भारताचे ज्याच्याशी बरे चालले होते असा बांगलादेश हा एकमेव शेजारी देशदेखील आता दक्षिण आशियातील आपल्या अस्थिर शेजाऱ्यांपैकी झाला, हे काळजी वाढवणारेच…

बांगलादेशातील घडामोडींवर ‘लोकसत्ता’ने ‘वंगदेशी विद्यार्थ्यांचा विद्रोह’ (२२ जुलै) या संपादकीयात विद्यार्थ्यांची वावटळ शमणे अवघड असल्याचे भाकीत केले होते. तसेच झाले. या विद्यार्थ्यांनी अखेर पंतप्रधान बेगम शेख हसीना यांनाच पदच्युत केले आणि जीव वाचवण्यासाठी या बेगमेस देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. जे झाले त्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. आपले सर्व काही उत्तम चाललेले आहे आणि आपल्या धोरणांमुळे देशाचेही उत्तम चालू आहे असे मानणारे स्वमग्न सत्ताधीश लोकशाहीचा अभाव असेल तर याच मार्गाने सत्ताच्युत होतात. लोकशाही नसेल तर आपले काय चुकते हे सांगणारे ना विरोधक असतात ना माध्यमे ते करू धजतात. त्यात विकासाचा फुगा फुगवलेला असेल तर काही बोलायचीच सोय नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याप्रमाणे शेख हसीना यांनी आपल्या हुकूमशाही धोरणांच्या जोरावर काही आर्थिक विकास घडवून आणला खरा. पण अशा दमदाटीने होणारा विकास तकलादू असतो आणि समाजातील सर्वांच्या गरजा भागवण्यास पुरेसा नसतो. हे सर्व बांगलादेशात दिसून येत होते. पण आपल्या सिंहासनाखाली लागलेल्या आगीची दखल घेण्याचे शहाणपण पंतप्रधान शेख हसीना यांनी दाखवले नाही. अखेर विद्यार्थ्यांच्या विद्रोह वणव्यात त्यांनाच पदच्युत व्हावे लागले. या सगळ्याचे संदर्भ अनेक आहेत.

mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Dombivli Bangladeshi arrested
डोंबिवलीत सहा बांगलादेशी नागरिकांना अटक
China is building world largest artificial island
जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?
Rahul Gandhi and Atul Subhash Case
Atul Subhash Case : अतुल सुभाष प्रकरणात न्यायाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला राहुल गांधींचा पाठलाग, गाडीतून चॉकलेट फेकलं? पाहा नेमकं काय घडलं
kailash mansarover yatra
भारत-चीन संघर्ष मिटणार? कैलास मानसरोवर यात्रा अन् सीमा व्यापार पुन्हा सुरू; ‘या’ सहा मुद्द्यांवर झाले एकमत
Laxman Savadi
Karnataka : “मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा”, कर्नाटकच्या आमदाराची विधानसभेत मागणी; म्हणाले, “आमचे पूर्वज…”
ajit doval visit china
भारत – चीन सीमेवर शांततेसाठी उपाययोजना, विशेष प्रतिनिधी चर्चेत दोन्ही बाजूंनी सहमती

हेही वाचा >>> Sheikh Hasina : शेख हसीना यांचे पती होते शास्त्रज्ञ, मुलगी WHO ची संचालक, कुटुंबाविषयी या गोष्टी माहीत आहेत का?

उदाहरणार्थ या उद्रेकात चीन वा इस्लामी धर्मातिरेक्यांची भूमिका. बांगलादेशातील घडामोडींविरोधात विद्यार्थी भले उघडपणे व्यक्त झाले असतील. पण त्यांनी तसे व्यक्त व्हावे यासाठी त्यांना कोणाचेच उत्तेजन नव्हते असे मानणे अवघड. या संदर्भात चीन आणि इस्लामी धर्माभिमानी या दोघांवर संशयाची सुई रोखली जाते. यात चीनचा संशय अधिक घेण्यास जागा आहे. कारण शेख हसीना आणि चीन यांच्यातील संबंधांत तणाव निर्माण झालेला होता आणि अवघ्या काही आठवड्यांपूर्वीच बेगम साहिबांवर आपला चीन दौरा अर्ध्यावर सोडून येण्याची वेळ आली होती. त्यांच्या चीन दौऱ्यात अध्यक्ष क्षी जिनपिंग हे शेख हसीना यांना भेटलेही नाहीत. या दौऱ्यात चीनने त्यांची तशी उपेक्षाच केली. त्यामुळे दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतण्याचे टोकाचे पाऊल हसीना यांस उचलावे लागले. त्यानंतरही चीनने संबंध सुधारासाठी काही प्रयत्न केले नाहीत. हसीना यांची चीनपेक्षा भारतावर अधिक भिस्त होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. भारतीय उपखंडात आपल्या हितसंबंधांत कोणी वाटेकरी झालेले चीनला चालत नाही. बांगलादेशातील उद्रेकास चीनची फूस असू शकते असे मानण्यामागे हे एक कारण असू शकते. तसे ते असेल तर मग या साऱ्यात खुद्द बांगलादेशी सरकारने आणि त्या देशाचा मित्र, हितरक्षक अशा भारताने अधिक सजग असणे आवश्यक होते. त्या देशातील वाढत्या भारत प्रभावाविरोधात चीन बघ्याची भूमिका घेणार नाही हे उघड होते. तेव्हा आपल्या देशातील नाराजीचा उद्रेक हाताबाहेर जाणार नाही याची खबरदारी शेख हसीना यांनी घ्यायला हवी होती आणि चीनच्या संभाव्य कुरापतीविरोधात त्यांना सतर्क करण्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी होती. यातील पहिल्याबाबत त्या किती निष्प्रभ ठरल्या, ते स्पष्टच आहे. दुसऱ्याबाबतचा तपशील उपलब्ध होणे अवघड. तथापि बांगलादेश सोडताना त्यांना आपल्या हवाई दलाने कशी सुरक्षा दिली वगैरे अनावश्यक शौर्यकथांत काही अर्थ नाही. कारण त्यांच्या जिवास अपाय करण्यात चीनला रस नव्हता. त्यांना सत्ताच्युत करणे चीनसाठी पुरेसे होते. ते झाले.

हेही वाचा >>> Sheikh Hasina : बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना भारतातच का आल्या? काय आहे कारण?

गेल्या जवळपास तीन दशकांतील दोन दशके बांगलादेशावर शेख हसीना यांनी राज्य केले. विरोधकांच्या मुसक्या आवळणाऱ्या या देशातील लोकशाही केवळ नावापुरती होती आणि शेख हसीना यांच्या सत्तेस लष्कराचाही आशीर्वाद होता. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ या प्रमुख विरोधी पक्षाने बहिष्कार घातलेल्या निवडणुकीत शेख हसीना यांना यंदाच्या जानेवारीत पुन्हा सत्तासंधी मिळाली आणि तो देश शब्दश: एकपक्षीय लोकशाही बनला. दरम्यानच्या काळात खरे तर हसीना यांच्या धोरणांनी आर्थिक विकासास चांगली चालना मिळालेली होती. तयार कपड्यांच्या कारखानदारांचे जागतिक केंद्र बनल्याने बांगलादेशात महिला रोजगारात लक्षणीय वाढ झाली आणि मानव्य विकास निर्देशांकही चांगलाच सुधारला. पण तीत सातत्य राखता आले नाही. आर्थिक विकास ही सततची प्रक्रिया असते. त्यात एकदाच आघाडी घेऊन चालत नाही. मिळालेली आघाडी टिकवणे महत्त्वाचे असते. ते हसीना यांस जमले नाही. या पार्श्वभूमीवर त्या देशातील जुन्या आरक्षण धोरणाच्या कढीस न्यायालयीन निकालामुळे पुन्हा उकळी आली आणि संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जवळपास ३०० जणांची हत्या आणि १० हजारांहून अधिकांस तुरुंगात धाडूनही विद्यार्थ्यांचा आक्रोश शांत होईना. कसा होणार? या १७ कोटींच्या देशात २० लाखांहून अधिक बेरोजगार आहेत आणि आटत्या सरकारी नोकऱ्यांत ७५ टक्क्यांच्या आसपास आरक्षण. यामुळे विद्यार्थी संतापले. त्यातून हे पुढचे रामायण घडले. त्यानंतर बांगलादेशी लष्करप्रमुखांनी हंगामी सरकार स्थापनेची घोषणा केली खरी. पण तीबाबत शंका घेण्यास बराच वाव आहे. लष्करशहांची सुरुवात बऱ्याचदा हंगामी असते. पण नंतर ते हात-पाय पसरतात आणि सत्ता ताब्यात घेतात. बांगलादेशातही तसे होते किंवा काय, हे पाहायचे. विरोधी पक्षीय नेत्यांची तुरुंगातून सुटका, सहमतीची भाषा अशी काही सकारात्मक लक्षणे या लष्करशहांत दिसतात. हे गणवेशधारी पुढे काय करतात ते महत्त्वाचे. तिथे जे झाले ते आपली काळजी वाढवणारे ठरते.

हेही वाचा >>> Bangladesh Unrest Reason: बांगलादेशमधील अराजकतेमागे पाकिस्तान, चीनचा हात? ब्रिटनमध्ये शिजला शेख हसीना यांच्या विरोधातील कट

दक्षिणेकडील श्रीलंका अद्यापही पुरता स्थिरावलेला नाही. उत्तरेतील नेपाळचा भरवसा देता येत नाही आणि त्या शेजारील भूतानचे काही खरे नाही. पाकिस्तानविषयी तर न बोललेलेच बरे, अशी परिस्थिती. पाकिस्तानपलीकडच्या अफगाणिस्तानातील तालिबानी जम्मूची वेस ओलांडून सहज भारतात येऊ लागलेले आहेत आणि पूर्वेकडच्या म्यानमारची अस्थिरता आपल्या ईशान्येकडील राज्यांत येऊन ठेपलेली आहे. अशा अस्थिर शेजाऱ्यांच्या गराड्यात आता या बांगलादेशाची भर. तेथे जे झाले ते आपले पित्त आणि जळजळ वाढवणारे आहे याचे कारण आपले ज्याच्याशी बरे चालले होते असा हा एकमेव शेजारी देश. चीनपेक्षा आपणास जवळ करणारा आणि नदी पाणीवाटपापासून निर्यात धोरणापर्यंत भारताशी जुळवून घेणारा बांगलादेश आपला तसा भरवशाचा साथीदार होता. तो भरवसा यापुढे देता येणार नाही. त्या देशात लष्करशाहीच राहिली तरी किंवा विरोधी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सत्तेत सहभागी झाली तरी भारत हा काही या दोन्ही घटकांचा प्रेमाचा विषय नाही. तो व्हावा यासाठी आपणास आता नव्याने प्रयत्न करावे लागतील आणि आपला आणखी एक शेजारी देश चीनकडे झुकणार नाही यासाठी अधिक जागरूक राहावे लागेल.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘लालयेत पंचवर्षाणि…’

सध्या देशाबाहेर असलेले नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी पुन्हा मायदेशी येऊन सत्तेत सहभागी व्हावे असा विद्यार्थी आंदोलकांचा आग्रह आहे. युनूस खरोखरच तसे करणार किंवा काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशाचे आर्थिक पुनरुज्जीवन शक्य आहे असे युनूस यांस वाटते. ते करण्याची संधी त्यांस खरोखरच मिळेल का, लष्कर सत्ता सोडेल का इत्यादी प्रश्नांत त्या देशाचे भवितव्य दडलेले आहे. त्यात आपल्यालाही रस असल्याने बांगलादेश पुन्हा एकदा न्यारा व्हावा यासाठी आपणासही सक्रिय आणि सतर्क राहावे लागेल

Story img Loader