सगळय़ासाठीच दोन वा अधिक पर्याय आणि कशासही नाही म्हणायचा अधिकार नाही.. आपल्या मोरूचे आज काय होणार?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्र संपले. विजयादशमी उजाडली. पण प्रथेप्रमाणे मोरूच्या बापाने मोरूस झोपेतून उठवले नाही. भल्या सकाळी उठून दरवाजास आणि चिरंजीवांच्या दुचाकीस बांधण्यासाठी झेंडूच्या फुलांचे तोरण बनवत बसलेल्या मोरूच्या मातोश्रींकडे आणि गाढ झोपलेल्या आपल्या कुलदीपकाकडे पाहून मोरूच्या बापास कणव आली. त्याचे हृदय पितृप्रेमाने भरून आले. किती अवघड आजच्या तरुणांचे जगणे.. असे वाटून मोरूचा बाप हळहळला. त्याचे मन भूतकाळात गेले.. 

त्यास आठवले विजयादशमी आली की आपले तीर्थरूप आपणास झुंजुमुंजु व्हायच्या आधी अंथरुणातून उठवत आणि मग आपण आपल्या तीर्थरूपांस अंगणाची झाडलोट करणे, आंब्याच्या डहाळय़ा आणणे इत्यादी कामांत मदत करीत असू. नंतर सुस्नात होऊन सरस्वती पूजन असे आणि १-१-१-१ च्या आकडय़ांनी आपल्या पाटीवर आकारलेल्या सरस्वतीस तसेच शेजारी मांडलेल्या आपली लेखणी, पुस्तके, आई बटाटय़ाच्या फोडी करण्यास वापरत असे ती सुरी असे ‘शस्त्रपूजन’ होत असे. मोरूच्या बापास आठवले दरवर्षी लेखणीस झेंडूचे फूल वाहताना आपले तीर्थरूप ‘यामुळे तरी अक्कल येईल’ असे विधान न चुकता करीत. नंतर दुपारी घरच्या घरी बनवलेल्या चक्क्याचे श्रीखंड चापायचे आणि झोपून उठल्यावर संध्याकाळी विचारांचे सोने लुटण्यास सज्ज. संपूर्ण विजयादशमीत मोरूच्या बापाचा सर्वात आवडता कार्यक्रम हा. विचारांचे सोने लुटणे. म्हणजे नक्की काय करायचे हे त्यांस तेव्हाही कळाले नव्हते आणि आता तर हे कळण्याचा प्रश्नच नाही. पण तरी त्या वेळी या सोने लुटण्यास जाणे आवडे. याचे एकमेव कारण या विचारसोने लुटण्यामुळे घरात चारचौघात जे उच्चारता येत नसत ते शब्दप्रयोग कानी पडत. त्यामुळे भाषासमृद्धी होत असे. हे सर्व आठवले आणि मोरूचा बाप गाढ झोपलेल्या मोरूकडे पाहात भला मोठा सुस्कारा सोडता झाला..! 

हेही वाचा >>> अग्रलेख: महुआ-मायेचे मूळ!

काय काय सहन करावे या पिढीने..असा प्रश्न त्यास मोरूकडे पाहून पडला. आपल्या लहानपणी एक तर गरब्याचे इतके प्रस्थ नव्हते. सभ्यसाधा भोंडला असे. पण आज मोरूच्या पिढीस निवडीचे स्वातंत्र्य आले. याचा खरे तर आनंद वाटावयास हवा. पण नकाराधिकाराशिवाय निवडीच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग, असे वाटून मोरूचा बाप पुन्हा खजील झाला. म्हणजे असे की मोरूच्या लहानपणी गल्लीत एकच-एक गरबा असे. आता तसे नाही. अर्धा डझन तरी गरबे लागतात. लोकप्रतिनिधीचा एक, त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा दुसरा, धर्माभिमानी संस्कृतीसंवर्धक भाजपचा तिसरा, या तीनही पक्षनेत्यांच्या युवा-पिढीचे तीन म्हणजे एकूण सहा, खेरीज आपण धर्मसंस्कृतीप्रेमात तसूभरही कमी नाही हे दाखवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे दोन, त्यांच्या युवाशाखांचे आणखी दोन अशा किमान दहा गरब्यांत मोरूस कंबर लचकवण्यासाठी जावे लागते. दररोज. न गेल्यास तू ‘त्यांच्या’ गटात सामील दिसतोस असे ‘यांचे’ आरोप. यांच्याकडे जावे तर मग ‘ते’ नाराज. कोणीच नाराज नको म्हणून मग सगळय़ांकडे जावे तर नाचून नाचून मोरूचे त्याच्या हातातील टिपऱ्यांपेक्षा जरा बरे कंबरडे मोडते की काय, अशी परिस्थिती. हे असे हल्ली प्रत्येक सणाचे होऊ लागल्याने मोरूचा बाप फार म्हणजे फारच काळजीत पडला. दहीहंडीत ‘प्रेरणा’, ‘स्वाभिमान’, ‘संघर्ष’ अशा शूरवीर नावांच्या हंडय़ांत भिजून भिजून मोरूस न्यूमोनिया होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मोरूच्या बापास आठवले. त्यानंतर गणपती. गल्लोगल्लीच्या राजांच्या मिरवणुकांत नाचणाऱ्या मोरूंची प्रजा पाहून याचा अभिमान बाळगावा की लाज वाटून घ्यावी असा प्रश्न आपणास पडल्याचेही मोरूच्या बापास आठवले. पूर्वी दोन मराठी माणसे एकत्र आली की त्यांच्या तीन संस्था तयार होतात, असे म्हटले जात असे. राज्याने प्रगती केली असल्याने आता तिनाने भागत नाही. आता सुरुवातच दोनाच्या चाराने होते आणि मग त्यांचा गुणाकार होत जातो. तेव्हा ‘आवाऽऽऽज कुणाचा’ या ऐतिहासिक प्रश्नास उत्तर तरी काय देणार आजचे मोरू हा प्रश्न. आता श्रीखंडाचीही काही मातबरी नाही. ते कधीही मिळते. पूर्वी केवळ उन्हाळय़ात अंगाची लाही झाल्यावर खावयाची किलगडे आता भर पावसातही पिकतात; तेव्हा एकटय़ा मोरूस तरी किती दोष देणार? विचारांच्या सोन्याचेही असेच..

हेही वाचा >>> अग्रलेख : अर्थचक्रप्रवर्तन

पूर्वी ते एकाच ठिकाणी लुटले जात असे आणि एकच एक (कथित) विचार देत असे. मामला सोपा होता तेव्हा. आता तसे नाही. शिवसेनेच्या सभेस जावयाचे म्हटले तरी पुढचा प्रश्न : कोणाच्या? विरोधी पक्षात असलेल्या असे उत्तरावे तरी मग प्रश्न : मग सत्तेत आहे तीही शिवसेनाच नव्हे काय? विरोधी पक्षातही आणि त्याच वेळी सत्तेतही एकाच वेळी ‘असणे’ जमलेला दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीचे नेते पवार आणि सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचेही नेते पवार. तेव्हा पवारांचे ऐकावे म्हटले तर कोणत्या पवारांचे हा प्रश्न उरतोच. शिवसेनेच्या तुलनेत हा राष्ट्रवादीचा गुंता अधिक गांगरवणारा. दोघे एकत्र आहेत. आणि त्याच वेळी ते एकत्र नाहीतही. त्यामुळे त्या पक्ष-चाहत्या मोरूंची अधिक पंचाईत. तथापि एका मुद्दय़ावर राष्ट्रवादीची विजयादशमी अधिक सोपी. याचे कारण उगाच विचारांचे सोने लुटण्याची प्रथा त्या पक्षाची नाही. तो पक्ष काँग्रेस संस्कृतीत वाढलेला. त्यामुळेही असेल. पण लुटायचे असेल तर हाती काही लागेल असे भरीव काही केलेले बरे असा विचार त्या संस्कृतीत झालेला असणार. उगाच लांबलांबून आपल्या कार्यकर्त्यांना बोलवायचे आणि रिकाम्या हाताने पण भरलेल्या डोक्याने परत पाठवायचे यात काही अर्थ नाही, हे त्यांस लवकर उमगले. हातात काही भरलेले असेल तर निदान ते कळते तरी. विचारांनी डोकी भरायची म्हणजे भलतीच पंचाईत. आधी आत (म्हणजे डोक्यात) किती जागा आहे याचा अंदाज नाही. त्यामुळे त्यात (म्हणजे डोक्यात) आणखी किती काय मावेल हे कसे कळणार? म्हणून काँग्रेस संस्कृतीत ही अशी विचारांचे सोने लुटण्यास शिलंगणास निघण्याची प्रथा नाही, हे लक्षात येऊन मोरूच्या बापाचा ऊर काँग्रेसी नेतृत्वाविषयी आदराने भरून आला.  पण त्याच वेळी आपल्या मोरूचे आज काय होणार या चिंतेची काजळी त्यांच्या मनी दाटून आली. सगळय़ासाठीच दोन वा अधिक पर्याय आणि कशासही नाही म्हणायचा अधिकार नाही. आपल्या सांस्कृतिक मराठी अस्मितेचे रक्षण करण्यास पूर्वी एकच पक्ष होता. आता दोन आणि अधिक कधी कधी एक मनसे. धर्माचा विचार करावा तर तिथेही तेच. आद्य धर्मरक्षक भाजप आहे. त्याचा एके काळचा ‘मातोश्री’केंद्रित सहकारी पक्ष आहे. त्या पक्षातून निघालेला आणखी एक पक्ष आहे. याच्या जोडीला ‘मातोश्री’तून फुटून दादरात ‘शिवतीर्था’कडे गेलेली आणखी एक फांदी आहे. म्हणजे मराठी अस्मितेसाठी दोन अधिक कधी कधी एक असे तीन; तर हिंदूत्वासाठी तीन अधिक कधी कधी एक असे चार चार पक्ष. यातले दोन आज विजयादशमीस एकाच वेळी विचारांचे सोने लुटणार! कसे काय हे आपल्या मोरूच्या मेंदूस पेलवणार असा प्रश्न पडून मोरूचा बाप अधिकच चिंतातुर जाहला. त्याने ठरवले.. हे जीवघेणे आव्हान पेलावे लागण्यापेक्षा मोरू झोपून राहिलेला बरा.. म्हणून विजयादशमी असूनही मोरूच्या बापाने मोरूस झोपेतून उठवलेच नाही..!

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara melava 2023 eknath shinde vs uddhav thackeray political leaders rally in maharashtra on dasara festival zws