नागपूरची संत्री म्हटली की अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. साऱ्या देशात लोकप्रिय असलेल्या या संत्र्याने आता प्रथमच विदेशात पाऊल ठेवले आहे, याचे स्वागतच. विदर्भात भरपूर उत्पादन असलेल्या या संत्र्याला स्थानिक बाजारात चांगला भाव मिळत नाही. यंदाही सात ते आठ रुपये किलो भाव असलेली ही संत्री श्रीलंकेने १८ रुपये दराने खरेदी केल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. विदर्भच नाही तर आजवर देशाच्या कोणत्याही भागातली संत्री निर्यात होत नव्हती कारण केंद्राच्या निर्यात फळांच्या यादीत त्याचा समावेशच नव्हता. केंद्रात सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरींनी त्यासाठी प्रयत्न केले. संत्री उत्पादकांचे नेते श्रीधर ठाकरे यांनी त्याचा पाठपुरावा केला. संत्र्यांच्या निर्यातीला केंद्राने परवानगी दिली, पण वेगवेगळया देशांना आवडणारी वेगवेगळया प्रतवारीची संत्री उत्पादित करण्याचे मोठे आव्हान विदर्भातील शेतकऱ्यांसमोर होते. त्यासाठी निर्यातदार विदर्भात फिरले. वर्षभर चाललेल्या या प्रक्रियेनंतर श्रीलंकेत मागणी असलेल्या मध्यम आकाराच्या संत्र्यांचे उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले. आता ही संत्री श्रीलंकेत पोहोचली आहेत.
या निर्यात-निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या वध्र्याजवळील कारंजाच्या संत्री निर्यात केंद्रात व्यापारी व शेतकऱ्यांची लगबग दिसू लागली आहे. संत्री खाणारे त्याच्या चवीच्या बाबतीत खूप चोखंदळ असतात. दिल्लीत मोठय़ा आकाराच्या संत्र्याला मागणी असते. ही संत्री थोडी आंबटसर असतात. दक्षिण भारतात लहान आकाराची संत्री विकली जातात. अरब राष्ट्रात नारंगी संत्री खूप विकली जातात. ती गोड असतात. आजवर संत्र्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात पाकिस्तान आघाडीवर होता. मध्य आशियातील इतर कोणतेही देश संत्री निर्यात करीत नसल्याने या व्यवहारात पाकिस्तानची मनमानीच होती. आता भारताने यात पाऊल टाकल्याने चांगली स्पर्धा निर्माण होईल, एवढे नक्की. नागपूर व विदर्भात होणाऱ्या संत्र्यांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे येत्या काळात हा निर्यातीचा व्यवसाय मोठा पल्ला गाठेल, असा विश्वास बाजारपेठेत व्यक्त होतो आहे, तो या दर्जाच्याच हवाल्यावर.
केंद्र सरकारने संत्र्यांच्या निर्यातीला मान्यता दिल्यानंतर नितीन गडकरींनी या व्यवहारात दलाल नको, निर्यातदारांनी थेट शेतकऱ्यांशी करार करावेत, अशी भूमिका घेतली होती. त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना पहिल्याच प्रयत्नात झाला आहे. याच संत्र्यापासून तयार होणारी बर्फी केव्हाचीच विदेशात पोहोचली होती. आता तिच्यापाठोपाठ ही संत्री निघाली आहेत. विदर्भातील कर्जबाजारी शेतकरी, त्यांच्या आत्महत्या अशा नेहमी कानावर पडणाऱ्या दु:खद व नकारात्मक बातम्यांच्या पाश्र्वभूमीवर ऐन दिवाळीत सुरू झालेली ही संत्री निर्यात आनंद देणारी आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा