खुलेपणाने कथन करण्याची सहजवृत्ती, चुकांचीही कबुली, मीडियाच्या कॉपरेरेटीकरणानंतर काय या प्रश्नाचा केलेला ऊहापोह आणि काही माणसांबद्दलचे मतप्रदर्शन यांसाठी दिवंगत विनोद मेहता यांचे हे पुस्तक ‘नवे’च राहील..
विनोद मेहता यांनी गेली ४० वर्षे इंग्रजी पत्रकारितेत अक्षरश: मुक्त मुशाफिरी केली. या सर्व कालावधीत ते थेट संपादक म्हणून वावरले. पण म्हणून कोणी त्यांची व्यासंगी, साक्षेपी, विचारवंत वगैरेनी संभावना केली असती, तर त्यांनी ती आपल्या बिनधास्त शैलीत लगोलग अमान्य केली असती. अर्थात, या बिरुदावल्या सार्थ ठराव्यात असे गुण त्यांच्या अंगी होतेच, पण त्या अनुषंगाने अकारणपणे येणाऱ्या ‘हस्तिदंती मनोऱ्या’पासून ते जाणीवपूर्वक दूरच राहिले. पत्रकार हा कथनकर्ता असावा अशी त्यांची धारणा होती. पत्रकाराकडे सांगण्याची ऊर्मी अपार असावी असा त्यांचा आग्रह होता आणि पत्रकाराने स्वच्छ दृष्टीने जगाकडे पाहावे अशी त्यांची अपेक्षा होती. मेहता आपल्या लिखाणात अनेकदा देशोदेशीच्या विचारवंत, पत्रकारांचे दाखले देत. चौफेर वाचन व त्यातून नेमके काय घ्यायचे याचे भान त्यांना होते व ते त्यांनी शेवटपर्यंत जपले. हे करताना वाचकाला उगीच दिपवून टाकण्याची मखलाशी त्यांनी केली नाही. केवळ भारतीय संदर्भात ते प्राधान्याने विचार करीत. त्यांनी अंगीकारलेली व अधिक दृढ केलेली पत्रकारिता निखालस भारतीय बनावटीची होती. त्याबाबत त्यांना रास्त अभिमानही वाटत होता. पत्रकारितेतील हे बीज संधी मिळेल तसे ते पेरत गेले. त्यांच्या पूर्वसुरींपैकी तुलनाच करायची झाली तर खुशवंतसिंगांशी करता येईल. आपल्याकडच्या इंग्रजी पत्रकारितेचा माहोल असाच खुशवंतसिंग यांनी भारून टाकला होता. विनोद मेहता यांची जातकुळी त्याच वळणाची होती. आपल्याकडच्या इंग्रजी पत्रकारितेचे हे देशी वळण स्वीकारण्यात मेहतांनी कधीच कमीपणा मानला नाही. किंबहुना ते अधिकाधिक प्रशस्त व्हावे असाच त्यांचा प्रयत्न राहिला. अलीकडेच, या आठवडय़ाच्या सुरुवातीला विनोद मेहता यांचे अकाली निधन झाले. अनेकांनी त्यांच्या स्मृती जागवताना हा पत्रकार-संपादक तुमच्या आमच्या किती जवळपासचा होता याच्या आठवणी सांगितल्या. वाचकाच्या असे सतत जवळ राहणे विनोद मेहतांना जमून गेले, याचे कारण त्यांचा येथल्या मातीत घडलेला पिंड.
हा पिंड कसा घडत गेला त्याची गोष्ट विनोद मेहता यांनी ‘लखनऊ बॉय’ या आत्मकथनात मोठय़ा खुबीदारपणे रंगवून सांगितली होतीच. हे पुस्तक सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. स्वत:चीच गोष्ट खुलवून सांगताना त्यांनी आत्मकथनात लावलेला संवादी सूर हा त्यांच्या एकूणच पत्रकारितेशी आणि व्यक्तिमत्त्वाशी साजेसा होता. ‘लखनऊ बॉय’ चर्चेत असतानाच त्याला जोड देणाऱ्या अनेक अठवणी व विषयांचा धांडोळा घेत दुसऱ्या पुस्तकाची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली होती. सांगावे असे खूप काही त्यांच्याकडे शिल्लक होते व ते सांगण्याची घालमेल कायम होती. या ऊर्मीतूनच ‘एडिटर अन्प्लग्ड- मीडिया, मॅग्नेट्स, नेताज् अँड मी’ हे नवे पुस्तक त्यांनी सादर केले. हेच त्यांचे अखेरचे पुस्तक ठरले. आत्मकथनाच्या आगळ्या शैलीमुळे हे पुस्तकही वाचकांना भावले.
याचे कारण आत्मकथनांतून अनेकदा जाणवणारा मीपणाचा, आत्मप्रौढीचा दर्प विनोद मेहता यांनी कधी बाळगला नाही. स्वत:वर प्रेम करायला, केंद्रस्थानी ठेवायला त्यांना आवडत होते; पण म्हणून तपशिलाचा विपर्यास करण्याची किंवा एखाद्याचा उपमर्द, दुस्वास करण्याची वृत्ती त्यांच्या ठायी नव्हती. उत्फुल्लपणे जगाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीचा प्रत्यय ‘एडिटर अन्प्लग्ड’ वाचताना पुन:पुन्हा येत राहतो. वस्तुत: मुंबई व त्यानंतर दिल्लीच्या सत्तावर्तुळाभोवती वावर असणाऱ्या विनोद मेहतांकडे चांगल्या-वाईटाची शिदोरी अमाप असेलही, पण वाईट तेवढेच सांगत स्वत:ची प्रतिमा उजळवण्याचा मोह त्यांना कधी झाला नाही. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाचे, प्रसंगोपात्त केलेल्या उक्ती-कृतीचे समर्थन ते हिरिरीने करतातच, पण हातून घडलेल्या चुकांची कबुली देण्यातील उमदेपण दाखवतात.
‘एडिटर अन्प्लग्ड’ हे पुस्तक ‘लखनउ बॉय’चा पुढचा टप्पा मानावा असे त्यांनी म्हटले असले तरी स्वतंत्रपणेदेखील या पुस्तकाचे महत्त्व उरतेच. याचे मुख्य कारण या पुस्तकात त्यांनी काही विषयांवर केलेली मुक्त चर्चा आणि नोंदवलेली मते. अर्थात, या विषयांमध्ये प्रामुख्याने माध्यमविश्व जसे आहे त्याचप्रमाणे भारतीय राजकारणातील गांधी परिवाराची घराणेशाही, भारतीयांची विनोदबुद्धी हेदेखील आहे. व्यक्तिचित्रण करण्याची मेहतांची हातोटी या पुस्तकात पाहावयास मिळते. स्वत:ला आवडलेल्या सहा व्यक्तींचे त्यांनी केलेले चित्रण अफलातून उतरले आहे.
गेल्या काही दशकांत आपल्याकडच्याही माध्यमांत आमूलाग्र बदल घडून आले. कालचे आज जुने व अप्रस्तुत वाटावे इतका या बदलांचा वेग होता. या क्षेत्राचा चेहरामोहराच जणू पालटून गेला. ही स्थित्यंतरे घडत असताना मेहता सजगपणे वावरत होते. माध्यम क्षेत्रातील ही उलथापालथ आजूबाजूला होत असताना त्यातील तंत्राचा नव्हे, पण मंत्राचा मात्र त्यांना निश्चितच अंदाज येत होता. मुद्रित माध्यम हा तर त्यांच्या जिवाभावाचा प्रकार. मुद्रित माध्यमाबाबत ते शेवटपर्यंत हळवे राहिले. पण इतर माध्यम प्रकारांचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी होती. या गदारोळात मुद्रित माध्यमांचा स्वर उंचा कसा राहील यासाठी ते जागरूक राहिले. डेबोनेर, इंडियन पोस्ट, इंडिपेंडंट व नंतर प्रदीर्घ काळ आऊटलुक या मुद्रित माध्यमांत शीर्षस्थानी राहून नवनवे प्रयोग करीत राहिले. मुद्रित माध्यमे संदर्भहीन होणार नाहीत ही त्यांची श्रद्धा होतीच व त्यासाठी करावयाच्या बाबी ते अथकपणे करीत राहिले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा शिरकाव होऊन ती आता रुळलेली आहेत. सारा आसमंत व्यापून टाकलेला आहे. त्यापासून फटकून राहणे टाळून मेहतांनी माध्यमाचे हे नवे स्वरूपही समजून-उमजून घेतेले.
‘एडिटर अन्प्लग्ड’मधील ‘टीव्ही अँड मी’, ‘कॉर्पोरेट्स अँड मीडिया’, ‘ड्रिंकिंग इन द लास्ट चान्स सलून’ या प्रकरणांत माध्यमांतील स्थित्यंतराविषयी विनोद मेहतांची मते मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. संदर्भ आणि दाखले देत त्यांनी या विषयाचे नेमके प्रश्न चर्चेला आणले आहेत. हे वाचताना एक बाब सतत अधोरेखित होते ती म्हणजे मुद्रित माध्यमाविषयीचे त्यांचे प्रेम व आस्था. माध्यमांच्या गदारोळात व स्पर्धेत मुद्रित माध्यमांचा ऱ्हास अपरिहार्य आहे हा नेहमीच चर्चेला येणारा मुद्दा मेहतांना कदापी मान्य नव्हता. ‘ज्या प्रमाणे दूरचित्रवाणीचा धोका होता, तेव्हा मुद्रित माध्यमाने त्यावर मात केलीच की. आता इंटरनेटमुळे नवे संकट उभे ठाकले आहे अन् त्यावर मात करायचा मार्ग नक्कीच सापडेल. आता हे होताना काहीजण जेरबंद होतीलही, मात्र मुद्रित माध्यमाचा सर्वथा ऱ्हास अशक्य आहे.’ असे नोंदवून ते कमालीचा आशावाद दाखवतात.
मेहता हा आशावाद बाळगून होते याचे कारण मुद्रित माध्यमाची जाण त्यांना पुरेपूर होती. मुद्रित माध्यमाचे असणे सर्वतोपरी कायम राहील असे त्यांना भाबडेपणाने वाटत नव्हते, तर त्यासाठी काय करावे याबाबत त्यांची निश्चित मते होती. काही बाबतींत या माध्यमाने कोणतीही तडजोड करता कामा नये असे त्यांचे सांगणे होते. अन् त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुद्रित माध्यमाची आशयगर्भता. मजकुराच्या आशयाबाबत अपरिमित श्रम घेतले गेले पाहिजेत, तोच जीवनरस आहे असे त्यांचे परोपरीने सांगणे होते. आशयाबरोबरच आजवरच्या शैलीला नवे आयाम दिले जावेत याची जाणीवही ते करून देतात. ‘मुद्रित माध्यमाला संपवण्याची ताकद बाहेरच्या कोणाकडे नाही, तर ती त्यातील लोकांमध्येच आहे.’ असे ते नोंदवतात तेव्हा हा धोका टाळण्याकामी किती दक्ष राहिले पाहिजे याचे भान आल्यावाचून राहात नाही.
एकूणच माध्यमाचा उद्योग बनत असताना, त्यात व्यवसायाच्या संधी दिसत असताना, किंबहुना त्या अनुषंगाने आत्मसात होऊ शकणाऱ्या प्रभावाच्या मिषाने या क्षेत्राचे झपाटय़ाने ‘कॉर्पोटरायझेशन’ होऊ पाहात आहे. याची चर्चा करताना मेहता एक धावता पटच मांडतात. भारतातील माध्यम व्यवसायात उद्योगपती व राजकारणी मंडळी दाखवत असलेल्या स्वारस्याची अनेक उदाहरणे येथे पाहायला मिळतात. यातील काही जणांनी या क्षेत्रात अंधपणे उडी घेतली. परिणामी काही अपवाद वगळता अशी उद्योगसमूह किंवा राजकारण्यांनी घेतलेली वा चालवलेली माध्यमे यशस्वी ठरलेली नाहीत हे ते आवर्जून लक्षात आणून देतात.
तरीही माध्यमांचे ‘कॉर्पोटरायझेशन’ हे जगातले वास्तव आहे हे मेहतांनाही मान्य होते. म्हणून भारतात याबाबत जे घडत आहे ते काही विपरीत असे नाही, असे सांगताना मात्र, माध्यमांचे काही मूठभरांच्या हातात केंद्रीकरण होणे ते अशुभ मानतात. विनोद मेहतांचा रोख अर्थात मुकेश अंबानी यांच्याकडे जितका आहे, तितकाच टाइम्स समूहाद्वारे समीर व विनित जैन ही जोडगोळी भारतातील माध्यमविश्व जणू पादाक्रांत करू पाहात आहेत या वास्तवाकडेही आहे.
‘कॉर्पोरेटायझेशन’ होत असताना अपरिहार्यपणे माध्यमांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उमटते. याकामी नियंत्रण ठेवणारी नियामक अशी ठोस व्यवस्था नसल्याची मेहतांना खंत होती. माध्यमांवर अंकुश ठेवावे अशी अपेक्षा असलेली ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ ही यंत्रणा दात नसलेल्या वाघासारखी कुचकामी ठरत आहे, असे त्यांचे ठाम मत होते. ही यंत्रणा संदर्भहीन ठरत आहे, कारण तिला कोणतेच अधिकार नाहीत. एकीकडे माध्यमे चहूबाजूंनी फोफावत असताना त्यांच्यावर नियंत्रणाची गरजही तितकीच आवश्यक आहे. पण हे करणार कोण? यावर मेहतांनी सुचवलेला पर्याय आहे तो स्वयंशिस्तीचा. काही जबाबदार वृत्तसमूहांनी स्वत:पुरती आचारसंहितेची चौकट आखून घेतली आहे. हे स्वागतार्ह असले तरी तेवढय़ाने भागणार नाही असे नमूद करून मेहता ‘प्रेस कम्प्लेंट्स कमिशन’ची कल्पना मांडतात. माध्यमविश्वाचे नियमन करणारी स्वतंत्र व स्वायत्त अशी यंत्रणा अस्तित्वात यावी व तिच्या उभारणीत देशातील प्रमुख इंग्रजी व भाषिक वृत्तपत्रांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती.
माध्यमकर्मी असल्याने आत्मकथनाचा मोठा भाग माध्यमचर्चेने व्यापला जाणे साहजिकच आहे. विनोद मेहतांनी तो ना आक्रस्ताळी होऊ दिला ना रटाळपणे रेटत नेला. गेल्या ४० वर्षांचा आपला पत्रकारितेतील प्रवास वाचकाशी गप्पा माराव्यात अशा सहजतेने सांगितला आहे. आपल्यावर कोणाचा प्रभाव आहे, असा प्रश्न मेहता स्वत:लाच विचारतात आणि उत्तरही कोणाचाच नाही, असे देतात. मेहता म्हणतात, मी कोणाला हिरो मानणे कधी केले नाही. कारण सर्वाचेच पाय मातीचे असतात. त्यापेक्षा काहीजणांविषयी ममत्व, आदर असणे कधीही चांगलेच. मेहतांच्या या यादीत अनेकजण असतील. पैकी सहा जणांबाबत पुस्तकात त्यांनी खूप बहारदाररीत्या लिहिले आहे. सिनेपत्रकार ख्वाजा अहमद अब्बास, लेखक रस्किन बाँड, विनोदी अभिनेता जॉनी वॉकर, दिवंगत पत्रकार खुशवंतसिंग, बंडखोर लेखिका व मैत्रीण अरुंधती रॉय व सचिन तेंडुलकर या सहा जणांचा चाहता असल्याचे सांगताना यापैकी प्रत्येकाविषयी मार्मिक टिपण्णी करतात. जॉनी वॉकरने लोकांना केवळ हसविलेच नाही तर विनोदाची पातळी कधीही खाली ढळू न देता एका मोठय़ा कालखंडातील जनतेचे जगणे सुसह्य़ केले असे मेहता सांगतात, तसेच सचिनने भारत सुपर पॉवर कसा बनू शकतो हे निर्विवादपणे दाखवून दिले हे नमूद करतात. अरुंधती रॉय नसती तर आपल्याला ती शोधून काढावी लागली असती, अशी मार्मिक टिप्पणी ते करून जातात. खुशवंतसिंग यांच्या धाडसाबाबत आदर व्यक्त करताना तसे धाडस दाखविण्यात आपण कमी पडल्याची कबुली देतात. मुंबईत इंडिपेंडंटचे संपादक असताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता सीआयएचा हस्तक असल्याची बातमी दिल्याचे व नंतर ती अंगाशी आल्यानंतर रातोरात मुंबई सोडावी लागल्याचा संदर्भ देताना मेहता त्या नेत्याच्या नावाचा (स्व. यशवंतराव चव्हाण) उल्लेख मात्र टाळतात.
मेहतांच्या पत्रकारितेतील अलीकडेच गाजलेले प्रकरण म्हणजे २-जी घोटाळ्याशी संबंधित नीरा राडियाकांड. याविषयी मेहतांनी पुस्तकात एका स्वतंत्र प्रकरणच दिले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर येथल्या कॉर्पोरेट विश्वाला किती जबर धक्के बसले याची झलक ते वाचताना येते. या गौप्यस्फोटामुळे रतन टाटा यांची खप्पामर्जी कशी झाली हे त्यांनी विस्ताराने मांडले आहे. रतन टाटा यांचा गैरसमज दूर करण्याची व त्यांच्याबरोबर एकदा चहापान करण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. आता ते शक्य नाही.
नुकत्याच झालेल्या दिल्लीतील निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी असाधारण यश मिळवले. मेहता यांना त्याचा अंदाज आला नसावा. कारण केजरीवाल हे हिरोचे झीरो कसे होत जात आहेत यावर त्यांनी एक प्रकरण खर्ची घातले आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर दिल्लीतील निवडणूक निकालाने मेहता यांचे विश्लेषण अखेर फोलच ठरले. मात्र, केजरीवालांनी दिल्लीतील व्हीआयपी संस्कृतीला जोरदार धक्के दिले हे ते मान्य करतात.
नरेंद्र मोदी यांच्याबाबत मात्र मेहता थेट काही सांगत नाहीत. मोदींवरील प्रकरणाला ‘मोदींना समजून घेताना’ असेच ते शीर्षक देतात. मोदींबाबतची त्यांनी केलेली एक टिप्पणी मात्र उल्लेखनीय ठरावी. ‘मोदी याचे व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचे आहे. ते एकाकी आहेत अन् त्यांना तसे राहणे आवडत असावे. ते स्वत:विषयी काही सांगत नाहीत. मात्र, आपल्या नेत्याविषयी काही तरी ठाम माहिती असावी ही लोकांची अपेक्षा असतेच. मोदींनी अजून तरी त्यांच्याविषयी लोकांना थांग लागू दिलेला नाही.’
गेल्या ४० वर्षांचा विनोद मेहतांनी मांडलेला पट जितका माहितीपूर्ण आहे, तितकाच लिखाणाची शैली म्हणूनही प्रवाही आहे. तो वाचकाला अनुभवसंपन्न करतानाच भवतालाकडे पाहण्याची एक पारखी नजरही बहाल करतो.
* ‘‘एडिटर अन्प्लग्ड- मीडिया, मॅग्नेट्स, नेताज् अँड मी’
लेखक- विनोद मेहता
प्रकाशक – पेंग्विन व्हायकिंग
पृष्ठे- २८१ किंमत – ५९९ रु.