ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या वटवटीच्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेत्यांनी दाखवलेला समंजसपणा आणि पुतिन यांचे चातुर्य अधिक उठून दिसते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरज ही केवळ शोधांचीच जननी असते असे नव्हे. ती संबंधांचीही जननी असते. विशेषत: अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा हडेलहप्पी आणि बेमुर्वतखोर गृहस्थ आल्यावर सगळेच अस्थिर आणि बेभरवशाचे वाटू लागते. अशा वेळी नव्या समीकरणांची गरज निर्माण होते. त्यात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांस ‘व्हाइट हाऊस’मध्ये अध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स या जोडगोळीने जी वागणूक दिली ती आंतरराष्ट्रीय संबंध, मुत्सद्देगिरी इत्यादी विषयांबाबतच्या प्रचलित समजांस तडा देणारी होती. त्याबाबत ‘लोकसत्ता’ने ‘‘विश्व’गुंड’ या संपादकीयात (३ मार्च) सविस्तर भाष्य केले. त्यामुळे त्याच्या पुनरुक्तीची गरज नाही. या संपादकीयात ‘ट्रम्प आपल्या वर्तनामुळे अन्य अनेक देशांस अमेरिकेविरोधात एकत्र येण्याची गरज दाखवून देतात’ अशी टिप्पणी आहे. या घटनेनंतर २४ तासांच्या आत हे भाकीत खरे होताना दिसते. वॉशिंग्टनमध्ये अपमानित झेलेन्स्की तेथून लंडनला गेले आणि तेथे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी दोन्ही हातांनी कवेत घेऊन त्यांचे स्वागत केले. राजे चार्ल्स यांनीही झेलेन्स्की यांस धीर दिला. झेलेन्स्की यांस दुखावताना सध्याचे जग अमेरिकाधार्जिणे नाही याचेही भान ट्रम्प यांस राहिले नाही. इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आहे. पण तरी अमेरिकेची तळी उचलण्यात धन्यता मानणारे टोनी ब्लेअर वा तत्सम कोणी पंतप्रधानपदी नाही. जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही आपल्या हो ला हो म्हणणारे सत्तेवर नाहीत हे वास्तवदेखील ट्रम्प यांनी लक्षात घेतले नाही आणि साऱ्या विश्वावर जणू आपली मालकी आहे अशा थाटात ते वागले. असे केले की काय होऊ शकते याचा पहिला धडा ट्रम्प यांस मिळाला.

तो म्हणजे युरोपात नुकतीच पार पडलेली अघोषित युक्रेन परिषद. व्हाइट हाऊसमधून अपमानित झेलेन्स्की यांचे स्वागत उत्साहाने ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ येथे तर झालेच. पण त्याखेरीज त्यांच्या स्वागतासाठी युरोपीय युनियनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेयेन, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्राँ, इंग्लंडचे कीएर स्टार्मर या देशप्रमुखांखेरीज जर्मनी, इटली, डेन्मार्क, तुर्कीये आणि नाटो इत्यादींचे प्रतिनिधी हजर होते. इतकेच नव्हे तर अमेरिकेचा सख्खा शेजारी असलेल्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेदेखील यासाठी मुद्दाम हजर राहिले. ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका कॅनडासही सहन करावा लागत असून इतकी वर्षे कॅनडाबरोबर अस्तित्वात असलेला गुप्तवार्ता सहकार्य करार ट्रम्प रद्द करू पाहतात. या व अन्य कारणांनी कॅनडासही त्यांनी दुखावलेले असल्याने ट्रुडो यांची झेलेन्स्की समर्थनार्थ उपस्थिती वारे कोणत्या दिशेने वाहू लागले आहेत याची जाणीव करून देते.

या सर्वांनी झेलेन्स्की यांस ‘आम्ही तुमच्या मागे आहोत’ असे आश्वासन देत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांस एक प्रकारे खिजवलेच. यातील इटली हा ट्रम्पस्नेही देश आणि ‘नाटो’ ही ट्रम्पस्नेही संघटना. पण त्यांनाही ट्रम्पविरोधात झेलेन्स्की यांच्यामागे उभे राहण्याची गरज वाटली. इंग्लंडचे पंतप्रधान या प्रसंगी म्हणाले : एखाद्या पिढीत एकदाच येतो असा प्रसंग सध्या आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे. असे म्हणतानाच त्यांनी एकट्या इंग्लंडकडून युद्धग्रस्त युक्रेनला २७० कोटी डॉलर्स इतके विशेष कर्ज मंजूर केले. त्याचबरोबर २०० कोटी डॉलर्स इतके निर्यात साहाय्यही त्या देशास इंग्लंडकडून दिले जाईल. ‘‘आम्ही युक्रेनचे अर्थसाहाय्य दुप्पट करत आहोत’’ असे स्टार्मर यांनी जाहीर केले. ब्रिटिश पंतप्रधानांनी या वेळी चार कलमी युक्रेन साहाय्य योजना जाहीर केली आणि त्या युद्धग्रस्त देशात शांतता परतावी यासाठी युरोपीय संघातर्फे सर्व ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले. हे सर्व होत असताना युरोपीय नेत्यांनी दाखवलेले चातुर्य आणि राजकीय समज वाखाणण्याजोगी ठरते.

असे म्हणण्याचे कारण म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने वा अन्यत्रही एकाही युरोपीय नेत्याने ट्रम्प यांच्यावर एका शब्दाने टीका केली नाही. दुसरे असे की व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की चकमक झाल्यानंतरही ब्रिटिश पंतप्रधानांनी एकदा नव्हे दोन वेळा ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. युरोपीय संघाच्या प्रमुख उर्सुला लेयेन या वास्तविक ट्रम्प समर्थक अजिबात नव्हेत. पण त्यांनीही ट्रम्प यांच्यावर अजिबात टीका न करण्याचा संयम दाखवला. या उभयतांनी उलट ट्रम्प हे किती प्रामाणिक शांततावादी आहेत, त्यांच्या याबाबतच्या भावना किती तीव्र आणि सच्च्या आहेत वगैरे भाषा केली.

ट्रम्प यांच्यासारखे आत्ममग्न, आत्मप्रेमी नेते साध्या स्तुतीने विरघळतात. म्हणून अशा मंडळीस आसपास सत्यवाद्यांपेक्षा स्तुतिपाठक हवे असतात. खोटी असली तरी चालेल; पण या आणि अशांना केवळ आणि केवळ स्तुती हवी असते. सबब अशांस हरभऱ्याच्या झाडांवर चढवण्याची सोय झाली की जिंकून घेता येते. याचा पूर्ण अंदाज असल्याने एकाही युरोपीय नेत्याने ट्रम्प यांच्याविरोधात चकार शब्द काढला नाही. ही अवस्था अधिक अवघड. कारण अद्वातद्वा बडबड केल्यानंतरही समोरचा शांतता न ढळू देता बडबड करणाऱ्याविषयी बरेच बोलत असेल तर ही परिस्थिती घायाळ करणारी ठरते. टीकेपेक्षा कधी कधी स्तुती ही अधिक जहरी आणि गहरी जखम करणारी कशी ठरते; त्याचा हा नमुना. ट्रम्प यांची अडचण येथेच संपत नाही.

तीत रशिया आपली स्वत:ची भर घालताना दिसतो. काही व्यक्ती, संस्था वा प्रसंगी व्यवस्था यांच्याकडून कौतुक केले गेले तर त्यातून पात्रतेपेक्षा अपात्रतेचेच दर्शन घडते. सद्या:स्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी व्यवस्था म्हणजे रशिया आणि पुतिन. व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जे काही घडले तर त्यावर रशियाने मौन पाळले असते तर वास्तविक ते ट्रम्प यांच्यासाठी अधिक बरे झाले असते. पण तसे न करता पुतिन आणि त्यांच्या प्रशासनाने झेलेन्स्की यांस ‘जागा’ दाखवून दिल्याबद्दल ट्रम्प यांचे जाहीर कौतुक केले. हे फारच वाईट. कारण अमेरिकेत आधीच ट्रम्प यांच्यावर पुतिन यांच्या ताटाखालचे मांजर होत असल्याची टीका होत असताना पुतिन हे अमेरिकी अध्यक्षांचे कौतुक करताना दिसत असतील तर त्यातून त्या टीकेत किती तथ्य आहे हेच दिसून येते.

सध्या तसेच होऊ लागले आहे. परत रशिया इतकेच करून थांबला नाही. तर त्या दिशेने ‘सध्याच्या अमेरिकेची’ आणि रशियाची धोरणे यांत किती साम्य आहे यावर भाष्य केले. हा तर कहरच. रशियाच्या पुतिन यांच्यासारख्या अध्यक्षाकडून प्रमाणपत्र घेणे हे अमेरिकी अध्यक्षासाठी अपात्रता निदर्शक असते. हे भान पुतिन यांस नसणे अशक्य. तरीही त्यांनी ट्रम्प यांच्यावर मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळली कारण अमेरिकेस युरोपपासून तोडता नाही आले तरी जास्तीत जास्त दूर नेता आले तर पाहावे हा त्यामागील विचार. असे करून धूर्तपणाबाबत आपण ट्रम्प यांच्यापेक्षा सव्वाशेर आहोत हेच पुतिन यांनी दाखवून दिले. ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या वटवटीच्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेत्यांनी दाखवलेला समंजसपणा आणि पुतिन यांचे चातुर्य अधिक उठून दिसते. असे झाले तरी ट्रम्प त्यातून काही शिकतील आणि आपले वागणे सुधारतील अशी आशा बाळगण्यात अर्थ नाही.