पेशवा बाजीराव यांची पत्नी आणि मस्तानी पडद्यावर एकत्र नाचत आहेत, मंगळागौरीच्या निमित्ताने पिउङ्गा खेळता खेळता , लावणी/ नौटंकी / बिरहा आदी लोकानुरंजनी नृत्ये आज ज्या प्रकारे केली जातात, तशा हालचाली या स्त्रिया करीत आहेत , हा इतिहासाशी अत्यंत मद्दडपणे फारकत घेणारा भाग . मस्तानीशी पेशवे घराण्यातील कुणाचे पटत नसे , हे तथ्यही पायदळी तुडवले जाते आहे हा पुढला मुद्दा . अशा प्रकारचे चित्रण करणारा आणि बाजीराव पेशवे यांच्या प्रेमकहाणीला महत्त्व देणाऱ्या ” राऊ ” कादंबरीवर कथितरीत्या बेतलेला ” बाजीराव मस्तानी ” हा चित्रपट धो धो धंदा करीत असल्याच्या बातम्या आहेत. यातील विपर्यासावर आक्षेप घेणारी बाजू सपशेल दुबळी ठरली , हे या बातम्यांमधून आपल्यापर्यंत पद्धतशीरपणे पोहोचवल्या जाणार्या आकड्यांतून दिसते आहे . चित्रपट किती चांगला किंवा किती वाईट , याची समीक्षा अनेक प्रकारे होऊ शकते, पण इथे ” विपर्यासावर आक्षेप घेणार्याची बाजू दुबळी ठरली ” असे खरोखरच म्हणता येईल का , आणि तशी ठरली असल्यास ती का ठरली , याची चर्चा होणे आवश्यक आहे.

आक्षेप घेण्यासाठी मुद्दे लाग्तात. ते काहींनी मांडले . त्यांच्या मते बाजीरावाच्या कथेचे मनोरंजनीकरण करताना किती कलात्मक स्वातंत्र्य घ्यावे , यास मर्यादा असायलाच हव्यात , कारण अखेर या कथेचा संबंध इतिहासाशी आहे. ते कलात्मक स्वातंत्र्य इतके अधिक घेऊ नये की , इतिहासाच्या तथ्यांची मोडतोड होईल, म्हणजेच – विपर्यास होईल. हे सारे खरे . पण या म्हणण्याचा सामना होता तो प्रचंड पैसा खर्चून , प्रसिद्धी आणि तिकीटबारीवर गल्ला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्या व्यवसायाशी . त्यामुळे तो सामना विषम होता आणि केवळ आक्षेप बिनतोड किंवा सज्जड असणे पुरेसे नव्हते. तो आक्षेप किती जणांना पटतो आहे, हेही महत्त्वाचे होते.

ते का, हे आता तरी आक्षेप घेणार्यांनी समजून घ्यावे … आम्हाला लोकांचा पाठींबा आहे , असे बाजीरावावर – व केवळ त्या ऐतिहासिक व्यक्तीच्या प्रेमकथेवर – चित्रपट काढणारे आता म्हणू शकतात. पण आक्षेप अनेकांना पटले होते , हे सिद्ध कसे होणार ? बहुसंख्या म्हणजे झुंडशाहीच , अशी जणू रीत सध्या रूढ झाली आहे… तो चुकीचा आणि त्याज्यच मार्ग . मग आक्षेप घेणारे थोडेच राहणार का ? हे प्रश्न यापुढे कायम राहतील . त्यावर शोधायचे , तर आत्मपरीक्षण करावेच लागेल. आक्षेप इतिहासाच्या विपर्यासाबाबत आहे की या चित्रणामुळे ” आमच्या समाजाची अस्मिता दुखावली” एवढाच त्याचा अर्थ आहे, यातील सीमारेषा धूसर झाली ती आज नव्हे . ती प्रक्रिया ” रिडल्स प्रकरणा ” पासूनची आहे. आपण ज्या कलाकृतीला / चित्रकृती किवा अभ्यासकृतीला आक्षेपार्ह ठरवतो त्यामागे काय हेतू होता/ आहे, त्या हेतूशी ती कृती पर्मानिक आहे का ? की, अभ्यास अपुरा किंवा रंजन भडक आहे? या प्रश्नांपर्यंत चर्चेचे गाडे जातच नाही .
कदाचित , आजवर ” विपर्यासा” च्या आक्षेपांना यशच मिळत गेले आणि तेही त्यामागला खरा मुद्दा अस्मितेचा असल्यानेच, हे आज विपर्यासाचे आक्षेप तोकडे ठरले , याचे कारण असू शकते. हे ज्यांना पटेल , त्यांनी विपर्यास आणि अस्मिता, व्यापक जनचर्चा आणि झुंडशाही यांतल्या फरकांकडे बारकाईने पहायला हवे.

Story img Loader