पहिल्या चेंगराचेंगरीत रस्त्यावर झोपलेले पायदळी तुडवले गेले. दुसऱ्या चेंगराचेंगरीत रेल्वे फलाटावरील प्रवासी चेपले गेले. हे दोघेही ‘जनता क्लास’चे…
माणसांकडून कुस्करली जाऊन माणसे मरणे आपणास नवीन नाही. गेल्या वर्षी हाथरस येथे कोणा भोले बाबा याच्या सत्संगात सुमारे १२१ जणांचे मरणे, साधारण २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मांढरा देवीच्या जत्रेतील चेंगराचेंगरीत ३४० जणांनी जीव गमावणे, त्यानंतर तीन वर्षांनी २००८ साली राजस्थानातील चामुंडा देवीसमोरील गर्दीत २५० आणि त्याच वर्षी हिमाचलातील नैना देवी येथील मानवी कोंडीत १६२ जणांचे चिरडून मरणे हे ‘महाअपघात’ वगळले तर चेंगराचेंगरीच्या घटना कोठे ना कोठे घडतच असतात. गेल्या महिन्यात महाकुंभात प्रयागराज येथे असा प्रकार घडला. त्यात नक्की किती जण बळी गेले त्याबाबत सरकार सांगत असलेल्या संख्येवर अनेकांचा विश्वास नाही. ते ठीक. पण या चेंगराचेंगरीत ३० जणांचा बळी गेला असे सांगितले जाते. त्या घटनेवर ‘लोकसत्ता’ने ‘मेजॉरिटीची मौनी ममता’ या संपादकीयातून भाष्य केले. त्या घटनेच्या जखमा, व्रण आणि आठवणीही ताज्या असताना शनिवारी रात्री देशाची राजधानी नवी दिल्ली येथील रेल्वे स्थानकावरही असा प्रकार घडला. तूर्त सरकारच्या म्हणण्यानुसार त्यात १८ जणांचा बळी गेला. एका चेंगराचेंगरीनंतर तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आपण किती शिकलो, किती खबरदारी घेतली हे यातून दिसते. यातील दुर्दैवी भाग आहे तो एकाच सोहळ्याशी संबंधित घडलेले हे दोन चेंगराचेंगरीचे प्रकार. म्हणजे या सोहळ्यास आपले राज्यकर्ते जनतेस उत्साहाने निमंत्रणे धाडत असले तरी इतक्यांस हाताळण्याची सरकारी तयारी किती तुटपुंजी होती हेच यातून दिसते. गावजेवणास हाका मारून मारून बोलवायचे आणि लोक खरोखरच आले की त्यातले ‘व्हीआयपी’ वगळता अन्यांना वाऱ्यावर सोडायचे तसा हा प्रकार. तो आता रेल्वेबाबतही दिसून आला. जे झाले ते इतके आक्षेपार्ह आहे की त्यामुळे रेल्वे वास्तवावर भाष्य करणे अनिवार्य ठरते.
कारण रेल्वे असो वा महाकुंभातील सहभागींच्या व्यवस्थेचा मुद्दा. आपला सगळा भर आहे तो श्रीमंतांस कशी तोशीस पडणार नाही; या वर्गाचे सर्व काही सुखासमाधानाने कसे पार पडेल यावर. उद्योगपती, चित्रपट तारेतारका, राजकारणी, अन्य देशांचे प्रतिनिधी यांची चोख व्यवस्था करावी आणि जनसामान्यांनी त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे. तो जितका महाकुंभ येथील गोंधळविरहित पंचतारांकित सोयीसुविधांस लागू होतो तितकाच तो रेल्वेबाबतही सत्य ठरतो. रेल्वेचा सगळा भर आहे तो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांस शाही सुविधा देण्यावर. याबाबत भावी ‘बुलेट ट्रेन’ हे काही एकमेव उदाहरण नाही. रेल्वेच्या विविध गाड्यादेखील याच मानसिकतेचे प्रदर्शन घडवतात. एक तर आपल्याकडे करोनाकाळापासून ‘जनता क्लास’ला कात्रीच लागलेली आहे. या जनता क्लासच्या डब्याची संख्या कमी, जनता गाड्या कमी, चालवल्या तरी श्रीमंती गाड्यांसाठी त्या मागे ठेवायच्या वा त्यांचा वेग कमी करायचा हे प्रकार सर्रास अनुभवास येतात. याचा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नसावी. सर्व काही नवश्रीमंत आणि राजनिष्ठ वर्गासाठी. नवी दिल्ली स्थानकावर जो काही प्रकार घडला त्यातून हीच मानसिकता दिसून येते आणि नंतर तो ज्या प्रकारे हाताळला गेला त्यातून तर ती अधोरेखितच होते. हा मुद्दा समजावून घेण्यासाठी जे झाले, जसे झाले तसेच त्याकडे पाहायला हवे.
या स्थानकात जी गर्दी जमली ती ‘जनता क्लास’ची होती. हा वर्ग सरकारने सोडलेल्या विशेष रेल्वे गाड्यांतून प्रयागराज येथे पुण्यसंचयासाठी जाऊ पाहत होता. पापपुण्यास न मोजणारे धनाढ्य उद्याोगपती, चित्रपट तारेतारका इत्यादींस गंगेत अर्घ्य देताना जेव्हा सामान्यजन पाहतात तेव्हा त्यांनाही असे करावेसे वाटणे साहजिक. यातील अडचण ही की या मंडळींच्या यशाचे श्रेय सामान्यजन त्यांच्या धर्म कार्यास देतात आणि म्हणून त्यांस ते अनुकरणीय वाटते. वास्तविक या चमचमत्या वर्गाचे जगणे आणि पापपुण्याची संकल्पना यांचा काहीही संबंध नसतो, हे अनेकांस लक्षातही येत नाही. समाजाचे ‘संस्कृतायझेशन’ म्हणतात ते हेच. घरमालकाप्रमाणे त्याच्याकडील घरगुती कामगार, स्वयंपाकाच्या बाई, मोटारीचा चालक आदींनाही आपल्या मुलाबाळांस इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालावे असे वाटते तेही याच समाजाच्या ‘संस्कृतायझेशन’चे लक्षण. जेव्हा हा असा उपेक्षित समाज प्रचंड संख्येने असतो तेव्हा महाकुंभास जाणाऱ्यांची गर्दी हाताबाहेर जाऊ लागते. ती तशी हाताबाहेर जाणार हे खरे तर रेल्वे तिकिटांची विक्री करणाऱ्यांस न कळणे अशक्य. विशेषत: दोन तासांत २६०० वा अधिक तिकिटे विकली गेली असतील तर रेल्वेच्या फलाटावर इतक्यांस सामावून घेता येणे अशक्य हे लक्षात येण्यास विशेष बुद्धिमत्तेचीही गरज नाही. पण तितकाही विचार रेल्वे प्रशासनाने केला नाही. कारण अर्थातच जनता क्लास. हे सर्व विशेष गाडीने पुण्यसंचयास जाणारे होते, हा वर्ग काही चार्टर्ड फ्लाइटने जाऊन पंचतारांकित तंबूत गंगाकिनारी वास्तव्यास जाणारा नाही. त्यामुळे त्यांची पर्वा करण्याची गरज प्रशासनास वाटली नसेल तर ते प्रचलित संस्कृतीप्रमाणेच झाले म्हणायचे. गंगाकिनारी पहिल्या चेंगराचेंगरीत रस्त्यावर झोपलेले पायदळी तुडवले गेल्याने मारले गेले. दुसऱ्या चेंगराचेंगरीत रेल्वे फलाटावरील प्रवासी चेपले गेले. दोन्हींतील साम्य एक. ते म्हणजे जनता क्लास.
या वर्गातील अनामिकांच्या जगण्याची किंमत त्यांच्या मरणाच्या वार्तेत अधिक असते. त्यामुळे या वर्गासाठी काही खास केले न केले तरी केले नाही असे चित्र निर्माण होणे सत्ताधीशांस चालत नाही. साहजिकच ते. कारण सगळे राजकारण होत असते ते गरिबांच्या नावे आणि हा गरीबच जर पायदळी तुडवला जात असेल तर ते सत्य सत्ताधीशांसाठी कटूच असणार. त्यामुळे हे सत्य जमेल तितके दाबणे आणि न जमल्यास अधिकाधिक लांबवणे इतके तरी करण्याकडे सत्ताधीशांचा कल असतो. प्रयागराज येथील गंगाकिनारची चेंगराचेंगरी असो वा राजधानी दिल्लीतील रेल्वे फलाटावरील. दोन्हीही प्रकारांत हेच सत्य दिसून आले. ही यातील चीड आणणारी बाब. हा सारा प्रकार घडल्यानंतर अडीच-तीन तास सरकारी उच्चपदस्थ तसे काही घडलेच नाही, ही अफवाच आहे, सर्व काही सुरळीत आहे इत्यादी तुणतुणे वाजवत बसले. सर्व प्रयत्न करूनही ही बातमी दाबता येणार नाही, हे लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी मृतात्म्यांस श्रद्धांजली वाहणारे ट्वीट केले आणि तसा हिरवा सिग्नल मिळाल्यावर मग रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत भाष्य करण्याची सद्बुद्धी झाली. त्याआधी वास्तविक रुग्णालयांतून या चेंगराचेंगरीत किती मृत झाले इत्यादी माहिती दिली जात होती. पण तरीही त्यावर उच्चपदस्थ मौन बाळगून होते. प्रयागराज येथील चेंगराचेंगरी आणि हा रेल्वे स्थानकावरील प्रकार यात आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे या दोन्ही ठिकाणी माध्यमांस रुग्णालयांत जाऊ देण्यापासून रोखले गेले. सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या उच्चपदस्थांनी वास्तविक असे काही करण्याची गरज नव्हती. उलट माध्यमांस आडकाठी न करू देता सर्व काही आलबेल कसे आहे त्याचे चित्रीकरण करू द्यायला हवे होते.
पण उच्चशिक्षित, अभ्यासू इत्यादी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या प्रकरण हाताळणीत फरक नव्हता. ‘इतरांची पीडा जाणतो तो खरा वैष्णव’ असे ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’’ हे भजन सांगतो. या कसोटीवर या वैष्णवाने स्वत:चे मूल्यमापन करावे. मग लालबहादूर शास्त्री हे खरे वैष्णव का ठरतात हे कळेल.