सध्याच्या काळात लोकप्रिय न होण्याचा मार्ग पत्करत आर्थिक शहाणपण दाखवणे सोपे नाही. आज सादर केलेल्या आपल्या दुस-या अर्थसकल्पात सुरेश प्रभू यांनी हा आर्थिक शहाणपणाचा मार्ग पुढे चालू ठेवला आहे. त्यांचे अभिनंदन यासाठी. कोणत्याही नवीन रेल्वेगाड्या नाही. पंतप्रधान वा अन्य मंत्र्यांच्या मतदारसंघात रेल्वेचे डबे वा इंजिने बनवणा-या कारखान्यांच्या घोषणा नाहीत आणि निवडणुक सज्ज पाच राज्यातील मतदारांना भुलवण्यासाठी रूळावरची लालूच नाही, हे प्रभू यांच्या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य मानावे लागेल. रेल्वेला विद्यमान काळात प्रचंड आव्हान आहे याचे कारण रेल्वेपासून दूर गेलेली माल वाहतूक आणि स्वस्त दरातील विमान सेवांनी खेचून घेतलेली प्रवासी वाहतूक अशा कात्रीत भारतीय रेल्वे अडकलेली आहे. ती बाहेर काढावयाची असेल तर लोकप्रियतेच्या नादी न लागता सतत आर्थिक शहाणपणाची कास धरणे आपल्या दुस-या अर्थसंकल्पातही प्रभू हे शहाणपण टिकवण्यात यशस्वी झाले आहेत.

पुढील वर्षात रेल्वे अधिक प्रवासीभिमुख करण्याच्या अनेक योजना त्यांनी आजच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्या. वायफाय, लहान मुलांसाठी स्वतंत्र अन्न, इंटरनेटवरून तिकिटांची गती वाढवण्याचा निर्णय, रेल्वे स्थानकं अधिक स्वच्छ ठेवण्याचे नवीन मार्ग, विमानांप्रमाणे रेल्वेतही आधुनिक स्वच्छतागृहे आदी अनेक नवनव्या कल्पना त्यांनी जाहीर केल्या. तसेच मालवाहतूकीसाठी चार नवीन महामार्गही त्यांनी घोषित केले. या सगळ्याचा परिणाम दिसण्यासाठी किमान तीन ते चार वर्षांचा अवधी द्यावा लागेल. याचाच अर्थ या अर्थसंकल्पातून लगेचच काही बदल होऊ शकतील असे नाही. एका बाजूला दीर्घकालीन दृष्टी ठेवून अर्थसंकल्प सादर करणे केव्हाही योग्य असले तरी त्याचवेळी दुसरीकडे काही तात्कालिक उपाययोजनाही कराव्या लागतात, प्रभू यांनी त्या केल्या आहेत असे म्हणता येणार. पुढील वर्षात विविध क्षेत्रात रेल्वे १ लाख २१ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी केली. तथापि, हा निधी कोठून उभा राहणार हे या अर्थसंकल्पावरून कळत नाही. याच काळात रेल्वेच्या खर्चात प्रभू यांना आठ हजार कोटी रूपयांची बचतही करावयाची आहे. तसेच सातव्या वेतन आयेगामुळे वेतन आणि निवृत्तीवेतनावर ३२ हजार कोटी रूपये इतका अतिरिक्त खर्चही त्याना करावयाचा आहे. तेव्हा या खर्चाची तोंडमिळवणी ते कशी करणार हा प्रश्न अर्थसंकल्पानंतर उरतोच. तो उरण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांनी प्रवासी व मालवाहतूक दरात दरवाढ करण्याचे टाळले आहे. हे सर्व पाहता, प्रभू यांची इच्छा चांगली परंतु ती पूर्ण करण्याचे साधन काय?

चांगल्या इच्छेच्या पूर्ततेसाठीही कष्ट करावे लागतात त्याची वानवा आहे की काय असा प्रश्न अर्थसंकल्पावरून पडतो त्यामुळे अर्थसंकल्पावर ‘प्रभू तू दयाळू’ अशी प्रतिक्रिया उमटू शकेल. परंतु, ठाम प्रयत्नांअभावी सद्हेतू आणि दया हे निष्प्रभ ठरतात हे विसरून चालणार नाही.

Story img Loader