‘हरिओम तत्सत’ या भजनाने साऱ्या भारतवासियांना वेड लावणाऱ्या बडे गुलाम अली खाँ यांचे शिष्यत्व पत्करलेल्या गुलाम अली यांच्यासारख्या गजल गायकाचे मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम केवळ ते पाकिस्तानी आहेत, म्हणून बंद पाडणे, यात कोणतेच शहाणपण नाही. शिवसेनेला अधूनमधून अशा प्रकारची सोपी आंदोलने करण्याची सवय असल्याने गुलामअली यांचे कार्यक्रम संयोजकांनीच रद्द करून टाकले. मेहदी हसन यांच्या नंतर गजल या गायन प्रकारात जगभरातील रसिकांची पसंती मिळवणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये गुलामअली यांचे नाव खूप वरचे आहे.पतियाळा घराण्याची तालीम मिळालेले हे गायक ‘हिंदुस्थानी’ शास्त्रीय संगीत गात असल्याबद्दल कधी कुरकूर करत नाहीत. त्यांच्यालेखी ते हिंदुस्थानी संगीतच आहे. राजकारण आणि कला यांची गल्लत करून समाजाचे लक्ष विचलीत करण्याने प्रत्यक्षात काहीच साधत नाही. सेनेने यापूर्वीही पाकिस्तानी क्रिकेट संघाबरोबरच्या सामन्यांवर बंदी आणली होती. मैदानाची नासधूसही केली होती. असे केल्याने पाकिस्तानातील सत्ताधीश भारतापुढे नमते घेतील, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत असावे.

खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनाही पाकिस्तानी खेळाडूंबद्दल कमालीचे ममत्व होते आणि ते त्यांनी लपवून ठेवलेले नव्हते. कलाकारांनी आपल्या कलेद्वारे रसिकांची मने रिझवायची असतात. त्या कलेच्या माध्यमातून सांगीतिक विचार पोहोचवायचा असतो. भारतीय रसिकांच्या ओठांवर गुलामअली यांच्या कितीतरी गजला सतत रेंगाळत असतात, याचा अर्थ त्यांनी भारतीय रसिकांना जिंकले आहे, असाच होतो. सेनेच्या नेत्यांना हे ठाऊक नसले पाहिजे.अशा बंदीमुळे तात्पुरती चर्चा होते, परंतु मूळ प्रश्न सुटण्याच्या दिशेने अर्धे पाऊलही पुढे पडत नाही, याचे भान खरेतर राजकारण्यांना यायला हवे.

Story img Loader