दोन वर्षांनंतर यंदा दणक्यात होणाऱ्या उत्सवांवरची सारी बंधने नवीन सरकारने काढली आहेतच.. त्यात यंदा येऊ घातलेल्या पालिका निवडणुका!
करोनाच्या संकटकाळात सार्वजनिक गणेश मंडळांच्या अनेक कार्यकर्त्यांनी लाखोंना मदतीचा हात दिला. यंदा मात्र हाच उत्सव ‘दणक्यात’ होणार..
गणपती ही विद्येची देवता! गेली दोन वर्षे करोनामुळे या विद्येच्या देवतेचा सोहळा झाला नाही. गेल्या दोन वर्षांतील करोनाच्या संकटकाळात राज्यभर पसरलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या अनेक कार्यकर्त्यांनी लाखोंना मदतीचा हात दिला. कुणाच्या घरी जेवणाचे डबे पोहोचवले, तर कुणाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत केली. एवढेच काय करोनामृतांच्या अंत्यसंस्कारांसाठीही पुढाकार घेतला. पण इतका प्रदीर्घ काळ सार्वजनिक पातळीवरून ज्ञानदेवता गायब झाल्याने या देवतेच्या सार्वजनिक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे जरा वांधेच झाले असणार. दोन वर्षे शाळेपासून दूर राहावे लागलेल्या, घरात बसून आंबलेल्या विद्यार्थ्यांचे जे झाले तेच दोन वर्षे या विद्यादेवतेच्या मंडपापासून दूर राहावे लागलेल्यांचे झाले असणार! असा वहीम घेण्यास जागा आहे कारण दोन वर्षांनंतर यंदा दणक्यात होणाऱ्या सार्वजनिक उत्सवातल्या काहींचे वर्तन. दोन वर्षांच्या ज्ञानसंस्कारांची उणीव त्यांच्या वागण्यातून ओसंडून वाहताना आताच दिसू लागली आहे. आणि अद्याप या उत्सवाला सुरुवातही झालेली नाही. गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर ती होईल. त्यानंतर दहा दिवस ज्ञानदेवतेच्या या भक्तगणांचा उत्साह ओसंडून रस्ते/ नद्या/ नाले दुथडी भरून वाहू लागतील. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते परस्परविरोधी कसे असू शकते याचा अभ्यास या काळात समाजशास्त्रींना करता येईल. म्हणजे शिक्षक प्रकांडपंडित आहेत म्हणून त्यांचे विद्यार्थी ढ निपजतच नाहीत असे नाही. त्यामुळे विद्यादेवतेच्या सार्वजनिक प्रदर्शनातील सहभागी अतिउत्साहींच्या अविद्येचे दर्शन घडणारच नाही असे नाही.
आपल्याकडे उत्सवांच्या उत्साही लाटा उचंबळू लागल्या की जनसामान्यांना जीव मुठीत धरून जगावे लागते. आधीच सार्वजनिक शिस्त म्हणजे काय, हा प्रश्न पडावा अशी स्थिती. त्यात या काळात मोडके रस्ते तोडून उभारले गेलेले मंडप, त्यामुळे वळवल्या गेलेल्या वाहतुकीने होणारे वांधे, माणसास बहिरे होण्यासाठी ध्वनिलहरी किती तीव्र लागतात हे मापनासाठी चौकोचौकी सुरू होणारे प्रयोग इत्यादी सारे अनुभवास येऊन वातावरणातील आनंदमयता आणि भक्तिभाव अधिकच वाढीस लागलेला पाहता येईल. त्यात यंदा या साऱ्यासाठी आणखी एक विशेष आहे. ते म्हणजे आगामी महापालिका निवडणुका. आधीच साग्रसंगीत सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यात येऊ घातलेल्या निवडणुका! अनेक मंडळांनी गेल्या काही वर्षांत रुग्णवाहिकांची सोय, प्राथमिक उपचार केंद्रे, कायदेशीर सल्ला, शाळांना, रुग्णालयांना मदत अशी अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यासाठीही संभाव्य आणि विद्यमान लोकप्रतिनिधी सढळ हस्ते मदत करतील. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात दिसणारा हुरूप धडकी बसवेल यात शंका नाही. सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून निवडणुकीआधीच जनसंपर्क अभियान राबवून मतांची बेगमी करण्याची ही नामी संधी. मंडळांच्या देखाव्यांच्या विषयातही त्याचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. नावातच ‘नरेंद्र’ असलेल्या पुण्यातल्या एका मंडळाने तर उद्धव ठाकरे सरकारचा कोथळा बाहेर काढणारा देखावा सादर केला होता, म्हणे. पण पोलिसांनी त्यांस परवानगी नाकारली. न जाणो उद्धव आणि त्यांच्या सरकार पतनास जबाबदार उद्या एकत्र झाले तर काय घ्या.. अशी भीती पोलिसांच्या मनी नसेलच असे नाही. विघ्नहर्त्यांच्या उत्सवामुळे आपल्या आयुष्यात उगा विघ्न नको असा विचार पोलिसांनी केला असल्यास ते योग्यच म्हणायचे. विद्यादेवतेची साधना जेवढी सरकारी नोकरांस पावते तेवढी सरकारबाह्य जनसामान्यांस नाही, हे सत्य आहेच. तेव्हा राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे देखावे हे या वर्षीचे कदाचित वेगळेपण ठरू शकेल. अलीकडे नैतिकता वगैरे पाळणारे नागरिक नगरपालिकादी निवडणुकांच्या तोंडावर संभाव्य लोकप्रतिनिधींस आपल्या संकुलाच्या अंगणात फरशा घालून दे, शेड बांधून दे वगैरे मागणी करतात. एकटय़ादुकटय़ाने असे काही केले तर ती लाच ठरते आणि ती मागणारा आणि देणारा लाचखोर ठरून कायद्याच्या कचाटय़ात सापडू शकतो. ते टाळण्यासाठी आपल्याकडे एक राजमार्ग आहे. तो म्हणजे अशी मागणी सार्वजनिक पातळीवर करायची. नाही तरी एकटय़ाने खाल्ले तर शेण आणि सर्वानी एकत्र प्राशन केल्यास श्रावणी असे आपण मानतोच. त्याच धर्तीवर संभाव्य लोकप्रतिनिधींकडून व्यक्तिगत लाभ न घेता सार्वजनिकरीत्या तो घ्यायचा. व्यक्तीपेक्षा समष्टी केव्हाही महत्त्वाची असे आपली संस्कृती सांगते. आणि सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे त्या संस्कृतीचा उत्साही वार्षिक आविष्कारच की! तेव्हा आजपासून सुरू होणाऱ्या या विद्यादेवतेच्या उत्सवात आपल्या लक्ष्मीपुत्र लोकप्रतिनिधींस पुण्यप्राप्तीची नामी संधी असेल. ठिकठिकाणच्या शहरांतील ‘अमुक गल्लीचा राजा’, ‘तमुक सम्राट’, ‘नवसाला पावणारा’ (असे वर्णन न केलेले पावत नाहीत काय?) इत्यादी गणेशोत्सवांची ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत दर्शनयात्रा, भगिनी वर्गासाठी हळदीकुंकवातून घसघशीत वाण, तरुणांचा उत्सवाचा आनंद द्विगुणित वा त्रिगुणित वा थेट चौगुणित व्हावा यासाठी उत्साहवर्धकांची सोय इत्यादी पुण्यप्राप्तीच्या मार्गाची रेलचेल आगामी दहा दिवसांत असेल. याच्या जोडीला विधायक उपक्रम वगैरेही असतीलच. अनेक मंडळांनी गेल्या काही वर्षांत रुग्णवाहिकांची सोय, प्राथमिक उपचार केंद्रे, कायदेशीर सल्ला, शाळांना, रुग्णालयांना मदत अशी अनेक समाजोपयोगी कामे केली. यंदा त्यासाठीही संभाव्य आणि विद्यमान लोकप्रतिनिधी सढळ हस्ते मदत करतील.
इतक्या साऱ्या विधायकतेस, कल्पकतेस गेली दोन वर्षे कुचंबणा सहन करावी लागली. तोंड न दाबताच बुक्क्यांचा मार नुसता. त्यामागे कारण होते करोनाचे, हे खरे. पण तरी गतसाली हा विषाणू मंदावलेला असताना उत्सव दणक्यात साजरा करू देण्यास हरकत नव्हती. मात्र शिवसेनेत असूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना गर्दीचे वावडे. त्यांनी काही निर्बंध सैल केले नाहीत. ज्ञानलालसेने आसुसलेल्या विद्यादेवतेच्या भक्तांची केवढी उपासमार त्यामुळे झाली! यंदा मात्र गणरायाच्या कृपेनेच सत्ताबदल झालेला!! उत्सवास दुर्मुखलेल्या उद्धवांचे सरकार त्यामुळेच योग्य वेळी पडले आणि नवीन सरकारने ‘वाजवा रे वाजवा’ म्हणत उत्सवी उत्साहींवरची सर्व नियंत्रणे काढली. नुकत्याच पार पडलेल्या कृष्णजन्माष्टमी उत्सवात या उत्साहाचा पहिला कलात्मक आविष्कार साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. मुंबईत तर काही कृष्णप्रेमाने भारित लोकप्रतिनिधींनी आयोजित जन्माष्टमी उत्सवात सहभागी गवळणींच्या देह-पदलालित्य दर्शनाने अनेकांच्या हृदयांत भक्तिभाव जागृत झाला म्हणतात. आता या उत्सवात दहीहंडीचे थर लावताना पडून प्राण गेला असेल एखाद्याचा. या तरुणाच्या आई-वडिलांची भावना वेगळी असेलही. पण दोनचार जणांच्या दु:खापेक्षा हजारोंचा आनंद केव्हाही अधिक महत्त्वाचा, असे मानले की उत्सवी उत्साह दुणावतोच.
आताही ध्वनिप्रदूषण, सामाजिक स्वास्थ्य, शिस्तीचा अभाव इत्यादी इत्यादी क्षुद्र मुद्दे काढून मनांतल्या मनांत किंवा ‘लोकमानसा’तील पत्रांत कुढणारे असतीलच. या असल्या शिस्तवान घरकोंबडय़ांच्या मतांकडे दुर्लक्षच करणे योग्य. सामुदायिक उत्साहाचा आनंद या कुढमतींना काय कळणार? शिवाय हा आनंद भोगताना आफ्रिकेतील दरिद्री देशांसही लाजवतील असे रस्ते, ते चुकवताना आठ (तूर्त) जणांचे हकनाक गेलेले प्राण, मुंगी वा कासव यांच्या वेगाने अचंबित व्हावे अशा गतीने वाहणारी वाहतूक आदी मुद्दय़ांचे विस्मरण होऊन दु:ख कमी होते. हा अशा सार्वजनिक उत्सवांचा केवढा मोठा फायदा!! तेव्हा लोकहो.. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले..’ ही कविता आठवत या उत्साहाच्या वातावरणात रंगून जा. आणखी एक फक्त करा. ही कविता तिची पुढली एक ओळ टाळून म्हणा. उगाच आनंद विरजायला नको.