नापसंतीचे सूर काढताच त्याला एखाद्याला देशद्रोही, दहशतवाद्यांच्या पंक्तीत नेऊन बसविणे, देशाबाहेर जाण्याचे किंवा पुरस्कार परत करण्याचे इशारे देणे अशा अविवेकीपणाचा कळस होतो, हेच मुळात असहिष्णु वृत्ती बळावल्याचे स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे..
‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असा एक गमतीदार परंतु धोकादायक खेळ सध्या सत्तारूढ भाजपमध्ये सुरू झालेला दिसतो. पक्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील एखाद्या भगवेधारी पदाधिकाऱ्याच्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर समाजात उमटणारी वादळे शमविण्यासाठी तंबी देऊन पक्षाचे वरिष्ठ नेते हुश्श करतात तोवर दुसरा एखादा पदाधिकारी किंवा नेता पुढे सरसावतो आणि पहिल्यावरही कडी करणारे वक्तव्य करून त्याहूनही मोठे वादळ माजवितो. गेल्या काही महिन्यांत, विशेषत बिहारसारख्या प्रतिष्ठेच्या राज्यात निवडणुकांचे अटीतटीचे माहोल सुरू झाल्यापासून, या खेळाला चांगलाच रंग आलेला दिसतो. यामागील पक्षाची राजकीय गणिते कोणती असावीत हे गूढच असले तरी संपूर्ण देशाच्या सौहार्दाकरिता हे प्रकार घातकच आहेत, यात शंका राहिलेली नाही. देशामधील सहिष्णुता आणि सामाजिक सामंजस्याच्या वातावरणालाच आव्हाने देणारी ही वक्तव्ये अजाणतेपणी वा राजकीय परिणामांच्या अज्ञानातून केली जात असतील असे मानणे हेच अज्ञान ठरेल. कारण अशा वक्तव्यांनतर समाजातील अनेक नामवंतांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देऊन वा पुरस्कार परत करून निषेध नोंदविल्यानंतरही विषारी वक्तव्यांची गटारे अव्याहत वहातच आहेत.
वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शाहरूख खान यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी नापसंती व्यक्त करणारे वक्तव्य करताच त्यांचा आत्मा पाकिस्तानात असल्याचा शोध भाजपचे खासदार कैलाश विजयवर्गीय यांनी लावला. यानंतरही त्यांना देशद्रोही, पाकिस्तानचे हस्तक ठरवून दहशतवाद्यांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचे पोरकट धाडस भाजपचे खासदार आदित्यनाथ केल्यावर, अशा बडबडीला पक्षातीलच अनेकांनी फटकारले.
भगवी वस्त्रे परिधान करून राजयोग उपभोगणाऱ्या कंपूचे प्रस्थ पक्षात अलीकडे फारच वाढल्यामुळे अगोदरच भाजपमध्ये प्रचंड बेचैनी आहे. सरकारच्या प्रतिमेलाच धक्के देणाऱ्या या बेताल बडबडीला आवर कसा घालावा या चिंतेने पक्षाच्या पहिल्या फळीला ग्रासलेले आहे. याआधीही योगी आदित्यनाथांच्या जिभेला लगाम घालण्याचे प्रयत्न पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पण भाजपमध्ये आदित्यनाथ हे एकटेच असे बेताल बडबडीचे बादशहा नाहीत. अशाच आणखीही काही महाराज, बाबा, योगींजनांची फौज भाजपला अडचणीत आणण्याचे काम करतच असते. शाहरूख खान यांच्यावर चिखलफेक केल्यानंतर भाजपचेच अनुपम खेर यांनी त्यांची तीव्र शब्दांत खिल्ली उडविली, तर देशात असहिष्णुता असल्याचा इन्कार करून सलमान खान यांनी या वादात उडी घेतली. बॉलिवूडमध्ये आता या मुद्दय़ावरून उभी वैचारिक फळी पडणार आणि त्यामुळे पुन्हा एकवार देशात गदारोळ माजणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ही परिस्थिती चिघळू नये म्हणून सत्ताधारी भाजपचे नेते पुन्हा एकदा अशा वाचाळांना तंबी देतील, धारेवरही धरतील. असे अगोदरही घडलेच होते. एकाचे तोंड गप्प करावे तोवर दुसऱ्याचे तोंड उघडत असल्याने बोलकी तोंडे गप्प करण्यासाठी याआधी कधीही नाही एवढी कसरत भाजपला करावी लागणार आहे.
असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर नापसंतीचे सूर काढताच त्याला एखाद्याला देशद्रोही, दहशतवाद्यांच्या पंक्तीत नेऊन बसविणे, देशाबाहेर जाण्याचे किंवा पुरस्कार परत करण्याचे इशारे देणे अशा अविवेकीपणाचा कळस होतो, हेच मुळात असहिष्णु वृत्ती बळावल्याचे स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. अशा वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांची खिल्ली उडवून वैचारिक दबावाचे राजकारण खेळले जात असेल, तर ते विाकासाच्या प्रक्रियेला पोषक नाही. खुद्द पंतप्रधान, राष्ट्रपती आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही त्याची जाणीव करून दिली होती, हेदेखील या वाचाळवीरांनी लक्षात ठेवायला हवे.

Story img Loader