सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख जिवानिशी गेले तरी त्याबद्दलची चर्चा जातींच्या आधारेच झाली. जातीच्या या विळख्यातून राज्याची मुक्तता करायला प्राधान्य हवे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र सध्या खूपच तापलेला आहे. लोकसभा निवडणुकांपासून, खरे तर त्याहीआधी २०१४ साली, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आरूढ झाल्यापासून ही तापमानवाढ सुरू झाली. आधी न सुटणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला आणि नंतर त्याचा गुंता अधिकच वाढवण्याचा प्रयत्न झाला. हा मुद्दा काढण्यामागे, आश्वासन देण्यामागे आणि अर्थातच तो प्रश्न न सुटण्यामागेही राजकारण हेच कारण होते. नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपस कात्रजचा घाट दाखवल्यानंतर या तापमानवाढीचा वेग वाढला.

याच काळात केंद्रीय यंत्रणांच्या डोळ्यांवर महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांचा कथित भ्रष्टाचार येऊ लागला आणि इतका काळ केवळ सामाजिक कारणांनी होत असलेली तापमानवाढही राजकीय बनू लागली. हे राजकीय तापमान इतके वाढले की उद्धव ठाकरे यांचे साथीदार त्या उष्णतेने वितळू लागले आणि अखेर थंडाव्यासाठी भाजपच्या कळपात दाखल झाले. पाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही हेच घडले. अजितदादा आणि त्यांचे काही कंत्राटदारस्नेही सवंगडी केंद्रीय यंत्रणांच्या उष्णतेने पार पाघळले आणि तेही अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सवंगड्यांप्रमाणे भाजपशी हातमिळवणी करते झाले. या सत्तासंतुलनात राजकीय तापमान काही प्रमाणात कमी झाले खरे; पण हे वाढते तापमान मग सामाजिक क्षेत्रास तापवू लागले. हे सर्व केवळ उष्णता वाढण्यापुरतेच मर्यादित राहिले असते तर एकवेळ त्याकडे काणाडोळा करता आला असता. पण गेले काही महिने ही तापमानवाढ जीवघेणी ठरू लागली असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अशा वेळी त्याची दखल घेऊन उपाय सुचवणे आवश्यक ठरते.

विशेषत: मराठवाड्यातील एकट्या बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शेकडोंची हत्या झाल्याची माहिती विधानसभेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच दिली गेली असेल तर ही तापमानवाढ किती गंभीर आहे; हे लक्षात येईल. सध्या संतोष देशमुख प्रकरण गाजते आहे. या सरपंचाचे मरण, त्यास जबाबदार असलेले आरोपी अशा मुद्द्यांस जातीय वळण लागलेले आहे आणि त्यातून मराठा-ओबीसी दुभंग अधिक तीव्र झालेला आहे. त्याच परिसरात परभणीत सोमनाथ सूर्यवंशी याचाही जीव गेला. देशमुख हत्येस राजकीय कंगोरे असल्याने त्यावरील चर्चा आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा यामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात राहिले.

सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू दुर्लक्षित राहिला. यातून एक प्रश्न उभा ठाकतो : मरणाऱ्याचे सामाजिक स्थान काय यावरून त्या मरणाऱ्याची दखल घेतली जाणार काय? कारण सूर्यवंशी मागास समाजाचा. म्हणजे त्या समाजाचा आक्रोश व्यवस्थेच्या कानी पडेपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही, असा त्याचा अर्थ. बीडमधील अन्य हत्यांचा तपशील समोर आलेला नाही. त्यामुळे त्या गुन्ह्यांस जातीपातीची किनार होती किंवा काय, असल्यास मारले गेले ते कोणत्या जातीचे आणि मारणाऱ्यांची जात काय इत्यादी अलीकडच्या काळात अमूल्य ठरलेल्या मुद्द्यांची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. कदाचित ती होणारही नाही. कदाचित सूर्यवंशी याचे मरण ज्या कारणांनी दुर्लक्षित राहू दिले गेले ती वा तशीच काही कारणे यातील बहुतेकांच्या मृत्यूमागे असतीलही. किंवा त्या सर्व मरणांस राजकीय परिमाण नसेल. काहीही असो. पण या असल्या घटना आधुनिक इत्यादी महाराष्ट्रात कमालीच्या वेगाने वाढल्या असून राज्याने घेतलेले हे वळण अत्यंत धोकादायक ठरते.

याचे कारण आजच्या महाराष्ट्रात जात या घटकास आलेले, दिले जात असलेले अतोनात महत्त्व. एखादा गुन्हा असो वा अन्य काही. पहिला प्रश्न उपस्थित केला जातो तो जातीचा. गुन्ह्यातील बळीची जात कोणती आणि आरोपी कोणत्या जातीचे याच्या चौकशा या आता सर्रास होतात. ही घृणास्पदता इतकीच मर्यादित नाही. या गुन्ह्यांवरील प्रतिक्रियाही जातीच्या परिघातच असतात. म्हणजे गुन्ह्यातील बळींचे जातभाई फक्त त्याबद्दल व्यक्त होणार आणि आरोपीचे समजातीय त्याबाबत व्यक्त होणार. हे व्यक्त होणेही न्याय्य असते वा माणुसकीच्या किमान तत्त्वांवर असते असे नाही. अनेकदा ‘त्या जातवाल्याला धडा शिकवला हे बरे झाले’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात आणि बळी हा अमुक-तमुक जातीचा असल्याने त्याच्यावर ही वेळ आली, अशी टिप्पणी सहजपणे केली जाते. हे कमालीचे दुर्दैवी आहे. हा मुद्दा केवळ गुन्हा/ आरोप इतपतच मर्यादित राहिलेला नाही.

जगण्याच्या सर्व अंगास सद्या:स्थितीत जात या घटकाचा विखारी विळखा पडलेला असून त्यातून राज्याची मुक्तता करणे हे सर्वांचे प्राधान्य असायला हवे. कलाकार आणि त्याची अभिव्यक्ती, लेखक- प्रकाशक- वाचक- टीकाकार आदी सर्व मुद्द्यांचा विचार केवळ जातीच्या अंगाने होताना दिसतो. हे प्राक्तन आधुनिक कवींपुरते मर्यादित नाही. आपण महाराष्ट्राच्या उज्ज्वल संतपरंपरेस जातीच्या कोंदणात डांबणे सुरू केले त्यास बराच काळ लोटला. याच महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अतुलनीय बुद्धिवंताने न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या बौद्धिक उंचीचा आदराने जाहीर गौरव केला आणि याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा पाया संतपरंपरेने घातला असे न्या. रानडे यांनी लिहिले. जे सहिष्णू वातावरण विसाव्या शतकात प्रत्यक्षात होते ते आज एकविसाव्या शतकात स्वप्नवत झालेले आहे. म्हणजे या काळात प्रगतीऐवजी आपली अधोगतीच झाली, असा त्याचा अर्थ. ‘वरच्या’ बाजूने धर्माचा दुभंग आणि येथे जातीचा, असे आपले वास्तव.

परंतु त्यामुळे आपण आर्थिक प्रगतीत किती मार खात आहोत याचे भान आपणास नाही. तमिळनाडू सर्वार्थाने महाराष्ट्राच्या निम्मा. परंतु सकल राष्ट्रीय उत्पादन वा दरडोई कमाई या आघाडीवर तो आज महाराष्ट्राशी स्पर्धा करत असून तो आपल्या राज्यास कधीही मागे टाकेल अशी परिस्थिती आहे. आज दक्षिणेतील राज्ये ही अत्यंत स्पर्धात्मकता आणि कमालीची कार्यक्षमता, प्रशासकीय लवचीकता दाखवत असताना महाराष्ट्र मात्र जाती/ पातीची, भाषेची पोकळ अभिमानगीते गाण्यात धन्यता मानताना दिसतो. इतिहासाचा अभिमान जरूर असावा. राज्याचा इतिहास अभिमानास्पद निश्चितच. पण ऐतिहासिक अभिमान मिरवण्यासाठी वर्तमानही इतिहास घडवू शकेल अशा दर्जाचे हवे. त्या आघाडीवर बोंब असेल तर त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून मग केवळ ऐतिहासिक गौरवगाथांत रमणे बोकाळते.

सध्याच्या महाराष्ट्रात तेच सुरू आहे. राज्याच्या सार्वत्रिक प्रगतीसाठी यात बदल व्हायला हवा असे या राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांस वाटत असेल तर त्वरेने पावले उचलायला हवीत. ही जातीपातीची विषवल्ली दूर करणे लगेच शक्य नाही. पण निदान तिचा डंख कमी व्हावा यासाठी तरी हालचाल व्हायला हवी. त्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय, सर्वसमाजीय वा सर्वधर्मीय चर्चा करावी आणि काही एक मार्ग काढण्यासाठी पावले टाकावीत. अन्यथा हे असेच सुरू राहिले तर या राज्याचे काही खरे नाही, हे निश्चित. वसुंधरेचे तापमान वाढते आहे ते पृथ्वीभोवतीचा ओझोन थर पातळ झाल्यामुळे. त्याची जाडी पुन्हा वाढावी यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. ते आव्हान अवघड. महाराष्ट्र गरम झालेला आहे तो या राज्यास सुरक्षित ठेवणाऱ्या समंजसता आणि सहिष्णुता या गुणथरांची जाडी कमी झाली म्हणून. ती वाढवणे ओझोन थर पुन्हा जाड करण्याइतके अवघड नाही. त्यासाठी शहाणपणाचे वारे तेवढे पुन्हा एकदा या राज्यात वाहायला हवेत. डोकी शांत करण्यासाठी जरा हवा येऊ द्यायला हवी.