गणपतीचे दिवस संपताना विसर्जनाचा सोहळा असतो. हे ठरल्या दिवशी विसर्जन-सोहळय़ाचे कौतुक सर्वात मोठा सण म्हणून मिरवणाऱ्या दिवाळीच्या वाटय़ास नाही. बुद्धिदाता बाप्पा गावाला गेला म्हणून चैन पडेना अशी भावनिक स्थिती होते, तसे सुखसमृद्धीचा उत्सव संपल्यावर होत नाही. भाऊबीजेच्या रात्रीच, उद्यापासून रोजचा दिनक्रम सुरू करायचा आहे, याचे आडाखे पक्के असतात! दिवाळीदरम्यान लक्ष्मीपूजन आणि पाडवा यांच्या मध्ये एखादी अमावास्या आली तर तो ‘भाकड दिवस’ म्हणणाऱ्यांना दिवाळीनंतरचे दिवस भाकड वाटत नाहीत. वाटले, तरी तसे म्हणायचे नसते. दिवाळीचे दिवस आनंदाचे आहेत असे सर्वानीच ठरवलेले असते आणि बाकीचे दिवस हे आनंद आणि दु:ख, आशा आणि निराशा यांच्या मधलेच असणार, हे प्रत्येकास माहीत असते. आशेची एखादीच पणती तेवत ठेवली तरी पुरे, एवढीच मध्यमवर्गाची अपेक्षा. यासाठी आपापल्या आशा-निराशांमध्ये फार चढउतार होऊ नयेत, फार हेलकावे बसू नयेत असा मध्यममार्ग अनेक जण स्वीकारत असतात. मग इतरांच्या आयुष्यांमधले चढउतार, त्यांच्या आनंद आणि दु:खाचे वा जीवन-मरणाचे हिंदोळे यांची जाणीव मध्यममार्गी मंडळींना देण्यासाठी सकस ललित साहित्य वा उत्तमोत्तम चित्रपटांसारख्या कलाकृतींपासून ते दररोज काही ना काही पुढय़ात वाढणाऱ्या प्रसारमाध्यमांपर्यंत अनेक घटक आपापली भूमिका बजावत असतात. हे घटक ज्या आनंद-दु:खाचे, जीवन-मरणाचे चित्रण करतात त्यामुळे सामान्य माणसाचा आशावाद सहसा जिवंत राहील, असे पाहिले जाते. पण माध्यमे काय वा विविध कलाप्रकार काय, जगण्यातल्या अनुभवांचे फार तर प्रतिबिंबच त्यांत पडू शकेल, इतकीच त्यांची उडी. रात्रंदिन आम्हां कोणत्या युद्धाचा प्रसंग आहे, हे ज्याचे त्याला कळते. आपण खमके आहोत असे ठरवूनच जगणारी कित्येक माणसे, कैक कुटुंबे.. ‘मनाची तयारी ठेव’ यासारख्या शब्दांनी एकमेकांना जगण्याचा आधार देणारी. अशा कुटुंबांतले वडीलधारेदेखील ‘तुझे तू ठरव’ अशी मोकळीक देता देता सुखदु:खांच्या जबाबदारीची जाणीव पुढल्या पिढीला देत असतात. मी फक्त मार्गदर्शक, असे या वडीलधाऱ्यांचे सांगणे. वडीलधारे मार्गदर्शकच आहेत, माणूसच आहेत, हे पुढल्या पिढीनेही ओळखणे हा खरा मध्यममार्ग!
पण नेहमीच असे होते, असेही नाही. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळणारे नाही, हे संकट वाटू लागते. अशा संकटाचा अंदाज आलेला असतानासुद्धा आशा सुटून जाण्याचे क्षण येतात. निराशा वाईट आणि आशा चांगली हे सर्वानी ठरवलेले असते. मरण नको, दुख नको, असेही मनोमन वाटत असते. ही आसक्ती असते जगण्याची. फक्त स्वत:च्या किंवा आपल्या माणसांच्याच नव्हे, तर एकंदरीत जिवंतपणाची. हा जिवंतपणा तरी का हवा असतो, असा प्रश्न विचारणे हे तत्त्वचिंतकांचे आणि तत्त्वज्ञांचे काम. ते त्यांनी गेल्या काही शतकांपासून यथाशक्ती केले आणि त्या सर्वाना उत्तर सापडले ते साधेच वाटेल.. आशा आणि जिवंतपणा यांचा संबंध आहे, असे या उत्तराचे सार! हे तर सर्वानाच माहीत असते, मग तत्त्वज्ञ कशाला हवे? आशा नेहमीच अमूर्त असते आणि मूर्ती पाहून ती कशी आहे हे जसे चटकन सांगता येते तसे आशेसारख्या अमूर्त गोष्टीबद्दल सांगता येत नाही, म्हणून तत्त्वज्ञांचा आधार हवा. आशा आणि अपेक्षा, आशा आणि ध्येय, आशा आणि स्वप्न एवढय़ाच बाजू दाखवून न थांबता त्यांनी पुढे आशा आणि दैववाद, आशा आणि प्रयत्नवाद, निरीश्वरवादी विचारांमध्ये आशेचे स्थान आदी मुद्दय़ांची चर्चा केली. विचारविश्व मर्यादित ठेवण्याचे फायदे सामान्य माणसाला कळतात आणि मिळतातसुद्धा; पण आपले विचार नेमके कोठे आहेत, हे जोखून पाहण्याची आणि विचार अधिक लखलखीत करण्याची संधी तत्त्वचिंतनाचा आधार घेतल्यास मिळू शकते. हा आधार उपलब्ध असतो, पण तो रेडीमेड नसतो. ज्याचा त्याला, जिचा तिला शोधावा लागतो. मार्गदर्शक ते हेच, असे न मानता हे सारे रस्त्यांवरचे दिवे आहेत आणि आपला रस्ता आपण शोधायचा आहे, हे ठरवल्याशिवाय तत्त्वचिंतकांनी वेळोवेळी जी चिकित्सा केली, तिचा फायदा कुणालाच मिळत नाही. आपले नाही, असे कुठलेच तत्त्वचिंतन असू शकत नाही. जे मुळात वैश्विक आहे, माणसाचा विचार माणूस म्हणूनच करणारे आहे आणि हा फ्रेंच, तो भारतीय, त्यात हा महाराष्ट्रीय आणि हा बिहारी असे कप्पे पाडणारे नाही, ते सर्वानाच उपयोगी पडणार. पण होते असे की, हा उपयोग माहीत असूनही तो प्रत्यक्ष करण्यासाठी माणसे आपणहून पुढे येत नाहीत. आपले विचार कुठे आहेत- आपल्याला जे ‘योग्य’ वाटते ते खरेच योग्य आहे का, हे जोखून पाहण्यासाठी एक पट आखून उलगडलेला आहे.. तरीही, त्याकडे न पाहता आपणच खरे ही खात्री कायम राहू शकेल, याचे फसवे समाधान बहुतेकांना हवे असते!
आशा सुटून जाण्याचे क्षण सामान्य माणसाच्या आयुष्यात येतात आणि त्याआधी आशा आपणच फार ताणतो आहोत याची जाणीव सामान्य माणसाला होते, याचे कारण आपापल्या आशेचे रूप त्याने तत्त्वचिंतनाच्या उपलब्ध आरशात पाहिलेले नसते. तसे पाहणे त्याला नको वाटत असते. तत्त्वचिंतकांनी वापरलेली भाषा कठीण, हे यामागचे पहिले कारण. पण महानुभाव, जातककथा यांपासून ते आजच्या स्लावोय झिझेकपर्यंत अनेकांची तत्त्वचिंतनाची भाषा सोपीच आहे, हे दिसत नाही; कारण हे सारे आपल्या काळाला, आपल्या धर्मश्रद्धेला दूरचे वाटतात. मुल्ला नसिरुद्दीनपासून अनेकांच्या कथा सांगणारे ओशो मात्र जवळचे वाटतात, कारण तयार ताट वाढून हवे असते! अशी तयार ताटे तत्त्वचिंतनाच्या क्षेत्रात हल्ली आली, ती राजकीय-सामाजिक चिंतनाच्या क्षेत्रात तर फारच अगोदरपासून आहेत. किंबहुना, जगभरची माणसे त्या त्या वेळी राजकीय चिंतनाचे तयार ताट वाढणाऱ्यालाच नेतेपद देऊन टाकतात, हा इतिहास हिटलर आणि मुसोलिनीच्याही आधीचा- अगदी ग्रीसच्या सिकंदरापर्यंत जाणारा आहे. आशा जिवंत ठेवल्याचे जे फसवे समाधान फार त्रास न घेता मिळते, ते देण्याचे काम ही तयार ताटे करीत असतात. आशा आणि निराशेचा नव्हे, आशा आणि रेडीमेड आशावाद यांचा हिंदोळा सुरू होतो. आशेला सकारात्मकतेचे- ऑप्टिमिझमचे जे अधिष्ठान हवे, ते रेडीमेड आशावादाला असू शकत नाही. तरीही आमचेच राज्य येणार, आम्हीच राज्य करणार, इतरांचा नायनाट होणार आणि आमचे भले होणार, अशी स्वप्ने या रेडीमेड आशावादाच्या आधारे पाहिली जातात. असा आशावाद देणारा नेताच संकटग्रस्त आहे असे पाहिल्यावर माणसे वेडीपिशी होतात. नेत्याच्या आदेशाने रस्त्यावर येण्याची सवय असलेली ही माणसे मग कुणाच्याही आदेशाविना रस्त्यावर येतात.
आशा सुटून जाते आहे म्हणून वेडेपिसे होण्याचे क्षण कोटय़वधी सामान्य माणसांच्या आयुष्यात कधीही आलेले नसतील. कुणाचेही अनुयायित्व न पत्करता, अध्यात ना मध्यात पद्धतीने आपापला मध्यममार्ग शोधणारेच अनेक जण असतात. दिवाळी संपणारच, गणपतीबाप्पादेखील ठरलेला मुक्काम संपल्यावर आपल्या घरून जाणारच, हे त्यांनी ध्यानात घेतलेले असते आणि सुखदु:खाच्या हिंदोळय़ावर झुलताना आपापल्या आशेची दोरी आपणच पक्की करायला हवी, हेही त्यांना माहीत असते. ‘अती ताणू नये,’ यासारखे साधेच तत्त्व अशी माणसे जगण्यावरल्या प्रेमालाही आपसूक लागू करत असतात!
हिंदोळय़ावर..
गणपतीचे दिवस संपताना विसर्जनाचा सोहळा असतो. हे ठरल्या दिवशी विसर्जन-सोहळय़ाचे कौतुक सर्वात मोठा सण म्हणून मिरवणाऱ्या दिवाळीच्या वाटय़ास नाही. बुद्धिदाता बाप्पा गावाला गेला म्हणून चैन पडेना अशी भावनिक स्थिती होते, तसे सुखसमृद्धीचा उत्सव संपल्यावर होत नाही.
First published on: 17-11-2012 at 12:13 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial on hope and liveness