग्णालयात यशस्वी केली होती. आज मूत्रिपड प्रत्यारोपण ही विशेष गोष्ट राहिली नाही पण त्यावेळी डॉ.मरे यांच्यासाठी ते एक मोठे साहस होते. त्यांना या शस्त्रक्रियेसाठी १९९० मध्ये डॉ. डॉनल थॉमस यांच्यासमवेत नोबेल पारितोषिकही मिळाले. सुरुवातीला लष्करात डॉक्टर म्हणून काम करीत असताना जळालेल्या सैनिकावर त्यांनी त्वचारोपण केले.. ते केवळ ८ ते १० दिवस टिकायचे, पण एका व्यक्तीच्या उती दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात टिकाव धरू शकतात हा पहिला संकेत त्यांना तिथे मिळाला. त्यातून त्यांना प्रत्यारोपणाची कल्पना सुचली.  पहिल्यांदा जुळ्या भावांमध्ये मूत्रिपडाचे प्रत्यारोपण करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्यावेळी असे करणे म्हणजे निसर्गाशी खेळणे आहे असा बोभाटा धर्ममरतडानी चालू केला होता पण त्यांनी त्या सर्वाना शांत करीत हे साहस केले. ज्याच्यावर ही शस्त्रक्रिया केली त्या व्यक्तीचे नाव होते, रिचर्ड हेरिक तो नंतर बराच काळ जगला त्याचा भाऊ रोनाल्ड २०१० मध्ये निवर्तला. डॉ. मरे यांनी ती शस्त्रक्रिया १९५४ मध्ये केली तेव्हा शस्त्रक्रियागृहात एक गूढ शांतता पसरली होती. तेथील दृश्य पाहून कुणाचाही भीतीने थरकाप उडाला असता पण डॉ. मरे यांच्यातील शल्यविशारदाने त्यावर मात केली. डॉ.मरे यांचा जन्म १ एप्रिल १९१९ रोजी अमेरिकेत मिलफोर्ड येथे झाला. त्यांचे वडील न्यायाधीश तर आई शिक्षिका होती. होली क्रॉस कॉलेज व हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले. ब्रिगहॅम हॉस्पिटल ही त्यांची कर्मभूमी होती, तिथे त्यांनी वैद्यकीय शिक्षणातील धूळाक्षरे गिरवली.  त्यांनी ही शस्त्रक्रिया अनेक विद्यार्थ्यांना शिकवली. रुग्णाला मदत करण्यावर लक्ष केंद्रित करा, पूर्वी जे रोग असाध्य होते त्यांच्यावर आज उपचार शक्य आहेत त्यामुळे आज डॉक्टर होणारी मुले भाग्यवान आहेत असे ते म्हणायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा