भारतात आलेला कुणीही परदेशी पाहुणा जाहीर व्यासपीठांवरून भारताचे गोडवे गातोच, अशी आपल्या देशाची महती.. त्यातून हा पाहुणा विद्यार्थ्यांसमोर बोलत असेल तर, भारत महासत्ता होणार वगैरे वाक्येही सहजपणे ऐकविली जातात. हे सारे ठराविक शब्दांतले कौतुक, ऐकून सोडून द्यावे अशा छापाचेही असते. कारण पाहुण्याचे शब्द आणि त्याची कृती यांत काहीच ताळमेळ नसतो. दिल्लीच्या आयआयटीत ‘फेसबुक’चे प्रणेते मार्क झकरबर्ग आले, तेव्हा त्यांनीही भारताची महती मान्य केलीच. पण तोंडदेखल्या भारतप्रेमामध्ये ते वाहावत गेले नाहीत. याचे कारण त्यांचे शब्द केवळ विद्यार्थ्यांना वा प्रसारमाध्यमांना छान वाटावे यासाठी नव्हते. भारतीय प्रौद्योगिकी संस्थानातच (आयआयटी) ‘टाउनहॉल’ हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम भरविण्यामागे झकरबर्ग यांचा उद्देश कृतीप्रवण असल्याचेच बुधवारी दुपारी सुमारे सव्वा तास झालेल्या या कार्यक्रमातून दिसले. हा उद्देश आणि त्यांना अपेक्षित असलेली कृती म्हणजे- व्यवसायवृद्धी! ‘फेसबुक’ आणि त्या कंपनीच्या अन्य सेवांना तसेच भविष्यकालीन योजनांना वाढीचे रस्ते मोकळे राहावेत, यासाठी झकरबर्ग आले होते. येथे त्यांना विचारले गेलेल्या १४ पैकी किमान आठ – म्हणजे निम्म्याहून अधिक- प्रश्नांवरील उत्तरांमधून त्यांनी हेच साध्य केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न टोकदार होते आणि झकरबर्गही स्पष्ट उत्तरे देतादेता मध्येच वळण घेऊन, आपल्याला सांगायचे आहे तेच सांगत होते.
‘नेट न्यूट्रॅलिटी’साठी देशोदेशींची सरकारे नियम बनवत आहेत, अमेरिकेने त्यात आघाडी घेतलेली आहे आणि हे देशोदेशींचे नियम पाळूनच आम्ही ‘इंटरनेट. ऑर्ग’ ची वाटचाल सुरू ठेवू अशी स्पष्ट ग्वाही झकरबर्ग यांच्याकडून या प्रश्नोत्तरांत मिळाली आहे. म्हणजे भारताला याबद्दलचे कायदे करताना भारतीय अडकू नयेत किंवा आयते गिऱ्हाईक बनू नयेत, याची काळजी घ्यावी लागणार. भारतात एक कोटी ३० लाख फेसबुक वापरकर्ते आहेत, ती संख्या वाढण्यासाठी ‘इंटरनेट. ऑर्ग’ आवश्यकच आहे, असे झकरबर्ग यांचे म्हणणे. लाखो गरिबांना आजही इंटरनेटचा लाभ मिळतच नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, त्याखेरीज अनेकांकडे इंटरनेट वापरता येईल असे फोन आहेत पण इंटरनेट का वापरायचे याची कल्पना त्यांना नाही. अशा उत्तरांमुळे, भारतातील स्थितीची त्यांना पुरेशी कल्पना आहे का, असा प्रश्नही पडेल. अशिक्षित आणि त्यामुळे अडाणीही असलेल्या लोकांसाठी फेसबुक काय करणार, या प्रश्नाचा रोख भारताच्या संदर्भात होता. परंतु झकरबर्ग यांनी उत्तर दिले ते न्यूजर्सी शहरात ग्रॅज्युएशनपेक्षा कमी शिकलेल्यांसाठी फेसबुकने काय सुरू केले, याबद्दल!
नवी स्वप्नेही झकरबर्ग यांनी दाखविली. ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ मुळे दूरच्या मित्राशी पिंगपाँग खेळण्याचा आनंद घरबसल्या मिळवता येईल, किंवा दृष्टिहीनांना फोटो पाहाता आला नाही तरी त्यावर क्लिक करून त्याचे वर्णन ऐकता येईल, अशी सुविधा येत्या काही वर्षांत येणार असल्याचे ते म्हणाले. या भूलथापा नाहीत, असा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे आणि दिल्लीच्या विद्यार्थ्यांनीही आता तो पाहिला आहे. चुका झाल्याच, होतही राहातील, पण आपला उद्देश लोकांच्या उपयोगी पडेल असे काहीतरी करण्याचा होता हे एकदा सिद्ध झाल्यावर चुकांमधून शिकण्याचे बळही वाढते, असा मंत्रच या पाहुण्याने विद्यार्थ्यांना दिला. भारताचे कौतुक नेहमीच्याच शब्दांत करण्याचा धोपटमार्ग बाजूला ठेवून, झकरबर्ग यांनी आपण जे करत आहोत त्यावर आपला विश्वास किती आहे हेच प्रेक्षक- श्रोते- प्रश्नकर्ते यांना दाखवून दिले. झकरबर्ग यांच्या प्रश्नोत्तरांपेक्षा लक्षात राहील तो हा मूर्तिमंत विश्वास!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा