महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असणाऱ्या संत तुकाराम महाराज यांचे वंशज एवढीच ओळख खरे तर पुरून उरावी अशी. परंतु डॉ. सदानंद मोरे यांच्या बाबतीत या ओळखीपलीकडे जाऊन त्यांनी सध्याच्या काळात केलेले वैचारिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेणे भाग पडते. घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बहुमताने निवड होणे हा या परंपरेचा सन्मान आहे, असे म्हटले पाहिजे.
गेल्या काही दशकांत समाजसुधारक हे अलिखित पद जसे कालबाह्य़ झाले आहे, तसेच सामाजिक विचारवंतांची परंपराही खंडित झाली आहे. केवळ इतिहासाचे आकलन करण्यापेक्षा समाजातील सर्व घटकांमध्ये घडलेल्या घटना-घडामोडींचा एकत्रित विचार करण्याची क्षमता असणारे विचारवंतही एका हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढय़ाच संख्येने आहेत. त्यामध्ये अग्रणी असण्याचा मान डॉ. मोरे यांच्याकडे जातो. गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून त्यांनी जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे. महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या अंगाने केलेला नाही. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण या क्षेत्रांचीही जोड त्यांच्या अभ्यासाला मिळाल्यामुळे तो अनेकांगी आणि परिपूर्णतेकडे जाणारा ठरला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांचा हा अभ्यास जसा लक्षात येतो, तसाच ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ यांसारख्या लिखित आणि संपादित ग्रंथांमुळे त्यातील गुंतागुंत अधिक सोपी करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही अभ्यासकांच्या मनात ठसतो. लोकमान्य टिळकांचे पहिले आणि समग्र चरित्रकार होणे ही सदानंद मोरे यांना भावणारी गोष्ट होती. सद्य:स्थितीत सगळे संत आणि समाजकारणी यांना जातींच्या कप्प्यांमध्ये कोंबण्याची घाई झालेली दिसते. अशा वेळी जातिधर्माच्या पलीकडे जाऊन मूलभूत स्वरूपाचे चिंतन करण्याचे सामथ्र्य मोरे यांच्याकडे आहे. संतपरंपरेचे आकलन बदलत्या काळाच्या संदर्भात करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यासाठी समाजजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्शणारा अभ्यास करण्याची त्यांची क्षमता म्हणूनच वाखाणण्यासारखी आहे. चिंतनपर लेखनाबरोबरच नाटक आणि कविता हा प्रांतही त्यांनी धुंडाळला आहे. विद्यार्थिप्रिय अध्यापक ही त्यांची आणखी एक ओळख. आपले प्रतिपाद्य शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर घासून तपासून घेणाऱ्या आणि तत्त्वज्ञान, इतिहास, कला अशा अनेक विषयांत नैपुण्य मिळवणाऱ्या अशा विचारवंताच्या गळ्यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पडणे ही यथोचित घडलेली घटना आहे.
डॉ. सदानंद मोरे
महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असणाऱ्या संत तुकाराम महाराज यांचे वंशज एवढीच ओळख खरे तर पुरून उरावी अशी.
आणखी वाचा
First published on: 12-12-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sadanand more