डोळय़ावर ‘लेसर शस्त्रक्रिया’ (लासिक) करून घेतल्याने अनेकांचा लांबचा नंबर नाहीसा झाला असेल. त्या लासिक शस्त्रक्रियेचे जनक असलेले रंगास्वामी श्रीनिवासन यांचा अमेरिकेत ओबामा प्रशासनाने तंत्रज्ञान अभिनवता पदकासाठी निवड करून केलेला सन्मान निश्चितच समर्पक आहे. श्रीनिवासन यांनी आयबीएमच्या टी. जे. वॉटसन रीसर्च सेंटर येथे ३० वर्षे अतिनील किरणांवर संशोधन केले आहे. १९८०च्या सुमारास लेसर किरणांची निर्मिती व्यावसायिकदृष्टय़ा शक्य झाली, पण त्यांचा वापर डोळय़ांच्या शस्त्रक्रियेसाठी करणे श्रीनिवासन यांनी शक्य करून दाखवले. स्पंदित एक्सायमर लेसर या १९३ नॅनोमीटर तरंगलांबीच्या लेसरचा वापर त्यांनी कार्बनी घनपदार्थ कापण्यासाठी करता येईल हे दाखवले. त्यानंतरची पायरी ही मानवी ऊती बाजूच्या कुठल्याही भागाला धक्का न लावता कापणे किंवा दूर करणे यासाठी त्यांनी हे तंत्र वापरले. लासिक शस्त्रक्रियेत हेच (अब्लेटिव्ह फोटो डिकम्पोझिशन) तंत्र वापरले जाते, ते श्रीनिवासन यांनी शोधून काढले आहे. त्यांचे १३० शोधनिबंध प्रसिद्ध असून अब्लेटिव्ह फोटो डिकम्पोझिशन या विषयात त्यांनी २२ पेटंट मिळवले आहेत. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग हा पॉलिमाईड या चिप्स व इंकजेट प्रिंटरच्या नॉझल्सचे पॅकेजिंग करण्यासाठीही होत आहे. तरीही सगळय़ात जास्त लोकप्रिय ठरली ती लासिक (लेसर इन सिटु केराटोमिलेसिस) ही शस्त्रक्रिया. लाखो लोकांना या शस्त्रक्रियेमुळे आजपर्यंत फायदा झाला आहे. असे असले तरी स्वत: श्रीनिवासन अजून चष्मा का लावतात असा प्रश्न पडणे साहजिक आहे याचे कारण म्हणजे वयाच्या साठीत नेत्रपटल खूपच पातळ होते व तेव्हा ही शस्त्रक्रिया करता येत नाही. विशिष्ट वयातच ती करावी लागते. श्रीनिवासन यांचा जन्म भारतात १९२९ मध्ये झाला. ते १९५३ मध्ये पदवीसाठी अमेरिकेत गेले, तिथेच कॅलिफोर्निया विद्यापीठात पीएच.डी. केली. अमेरिकन केमिकल सोसायटीचे अभिनव संशोधन पदक, एसेलन पदक असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. यूव्ही टेक असोसिएट्स ही तंत्रज्ञान सल्लागार कंपनी ते चालवतात. व्हाइट हाउसतर्फे त्यांना नुकतेच जाहीर झालेले अमेरिकी ‘नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन’ हा त्यांचा सर्वोच्च सन्मान ठरेल.
डॉ. रंगास्वामी श्रीनिवासन
डोळय़ावर ‘लेसर शस्त्रक्रिया’ (लासिक) करून घेतल्याने अनेकांचा लांबचा नंबर नाहीसा झाला असेल. त्या लासिक शस्त्रक्रियेचे जनक असलेले रंगास्वामी श्रीनिवासन यांचा अमेरिकेत ओबामा प्रशासनाने तंत्रज्ञान अभिनवता पदकासाठी निवड करून केलेला सन्मान निश्चितच समर्पक आहे.
First published on: 26-12-2012 at 04:08 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr rangaswami shrinivasan