ट्रम्प व पुतिन यांच्या मानसिकतेत मूलत: काहीही फरक नसल्याचेच वारंवार दिसल्यास, अनेक धुरीणांस जगाची घडी नव्याने बसवावी असे वाटणार…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या पूर्वसुरी विरोधकांनी जे केले त्याच्या नेमकी उलट कृती करणे, त्यांना बोल लावणे, त्यांना अयोग्य ठरवणे यातच स्वत:च्या कृतीची योग्यता शोधणारे जगाच्या पाठीवर कमी नाहीत. यांचा समजेचा अवकाश मर्यादित असतो आणि स्वत:च्या शहाणपणापेक्षा आपल्या पूर्वजांना मूर्ख ठरवणे इतकीच त्यांची झेप असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अशांतील एक. अमेरिकेसारख्या प्रबळ आणि प्रभावशाली देशाचे नेतृत्व अशा व्यक्तीकडे जाणे हे त्या देशाचे आणि त्यापेक्षाही अधिक जगाचे दुर्दैव. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊन जेमतेम दोन महिनेही झालेले नाहीत; पण आपण काय काय उत्पात घडवू शकतो याची चुणूक दाखवण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. आपल्या विजयाची इच्छा बाळगणाऱ्यांचे तर नाक पुरते ठेचल्याखेरीज ट्रम्प थांबणार नाहीत असे दिसते. यात अमेरिकेतील रिपब्लिकन जसे येतात, तसे भारतात त्यांच्या विजयासाठी देव पाण्यात घालून बसणारे येडबंबू विचारांधळेही येतात. यातील पहिल्या वर्गातील शहाणे- म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकनांतील काही- ट्रम्प यांच्याविरोधात व्यक्त होऊ लागले असून दुसऱ्या वर्गात हे शहाणपण झिरपण्यास अंमळ वेळ जावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नको नको’ म्हणत असताना, नाराजी व्यक्त करत असताना आपण त्यांना आयात करवाढीसंदर्भात कसे सुनावले याची जाहीर आणि अत्यंत असभ्य फुशारकी ट्रम्प यांनी मारली असली तरी ती अनेकांची ‘अगली बार…’ची झिंग उतरवण्यास पुरेशी असेलच असे नाही. असो. त्या- म्हणजे भारतासंदर्भातील- विषयास स्पर्श करण्याची संधी यापुढे वारंवार देण्यास ट्रम्प समर्थ आहेत. तूर्त युक्रेन आणि रशिया या संदर्भात त्यांनी तोडलेल्या ताऱ्यांबाबत.
त्यात कहर आहे तो ‘रशियाशी युद्ध युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीच सुरू केले’ हे ट्रम्प यांचे विधान. त्यामुळे खुद्द ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षात खळबळ उडाली असून साऊथ कॅरोलायना, साऊथ डाकोटा, आयोवा इत्यादी प्रांतांचे लोकप्रतिनिधी ट्रम्प यांच्या या भूमिकेपासून फारकत घेताना दिसतात. ही संख्या तूर्त लहान असेल. पण ही केवळ सुरुवात आहे आणि ट्रम्प यांना अध्यक्षपदी येऊन दोन महिनेही झालेले नाहीत. इतकेच नाही तर काही वृत्तवाहिन्यांच्या पाहण्यांत निम्म्यापेक्षा अधिक सहभागींनी ‘ट्रम्प अती करत आहेत’ असे मत नोंदवले. या सगळ्यामुळे ट्रम्प यांस तूर्त तरी काही फरक पडणार नाही. कारण आपल्या आधीचे आणि त्यातही डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व वेडे ठरवणे हीच ट्रम्प यांच्या शहाणपणाची परिसीमा. तथापि यामुळे अमेरिकेचे जागतिक राजकारणातील एकंदर स्थानच धोक्यात आले असून युक्रेनच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेने जगभरात अनेकांनी अमेरिकेवर यापुढे किती विश्वास ठेवावा असा प्रश्न विचारला आहे. ते योग्यच. याचे साधे कारण असे की अमेरिकेचे जागतिक अस्तित्वच मुळी अवलंबून आहे ते रशियाविरोधातील दुसरा ध्रुव असे. पण ट्रम्प महाशय तेच पुसून टाकायला निघालेले दिसतात. आपला इतिहास पुसून नवा इतिहास लिहिण्याची त्यांची घाई इतकी की ते युक्रेन-रशिया युद्धासाठी झेलेन्स्की यांना जबाबदार धरतात आणि त्यांची संभावना ‘हुकूमशहा’ अशी करण्यापर्यंत ट्रम्प तात्यांची मजल जाते. हा वेडाचार असाच चालत राहिला तर जगातील खरा लोकशाहीवादी म्हणून ते पुतिन यांस मिठीत घेण्याचा क्षण फार दूर नाही. सारे जग जाणते की तीन वर्षांपूर्वी २४ फेब्रुवारी या दिवशी पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला आणि त्या देशास स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार नाही असे भाष्य केले. आता त्या पुतिन यांस काहीही बोल न लावता ट्रम्प चक्क झेलेन्स्की यांनाच दोष देणार. यातून एक बाब ठसठशीतपणे स्पष्ट होते. ती म्हणजे अध्यक्षपदी विराजमान होण्याआधीच ग्रीनलँडवर हक्क सांगणारे, पनामा कालवा परत द्या अशी मागणी करणारे आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवल्यासारखे इजिप्त आदी देशांना पॅलेस्टिनींना सामावून घ्या असा ‘आदेश’ देणारे ट्रम्प आणि जॉर्जियास हात घालणारे, युक्रेनवर हल्ला करणारे पुतिन यांच्या मानसिकतेत मूलत: काहीही फरक नाही. हे सत्य वारंवार समोर येणार असेल तर त्यामुळे अनेक धुरीणांस जगाची घडी नव्याने बसवावी असे वाटणार आणि तसे करावे लागणार.
त्याची सुरुवात झाल्याची चिन्हे दिसतात. ज्या पद्धतीने इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी अधिकृतपणे ट्रम्प यांच्यापासून फारकत घेत झेलेन्स्की यांना जाहीर पाठिंबा दिला त्यात या आगामी रचनेची चिन्हे दिसतात. या तीनही देशांच्या प्रमुखांनी स्वतंत्रपणे झेलेन्स्की यांच्याशी संपर्क साधला आणि रशियाविरोधातील संघर्षात उघड पाठिंबा जाहीर केला. याचा अर्थ ‘‘झेलेन्स्की यांना जायला एकही देश उरणार नाही’’ ही ट्रम्प यांची ताजी दर्पोक्ती अमेरिकेच्याच एकेकाळच्या मित्रदेशांनी फोल ठरवली. हे यापुढे वारंवार होईल. ग्रहताऱ्यांत काहीही चांगले-वाईट, शुभ-अशुभ नसते असेच ‘लोकसत्ता’ मानत असला तरी केवळ लोकप्रिय उपमा म्हणून ट्रम्प आणि पुतिन यांचे एकाच वेळी सत्तेत असणे हे ‘राहू-केतू एकाच घरात’ असल्यासारखे म्हणावे लागेल. यातील पुतिन यांनी आपण तहहयात अध्यक्षपदी राहू अशी तजवीज केलेली आहे आणि आपल्यालाही तसे काही करायला आवडेल अशी इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा हे संकट इतक्यात तरी काही संपुष्टात येण्याची शक्यता नाही. तसे होईल तेव्हा होवो. पण ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे आणखी एक गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
ती म्हणजे चीन. पुतिन यांच्या रशियाने झेलेन्स्की यांच्या युक्रेनवर केलेला हल्ला रास्त ठरत असेल, पॅलेस्टिनी भूमीत इस्रायलचा अमानुष अतिरेक गोड मानून घ्यावयाचा असेल तर उद्या चीन याच मार्गाने तैवानचा घास घ्यायला गेल्यास त्यास हे कोणत्या हाताने रोखणार? हे कल्पनाचित्र नाही. उंबरठ्यावर येऊन ठेपलेले वास्तव असून त्याचा अंदाज आत्मप्रेमात आकंठ बुडालेल्या ट्रम्प यांस आहे किंवा काय हा प्रश्नच. परत तो विचारणार कोण हा दुसरा प्रश्न. स्वत:च्याच प्रेमात पडलेल्याचा प्रेमभंग अशक्य असतो. पण या आत्मप्रेमींमुळे जगावरील विद्यामान आणि भावी संकटांस सामोरे कसे जावे याचा विचार शहाणपण शाबूत असलेल्या धुरीणांस तातडीने करावा लागेल. ती वेळ येऊन ठेपली आहे. ‘‘माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही’’ असे ट्रम्प म्हणतात. ते खरे आहे. कारण अशा आत्मप्रेमीशी वाद घालण्यापेक्षा दगडी भिंतीवर डोके आपटणे कमी वेदनादायी याचे भान सर्वांस असल्याने ट्रम्प यांच्याशी वाद घालण्यास जाणार कोण? तसे करून वेळ दवडण्यापेक्षा युक्रेनला वाचवायचे कसे, पॅलेस्टिनींना आधार द्यायचा कसा याचा मार्ग शोधणे अधिक गरजेचे आहे.
‘‘मातृभूमीच्या भल्यासाठी जो काम करतो त्याच्याकडून कधीही कायदेभंग होत नाही’’ अशा अर्थाचे अत्यंत भंपक ट्वीट हे ट्रम्प करतात. आपण काहीही केले तरी ते देशासाठीच आहे असे म्हणण्याची सोय राजे-सम्राटांना असते कारण त्यांच्या कृतीचे मूल्यमापन करण्याची मुभा प्रजेस नसते. ट्रम्प यांचा प्रवास त्या दिशेने सुरू आहे. ‘‘लाँग लिव्ह द किंग’’ असे दुसऱ्या ट्वीटमधे ते स्वत:च्याच निर्णयास उद्देशून म्हणतात. हा प्रकार अहंमन्य अमेरिकेसाठी आत्मघातकी ठरेलच; पण जगासाठीही तितकाच घातकी ठरेल, हे नि:संशय.