औरंगजेब हा केवळ निमित्त. वाद त्याच्या कबरीचा नसता तर अन्य कोणती कबर, मशीद, मजार असे काही ना काही मिळालेच असते…

इंग्रजीत ‘कीप द पॉट बॉइलिंग’ असा वाक्प्रचार आहे. म्हणजे एखादा मुद्दा सतत तापता ठेवणे. आपल्या देशात सतत असा तापता ठेवता येईल असा मुद्दा म्हणजे हिंदू-मुसलमान संघर्ष. असा संघर्ष नसेल तर तो निर्माण करा, निर्माण झालेला असेल तर तो शांत होऊ देऊ नका आणि तो निमालाच तर निखाऱ्यांवरची राख झटकून ही आग पुन्हा कशी भडकेल असे प्रयत्न करा असा या वाक्प्रचाराचा प्रचलित वातावरणातील अर्थ. हिंदू-मुसलमान मुद्दा नसेल तर मराठा-ओबीसी, दलित-दलितेतर, कथित उच्चवर्णीयविरोधात कथित कनिष्ठवर्णीय, ही विरुद्ध ती भाषा असा कोणता ना कोणता मुद्दा शोधा, तापवा आणि तापता राहील याची खबरदारी घ्या असा हा सांगावा. हे असे मुद्दे धुमसते ठेवणे अनेकांच्या सोयीचे असते. या अनेकांत राजकारणेतरही अनेक येतात. उदाहरणार्थ माध्यमे, सुरक्षा यंत्रणा, बाजारपेठ इत्यादी. माध्यमांकडे या काळात बहुतांशांचे अधिक लक्ष जाते म्हणून माध्यमे खूश. सुरक्षा यंत्रणांस त्यांचा अंमल चालवता येतो आणि हात ‘साफ करून’ घेता येतात म्हणून ते खूश. बाजारपेठ आनंदी कारण अनेक वस्तूंची मागणी वाढते आणि अधिक काही गंभीर होईल या भीतीने माणसे अनावश्यक चीजवस्तूही खरेदी करून ठेवतात. अखेर लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे भीतीचीसुद्धा एक मोठी बाजारपेठ असते आणि अन्य कोणत्याही बाजारपेठेप्रमाणे ती गजबजती राहील हे पाहणे बाजारपेठ धुरीणांचे कर्तव्य असते. हे सत्य एकदा का लक्षात घेतले की सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू ठेवण्यात येत असलेल्या वादाचा अर्थ लावता येईल.

कारण यात औरंगजेब हा केवळ निमित्त आहे. त्याच्या कबरीचा वाद पेटवणाऱ्या आणि नंतर तो पेटता ठेवणाऱ्यांच्या सूत्रधारांस हे ठावके नाही, असे नाही. छत्रपती शिवाजी महाराज महान ठरतात याचे कारण त्यांनी आदिलशहा, निजामशहा अशा किरकोळ शाह्यांचा बीमोड केला इतकेच नाही, तर या सर्व शाह्यांस पुरून उरलेल्या कर्दनकाळ ‘दुष्ट’द्याुम्न औरंगजेब आणि मुघलांचाही त्यांनी पाडाव केला. महाराज म्हणून अधिक वंदनीय ठरतात. छत्रपतींच्या आसपास, आगेमागे अनेक राजपूत वा हिंदू धर्मीय राजे होते. त्यांस जे साध्य झाले नाही, ते छत्रपतींनी करून दाखवले. आलमगीराच्या क्रौर्याचे आणि तरीही त्याच्या बीमोडाचे मोठेपण त्याच्या कबरीच्या ध्वस्ततेची मागणी करणाऱ्यांस माहीत नाही, असे नाही. वास्तविक छत्रपतींनी टोपीकरांस ज्या रीतीने धुडकावले तो मुत्सद्देगिरीचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरावा. पण त्याचा गवगवा तितका केला जाणार नाही. कारण उघड आहे. टोपीकर ख्रिाश्चन होते आणि औरंगजेब मुसलमान. त्यामुळे त्याचा संबंध पाकिस्तानशी आणि त्याद्वारे देशातील इस्लाम धर्मीयांशी जोडायची सोय आहे आणि ती ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी गरजेची आहे. गोऱ्या टोपीकरांशी आपला थेट वाद नाही. ते बौद्धिकदृष्ट्या झेपणारेही नाही. त्यापेक्षा सद्या:स्थितीत इस्लामींना चेपणे अधिक सोपे आणि सोयीचे. ‘घर मे घुसके मारेंगे’ची शूरभाषा म्हणूनच केली जाते ती फुटक्या पाकिस्तानबाबत. खरेतर आपल्या ‘घरात’ खऱ्या अर्थाने घुसलेला आहे तो चीन. पण त्याच्याबाबत मात्र सौहार्दाची, मैत्रीपूर्ण शांततेची भाषा! त्यामागील कारणही तेच. धर्म आणि सामर्थ्याचा आकार. चीनबाबत अशी भाषा आपल्याला पेलवणारही नाही आणि ते न पेलवणे सर्वांना दिसणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. तेव्हा सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा औरंगजेब बरा. त्याच्या नावे बोटे मोडणे, कबरीवर थुंकण्याची भाषा करणे इत्यादी शौर्यदर्शक कृत्ये सद्या:स्थितीत राजकीयदृष्ट्या सोयीची आहेत. खेरीज हे असले आदिम मुद्दे पटवून देणे सोपे आणि पेटवणे त्याहूनही सोपे. सबब औरंगजेब हा केवळ निमित्त. तो नसता, त्याच्या कबरीचा वाद नसता तर अन्य कोणती कबर, मशीद, मजार शोधता आली नसती असे नाही. भारतासारख्या देशात कबरी आणि स्मृतिस्थळांची कमतरता नाही. काही ना काही मिळालेच असते आणि पेटवणाऱ्यांची सोय झाली असती.

कारण आग विझवून काही निर्मिती करण्यापेक्षा आग लावून विध्वंस योजणे अधिक सोपे असते. त्यात मागे जमाव आणि सत्ताधीशही असतील तर हे काम अधिकच सुलभ. किती ते बाबरी मशीद पाडताना भारतीयांनी अनुभवले. हाताला काम आणि डोक्याला व्यवधान नसणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. त्यातील काही शेदोनशे जणांस एकत्र करायचे, पोलीस बघ्याची भूमिका घेतील याची हमी बाळगत औरंगजेबाच्या कबरीवर चालून जायचे आणि ती उद्ध्वस्त करून टाकायची की झाले. आहे काय नि नाही काय! जगातील सर्वात प्राचीन, सर्वात सहिष्णू इत्यादी असलेल्या हिंदू धर्मीयांच्या वैश्विक संघटनेने लोकशाहीची जननी असलेल्या देशात असे करून दाखवण्याचा इशारा दिलेला आहेच. तो अमलात आणणे फार अवघड नाही. पण तरीही तो तातडीने अमलात आणला जाणार नाही. कारण तसे झाले तर ‘इश्यू’च संपेल ! आणि इश्यू एकदा का संपला की मग पुन्हा एकदा नवीन मशीद शोधणे आले, नवीन कबर शोधणे आले, त्या विरोधात हवा निर्माण करणारा एखादा देमार चित्रपट निर्माण करणे आले! इतके सगळे उपद्व्याप केल्यानंतर कुठे एखादा मुद्दा कार्यक्रमपत्रिकेवर येतो. तसा आता कुठे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापवता आलेला आहे. त्यामुळे गावागावांत पत्रकार परिषदा घेऊन, भाषणे करून, इशारे देऊन तो अधिकाधिक कसा तापेल आणि तसा तापता राहील याची खबरदारी घ्यायला हवी. त्यानंतर मग ‘थेट प्रक्षेपणात’ कबर उखडण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम हाती घेता येऊ शकेल. त्यामुळे इतर ठिकाणच्या अशा कबरींबाबत योग्य तो इशाराही प्रसृत करता येईल आणि पुढचे उखडा-उखडीचे कार्यक्रम हाती घेता येतील. तो हाती घेणाऱ्यांचे सामर्थ्य लक्षात घेता त्यांनी अन्यही काही ‘विधायक’ कार्यक्रम सुरू करावेत.

जसे की प्रशासनातील भ्रष्टाचार त्यांनी उखडून टाकावा. अफझलखान, औरंगजेब यांची कबर उखडून टाकणाऱ्यांनी राज्याच्या प्रशासनातील अकार्यक्षमताही अशीच उखडून टाकावी. दफ्तरदिरंगाई, वेळकाढूपणा आदींचाही नाश त्यामुळे होऊन राज्याचे प्रशासन अधिक गतिमान होण्यास मदत होईल. आपल्या शिक्षणव्यवस्थेत फार मोठे अज्ञान पोसले गेलेले आहे. तेही या मंडळींनी उखडून टाकावे. त्यामुळे निदान सहावी-सातवीच्या मुलामुलींस दुसरी-तिसरीची पाठ्यपुस्तके वाचण्याचे तरी कौशल्य प्राप्त होईल. अज्ञान उखडून टाकणे हे इस्लामी राज्यकर्त्यांच्या कबरी उखडून टाकण्याइतकेच महत्त्वाचे नाही असे कोण म्हणेल? अनेक महाराष्ट्रीय तरुण/तरुणींच्या हातास सध्या काम नाही. या तरुण/ तरुणींच्या हाताचा आणि डोक्याचा रिकामटेकडेपणाही कबर उखडून टाकणाऱ्यांनी समूळ नाहीसा करून टाकावा. आपल्या राज्यातील अनेक महानगरे ही उकिरडे बनलेली आहेत आणि खेडी, गावे बकाल. या नवधर्मरक्षकांनी ठिकठिकाणचे उकिरडे, बकालपणादेखील नष्ट करून टाकावा. नुसत्या अचेतन कबरीची काय मातबरी? या धर्मप्रेमींनी चिंता, क्लेश, दारिद्र्य, दु:ख वगैरेंची जागजागी बनलेली थडगीही अशीच उखडून फेकावीत. शेवटचा मुद्दा. ‘‘उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा’’ असे विंदा सांगतात. ते या नवधर्मरक्षकांस ठाऊक असण्याची शक्यता नसल्याने त्यांना सांगायला हवे की दुसऱ्या धर्माचा राग केल्याने स्वधर्मावरील प्रेम सिद्ध होत नाही. तद्वत पराजयींच्या कबरी उखडून टाकण्याने आपला विजय सिद्ध होत नाही. तो आज सिद्ध करावयाचा असेल तर वर उल्लेखलेल्या गोष्टीही उखडून टाकायला हव्यात.

Story img Loader