भ्रष्टाचारास विरोध ही जणू आमचीच मक्तेदारी आहे आणि देशाची राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्यासाठीच आमच्या पक्षाचा अवतार आहे, असा भाजपचा आव असायचा. परंतु सध्या देशात गाजणाऱ्या दोन महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणांत या पक्षनेतृत्वावर मूग गिळून बसायची वेळ आली आहे, त्यावरून भाजपचे काँग्रेसीकरण फार वेगात होत असल्याचा निष्कर्ष कोणी काढल्यास त्यास दोष देता येणार नाही. काँग्रेसवृक्षाचे खोड असलेल्या गांधी घराण्याचे जावई चि. रॉबर्ट वडेरा यांचे गृहबांधणी उद्योग हा दिल्लीत मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. घरबांधणी क्षेत्रातील बलाढय़ अशा डीएलएफ या कंपनीच्या सहयोगाने त्यांनी जे गृहोद्योग केले त्यास गृहकलहाचीही जोड आहे, असे म्हणतात. यातील खरे-खोटे सोनियाच जाणे. पण गृहकलह हा झाला त्यांचा खासगी मुद्दा. त्या गृहकलहात अन्य कोणास पडायचे काहीच कारण नाही. परंतु या चि. रॉबर्ट यांनी गांधी घराण्याच्या नावावर जे उद्योग केल्याचा आरोप आहे त्याची चर्चा आणि अर्थातच शहानिशाही व्हायला हवी. जी कंपनी मुळातच डोक्यावर कर्ज वाहत आहे, त्या कंपनीने चि. रॉबर्ट यास बिनव्याजी कर्ज दिले असेल वा अतिस्वस्तात मत्ता दिली असेल तर त्या संदर्भात प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे आणि त्याची उत्तरे मिळण्याची अपेक्षाही तितकीच साहजिक आहे. चि. रॉबर्ट यांचे व्यवहार हे वैयक्तिक पातळीवर झालेली देवाणघेवाण आहे, सबब विरोधकांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण नाही, असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे. त्या पक्षात नेत्यांना गांधी घराण्याच्या चरणी निष्ठेच्या जोडीला शहाणपणही वाहावे लागते. तेव्हा त्यांची ही भूमिका त्यांच्या संस्कृतीचाच भाग झालेल्या लाळघोटेपणाशी निगडित आहे आणि त्यात काहीही आश्चर्य नाही. काँग्रेसजनांसाठी चाड म्हणजे काय हा प्रश्नच असतो हे इतक्या वर्षांच्या राजकारणात अनेकदा दिसून आलेले आहे. आताही तेच होत आहे. एका बाजूला चि. रॉबर्ट यांचा व्यवहार हा खासगी मामला आहे अशी भूमिका हा पक्ष घेतो तर त्याच वेळी या पक्षाचे महारथी सोनिया गांधी यांचा जावई हा काँग्रेसचाच घरजावई असल्याचे मानून त्याच्या सरबराईसाठी शर्यतीत असल्यासारखे धावून जाताना दिसतात. हे सगळेच काँग्रेस संस्कृतीचा भाग आहे आणि त्यात नवीनही काही नाही. परंतु भाजपचे काय? असे म्हणतात की गांधी घराण्याच्या चरणी निष्ठा वाहिलेली असूनही या घराण्याने संकटकाळात आपल्याला मदत केली नाही याचा राग येऊन कोणा राष्ट्रकुलदीपकाने चि. रॉबर्ट यांच्या गृहउद्योगांची माहिती स्वहस्ते विरोधकांच्या हाती दिली. हेतू हा की विरोधक चि. रॉबर्ट यांच्या प्रश्नावर काँग्रेसच्या सर्वेसर्वा गांधी घराण्यास धारेवर धरतील. भाजपचे अध्यक्ष नीतीनभाऊ गडकरी यांच्याकडे चि. रॉबर्ट यांच्या या कथित घोटाळय़ाचा तपशील ज्येष्ठ अशा ‘कल’मी काँग्रेसजनांनीच दिलेला होता. परंतु आपल्या एरवीच्या सवयीप्रमाणे त्यावर राळ उडवून देण्याच्या ऐवजी गडकरी यांनी हा दारूगोळा आपल्याच ‘माडी’वर लपवून ठेवला. अखेर स्वघोषित भ्रष्टाचार निर्मूलक अरविंद केजरीवाल हे काँग्रेसमधील या राष्ट्रकुलदीपकांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी चि. रॉबर्ट याचे गृहोद्योग चव्हाटय़ावर मांडले. खुद्द गडकरी यांनीच चि. रॉबर्ट याचे उद्योग आपल्याला माहीत होते, असे मान्य केल्याचे म्हटले जाते.
तसे असेल तर गडकरी यांचे या प्रश्नावरचे मौन बरेच प्रश्न निर्माण करणारे आहे. चि. रॉबर्ट याच्या दिल्ली आणि परिसरातल्या गृहउद्योगावर भाजपनेतृत्वाचे मौन हा अपवाद आहे असे म्हणावे तर महाराष्ट्रातही तेच. काकांविरोधात काढलेली तलवार न झेपल्यामुळे तापाने फणफणलेले अजित पवार असोत की पाटबंधारे प्रकल्पात आर्थिक तटबंदी लावण्यासाठी विख्यात असलेले सुनील तटकरे असोत की महाराष्ट्र सदनकार छगन भुजबळ असोत. भाजप नेतृत्वाचे मौन हे अनेक प्रश्नांना जन्म देणारे आहे. याच गडकरी यांनी भुजबळ यांच्या विरोधात अब्दुल करीम तेलगी याच्या मुद्रांक घोटाळय़ाप्रकरणी जोरदार आघाडी उघडली होती. आता तेच गडकरी त्याच भुजबळ यांच्या विरोधात सोईस्कर मौन पाळून आहेत. आपण राज्यातील भ्रष्टाचाराचे निर्दालन करणारा एक बुलडोझरच आहोत, अशी प्रतिमा गडकरी यांनी राज्यात निर्माण केली होती. परंतु हा बुलडोझर आता भ्रष्टाचाराच्या टोलेजंग इमारती सोडून छोटय़ामोठय़ा झुडपांना चिरडण्यात मग्न झाल्याचे दिसते. त्याची कारणे प्रामुख्याने दोन असू शकतात. एक म्हणजे, गडकरी आणि एकंदरच भाजपची कातडी ही राजकारणात पुरेशी निबर झालेली असावी. किंवा दुसरे म्हणजे, राजकारणात प्रगती‘पूर्ती’च्या शिडय़ा चढताना अनेकांची मदत घ्यावी लागते, तेव्हा भ्रष्टाचाराचे इतके काय, याचा साक्षात्कार गडकरी यांना झाला असावा किंवा असेही असेल की सत्ताकारणात अनेकांचे ‘संचित’ साठवत गेल्याने गडकरी यांना या अशा संचेतीविरोधकांच्या आरोपांची फिकीर नसावी. कारणे काहीही असोत, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे या प्रचंड घोटाळय़ात गप्प बसणे हे काँग्रेसला पर्याय म्हणून त्या पक्षाकडे पाहणाऱ्यांना नाराज करणारे आहे. राज्यात भुजबळ हे राष्ट्रवादीच्या मराठा महासंघात एकटे पडले आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांची हीच अवस्था भाजपमध्ये आहे. भुजबळ आणि मुंडे यांना एकत्र आणणारा घटक म्हणजे त्यांचे ओबीसी राजकारण. या ओबीसीच्या फलाटावर मुंडे आणि भुजबळ मांडीला मांडी लावून बसतात. तेव्हा भुजबळ यांच्या कथित घोटाळय़ावर मुंडे गप्प बसले तर ते समजण्यासारखे आहे. परंतु गडकरींचे काय? भुजबळ हा स्थानिक प्रश्न आहे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाने त्यावर बोलणे योग्य नाही, असा युक्तिवाद ते करू शकतील. परंतु दिल्लीत राहून चि. रॉबर्ट यांच्या प्रश्नावरही गडकरी मौनच बाळगून आहेत, त्यामागचे गौडबंगाल काय? वास्तविक सत्तासोपानावर चढण्यास आतुर झालेल्या भाजपसाठी सत्ताधाऱ्यांच्या वस्त्रहरणासाठी इतकी मोठी संधी मागूनही मिळणार नाही. परंतु भाजप अध्यक्ष तर मोक्याच्या प्रसंगी आपली तलवार म्यान करून बसले आहेत, अशी विचित्र अवस्था त्या पक्षाची झालेली आहे. असेही म्हणतात की केजरीवाल यांचा पुढील तोफगोळा भाजपच्या अध्यक्षांच्या दिशेने येणार आहे. खुद्द केजरीवाल यांनीच तसे सूचित केले आहे. गडकरी यांनाही त्याची कल्पना असावी. तसे झाल्यास भाजपची आणि त्यातही गडकरी यांची अवस्था अधिकच केविलवाणी होईल. याचे कारण असे की गेल्याच आठवडय़ात याच केजरीवाल यांना त्यांच्या व्यासपीठावर भाजपच्या दिल्लीतील कनिष्ठ नेत्यांनी साथ दिली होती. उद्या केजरीवाल यांच्याकडून गडकरी यांच्यावरच आरोप झाल्यावर हे भाजप नेते काय करणार?
लोकशाही व्यवस्थेत जनतेस विरोधक आश्वासक वाटणे आवश्यक असते. भाजप नेतृत्वाचे वागणे असेच राहिल्यास तो पक्ष आश्वासक न वाटण्याचा धोका संभवतो. राम मंदिरासाठी आंदोलनाची हवा तापवायची आणि पुढे त्या प्रश्नाचे नावच काढायचे नाही आणि भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात आंदोलने करायची आणि नंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा सोडूनच द्यायचा, असे भाजप अलीकडच्या काळात वारंवार करीत आलेला आहे. राज्यात भाजपची निवडणूक धुरा गोपीनाथ मुंडे यांच्याकडे येत असताना तर याची प्रकर्षांने जाणीव अनेकांना होईल. शरद पवार यांच्या विरोधात रान उठवणारे मुंडे सहकारातील अर्थकारणासाठी पवार यांचेच साथीदार कसे बनले याकडे सहजपणे डोळेझाक करता येणार नाही. तेव्हा गोपीनाथराव काय किंवा गडकरी काय, भ्रष्टाचाराविरोधातील हे एकेकाळचे गडबडकरी आता गप्प राहणार असतील तर ते चांगले लक्षण म्हणता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा