देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मार्ग खडतर असला तरी देवदर्शनातून मोक्षप्राप्तीची आस असलेल्या प्रत्येकासच आयुष्यात एकदा तरी वैष्णोदेवीचे दर्शन घ्यावे असा ध्यास असतो. सहाजिकच, हिमालयातील दुर्गम अशा त्रिकुटा पर्वतराजीत असलेल्या वैष्णोदेवीच्या वाटेवर हजारो यात्रेकरूंची रीघ असते. त्यामुळेच यात्रेकरूंची सुरक्षितता आणि परिसराच्या पर्यावरणाचे जतन या मुद्द्यांचा एक सुप्त संघर्ष गेल्या काही वर्षांपासून तेथे धुमसतो आहे. देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचविणारा सोपा मार्ग ठरू शकेल अशा रोप वे ची संकल्पना अनेक वर्षे याच संघर्षात गुरफटलेली आहे. वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापनाने सुमारे पाच वर्षांपूर्वी रोप वेची कल्पना स्वीकारली असली, तरी हवेतून जाणाऱ्या या मार्गावरही या संघर्षाचे अडथळे उभे राहिलेच. भाविकांची व सामानाची नेआण करण्यासाठी वैष्णोदेवीच्या वाटेवर सुमारे वीस हजार घोडे, खेचरे व गाढवांची येजा सुरू असते. या प्राण्यांची योग्य देखभाल होत नसल्यामुळेही परिसराचे पर्यावरण बिघडत असल्याचा आक्षेप घेणारी एक याचिका गेल्याच महिन्यात न्यायालयासमोर आली आहे. अशा संघर्षातूनच, हेलिकॉप्टर सेवा हा एक पर्याय निर्माण झाला. जम्मू तील संजीछत ते वैष्णोदेवी मंदिराचा सुमारे १२ हवाई किलोमीटरच्या या प्रवासास जेमतेम सात मिनिटे पुरतात. पण या सात मिनिटांचा प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला. हा एक दु:खद अपघात होता हे खरे असले तरी त्यामुळे या संघर्षाची दुसरी, प्रवासी सुरक्षिततेची बाजू पुन्हा ऐरणीवर आली आहे. वैष्णोदेवीचा रोप वे प्रकल्प येत्या वर्षअखेरीस पूर्ण झाला, की दर तासाला ८०० भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याचा खडतर मार्ग काहीसा सोपा होईल. पर्यावरण रक्षण ही मानवजातीच्या व निसर्ग, प्राणीमात्रांच्या जगण्याशी निगडीत गरज आहेच. सुरक्षिततेचेही तेच उद्दिष्ट असते. हेलिकॉप्टर अपघातासारख्या दुर्दैवी घटनांप्रमाणेच, या पर्वतराजीतील खडतर प्रवासातही संकटे दडलेली असतातच. त्यामुळे सुरक्षितता हेच सर्वोच्च प्राधान्य डोळ्यासमोर ठेवूनच वैष्णोदेवी व्यवस्थापनाला हा संघर्ष संपवावाच लागेल.
हवी आश्वस्त सुरक्षितता!
प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 24-11-2015 at 14:12 IST
मराठीतील सर्व ई-एडिट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A helicopter carrying a group of vaishno devi pilgrims crashed at katra in jammu