रोजचे रखरखीत वास्तव जगणाऱ्यांना खरे तर जगात अद्भुुत वगैरे काही असते किंवा घडू शकते, यावर विश्वासच ठेवता येत नाही. पण नुकतेच १९ मार्चच्या पहाटे अवघ्या जगाने एक अद्भुत बघितले. होय, अद्भुतच. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या आणि नऊ महिने (२८६ दिवस) त्रिशंकूसारखे तिथेच अडकून पडलेल्या आपल्या दोन अंतराळवीरांना अमेरिकेच्या नासाने स्पेसएक्सच्या सहकार्याने ज्या पद्धतीने सुखरूप पृथ्वीवर परत आणले ती खरोखरच अद्भुत या कोटीमधलीच घटना होती. ४२० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतराळ स्थानकातून १७ तासांचा प्रवास करून स्पेसएक्सची ‘ड्रॅगन’ ही कॅप्सूल किंवा अंतराळकुपी ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी, चारही पॅराशूट्स नियोजनाप्रमाणेच उघडून अलगद समुद्रात उतरली. अंतराळयात्रींना परत आणण्याची ही रीत जुनीच, पण इतके दिवस वरच राहावे लागण्याच्या अघटितानंतरचा परतीचा प्रवास उत्कंठा वाढवणारा. म्हणूनच त्याचे थेट प्रक्षेपण नासाने केले, ते घरोघरी चित्रवाणी वाहिन्यांवरून पाहिलेही गेले. अंतराळकुपी पृथ्वीच्या वातावरणात सुखरूपपणे शिरल्यापासून अंतराळवीरांना त्यातून बाहेर काढून वैद्याकीय तपासणीसाठी पाठवेपर्यंतचा दोन तासांचा घटनाक्रम कोणत्याही थरारक चित्रपटापेक्षा कमी नव्हता.

आपल्या आवाक्यापलीकडचे अथांग विश्व समजून घेण्याची मानवी जिज्ञासा, विश्वाचे कोडे सोडवण्याचा अथक प्रयत्न करणारी मानवी प्रज्ञा, तिला खतपाणी घालणारी नासासारखी अमेरिकी सरकारी यंत्रणा, तिला खासगी सहभागाची या प्रकरणात मिळालेली जोड, विज्ञानावरचे प्रभुत्व, त्यातून आलेली अचूकता आणि मुख्य म्हणजे या सगळ्याच्या जोडीला नऊ महिने अवकाशात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर या दोन अंतराळवीरांची जिद्द, मानसिक कणखरता आणि संकटावर मात करण्याची विजिगीषू वृत्ती… नासामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या देशांच्या, वंशांच्या अत्यंत बुद्धिमान लोकांनी हे आव्हान ज्या पद्धतीने पेलून दाखवले ते सगळे जात, धर्म, वर्ग, लिंग या सगळ्या माणसानेच आखून घेतलेल्या सीमारेषांच्या पलीकडे जाणारे होते. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा पुकारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ली चालवला असला तरी अशा गोष्टींमध्ये अमेरिका ‘ग्रेट’ आहेच ती का, याचा हा प्रत्यय होता.

यान आणि माणूस अंतराळात पाठवणे ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाही, अगदी २०२३ मध्ये भारतानेही दुसऱ्या प्रयत्नात आपल्या चांद्रयान-३ या मानवविरहित यानाचे चंद्रावर अचूक लॅण्डिंग करून जगाची वाहवा मिळवली होती. तरीही देश कोणताही असो, प्रत्येक अवकाश झेपेचा थरार कधीही कमी होऊ शकत नाही. किती तरी अंतराळ मोहिमा केल्यानंतरही २००३ मध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावलाचा समावेश असलेल्या कोलंबिया अंतराळ विमानाचा पृथ्वीच्या वातावरणात शिरताना स्फोट झाला आणि त्यात असलेले सगळे सात अंतराळवीर दगावले. कोणतेही अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात शिरताना घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेचा धोका असतो. त्याच कारणाने, बाह्य इंधन टाकीच्या संरक्षक आवरणाचा ढलपा उडून ‘कोलंबिया’चा शोकान्त घडला. मात्र त्यानंतर नासाने या समस्येवर प्रचंड काम केले असे सांगितले जाते. सतत अचूकतेचा ध्यास बाळगणाऱ्या आणि सतत अज्ञाताचे नवनवे प्रदेश धुंडाळू पाहणाऱ्या जगभरातील अवकाश शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज अंतराळवीर अवकाशात जाऊन, तिथे राहून आपले संशोधन करून ठरावीक काळानंतर सुखरूप परत येतात. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर ५ जून रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलायनरने नासाच्या अंतराळ स्थानकात गेले आणि स्टारलायनरमध्ये होत असलेल्या हेलियम गळतीमुळे तिथून परत येऊ शकले नाहीत. अंतराळ स्थानकातच अडकून पडले. या काळात त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद, वेळोवेळी केलेले वेगवेगळे व्हिडीओ, त्यातून दाखवलेला आपला दिनक्रम हे सगळे या आधीच्या अंतराळयात्रींनीही वेगवेगळ्या संदर्भात दाखवलेले असले तरी पुन्हा पुन्हा थक्क करणारेच होते.

पृथ्वीला २४ तासांत १६ प्रदक्षिणा घालणारे हे अंतराळ स्थानक अमेरिका, रशिया आणि जपानसह आणखीही काही देशांनी मिळून कसे उभे केले याच्या सुरस कहाण्या आहेतच, पण तिथे संशोधनासाठी राहणाऱ्या अंतराळवीरांच्या गरजा लक्षात घेऊन त्याची कशी सुसज्ज उभारणी केली गेली आहे, ते अचंबित करणारे आहे. अंतराळ स्थानकामधली सगळ्यात मोठी समस्या गुरुत्वाकर्षणाच्या अभावाची. त्यामुळे नीट उभे राहता येत नसल्याने अंतराळयात्री तरंगतात, केस विंचरले तरी उभेच राहतात, टूथब्रशवर टूथपेस्ट घेण्याचाही खटाटोप करावा लागतो, हे पडद्यावर पाहणे मनोरंजक असले तरी प्रत्यक्षात गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीरामधल्या हाडांची झीज होते. शरीराच्या वरच्या भागात जास्तीचा रक्तपुरवठा होऊन मेंदू, डोळे, कान या अवयवांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. किरणोत्सारी घटकांशी संपर्क येऊन त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हे सगळे टाळण्यासाठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना अंतराळ स्थानकात रोज दोन दोन तास व्यायाम करावा लागे. अशा वातावरणात इतका काळ काढावा लागल्याने त्यांच्या शरीरांवर काय परिणाम झाला, याची तपासणी होऊन त्यांना पुढचे ४५ दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. बराच काळ टिकू शकणारे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अंतराळवीर खातात. पण प्रश्न असतो खाल्लेल्या अन्नपदार्थांच्या विसर्जनाचा. मूत्रावर प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्याइतके निर्जंतुक केले जाते तर विष्ठा कचऱ्यासह जाळली जाते. अर्थात गुरुत्वाकर्षणाच्या अभावी या विसर्जन क्रिया करणेही जिकिरीचेच. पण त्याहीपेक्षा अवघड असते ते मनोबल टिकवून ठेवणे. आपल्या घरा-शहरापासून नव्हे तर पृथ्वीपासून दूर असणे, परतण्याची अनिश्चितता ही टांगती तलवार घेऊन जगण्यासाठी त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची मदत दिली गेली असली तरीही दांडग्या इच्छाशक्तीशिवाय यातून कुणी धकून जाऊ शकत नाही, हे तितकेच खरे. प्रक्रिया केलेले मूत्र दुसऱ्या दिवशी चहाकॉफीतून पिण्याची कल्पना करणेही किती अवघड आहे, हे लक्षात आले की सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर ही माणसे ‘अनंत आमुची ध्येयासक्ती’ या मानवी गर्वगीताच्या ओळी सार्थ करण्यासाठीच जणू जन्माला आली असावीत असे वाटते. कारण टिकून राहण्याच्या या लढाईशिवाय त्यांनी अंतराळात नऊ महिने आपले नेमून दिलेले कामही अत्यंत चोख केले. फुटबॉलच्या मैदानाइतक्या क्षेत्रफळाच्या अंतराळ स्थानकाची देखभाल, जुनी उपकरणे बदलणे, स्थानकाची स्वच्छता, हे सारे करून १५० हून अधिक प्रयोग त्यांनी केले. शून्य गुरुत्वाकर्षणाचा द्रव घटकांवर काय परिणाम होतो, तसेच अंतराळवीरांना ताजे, पोषक अन्नपदार्थ देण्यासाठी बायोन्यूट्रियंट्स कसे वापरता येतील यासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाचा भविष्यामधल्या दीर्घकालीन मोहिमांसाठी चांगलाच उपयोग होणार आहे, असे नासाचे म्हणणे आहे. सुनीता विल्यम्स यांनी नऊ वेळा स्पेसवॉकही केले. अंतराळ स्थानकाबाहेर ६२ तास सहा मिनिटे घालवणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत.

माणसाने ठरवले तर तो किती विध्वंसक असू शकतो याची रोजच्या रोज दिसणारी उदाहरणे काही कमी नाहीत. पण त्याने ठरवले तर तो किती दुर्दम्य आशावादी असू शकतो याचे यापेक्षा जिवंत उदाहरण आणखी कोणते असू शकते? त्यातही सुनीता विल्यम्स वडिलांकडून भारतीय वंशाच्या, या संदर्भामुळे आपल्याला त्यांचे अधिक अप्रूप. त्यांच्या पालकांनी लग्न आणि मुलेबाळे यातच स्त्रीच्या आयुष्याचे कसे सार्थक आहे, असा सर्वसाधारण भारतीय पालकांसारखा आग्रह धरला नाही आणि आपल्या लेकीला भरारी घेण्यासाठी अक्षरश: अवकाश खुले केले, हे तर आणखी अद्भुुत. काही तरी करण्याची स्वप्ने बघणाऱ्या प्रत्येक भारतीय मुलीला असे पालक मिळतील?

Story img Loader