मशिदीवरील बांग, हनुमान चालीसा इत्यादी ‘योग्य समयी’ हाती घेतलेल्या ज्वलंत मुद्दय़ांप्रमाणेच, हाही मुद्दा राज ठाकरे यांनी काढला; पण तो मागे पडला नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात पडद्यासमोर जे काही येते त्यापेक्षा पडद्यामागे जे काही घडत असते ते अधिक रंजक असते. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ छापाचे योगायोग फक्त वैयक्तिक आयुष्यात शोभून दिसतात. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचे तर पोट या असल्या योगायोगांनी भरत असते. पण राजकारणात असे होत नाही. राजकारणात जे योगायोग भासतात ते तसे उत्स्फूर्त असतातच असे नाही. ‘माझ्या उत्स्फूर्त भाषणांमागे कित्येक तासांची मेहनत आहे’, असे विन्स्टन चर्चिल म्हणत. त्याप्रमाणे राजकारणात पडद्यासमोर येणाऱ्या योगायोगांमागे पडद्यामागच्या अनेक तासांच्या रंगीत तालमींची साधना असते. हे तत्त्व एकदा का मान्य केले की अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून राज्यातील सत्ताधारी भाजपने घेतलेल्या माघारीपेक्षा या माघारीमागचे राजकारण जास्त आकर्षक आहे हे ध्यानात येईल. त्यामुळे हे योगायोग आणि त्यामागील घटनांची कारणमीमांसा होणे गरजेचे ठरते.

या निवडणुकीसाठी अर्ज भरणे आदी प्रक्रियांत सर्व अनावश्यक ताणतणावांचे दर्शन झाल्यानंतर, ते होत असताना सोयीस्कर आणि अपरिहार्य मौन पाळल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी बरोबर राज ठाकरे यांस महाराष्ट्राच्या उदात्त राजकीय संस्कृतीचे स्मरण झाले, हा योगायोग क्रमांक एक. वास्तविक याआधी पंढरपूर, नांदेड, कोल्हापूर आदी ठिकाणी गेल्या काही महिन्यांत पोटनिवडणुका झाल्या. त्यामागील कारणेही विद्यमान उमेदवारांचे निधन अशी होती. या सर्व निवडणुका अन्य निवडणुकांप्रमाणेच अहमहमिकेने लढल्या गेल्या. पण त्या वेळी या संस्कृतीचे स्मरण कोणत्याच ठाकरे यांस झाल्याचे दिसले नाही. हाही एक योगायोगच म्हणायचा. वास्तविक या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या आजपर्यंतच्या घटनाक्रमांत संस्कृती संवर्धनाच्या इतक्या संधी होत्या. त्या ठाकरे आणि अन्यांनी सोयीस्कररीत्या वाया घालवल्या, यासही योगायोग म्हणावे काय? उदाहरणार्थ सदर दिवंगत आमदाराच्या पत्नीचा महानगरपालिकेच्या सेवेचा राजीनामा मंजूर न करणे, त्यासाठी न्यायालयात  धाव घ्यायला लागणे, सुनावणीच्या आदल्या दिवशी या उमेदवारावर सेवेत कधी काळी भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल होणे इत्यादी. हे सर्व झाले ते सदर आमदाराच्या अर्धागिनीस निवडणूक लढवता येऊ नये, यासाठीच. पण त्या वेळी असे करणे हा संस्कृतिभंग असल्याची जाणीव राज ठाकरे यांस झाली नाही, यास योगायोगच म्हणायला हवे. 

या योगायोगांच्या मालिकेतील सर्वात मोठा योगायोग म्हणजे भाजपने विजयी जागा हातची सोडणे. दिवंगत आमदार शिवसेनेचे होते. सेनेच्या अनेक विद्यमान आमदारांप्रमाणे तेदेखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले असते किंवा काय या प्रश्नांची चर्चा आता करणे निर्थक. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे जाणे ओघाने आले. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ‘खऱ्या’ शिवसेनेकडे. पण तशी ती गेली नाही. कारण अशाच अन्य काही योगायोगांमुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाचा वाद मिटला नाही. त्यामुळे शिंदे गटाचा आधारस्तंभ असलेल्या भाजपने ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला. या पक्षाचे एक वैशिष्टय़ मान्य करावेच लागेल. ते म्हणजे निवडणूक –  मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची- भाजप प्रत्येक निवडणूक प्राणपणानेच लढवतो. त्यामुळे ही निवडणूकदेखील भाजपने सर्व जोर लावूनच लढवली असती. आणि अन्य निवडणुकांप्रमाणे ती जिंकलीही असती. असे असताना केवळ राज ठाकरे यांच्या आवाहनाचा मान ठेवत भाजपने माघार घेतल्याने तो पक्ष विजयाबाबत साशंक होता किंवा काय, असा प्रश्न पडतो. आपणास हवे आहे ते मागणे प्रशस्त ठरणार नाही, अशा मागण्या भाजप अन्यांच्या मुखांतून सुयोग्यपणे करवतो. तेव्हा या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी भाजपचीच इच्छा होती, पण तसे करणे बरे दिसले नसते म्हणून राज ठाकरे यांच्याकरवी ही मागणी भाजपने पुढे करवली असे तर नाही? राजकीय वर्तुळांत अशी चर्चा मोठय़ा जोमात सुरू आहे. राज ठाकरे यांनी ‘योग्य समयी’ मशिदीवरील बांग, हनुमान चालीसा इत्यादी ज्वलंत मुद्दे मोठय़ा तडफेने हाती घेतले आणि तशाच योग्य समयानंतर ते मागे पडले हा ताजा इतिहास. तोही योगायोगच. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या तोंडावरील राजकीय संस्कृतिस्मरणामागे असाच काही योगायोग असावा असा संशय जनसामान्यांस आला तर त्या बिचाऱ्यांस दोष का बरे द्यावा? त्यात भाजप समर्थकांसाठी अधिक मोठा धक्का म्हणजे साक्षात शरद पवार यांनी या राज ठाकरे यांच्या या मागणीस पाठिंबा दर्शवला होता. तेव्हा पवार यांनी पाठिंबा दिलेल्या मागणीस होकार देणे हे भाजपसाठी किती जड गेले असेल, याची कल्पनाच केलेली बरी. परत भाजपच्या समर्थकांस यामुळे किती वेदना होतील, हा वेगळाच मुद्दा. या निवडणुकीत भाजपचे यश निश्चित मानले जात होते. या निवडणुकीचा निकाल हा आगामी राजकारणास वळण देण्यासाठी किती महत्त्वाचा असेल, असेही म्हटले जात होते आणि ते खरेही होते. समाजमाध्यमी पंडितांनी तसे भाकीत वर्तवून विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली होती. या विजयामुळे भाजप विरोधकांचे नाक कापेल अथवा ठेचले जाईल अशीच चिन्हे दिसत होती. असे असतानाही पवार यांनी पाठिंबा दिलेली राज ठाकरे यांची मागणी मान्य होण्यामागील योगायोग काय, असा प्रश्न अनेकांस पडला असणार. परत आता हा निर्णय किती योग्य होता यासाठी या समाजमाध्यमी पंडितांस नव्याने तयारी करावी लागेल, ते वेगळेच.

दुसरे असे की या मुद्दय़ावरही उद्धव ठाकरे मागे पडले असेच म्हणावे लागेल. वास्तविक परंपरा अशी की दिवंगत लोकप्रतिनिधी ज्या पक्षाचा असतो त्या पक्षाचा प्रमुख नंतरची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अन्य राजकीय पक्षांस आवाहन करतो. त्यासाठी जातीने संबंधितांशी संपर्क साधला जातो. उदाहरणार्थ काँग्रेसचे राजीव सातव करोनाकाळात निवर्तल्यानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधकांनी उमेदवार उभा करू नये अशी विनंती करण्यासाठी राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींनी प्रमुख विरोधी नेत्यांची जातीने भेट घेतली होती. याचा अर्थ असा की आपल्या पक्षाच्या दिवंगत आमदाराच्या पत्नीची निवडणूक विनाविरोध व्हावी यासाठी शिवसेनेच्या प्रमुखांनी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक होते. सध्या शिवसेना आहेत दोन. म्हणजे शक्यतो या दोन्ही शिवसेनांच्या प्रमुखांनी, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी, ही निवडणूक होऊ नये यासाठी संबंधित पक्षांस गळ घालायला हवी होती. हे दोन्ही सेनाप्रमुख सोडा. पण यातील एका सेनाप्रमुखानेही अशी मागणी केली नाही. अशी मागणी केली ती या दोन्ही शिवसेनांशी ज्यांचा संबंधही नाही -निदान अधिकृत तरी- त्या भलत्याच सेनेच्या प्रमुखांनी. आता या सेनेचा ज्या पक्षाचा उमेदवार रिंगणात होता त्या भाजपशी संबंध काय, हाही तसा प्रश्नच. त्याचे उत्तर मिळण्याआधीच भाजपने ही मागणी मान्य केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली म्हणून आभार मानले ते शरद पवार यांचे. हे तसे अतक्र्यच नव्हे काय?

 तेव्हा अशा तऱ्हेने या एका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने योगायोगांचा असा अपूर्व संस्कृतिसंगम दिसून आला. आता तर या महाराष्ट्री निवडणुकांचा हंगामच सुरू होईल. त्यामुळे तुम्हा-आम्हा जनसामान्यांस या अशा संस्कृतिसंगमात डुंबण्याचा यथेच्छ आनंद लुटता येईल, हे निश्चित.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp withdraws candidate from andheri east bypoll after raj thackeray appeal zws
Show comments