बसपच्या बहनजी सुश्री मायावती यांनी रविवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपली किमती पर्स फेकली. हाती एकाही राज्याची सत्ता नसताना आणि लोकसभेत अवघे २१ खासदार असताना, केवळ आपल्या सामाजिक अभियांत्रिकीच्या भरोशावर त्यांनी हे जे धाडस केले आहे, त्याला दाद दिलीच पाहिजे. गणेशोत्सव येताच ज्याप्रमाणे गावोगावी गणपतीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात होते, त्याप्रमाणेच लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच दिल्लीत तिसरी आघाडी नावाच्या शाडूच्या मूर्तीची बांधणी सुरू होते. ती शाडूचीच असल्याने निवडणूक संपताच विरघळून जाते. असे असले तरी ही मूर्ती भारतीय राजकारणात फार महत्त्वाची आहे. कारण तिच्यामुळेच मूठभर खासदारांचे नेतेही पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू शकतात. गेल्या निवडणुकीत ते मुलायमसिंह यादव यांना पडले होते. बहनजींनाही ते पडत असते. भारतातील एका अमेरिकी अधिकाऱ्याने अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी िक्लटन यांना २००८ मध्ये पाठविलेल्या गोपनीय पत्रातही बहनजींच्या या दिवास्वप्नाचा उल्लेख आढळतो. काँग्रेस आणि भाजप यांना देशभर मार खावा लागला आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला व इतर प्रादेशिक पक्षांना चांगले यश मिळाले, तर बसप तिसऱ्या आघाडीत बहनगिरी करू शकते, असे त्या पत्रात म्हटले होते. बहनजींनाही नेमकी हीच आशा आणि अपेक्षा आहे. म्हणूनच त्यांनी या वेळी सगळ्यांच्या आधीच आपला पत्ता िरगणात फेकला आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही चालवली आहे. या तयारीचीही एक गंमत आहे. ती लोकसभेत वाजली तर वाजली, नाही तर विधानसभेत मोडून खाल्ली असे काहीसे तिचे स्वरूप दिसते. रविवारी लखनऊमध्ये झालेले ब्राह्मण भाईचारा संमेलन हा त्या तयारीचाच एक भाग होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत बहनजींचा पराभव झाला असला तरी समाजवादी पक्ष आणि बसप यांच्या मतांतील अंतर केवळ ३.१२ टक्के आहे. २००७ मध्ये ज्याने साथ दिली तो ब्राह्मण समाज हात सोडून गेल्याचा हा परिणाम होता. या समाजाला पुन्हा हत्तीच्या अंबारीत बसवण्याचे काम म्हणूनच मायावती यांनी हाती घेतलेले आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मणबहुल असे ३६ लोकसभा मतदारसंघ आहेत. तेथील २० जागांवर जरी विजय मिळाला, तरी उत्तर प्रदेशातून लोकसभेच्या ४० जागा मिळू शकतात, असे त्यांचे गणित आहे. ते सफल झाले नाही तरी त्याचा फायदा पुढच्या विधानसभेत त्यांना मिळू शकतो. परवाच्या सभेत बहनजींनी एका भाषणात दोन तीर मारले. काँग्रेस आणि भाजप उत्तर प्रदेशात सत्तेवर आले तर अनुक्रमे दिग्विजयसिंह आणि राजनाथसिंह मुख्यमंत्री होतील, असे सांगून त्यांनी ब्राह्मणांना, ठाकूरराज परतेल असा इशारा दिला आणि मग केवळ गुजराती लोकांचीच काळजी करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदास लायक नाहीत, अशी टीका करून त्यांनी मुस्लिमांना चुचकारले. राज्यात काँग्रेस आणि भाजप अतिदक्षता विभागात आहेत. ते तसेच राहतील असे गृहीत धरले, तरच बहनजींचा २००७चाच हा ‘फॉम्र्युला वन’ चालू शकेल. मात्र तशी शक्यता नाही. मोदींनी उत्तर प्रदेशात पांचजन्य फुंकलेला आहे. त्यामुळे ‘ब्राह्मण शंख बजाएगा, हाथी दिल्ली जाएगा’ ही घोषणा घोषणाच राहण्याची शक्यता आहे. मायावतींची ब्राह्मण, दलित आणि मुस्लीम सामाजिक अभियांत्रिकी म्हणजे काही तरी नवाच प्रकार आहे, असे समजले जाते. खरे तर उत्तर प्रदेशात काँग्रेस अनेक वष्रे हीच जादू करीत असे. तिचा प्रभाव आटला. तीच जादू आता मायावतींना पंतप्रधानपदी नेईल, असे समजणे म्हणजे फार म्हणजे फारच झाले.
बहनजींचे स्वप्न
बसपच्या बहनजी सुश्री मायावती यांनी रविवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपली किमती पर्स फेकली. हाती एकाही राज्याची सत्ता नसताना आणि लोकसभेत अवघे २१ खासदार असताना, केवळ आपल्या सामाजिक अभियांत्रिकीच्या भरोशावर त्यांनी हे जे धाडस केले आहे, त्याला दाद दिलीच पाहिजे. गणेशोत्सव येताच ज्याप्रमाणे गावोगावी गणपतीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात होते,
First published on: 09-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dream of mayawati