कुणाल कामराने पंतप्रधानांचे थेट नाव घेतले तसे एकनाथ शिंदे यांचे घेतले नसले, तरी विधानसभेत फडणवीसांकडून उघड बचाव शिंदेंचा… हे कामराचे ‘यश’!

अडीच वर्षांची एकत्र सत्ता, निवडणुकीत मिळवलेला ऐतिहासिक विजय यामुळेदेखील जे साध्य होऊ शकले नाही, ते कुणाल कामरा याने करून दाखवले. यासाठी बाकी कोणी नाही तरी निदान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कुणाल कामरा या विनोदकाराचे आभार मानायला हवेत. पण झाले उलटेच. या मंडळींनी कुणालच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले त्या स्टुडिओवर हल्ला केला आणि आपण खरी शिवसेना खरोखरच आहोत हे सिद्ध करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात तेथे मोडतोड केली. वास्तविक शिंदे यांच्या शिवसेनेने कुणालचे खासगीत का असेना अभिनंदन करायला हवे. कदाचित त्यांना कुणालचा विनोद लक्षात आला नसावा. त्यात त्यांची चूक तशी नाही. शिवसेना संस्थापक दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे, त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, पुतणे राज ठाकरे हे तीन ‘सन्माननीय’ अपवाद वगळता अन्य कोणास त्या पक्षात विनोद कळणे तसे अंमळ अवघडच. या तिघांनी(च) विनोद करायचे आणि ते हसल्यावर(च) अन्यांनी हसायचे अशी प्रथा असल्याने ‘हा विनोद आहे; आता हसा’ असा आदेश ‘मातोश्री’वरून येईपर्यंत अन्य सैनिकांस हसण्याची मुभा नव्हती. त्यामुळे कुणालचा विनोद त्यांस कळला नसला तर त्यांस बोल लावता येणार नाही. हे वाचल्यावर यात आदित्य ठाकरे यांचा उल्लेख का नाही, असा प्रश्न काहींस पडेल. त्याचे कारण त्यांना केवळ इंग्रजी विनोद कळतो म्हणून त्यांची गणना अन्य ठाकऱ्यांत नाही. असो. आता शिंदे यांच्या सेनेने कुणाल कामरा यांचे आभार का मानायला हवेत, हा प्रश्न.

याचे स्पष्ट कारण असे की कुणालमुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भर मैदानात, सर्वांसमक्ष उतरून शिंदे यांचा जाहीर बचाव करण्याची वेळ आली. ज्या कृत्याची प्रतीक्षा शिंदे आणि त्यांच्या साजिंद्यांना इतका काळ होती ते कृत्य एका य:कश्चित विनोदकारामुळे फडणवीस यांस करावे लागले. त्यामुळे खरे तर शिंदे यांच्यापेक्षा फडणवीस यांनी कुणालवर संतापायला हवे. मनात नाही ते करावयास लावले यासाठी फडणवीस आणि त्यांच्या भाजप समर्थकांनी कुणालवर चाल करून जायला हवे. पण झाले उलटेच. शिंदे यांच्या साजिंद्यांप्रमाणे फडणवीस यांच्या खंद्या समर्थकांचाही कुणालने केलेला विनोद आणि त्यामुळे फडणवीस यांनी हिरिरीने केलेला शिंदे यांचा बचाव हे पाहून गोंधळ उडाला. म्हणून ते गप्प राहिले. शिंदे यांच्या साजिंद्यांच्या सुरात सूर मिसळत बडबड करते झाले ते प्रसाद लाडसदृश नव आणि सोयीस्कर हिंदुत्ववादी नेते. ती त्या बिचाऱ्यांची गरज. एक तर भाजपमध्ये या अशांना कोणी विचारत नाही आणि जे एके काळी विचारत ते देवेंद्र फडणवीस आता त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यामुळे अशी काही संधी मिळाली की राजापेक्षा राजनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न हे करणार हे ओघाने आले. शिवाय फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळताना शिंदे यांसही नेत्रपल्लवी करण्याची संधी मिळते, हा फायदा आहेच. तेव्हा या मंडळींच्या कुणालक्रोधामागील खरे कारण हे! त्याच वेळी एकनाथ शिंदे यांचे सह-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचेही खरे तर कौतुक करायला हवे. अजितदादा म्हणाले : ‘‘कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये आणि घटनेने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून बोलावे.’’ पवार घराण्यातील सर्वांस आपसूक येते ते चातुर्य हे! अजितदादा जे बोलले ते बोलण्यासाठी कुणाल कामराच्या विनोदाची गरज काय? त्यांनी केले ते विधान सार्वत्रिक सर्वकालीन आहे. पण जेव्हा स्पष्टतेची गरज असते तेव्हाच सरधोपट काही बोलायचे हीच राजकारणातील पवार आडनावाची खासियत.

कारण याच विधानात तर कुणालचे काय करायचे या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. अजितदादा म्हणतात त्याप्रमाणे त्याने घटनाभंग केला आहे काय? असंसदीय शब्द उच्चारले आहेत काय? या प्रश्नांचे खरे उत्तर देता येणे अवघड. ते ‘हो’ असे द्यावे तर घटनाभंग काय हे सांगावे लागेल आणि नाही असे द्यावे तर कुणालचे समर्थन करावे लागेल. अजितदादा अत्यंत चातुर्याने हे दोन्हीही करणे टाळतात. याखेरीज टीका करणे यास आक्षेप घ्यावा तर कुणालपेक्षाही अधिक कडवट टीका राज ठाकरे यांनी अवघ्या २४ तासांपूर्वी केली; त्याची दखल घेणे आले. ‘‘विधानसभेत सगळेच खोक्याभाई’’ असे सणसणीत विधान राज ठाकरे यांनी केले. तथापि २८८ पैकी एकाही विधानसभा सदस्यांस त्यात काही गैर असल्याचे वाटले नसावे. कारण त्यावर कोणीच आवाज उठवला नाही. तसे करण्यात भाजपची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही अडचण झाली असणार. कारण इतके दिवस भाजपचे एकापेक्षा एक झुंजार नेते राज ठाकरे यांच्या गढीवर सादर होत होते आणि शिंदे यांच्या सेनेतर्फे तर खुद्द एकनाथ शिंदे हेच राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे विधानसभेतील सर्वांनाच मनसेप्रमुखांनी ‘खोक्याभाई’ असा सणसणीत शिवीसदृश वाक्प्रचार हासडला असला तरी सर्व विधानसभा सदस्य तो ठाकरी प्रसाद गोड मानून घेताना दिसतात. अपमान सहन करण्याचा या मंडळींचा हा विरोधाभास कौतुकास्पद म्हणावा असा. म्हणजे इतके दिवस अनेकांकडून वापरल्या गेलेल्या शब्दप्रयोगांचाच उपयोग कुणालने केला तर त्याविरोधात आगपाखड आणि विधानसभा सदस्यांचे वर्णन नावीन्यपूर्ण कुशब्दाने करणाऱ्या राज ठाकरे यांच्याबाबत मात्र मौन असा हा दुटप्पीपणा. त्यामागे दोन कारणे असावीत. आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मदतीची गरज हे एक उघड कारण.

आणि दुसरे तितकेच उघडे कारण म्हणजे कुणाल कामरा याने या कार्यक्रमात भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची आणि देशविकासात महत्त्वाच्या उद्याोगपतींची उडवलेली खिल्ली. इंग्रजीत खाता येईल तितकाच घास घ्यावा अशा अर्थाचा वाक्प्रचार आहे. कुणाल कामरास तो माहीत तरी नसणार अथवा त्याला त्याचा विसर तरी पडला असणार. नपेक्षा एकाच कार्यक्रमात तो एकनाथ शिंदे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाया मुकेशभाई अंबानी इतक्यांची खिल्ली न उडवता. तसे त्याने केल्याने शिंदे यांच्यासाठी त्याचा निषेध करावा लागेल/न लागेल, पण निदान पंतप्रधानांसाठी तरी करण्याची वेळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आली. पण तसे त्यांनी उघडपणे केले तर ते एक वेळ समजून घेता आले असते. कारण कुणालने या कार्यक्रमात उघडपणे पंतप्रधानांचे नाव घेतले. त्यामुळे त्याच्या प्रतिवादार्थ फडणवीस यांनी मैदानात उतरणे साहजिक. पण कुणालने सदरहू कार्यक्रमात शिंदे यांचा थेट उच्चार कोठेही केलेला नाही. आणि तरीही त्याविरोधात फडणवीस मैदानात. ज्याच्यावर थेट टीका त्याचा बचाव नाही आणि ज्याचे नावही नाही त्याचा उघड बचाव ही गंमतच म्हणायची. हे कुणाल कामरा याचे ‘यश’. ते विख्यात गणिती जॉन व्हॉन न्यूमन यांच्या आवडत्या किश्शाची आठवण करून देते. पहिल्या महायुद्धकालात बर्लिनच्या भर चौकात जाहीरपणे एका इसमाने कैसर यांस मूर्ख म्हटले म्हणून पोलीस त्यास पकडतात. त्यावर, ‘‘अहो मी जर्मनीच्या कैसरच्या नव्हे तर ऑस्ट्रियाच्या कैसरच्या नावे बोटे मोडत होतो’’, असे सांगण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत असता पोलीस म्हणतात : ‘‘तू आम्हास फसवू शकत नाहीस… तू कोणास मूर्ख म्हणत होतास ते आम्ही जाणतो.’’ येथे ‘त्या’ इसमावर आलेली वेळ कुणालवर आलेली आहे. सबब आता या कुणाल कामराचे काय करणार, हा प्रश्न.