‘अशा’ गुणवंतांकडे भाजप कसा ‘नजर’ ठेवून असतो हे फडणवीस यांनीच बोलून दाखवल्यानंतर तरी खुद्द थोरात आणि प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सजगता दाखवावयास हवी होती..
..तसे न होता झाले काय, हे नाशिकच्या निवडणुकीपासून दिसलेच आणि काँग्रेसचे राज्यातील नेते दुर्भिक्ष वाढलेच..
महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला की नाही, तो मंजूर होणार की नाही, झाल्यास काँग्रेसचे विधिमंडळ नेतेपद कोणाकडे, मंजूर न झाल्यास ते शांत होणार का इत्यादी मुद्दे अत्यंत गौण आहेत. काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे त्यातील खरा प्रश्न आहे तो मुळात या काँग्रेसचे काय होणार? वास्तविक नाना पटोले यांच्यासारखा उत्तम आणि तितकाच पोकळ बोलघेवडा प्रदेशाध्यक्ष असेल तर काँग्रेसच्या आव्हानवीरांची कामगिरी फार सोपी होते. या वेळी ती अधिकच सोपी झाली कारण मुळात बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या नाशिक निवडणुकीवरून घोळ घातला. पक्षश्रेष्ठींनी या जागेसाठी उमेदवार निवडणे थोरात यांच्यावर सोपवले होते. थोरात यांचे राज्य राजकारणातले वजन आणि शेजारील नगर जिल्ह्यातील त्यांचे स्थान हे यामागील कारण. तथापि या उमेदवार निवडीत त्यांनी आपल्या उगवत्या भाच्याऐवजी त्याच्या तीर्थरूपांस उमेदवारी दिली. भाच्यास ही उमेदवारी नाकारण्यामागे स्वत:च्या कन्येस पुढे आणण्याचा बाळासाहेबांचा विचार होता, असे म्हणतात. ते खोटे मानण्याचे कारण नाही. पण ज्यांच्यासाठी त्यांनी ही उमेदवारी सोडली, त्यांनी स्वत: अर्ज न भरता ज्यास ती नाकारली होती त्या आपल्या मुलालाच पुढे केले. म्हणजे त्यांनी बाळासाहेब थोरात यांनाच तोंडघशी पाडले आणि त्यातून पुढे काँग्रेसवरच तसे आपटण्याची वेळ आली. वास्तविक या नाटय़ात प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांस मोठेपणा दाखवून वाद मिटवता आला असता. पण त्यापेक्षा थोरात यांचे नाक कसे कापले जाईल यात त्यांस रस अधिक असावा. परिणामी जे झाले त्यामुळे हसे काँग्रेसचे झाले. त्याची जबाबदारी पटोले यांना टाळता येणार नाही.
आणि हीच नेमकी काँग्रेससमोरची अडचण. मुत्सद्दीपणा हा फारच मोठा शब्द. पण किमान जबाबदार, पोक्त नेत्यासारखे वागायचे कसे ही नानांपुढील मुख्य अडचण असणार. जबाबदारीचे पद नसेल तर वागण्या-बोलण्यातील वैदर्भीय मोकळेढाकळेपणा लोभस वाटतो. पण जबाबदार पदांवरील व्यक्ती एरवीच्या सैलपणेच बोलत राहिली तर मोकळे-ढाकळेपणा हा शहाणपणाच्या अभावाचा निदर्शक ठरण्याचा धोका असतो. तो नाना पटोले यांच्याबाबत मोठय़ा प्रमाणावर दिसतो. दुसरे असे की काँग्रेस हा पक्ष म्हणून भाजपसारखा तगडा आणि तंदुरुस्त असता तर नाना पटोले यांच्यातील मुत्सद्देगिरीचा अभाव खपूनही गेला असता. पूर्वसुरींनी गडगंज कमावून ठेवलेल्यांचे नातू-पणतू बेफिकिरीने वागू शकतात. त्यांना ते परवडते. भाजपचे तसे आहे. त्या पक्षाचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हेदेखील नानांप्रमाणे वैदर्भीय आणि त्यांच्याइतके नाही तरी त्यांच्याप्रमाणे वागणे-बोलणे असलेले. फरक हा की हे असे वागणे त्यांना आणि त्यांच्या पक्षास परवडू शकते. काही पडझड झाल्यास सावरण्यास देवेंद्र फडणवीस/ नितीन गडकरी/ आशीष शेलार आदी आहेत. नाना पटोले यांना ही चैन परवडणारी नाही. त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दुर्दैवाने विलासराव देशमुख यांच्यासारखा सर्वास बरोबर घेऊन चालू शकणारा आणि तरीही विरोधकांसमोर आव्हान निर्माण करण्याची क्षमता असलेला नेता त्यांच्याकडे नाही. देशमुखांचे साथीदार सुशीलकुमार शिंदे हे वय आणि परिस्थिती दोन्हीस शरण गेलेले. आता अधिक काही मिळवायची त्यांची आगही शांत झाली असावी. राहता राहिले तीन. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणी बाळासाहेब थोरात. यातील सर्वात योग्य पृथ्वीराजबाबा काँग्रेसच्या ‘जी २३’ गटातील. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावरची मर्जी अद्यापही खप्पा. अशोक चव्हाण काही कारणाने तसे हातचे राखून. राहुल गांधी यांच्या भारत यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांची सक्रियता दिसली. नंतर तेही पुन्हा आपल्या कोषात गेलेले दिसतात. अशा परिस्थितीत नाना पटोले यांनी जास्तीत जास्त जणांस बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य दाखवणे आवश्यक होते.
याचे कारण महाराष्ट्रातील आजच्या राजकीय स्थितीस एका अर्थी नाना पटोले हेच जबाबदार आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा त्रिपक्षीय सरकारात नाना यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे पद होते. ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष. पण नानांचा जीव मंत्रीपदात अडकलेला. तेही साहजिक. अध्यक्षपदावरून ‘कार्यकर्तृत्व’ दाखवण्यास तशा मर्यादाच येतात. त्यामुळे त्यांना मंत्रीपद हवे होते. या मुद्दय़ावर घायकुतीस आलेल्या नानांनी अखेर अध्यक्षपद सोडले खरे. पण मंत्रीपद काही मिळाले नाही ते नाहीच. उलट अध्यक्षपदही गेले. ते कायम राहिले असते तर सत्ताधारी आघाडीतील फुटिरांस पक्षत्यागाचा धीर होताच ना. म्हणजे गेल्या जून महिन्याच्या अखेरीस मुंबई- सुरत- गुवाहाटी- गोवा- मुंबई अशी जी पंचस्थळी पक्षांतर यात्रा झाली ती झालीच नसती. पक्षांतरनाटय़ात कळीची भूमिका असते अध्यक्षांची. नानांनी पूर्णवेळ अध्यक्षपद कायम राखले असते तर फाटाफुटी करणे अशक्य नाही तरी अवघड निश्चितच गेले असते. पण मंत्रीपदाच्या हव्यासामुळे नानांनी दूरदृष्टी दाखवली नाही आणि तेलही गेले- तूपही गेले या धर्तीवर दोन्ही घालवून प्रदेशाध्यक्षपदाचे धुपाटणे तेवढे त्यांच्या हाती आले. आता त्या पदावरूनही त्यांच्याकडून स्वनेत्यास दुखावणाऱ्या कृती होत राहिल्या तर ते त्यांच्या पक्षास परवडणारे नाही. या संदर्भात एक मुद्दा आवर्जून लक्षात घ्यायला हवा म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे या प्रकरणी सर्व काही बरोबर नाही, हे मान्य केले तरी एक सत्य विसरता येणार नाही. ते म्हणजे पक्षनिष्ठा. महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच काही जातिवंत काँग्रेसजन शिल्लक राहिले असतील त्यातील एक थोरात आहेत. नानांप्रमाणे अन्य पक्षांशी आणि त्यातही भाजप घरोब्याचा त्यांना अनुभव नाही. नानांनी निवडणूक लढवली भाजपच्या तिकिटावर, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवाराचा त्यांनी पराभव केला आणि नंतर राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले. थोरात यांचे तसे नाही. सद्य:स्थितीत असे एकपक्षीय राहणे दुर्मीळ.
पण स्वत:च्या कन्येस पुढे आणण्यासाठी भाच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सर्रास गुण त्यांनी दाखवला. हे प्रचलित राजकारणानुसारच झाले म्हणायचे. प्रस्थापित नेत्यांनी स्वत:च्या मुली/मुलासाठी पुतण्याकडे दुर्लक्ष करणे तसे अजिबात नवे नाही. या अशा दुर्लक्षाचे नमुने सर्वपक्षीय. तेव्हा थोरातांनी काही वेगळे केले असे नाही. नानांनी अशा वेळी हे वास्तव समजून घेऊन पुढचे नाटय़ टाळणे आवश्यक होते. ती त्यांच्या पदाची जबाबदारी होती. तीत निश्चितच ते कमी पडले आणि नाशिक विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारावरून नाचक्की झाली. हा उमेदवारही साक्षात भाजपने गौरवलेला. ‘अशा’ गुणवंतांकडे भाजप कसा ‘नजर’ ठेवून असतो हे देवेंद्र फडणवीस यांनीच बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीने बोलून दाखवलेले. ही अगदी काही महिन्यांपूर्वीची घटना. त्यानंतर खुद्द बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी अधिक सजगता दाखवायला हवी होती. पण झाले उलटेच. त्या आघाडीवर नानांच्या नेतृत्वाखालील पक्षाने स्वत:स हास्यास्पद केले. त्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा हा प्रकार. तोही टाळता आला असता. ते न झाल्याने भाजपस ‘विजया’चे समाधान मिळाले.
विख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे हास्यास्पद राजकारण सहा दशकांपूर्वीच्या या चित्रपटाचे स्मरण करून देणारे ठरते.