पदाचा बडेजावपणा न करता उच्च पदावर असतानाही आपले नियमित काम अगदी चोखपणे बजावणारे फारच कमी असतात. यातील एक म्हणजे भारतीय अंतराळ संस्था इस्रोमधून बुधवारी निवृत्त झालेले अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन. मंगळयान मोहिमेचे आव्हान, एस-बँडमधील घोटाळ्यामुळे इस्रोची प्रतिमा मलिन होत असतानाच त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांनी मंगळमोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण विज्ञानजगताला एक नवा आदर्श घालून दिला. त्यांनी अवघ्या ४५० कोटी रुपयांमध्ये मंगळ मोहीम आखली. इतक्या कमी खर्चात ही मोहीम कशी होऊ शकेल यावर कुणाचा विश्वासच बसला नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या आखणीवरही प्रश्न उपस्थित केले गेले. पण मंगळ मोहिमेतील २४ सप्टेंबर आणि डिसेंबरमधील दोन्ही टप्पे यशस्वी झाले आणि जगभरातील सर्व वैज्ञानिक संस्था थक्क झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या या यशाचे देशातूनच नव्हे, तर जगभरातून कौतुक करण्यात आले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानितही करण्यात आले. इतकेच नव्हे, तर विज्ञान क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या ‘नेचर’ या नियतकालिकाने सन २०१४मधील सवरेत्कृष्ट दहा वैज्ञानिकांची यादी जाहीर केली, यामध्येही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. राधाकृष्णन यांचा जन्म २९ ऑगस्ट १९४९ रोजी केरळ येथील थ्रिसूर जिल्ह्यातील इरिंजलकुडा या गावात झाला. १९७०मध्ये थ्रिसूर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रिकल शाखेत बी.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. यानंतर १९७१मध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात एव्हिऑनिक्स अभियंता म्हणून रुजू झाले. तत्कालीन इस्रोचे अध्यक्ष प्रा. सतीश धवन यांनी त्यांची नियुक्ती अर्थसंकल्प नियंत्रण आणि देखरेखीसाठी केली. यानंतर अंतराळ संस्थेतील विविध उपसंस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांची धुरा सांभाळत त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. २०००मध्ये त्यांनी खरगपूर येथील तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) डॉक्टरेट मिळवली. भारताला बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यानंतर त्सुनामीची आगाऊ सूचना मिळण्याची यंत्रणा विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यास प्रकल्पाचे ते संचालक होते. नंतर ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक होते. तेथूनच त्यांची नियुक्ती इस्रोच्या अध्यक्षपदी करण्यात आली. खरे तर ऑगस्ट महिन्यातच राधाकृष्णन निवृत्त होणार होते. मात्र मंगळयान मोहिमेसाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. डॉ. राधाकृष्णन हे संगीतप्रेमीही आहेत. कर्नाटकी संगीत आणि कथ्थकलीमध्ये त्यांना विशेष रस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा