समाजमाध्यमांनी व्यापलेल्या आजच्या पौगंडावस्थेतील मुलांची मने कोणत्या वादळात भिरभिरताहेत याची त्यांच्या पालकांना कल्पनाही येऊ शकत नाही…
पौगंडावस्थेतील किंवा ती पार करून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुला-मुलींचे जग पालकांना कळते आहे का आणि, त्याही पुढे जाऊन समाज म्हणून तरी त्याचे आकलन झाले आहे का या दोन्ही प्रश्नांसाठी बहुतांशांचे उत्तर ‘नाही’, असेच असेल, तर हे प्रश्न समजून घेण्यास पालक, समाज मुळात उत्सुक आहे का आणि कसा, यांच्या उत्तरावर या दोन्ही प्रश्नांची उकल अवलंबून असेल, असे सध्यापुरते म्हणायला हवे. ‘सध्यापुरते’ अशासाठी, की ज्या वेगाने सभोवताल बदलतो आहे, त्यात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे दर काही काळानंतर नव्याने शोधावी लागतील, अशी स्थिती आहे. म्हणूनच, सध्या भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिली जात असलेली ‘अॅडोलसन्स’ ही ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावरील मालिका आणि त्यापाठोपाठ ‘इन्स्टाग्राम’वरील ‘लाइव्ह’ या सुविधेवर १६ वर्षांखालील मुलांसाठी आणले गेलेले काही निर्बंध, या दोन्ही अलीकडच्या गोष्टींकडे उपरोल्लेखित प्रश्नांच्या परिप्रेक्ष्यात पाहायला हवे. तशा पाहू गेलो, तर कदाचित त्या अधिक खोलात जाऊन समजून घेता येतील.
‘मेटा’ या कंपनीने काही दिवसांपूर्वीच १६ वर्षांखालील मुलांना ‘लाइव्ह’ ही सुविधा वापरायची असेल, तर पालकांची परवानगी आवश्यक असेल, असे बंधन घातले. सध्या काही पाश्चात्त्य देशांसाठी हा नियम आला असला, तरी लवकरच तो जगभरात इतरत्रही लागू होईल. त्याचप्रमाणे १८ वर्षांखालील मुलांच्या सुरक्षिततेसाठी असलेले काही उपाय ‘मेटा’ने आपल्या ‘फेसबुक’ आणि ‘मेसेंजर’ या मंचांनाही लागू केले. या सगळ्याचा थोडक्यात उद्देश हा, की एक तर आपली षोडशवयीन, पौगंडावस्थेतील मुले या समाजमाध्यमांवर काय करतात, यावर पालकांचे नियंत्रण यावे आणि दुसरे म्हणजे, या अडनिड्या वयात नग्नता, हिंसा याबाबतचे वाईट चित्रण त्यांच्यापर्यंत शक्यतो न पोहोचण्याचीच तजवीज व्हावी. ही उपयोजने मुलांनी किती वेळ वापरावीत, यावर निर्बंध घालणे, तसेच कोणत्या खात्याशी (व्यक्ती वा निनावी, बनावट नावांचे समूह) आपल्या पाल्याचा संवाद सुरू आहे, हे समजणेही पालकांना आता शक्य होणार आहे. जगभरात १८ वर्षांखालील साडेपाच कोटी मुले – ज्यातील ९० टक्के मुले १३ ते १५ वर्षे वयोगटातील आहेत – इन्स्टाग्राम वापरतात, ही आकडेवारी या उपायांची व्याप्ती का मोठी आहे, हे सांगण्यास पुरेशी ठरावी.
आता हे उपाय कितपत प्रभावी ठरतील, हा आणखी वेगळा विषय. पण, मुळात या कोटीतल्या आकडेवारीसाठी हे उपाय का करावे लागले असतील, या प्रश्नाचे उत्तर शोधायचे, तर ते काही अंशी ‘अॅडोलसन्स’ मालिकेत दडलेले आहे. योगायोग असा, की ही मालिका येऊन काही आठवडे होतात ना होतात, तोच ‘इन्स्टाग्राम’वरील या निर्बंधांची घोषणा झाली. त्यामुळे दोन्हींचा अनुबंध जोडला जाणे साहजिकच. ‘अॅडोलसन्स’ ही जेमी या १३ वर्षीय मुलाची मानसिकता ऑनलाइन विश्व शब्दश: कसे घडवते वा बिघडवते, याची गोष्ट आहे. पौगंडावस्थेतील एखादे मूल त्याच्या वाट्याला येणाऱ्या नकारात्मकतेमुळे हिंसेपर्यंत कसे पोहोचते, याची जितकी ही कथा आहे, तितकीच त्याच्या मनात अशी काही खळबळ सुरू आहे, याची जराशीही चुणूक न लागल्याने त्याला समजून घेण्यात कमी पडलेल्या त्याच्या बापाच्या, पालक म्हणून वाट्याला येणाऱ्या हरलेपणाचीही ही कथा आहे. ‘इन्स्टाग्राम’च्या पालक नियंत्रणाकडे पालकांचेच फार कमी लक्ष असते, असे निरीक्षण ‘मेटा’च्याच एका अधिकाऱ्याने मध्यंतरी नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर तर, मालिकेतील जेमीच्या वडिलांचे हरलेपण अधिक गहिरे आणि मन खाणारे. आणि, म्हणूनच हा सगळाच विषय केवळ ‘इन्स्टाग्राम’वरील निर्बंध आणि ‘अॅडोलसन्स’ सुन्न करणारी आहे, असा या मालिकेला भारतासह जगभरातून मिळत असलेला प्रतिसाद, या दोन घटितांच्या पलीकडचा – पौगंडावस्थेचा आणि त्यातील न सुटलेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचाही आहे.
पौगंडावस्थेत शिरण्याच्या आणि ती संपवून तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या – १३ ते १९ वर्षे वयोगटातील, ज्याला इंग्रजीत ‘टीनएज’ म्हटले जाते, त्या मुलांची मानसिक जडणघडण कशी होते, या प्रश्नाला अनेक पदर आहेत. या वयोगटातील मुलांमध्ये होत असलेले शारीरिक बदल आणि ते समजून घेऊन त्यांना सामोरे जाण्याची मुलांची आणि पालकांची तयारी ही त्यातील पहिली पायरी. मुलगा आणि मुलगी या दोघांनाही ते नीट समजावून सांगितले जातात का, त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक गुंत्यांकडे कसे पाहिले जाते, हे यातील पालक-मूल या पातळीवरचे अगदी प्राथमिक प्रश्न. ते सोडवतानाच होणारी दमछाक सावरताना न सांगता उभे राहणारे इतर तिढे, उदाहरणार्थ, संगत, अभ्यासाचा ताण, शाळा-शिकवणी वर्गांतील दुसऱ्याबरोबरील तुलनेचे ओझे, मैत्री-प्रेम-नाते याबद्दलचे अत्यंत अनघड ताणेबाणे, मित्र-मैत्रिणींचे कंपू वा आजूबाजूचे लोक आदींमध्ये वावरताना शारीरिक ठेवण, रूप, आर्थिक स्थिती, कपडे अशा कारणांवरून होऊ शकणारी हेटाळणी, संपर्काच्या गरजेपोटी अपरिहार्यपणे मोबाइल फोन हातात पडल्यानंतर लागू शकणारे ऑनलाइन राहण्याचे व्यसन किंवा माझे काही करायचे राहून जाऊ नये, सुटू नये (फोमो), या भावनेतून त्यावर असण्याची असलेली अप्रत्यक्ष सक्ती, त्यातच दहावीनंतर काय, या प्रश्नाला पुढच्या करिअरशी जोडून ठेवल्याने वाढलेला ताण असे नानाविध प्रश्नराक्षस या वयोगटापुढे आणि पर्यायाने त्यांच्या पालकांपुढेही उभे आहेत. त्याला सामोरे जाण्याचे उत्तर ना शिक्षणव्यवस्थेत आहे, ना समाजव्यवस्थेत. जो तो पाल्य-पालक आपापल्या परीने त्यांची उत्तरे शोधू पाहतो. त्यात कधी अतिबंधने आणि अतिशिस्तीने माती होते, कधी अतिमोकळेपणा, अतिस्वातंत्र्याने बेफिकिरी वाढते, तर कधी दोन्हींचा मधला मार्ग काढूनही हाती ढोबळच उत्तरे येत राहतात. हे होतेे, कारण प्रत्येक मूल वेगळे असते आणि प्रत्येक पालकही. साधे ऑनलाइन असण्याचे उदाहरण. पालकच आधी गरज म्हणून आणि मग सवय म्हणून, विरंगुळा म्हणून, स्व-अवकाश हवा म्हणून ऑनलाइन राहत असेल, तर मूल कसे मागे राहील? आणि सोडली ही सवय, तरी जगण्यातल्या डिजिटल गदारोळाने डोळ्यांना वाचण्यापेक्षा पाहण्याचा सराव इतका केला आहे, की वाचण्यासाठी थांबूच मागत नाही कुणी. कारण, थांबणे हे क्रियापदच वेगाच्या व्याकरणाने गाळून टाकले आहे.
म्हणजे याला काहीच उत्तरे नाहीत का? तसेही नाही. पण, त्या-त्या पाल्य-पालक घटकाला त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार उत्तरे शोधावी लागतात, हेही तितकेच खरे. त्यातून वेगवेगळ्या आर्थिक स्थितीतील संघर्षही वेगवेगळे. या वयोगटातील मुलांचे पालक करिअरच्या अशा टप्प्यावरचे आहेत, असतात (४० ते ५० वयोगटातील), की जेथे त्यांना फुरसत शब्द जवळ बाळगण्याचीही मुभा नाही. काहींवर अपरिहार्यपणे ही परिस्थिती ओढवलेली, तर काहींनी ओढवून घेतलेली. पण, ‘कुटुंबासाठीच करतो ना हे सगळे,’ असे म्हणून पाल्याच्या प्रश्नांतून सोडवणूक करवून घेणे ही पळवाट पाल्यावर अन्यायकारकच. त्यासाठी सातत्यपूर्ण संवाद हाच खरे तर एकमेव मार्ग. आणि तोही कसा, तर एकमेकांना समजून घेणारा; दोषदर्शन करणारा वा दूषणे देत राहणारा नाही. ‘अॅडोलसन्स’ मालिका पाहिल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर म्हणाले, ‘मीही पौगंडावस्थेत असलेल्या दोन मुलांचा पालक आहे. वडील म्हणून ही मालिका पाहणे मलाही फार अवघड गेले.’ ब्रिटनचे पंतप्रधान असे म्हणत असतील, तर आपली काय कथा, असा प्रश्न स्वाभाविकपणे पडू शकतो. पण, त्यांनी पुढे जे मांडले, तेही लक्षात ठेवणे गरजेचे. ते म्हणतात, ‘मुले आज एकाकी आहेत. त्यांच्या खोल्यांतही असुरक्षित आहेत, कारण ऑनलाइन राक्षस त्यांचे नैतिक स्खलन करण्यास पुरेसे सामर्थ्यवान आहेत…’ पालक म्हणून आकलनाच्या या बिंदूपर्यंत पोहोचता आले, तरी किमान संवाद सुकर होत राहील. बाकी, पौगंडावस्थेतील मुलांचे जग पालकांना कळते आहे का, याचे उत्तर सध्या तरी नाही असेच आहे.