एखाद्या गंभीर मुद्द्याला नेमकी सोयीची बगल देऊन जगाचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भलतीकडेच वळविणे ही एक महान कला मानली पाहिजे. कारण सर्वसाधारण माणसाला ही कला काहीशी असाध्यच असते. ती साधण्यासाठी गाठीशी मोठी साधना असावी लागते. प्रदीर्घ काळ त्याचा सराव करावा लागतो. म्हणजे त्यासाठी त्यामध्ये अक्षरश: बुडवून घ्यावे लागते. राजकारण हा पूर्णवेळ व्यवसाय मानला, तर या व्यवसायातील अनेकांना ही कला अवगत असणे ही एक गरज असते. व्यक्तिभिन्नतेनुसार या कलेतील पारंगतांची मांदियाळी त्यामुळेच राजकारणात पहावयास मिळते. अशी दोन राजकारणी माणसे समोरासमोर आली तर त्यांच्यात रंगणाऱ्या जुगलबंदीच्या केवळ उत्सुकतेनेच सर्वसामान्य माणसे भारावून जातात. ‘अब आयेगा मजा’ असा विचार करीत, त्या दोघांमध्ये रंगणाऱ्या संभाव्य जुगलबंदीवर नजरा लावताना, मूळ मुद्द्याचा सर्वांना आपोआपच विसर पडतो.

छगन भुजबळ यांच्या अंगी असलेल्या असंख्य कलागुणांची एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झालेली आहे. ते नेते आहेत आणि उत्तम अभिनेतेही आहेत. त्यांच्यासारख्या वाकबगार नेत्याशी जुगलबंदी करण्यासाठी फडणवीस सरकारातील नवखे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बाह्या सरसावल्याने, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष अशाच एका बगलबहादुरीच्या संभाव्य स्पर्धेकडे एकवटले आहे. भुजबळ हे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी, तर चंद्रकांतदादा हे आजी मंत्री आहेत, आणि राज्यातील रस्त्यांची दुर्दशा हा वादाचा मूळ मुद्दा आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने एक हजार कोटींच्या रस्तेबांधणीची घोषणा केली आणि ‘ही तर आमच्याच सरकारची कामे’ असे सांगत भुजबळांनी तो फुगा फोडण्यासाठी टाचणी सरसावली. बगलबहादुरीचा खेळ इथून सुरू झाला आहे. रस्त्यांच्या दुर्दशेचे खापर फोडण्याची ही स्पर्धा आहे. सहाजिकच, आता या स्पर्धेत चंद्रकांतदादा भुजबळांशी कशी जुगलबंदी करणार याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागतील. वादविवाद, आरोप प्रत्यारोपांना उधाण येईल. त्यावर सर्वत्र चवदार चर्चा घडतील आणि सामान्य जनता त्याकडे डोळे लावून बसेल. रस्त्यांची दुरवस्था दूर होईल आणि चांगले रस्ते मिळतील या स्वप्नांचाही त्यात विसर पडून जाईल. तसेही, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एकूण कामगिरीचा. अनुभव शब्दश: पावलोपावली घेणाऱ्या महाराष्ट्राला चांगले रस्ते अनुभवण्यासाठी परराज्ये किंवा थेट परदेशच गाठावा लागतो. त्यातून त्याची सुटका करायची असेल तर बांधकाम खात्याने भांडणे करत बसण्यापेक्षा बांधणीवर भर द्यायला हवा. आपण भांडत बसायचे की बांधत राहायचे हे चंद्रकांतदादांनी ठरवायला हवे!

Story img Loader