अमेरिकी ट्रम्प वा ब्राझीलच्या बोल्सनारोंसारख्यांच्या सत्तारोहणाने होणारे नुकसान हे दीर्घकालीन असते, हेच पराभूत होताना त्यांनी मिळवलेल्या मतांतून दिसते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान सत्ताधीश जाइर बोल्सनारो यांचा पराभव झाला याचे दु:ख अधिक की लुईझ इनाशियो लुला डिसिल्वा विजयी झाले याचा आनंद या प्रश्नाचे उत्तर अजिबात अवघड नाही. ‘‘मी बलात्कार करावा अशी तुझी लायकी नाही,’’ असे एका महिलेविषयी उद्गार काढणारे, ‘‘मला पाच मुलगे आहेत, पण सहाव्या अपत्याच्या वेळी मी अशक्त होतो आणि मला मुलगी झाली,’’ असे म्हणणारे, ‘‘कैद्यांचा, गुन्हेगारांचा अनन्वित छळ करायलाच हवा’’, ‘‘माझा मुलगा समलिंगी निघाला तर मला त्याच्याविषयी काहीही ममत्व वाटणार नाही’’ अशी एकापेक्षा एक दिव्य विधाने करणारे बोल्सनारो पराभूत होणे ही काळाची गरज होती. सामाजिक मुद्दय़ांवर कमालीच्या प्रतिगामी मतांचा, विज्ञानविरोधक, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अनादर करणारा, कट्टर धर्मवादी इत्यादी अनेक मागासगुणयुक्त अध्यक्ष ब्राझीलला लाभला हेच मुळात दुर्दैव होते. बोल्सनारो यांच्या पराभवाने ते दूर झाले. दक्षिण अमेरिका खंडातील कोलम्बिया, चिली, युरोपातील फ्रान्स, त्याआधी खुद्द अमेरिका अशा देशांत हे असे प्रतिगामी राजकारणी एकामागोमाग एक पराभूत होत असताना काळजी होती ती ब्राझीलची. गेली चार वर्षे ब्राझीलमध्ये प्रतिगामी बोल्सनारो यांनी धुमाकूळ घातला. करोनाकाळात ब्राझीलची चांगलीच वाताहत झाली. त्यांची ओळख ‘ब्राझीलचे ट्रम्प’ अशी केली जात असे, यातच काय ते आले. यावरून त्यांच्या पराभवाचे महत्त्व लक्षात यावे.

तथापि त्यांचे ‘राजकीय गुरू’ ट्रम्प यांच्याप्रमाणे बोल्सनारो यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या आव्हानवीराचा विजय हवा होता तितका निर्विवाद नाही. लुला डिसिल्वा यांना जेमतेम ५१ टक्के मते मिळाली. म्हणजे जवळपास निम्म्या मतदारांचा पाठिंबा इतक्या मागास बोल्सनारो यांना आहे. अमेरिकेतही हेच दिसले. अध्यक्ष जो बायडेन हे विजयी ठरले खरे; पण डोनाल्ड ट्रम्प यांना पडलेली मते दुर्लक्ष करावे अशी नव्हती. याचा अर्थ ट्रम्पादी राजकारण्यांच्या सत्तारोहणाने होणारे नुकसान हे दीर्घकालीन असते. सूडबुद्धी, असहिष्णुता, धार्मिक विद्वेष आदी आदिम आणि म्हणून नैसर्गिक भावनांना प्रेरणा देणाऱ्यांचा विजय हा समाजास मागे नेतो. अमेरिकेत ते घडले आणि शेजारील ब्राझीलमध्येही तेच सुरू होते. या अशांच्या विजयामुळे मागासांची मुळातच खोलवर गेलेली मुळे अधिक घट्ट होतात. तथापि अमेरिकेप्रमाणे ब्राझीलचे मोठेपण असे की लोकशाहीत आवश्यक असलेल्या बहुसंख्यांनी हा धोका ओळखला आणि ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सनारो यांस वेळीच दूर केले. बोल्सनारो यांच्या अनेक वादग्रस्त विधानांतील एक निवडणुकांसंदर्भातील आहे. ‘‘निवडणुकीतील मतदानामुळे काहीही बदल होत नाही. बदलासाठी यादवीच व्हायला हवी आणि जे लष्कर करू शकते ते आपण करायला हवे. काही निरपराधांचे प्राण यात गेले तरी हरकत नाही..’’, अशा आशयाची मते या गृहस्थाने उघडपणे व्यक्त केली होती. यावरून त्यांची लोकशाहीवरील आस्था किती हे लक्षात येते. तेव्हा असा उघड हुकूमशाहीवादी इसम पराभव कसा काय स्वीकारणार असा प्रश्न ब्राझीलवासींना पडला असून सगळेच त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. ती स्पष्ट होत नाही तोपर्यंत लुला डिसिल्वा यांच्या विजयाचा अर्थ समजून घ्यायला हवा.

लुला कामगार वर्गातून पुढे आलेले राजकारणी. घरची अत्यंत गरिबी. वयाच्या १४ व्या वर्षांपासून त्यांस मजुरी करावी लागली. त्यातूनच कामगार संघटना आणि कामगार संघटना ते राजकारण असा आपल्या जॉर्ज फर्नान्डिसांप्रमाणे त्यांचा प्रवास झाला. साहजिकच त्यामुळे ते विचारधारेच्या डावीकडचे मानले जातात. जवळपास दोन दशकांपूर्वी २००३ साली ते पहिल्यांदा सत्तेवर आले तो ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा उदय. त्यानंतर सलग दोन खेपेस लुला अध्यक्ष राहिले. वैचारिकदृष्टय़ा डावरे असूनही भांडवलाच्या प्रवाहात आणि भांडवलदारांच्या गुंतवणूक निर्णयांत ते अडथळा ठरले नाहीत. उलट पेट्रोब्राससारख्या सरकारी मालकीच्या इंधन क्षेत्रातील कंपनीचे भाग्य त्यांच्याच काळात फळफळले. त्यांच्या दहा वर्षांच्या काळात अर्थगतीही उत्तम राहिली आणि डाव्या विचारधारेस उजवीकडच्यांच्या नफ्याची जोड देत त्यांनी सामाजिक सुरक्षितता आणि रोजगारनिर्मिती दोन्ही उद्दिष्टे साधली. दोन खेपांनंतरच्या निवडणुकांत त्यांनी उत्तराधिकारी म्हणून पक्षाची सूत्रे डिल्मा रूसेफ यांच्या हाती दिली. पण दुर्दैवाने बाईंना राजकारण म्हणावे तसे झेपले नाही. ब्राझीलची पहिली महिला अध्यक्ष ठरण्याचा मान त्यांना मिळाला खरा, पण त्यांची राजवट भ्रष्टाचारादी मुद्दय़ांनी गाजली. दुर्दैव असे की जी पेट्रोब्रास कंपनी डिल्माबाईंचे गुरू लुला यांच्यामुळे भरभराटीस आली तीच कंपनी डिल्मा यांच्या पतनास कारण ठरली. इंधन कंपन्यांचे अर्थकारणही नेहमीच ज्वालाग्राही असते. ते नीट हाताळता आले नाही तर या कंपन्या पहिला घास हाताळणाऱ्याचा घेतात. डिल्माबाईंस याचा प्रत्यय आला असणार. अध्यक्षपदावरील त्यांची पहिली खेप अखेरची ठरली आणि २०१६ च्या निवडणुकीत लुला-डिल्मा यांच्या पक्षाने सत्ता गमावली. हाच काळ ब्राझीलमधील उजव्या राजकारणाच्या प्राबल्याचा. जगात ट्रम्पसारख्या राजकारण्यांच्या यशामुळे असे संकुचित आणि अंतर्वक्र राजकारणी देशोदेशी यशस्वी ठरत होते. परिणामी पुढच्या निवडणुकीत साहजिकच बोल्सनारो विजयी झाले.

अशा राजकारण्यांच्या पठडीप्रमाणे बोल्सनारो यांनी लुला डिसिल्वा, त्यांच्यानंतरच्या डिल्मा रूसेफ यांस भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जर्जर केले. अर्थव्यवस्था ऊध्र्वमुखी नसते तेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केले जातात त्यांना चिकटू लागतात आणि सामान्य जनता आपल्या हालअपेष्टांसाठी या खऱ्याखोटय़ा भ्रष्टाचारास आणि त्यामागील राजकारण्यांस जबाबदार धरू लागते. ब्राझीलमध्येही हेच घडले. लुला भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली ‘दोषी’ मानले गेले आणि जवळपास दोन वर्षांचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला. तो संपला कारण हे आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. ‘‘मला जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाला, पण मी तो यशस्वी होऊ दिला नाही,’’ असे लुला म्हणाले त्याचा संदर्भ हा. वास्तविक बोल्सनारो विजयी होत असतानाही सर्वसाधारण जनतेच्या मनात लुलांविषयी आदरच होता. तो वारंवार जनमत चाचण्यांत प्रगटला. म्हणूनच ‘‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी’’ असे त्यांचे वर्णन बराक ओबामा यांनी केले. पण वैयक्तिक लोकप्रियता त्यांच्या पक्षास विजयी ठरवण्याइतकी पुरेशी ठरली नाही. पण यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे तुरुंगवासही त्यांच्या लोकप्रियतेस तडा देऊ शकला नाही. अर्थात प्रतिगामी बोल्सनारो यांच्या कडव्या राजकारणाची म्हणून एक लोकप्रियता होती. प्रतिगामींनी पसरवलेला विखार वातावरणात बराच काळ टिकून राहतो. त्यामुळे ब्राझीलमध्ये बोल्सनारो आणि समर्थकांस स्वत:च्या विजयाची ठाम खात्री होती.

पण अखेर विजयाने त्यांस हुलकावणी दिली. कमी मताधिक्याने का असेना पण लुला विजयी ठरले. शेवटी विजय हा विजय असतो. आता त्यांच्या पुढे आव्हान असेल ते ब्राझीलचा दुभंग बुजवण्याचे. ‘ते’ आणि ‘आपण’ ही दरी ब्राझीलमध्येही आहे आणि स्थलांतरितांबाबत बोल्सनारोंच्या टोकाच्या मागास भूमिकेमुळे ती अधिकच वाढलेली आहे. ती कमी करून अर्थव्यवस्थेस पुन्हा चालना देणे यावर लुला यांचे यशापयश जोखले जाईल. त्यात ते यशस्वी होतील-न होतील आणि त्यांचे राजकारण यशस्वी ठरेल-न ठरेल. पण एका मुद्दय़ावर मात्र ते यशस्वी ठरावेत. हा मुद्दा म्हणजे अ‍ॅमेझॉनचे खोरे पुन्हा हिरवेगार करण्याचा. बोल्सनारो यांच्या काळात जगातील हे वसुंधरेचे फुप्फुस ठरणारे हे जंगल तब्बल १५ टक्क्यांनी बोडके झाले. लुला हे थांबवू पाहतात. त्यात ते यशस्वी ठरले तर अ‍ॅमेझॉनचे आनंदतरंग आपल्यापर्यंत पोहोचतील. म्हणून या निकालाचे महत्त्व.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazil s presidential election luiz inacio lula da silva defeats jair bolsonaro zws
Show comments