अमेरिका एक पाऊल मागे गेल्यास त्याचा परिणाम अनेक देशांत चार पावले मागे जाण्यात होतो. त्यामुळे जगभरच्या विवेकवाद्यांचे तेथील निवडणुकीकडे लक्ष होते..
एकीकडे धर्मभावना, वंशश्रेष्ठत्व आदी आदिम मुद्दे आणि दुसरीकडे ढासळती अर्थव्यवस्था, पर्यावरणीय आव्हान अशी परिस्थिती. तरीही अमेरिकनांनी ट्रम्प-वादळ रोखले..
‘‘अध्यक्षीय निवडणुकीत रॉन डिसँटिस यांनी मला आव्हान द्यायचा प्रयत्न करू नये. मी अशा गोष्टी बाहेर काढीन की त्या रॉनच्या पत्नीलाही ठाऊक नसतील’’, अशी धमकी स्वपक्षीय उमेदवारास निवडणूकदिनी देणारे रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांची स्वप्नपूर्ती अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत होत नसेल तर ती आनंदाचीच बाब. या निवडणुकीत ट्रम्प यांना नको असलेले रॉन हे फ्लोरिडासारख्या राज्यातून तर निवडून आलेच पण त्याच वेळी ट्रम्प पुरस्कृत अनेक उमेदवार पराभूत झाले ही तर सोन्यास सुगंध देणारी घटना. अमेरिकेत प्रत्येक अध्यक्षास दोन वर्षांनंतर मध्यावधी निवडणुकांच्या परीक्षेस सामोरे जावे लागते. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी होणाऱ्या या निवडणुका म्हणजे अध्यक्षाच्या तोपर्यंतच्या कारकीर्दीची गुणपत्रिकाच. बराक ओबामा यांच्यासारख्या लोकप्रिय अध्यक्षासही या मध्यावधी निवडणुकांत जवळपास ६० जागा गमवाव्या लागल्या होत्या. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही मध्यावधीतील कामगिरी वाईटच होती. त्यांनी डझनांहून अधिक ठिकाणी स्वपक्षीय उमेदवारांचा पराभव अनुभवला होता. अमेरिकेचा इतिहास असा की १९३४ पासून आजतागायत एकाही सत्ताधारी अध्यक्षास पहिल्या कार्यकाळातील मध्यावधी निवडणुकांत पडझड टाळता आलेली नाही. सेनेटमध्ये सरासरी चार तर प्रतिनिधिगृहात सरासरी २८ इतक्या संख्येने विद्यमान अध्यक्षांनी या निवडणुकांत सदस्य गमावलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसापासून ज्यांची कामगिरी बेतास बातच मानली जात होती ते डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडेन यांचे या निवडणुकांत काही खरे नाही, असे अंदाज व्यक्त होत होते. राजकीय भाष्यकारांनी बायडेन यांच्या निरवानिरवीची भाषा सुरू केली होती. ढासळती अर्थव्यवस्था, पर्यावरणीय आव्हान आणि समोर वाटेल तो हुच्चपणा करण्यास तयार असे डोनाल्ड ट्रम्प असे तिहेरी आव्हान बायडेन यांच्यासमोर होते. त्यामुळे या निवडणुकांत ‘लाल वादळा’चा (रिपब्लिकन्स अमेरिकेत लाल रंगाने ओळखले जातात तर निळा रंग डेमोक्रॅट्सचा) झंझावात पाहायला मिळणार, असे मानले जात होते. तसे काही झाले नाही. बायडेन यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आणि ट्रम्प यांचे दावे अतिरेकी ठरले. हा स्तंभ लिहिला जाईपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण झालेली नव्हती. पण एकंदर कल ‘लाल वादळा’चे दावे फोल ठरवणारे आहेत हे निश्चित. जगभरातील विवेकवाद्यांचा श्वास रोखून धरणाऱ्या या निवडणुकीचे आणि निकालाचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. याचे कारण गेल्या वर्षांपेक्षा अधिक काळ ट्रम्प हे २०२४च्या निवडणुकीत पुन्हा उतरण्याची तयारी करीत आहेत. ही मध्यावधी निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीतील जवळपास ३३० उमेदवार ट्रम्प यांनी स्वहस्ते निवडले होते आणि अब्जावधी डॉलर त्यांच्यासाठी उभे केले होते. रिपब्लिकन पक्षास झाकोळून टाकणारे ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांनी या निवडणुकीत या पक्षाचा ताबाच घेतला. पण मतदारांनी त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. उदाहरणार्थ ट्रम्प कळपातील ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’वादी डग मॅस्त्रिनो यांचा पेनसिल्व्हेनियासारख्या पारंपरिक रिपब्लिकन राज्यात पराभव झाला, मेरीलँडमध्ये डॅन कॉक्स हरले, ओहायोत ट्रम्प यांच्या जे. आर. मॅजेव्स्की यांना डेमोक्रॅट उमेदवाराने धूळ चारली, व्हर्जिनियात येस्ली व्हेगा यांना मतदारांनी नाकारले इत्यादी. यापैकी पेनसिल्व्हेनियातील पराभव ट्रम्प यांच्या जिव्हारी लागेल. कारण डेमोक्रॅट जॉन फेटरमन यांच्याविरोधात लढण्यासाठी ट्रम्प यांनी पैसा आणि राजकीय पैस दोन्हीही पणास लावले होते. ही त्यांची गुंतवणूक वाया गेली. या अशा व्यक्तींच्या जोडीला अॅरिझोना वा जॉर्जिया अथवा नेवाडा अशा खाशा राज्यांनीही रिपब्लिकनांस पुरेशी साथ दिली असे म्हणता येणार नाही. जॉर्जियात तर रात्री उशिरापर्यंत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे दोघेही पन्नास-पन्नास टक्क्यांवर अडकलेले दिसत होते. त्या राज्याचा कायदा असा की एकाही उमेदवारास किमान ५१ टक्के मते मिळाली नाहीत तर पुन्हा मतदान घेतले जाते.
हे असे काही होणे या निवडणुकांत पूर्णपणे अनपेक्षित होते. ट्रम्प यांच्या प्रचाराचा दणका, त्यांनी निर्माण केलेले विविध वाद आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पारंपरिक धर्मभावना, वंशश्रेष्ठत्व आदी आदिम मुद्दय़ांना मिळणारा मतदारांचा भरभरून प्रतिसाद यामुळे अध्यक्ष बायडेन यांचे अस्तित्व अगदीच मचूळ ठरत गेले. साथीला ना वक्तृत्व ना वय अशी बायडेन यांची अवस्था. त्यात आर्थिक प्रश्नांनी थैमान घातलेले आणि चलनवाढ रोखण्यासाठी सतत व्याज दर वाढवण्याचे ‘फेड’चे धोरण. हे सारे लोकप्रियतेच्या आड येणारेच होते. पण तरीही त्यांची वाताहत झाली नाही, ही बाब अत्यंत कौतुकास्पद. पण यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बायडेन यांच्या यशाचे श्रेयही ट्रम्प यांच्याकडे जाते. ट्रम्प यांनी या निवडणुकीत इतका टिपेचा स्वर लावला की अनेक सनातनी अमेरिकनांनाही तो रुचला नाही. शेवटी मागे किती जायचे यालाही काही मर्यादा असतात. याचे भान ट्रम्प यांना राहिले नाही. त्यात त्यांनीच नेमलेल्या न्यायाधीशांनी दिलेला गर्भपात बंदीचा निर्णय. ‘गर्भपात केलेल्या महिलेवर मी खुनाचा गुन्हा दाखल करीन’ असे ट्रम्प यांच्या गटातील रिपब्लिकनांचे वक्तव्य. त्यामुळे गर्भपात करावा की न करावा या पूर्णपणे वैयक्तिक आणि वैद्यकीय मुद्दय़ावर अशी मागास भूमिका अनेकांस स्वीकारार्ह वाटली नाही. ही निश्चितच स्वागतार्ह घटना. वास्तविक ऐंशीच्या दशकात गर्भपातास कायदेशीरता देण्याचा पुरोगामीपणा दाखवला तो रिपब्लिकन पक्षानेच. पण काळाच्या ओघात पुढे जाण्याऐवजी मागे खेचणाऱ्या नेत्यांची आजकाल अनेक ठिकाणी चलती आहे. ट्रम्प अशांचे शिरोमणी. स्वत: अत्यंत वाह्यात आयुष्य जगलेला हा इसम महिलांच्या मूलभूत हक्कांबाबत इतकी सनातनी भूमिका घेतो हाच खरे तर मोठा विरोधाभास. दोन वर्षांपूर्वीच्या अध्यक्षीय निवडणुकीत आणि त्यानंतर आताच्या मध्यावधी निवडणुकीत तेथील मतदारांस तो लक्षात आला असेल तर ते अमेरिकेचे आणि त्यामुळे जगाचेही नशीबच. असे म्हणायचे याचे कारण अमेरिका एक पाऊल मागे गेल्यास त्याचा परिणाम अनेक देशांत चार पावले मागे जाण्यात होतो. तेव्हा या निवडणूक निकालांमुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय स्वप्नांस कात्री लागत असेल तर ते अधिक महत्त्वाचे. आताच ट्रम्प यांच्या हाती रिपब्लिकन पक्षाची सूत्रे देण्याविरोधात भावना व्यक्त होऊ लागल्या असून अनेक रिपब्लिकन नेत्यांनी या निवडणुकांत पक्षाने इतके ट्रम्प यांच्या आहारी जायला नको होते, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुरुवातीच्या परिच्छेदात उल्लेखलेले रॉन हे २०२४ साली रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणुकांत उतरू पाहतात. तसे झाल्यास ते ट्रम्प यांचे पक्षातील आव्हानवीर असतील. तेच नेमके ट्रम्प यांना नको आहे. आपल्या पक्षातील राजकीय आव्हानवीराविषयी ट्रम्प यांची भाषा एखाद्या गुंडाच्या तोंडी शोभेल अशी. याचा अर्थ असा की अशा या पुंडाशी दोन हात करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षास बायडेन यांच्यासारख्या वयोवृद्धावर विसंबून चालणार नाही. पुढील महिन्यात बायडेन सहस्रचंद्रदर्शन साजरे करतील. म्हणजे २०२४ साली ते ८२ वर्षांचे असतील. सद्य:स्थितीत ते टुकटुकीत आणि टुणटुणीत आहेत हे खरे.
पण हे वय राजकीय दांडगाई करण्यास योग्य नाही. म्हणून आताच्या निवडणुकीत बायडेन यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली असली तरी ती २०२४ च्या निवडणुका जिंकून देण्यास पुरेशी नाही. आताही सेनेट आणि/वा हाऊस यांतील एकात वा दोहोंत बायडेन यांचा पक्ष बहुमत गमावू शकतो किंवा कसेबसे बहुमत राखू शकतो. सर्व निकाल आल्यावर चित्र स्पष्ट होईल. अशा वेळी ट्रम्प यांची लाट रोखली ही समाधानाची बाब खरीच. पण डेमोक्रॅटिक लाट बायडेन यांना तयार करता आली नाही, हा त्या समाधानामागील टोचणी. तूर्त ट्रम्प यांचे स्वप्न भंगले यातच बायडेन यांस आनंद मानावा लागेल. तथापि स्वत:च्या डेमोक्रॅटिक पक्षाची स्वप्नपूर्ती यातून होणारी नाही.