..असा कोणाचा हकनाक जीव गेला तरी आमच्यातल्या अनेकांना तसे काही वाटतही नाही. म्हणून तुमच्या मरणाचे दु:ख तसे कोणास नाही. तुमच्यात राजकीय पक्षही नसतात. त्यामुळे तुम्हांस ते कळणार नाही.
बा चित्त्यांनो..! भारतात जबरदस्तीने आणवलेल्या तुमच्यातल्या आणखी एकाने आज प्राण सोडले. या देशातील समस्त जीव-प्रेमी, जीवादरी जनता आपली माफी मागू इच्छिते. तुमच्या चार पायांच्या राजिबडय़ा जगात आणि जगण्यात अशी माफी मागण्याची नाटकी परंपरा नाही, हे ती जाणते. तो खोटेपणा आम्हा द्विपादांनाच शोभतो. माफीचे कसे असते की ती मागूनही स्वत:स हवे ते करता येते. किंवा हवे ते करून नंतर माफ करा असे म्हणता येते. ते केले काय आणि न केले काय, तसा काहीच फरक पडत नाही. ‘मला फासावर लटकवा’, ‘मी माफी मागतो’ वगैरे विधाने तशी नाटकीच. केवळ वृत्तमूल्य असलेली. त्यांनी काहीही होत नाही. फार फार तर टीआरपी वाढतो. घडायचे ते घडून गेलेले असते आणि ते काही बदलत नाही या माफीने. हे सर्व खरे असले तरी तुमची माफी मागण्याव्यतिरिक्त या देशातील आम्ही सर्व जीव-प्रेमी अन्य काही करूही शकत नाहीत. शक्य असते तर आमच्या डॉ. वा. ग. पूर्णपात्रेंच्या ‘सोनाली’प्रमाणे तुम्हाला मिठीत घेऊन तुमची माफी मागितली असती.
तसे तुमचे जग सरळ आणि सोपे. तुम्ही जे करता ते केवळ गरज म्हणून. तुम्हाला इतरांना काही ‘करून दाखवावे’ असे वाटत नाही. तुम्ही जसे असता तसेच असता. आमच्यातल्या कोणाकोणास स्वत:स वाघ म्हणवून घ्यावेसे वाटते. पण वाघास अशी काही इच्छा नसते. उडय़ा आम्ही द्विपादांनी मारल्या की त्या माकडउडय़ा होतात. खऱ्या माकडांसाठी ते नैसर्गिक असते. आपल्या हुंकारास ‘सिंहगर्जना’ म्हणावे अशी काही खऱ्या सिंहांची इच्छा नसते. ती क्षुद्र ईर्षां हवा भरभरून छाती फुगवून काहीबाही वल्गना करणाऱ्या आमच्यातल्या काहींची. आमच्या अनैसर्गिक वटवटीस पोपटपंची म्हटले जाते; पण यात पोपटांचा काय दोष? तेव्हा तुमचे एरवी उत्तम चाललेले असते. तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात त्या आमच्यामुळे. आम्हाला काही ना काही सतत सिद्ध करून दाखवायचे असते. तुम्हांस ना मतदार असतात ना भक्त. आम्हांस ते दोनही हवेत. पूर्वी नुसते मतदार पुरत. आता फक्त त्यातून आमचा अहं सुखावत नाही. आम्हाला भक्त लागतात. या भक्तांसमोर आपला देव कसा अचाट आहे, तो काहीही कसे करू शकतो, जागतिक नेत्यांस लाजवू शकतो, विश्वगुरू बनू शकतो.. आणि मुख्य म्हणजे तो ‘देव’ आहे असे सतत सिद्ध करत राहावे लागते. खरे तर तुम्ही हे जाणता की प्रत्येक सजीव हा मर्त्यच असतो आणि त्यात कोणीच देव नसतो. पण एकदा मखरात बसायची सवय लागली की पदरी भक्त बाळगायची सवय आपोआप निर्माण होते आणि ती एकदा झाली की मखरात बसलेल्यास स्वत:ला देव मानावेच लागते. आणि पाठोपाठ येते अचाट काही करून दाखवण्याची इच्छा.
तुमचे भारतात येणे.. खरे तर तुम्हास भारतात आणणे हे यामुळेच झाले. वास्तविक द्विपादांचीच निर्मिती असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने २०१३ सालीच आमच्या देशातील चित्ता प्रकल्पावर बंदी घातलेली होती. त्यामागे हेतू हाच होता की तुम्हास हकनाक त्रास होऊन तुमच्या जिवावर बेतू नये. पण घर फिरले की वासेही फिरतात त्याप्रमाणे २०२० साली सर्वोच्च न्यायालयानेच ही बंदी उठवली. त्याआधी गेल्या सात वर्षांत असे काय झाले की ही स्वत:च घातलेली बंदी उठवावी असे सर्वोच्च न्यायालयास वाटले हा प्रश्न काही तुम्ही विचारू नका. तुमच्यापेक्षा आम्ही द्विपाद स्वत:स शहाणे मानत असलो तरी काही प्रश्नांना सामोरेच न जाण्याचे तुमच्यात अजिबात नसलेले कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे हा प्रश्न आम्ही ‘ऑप्शन’लाच टाकू. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली म्हटल्यावर तुम्हास भारतात पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. वास्तविक; विस्थापन किती अवघड असते हे आम्हा द्विपादांस माहीत. ते आम्ही अनुभवलेलेही असते आणि आमच्या इच्छेखातर अनेकांना ते करायलाही लावलेले असते. स्वत:स शहाणे समजणाऱ्या द्विपादांसाठी विस्थापन इतके अवघड असते तर तुमच्यासाठी ते किती तरी अवघड असेल हा विचार आम्ही करायला हवा होता. आमच्यातील काहींनी तो केलाही होता. पण आले.. मना; तेथे कोणाचे चालेना, हे वास्तव. खरे तर कोयना धरणाच्या विस्थापितांचे पुनर्वसन आम्ही अद्याप करू शकलेलो नाही. ते तर इथलेच. आमच्या बाजूचे. तरीही ते आम्हास जमलेले नाही. तुम्ही तर कोण कुठले, नामिबिया, दक्षिण अफ्रिकेतून आलेले. मते देणाऱ्या द्विपादांच्या विस्थापन समस्यांस आम्ही भीक घालत नाही. तेव्हा मतांचा अधिकार नसलेल्या तुमच्या अडचणींची आम्हांस काय पत्रास? आमचा आमच्यावरचा आणि आमच्या कर्त्यां-सवरत्यावरचा विश्वास इतका की अन्य कोणत्याही जुमल्याप्रमाणे आम्ही तुम्हालाही तुमच्या मायदेशांतल्या विलोभनीय जंगलांतून उचलून सरळ आमच्या बागेत आणले तरी काय फरक पडतो, असे आमच्यातल्या काहींस वाटले. तसेही वाटेल त्याला उचलून आमच्या अंगणात बसवून ठेवायची आमची सवय. त्याचप्रमाणे तुम्हालाही आणले गेले. आमच्यात आणि तुमच्यात फरक आहे याचा विचार तरी केला गेला होता की नाही, कोणास ठाऊक? असेलही. पण नसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकदा का ‘वरच्यास’ खूश करायची सवय लागली की आम्हाला कशाचेही भान नसते, हे सत्य आहेच. पण आमची खरी चूक काय सांगू?
तर तुम्हास तुमच्या मायदेशात सांभाळणारे तज्ज्ञ, अभ्यासक यांचे आम्ही ऐकले नाही. आमच्याकडे सगळे काही आहेच. आम्हास कोण शिकवणार, असे आम्हास वाटले. आमचे सगळेच ऐकतात. जे आज्ञापालनास तयार नसतात त्यांच्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’, इन्कम टॅक्स वगैरे आहेच. पण तुमच्यावर या सगळय़ाचा काही परिणाम होत नाही, हे आम्ही विसरलो. त्यामुळे तुम्हास जाणणाऱ्या खऱ्या तज्ज्ञांकडे आम्ही दुर्लक्ष केले. तुमच्यातला एक गेला तर आम्ही खोटेच सांगत राहिलो की चित्तिणीशी झालेल्या संघर्षांत तो गेला म्हणून. सत्य तसे नव्हते हे तुमच्यातल्या तज्ज्ञांनी आमच्या सर्वोच्च न्यायालयास सांगितल्यावर सगळय़ांना कळले. तुम्हाला हाताळणाऱ्या आमच्यातल्या काहींनी या सगळय़ाची खरी माहितीच दिली नाही, हे आज आमच्यासमोर आले. आमच्या या बेफिकिरीचे तुम्हांस आश्चर्य वाटले असेल.
कारण तुमच्यात गरज असल्याखेरीज कोणी कोणाचा जीव घेत नाही. म्हणूनच तर पोट भरल्यानंतरचा वाघ समोर शेळी आली तरी तिच्याकडे पाहातही नाही. तुमच्यात धर्म, जात असे काही नसते. आमचे तसे नाही. आम्ही कधीही कोणाचाही जीव सहज घेऊ शकतो. तुमच्यात दंगली नसतात. आमच्यात त्या घडवता येतात. आणि मुख्य म्हणजे असा काही कोणाचा हकनाक जीव गेला तरी आमच्यातल्या अनेकांना तसे काही वाटतही नाही. म्हणून तुमच्या मरणाचे दु:ख तसे कोणास नाही. तुमच्यात राजकीय पक्षही नसतात. त्यामुळे तुम्हांस ते कळणार नाही. पण काँग्रेसच्या काळात तुम्ही आला असतात आणि तुमचे काही बरे-वाईट झाले असते तर आमच्याकडे जरा जास्त बोंब मारली गेली असती. कोण, कधी, कोणा हस्ते मरतो यावर आमच्याकडे त्या मरणाचे मोल ठरते. तुम्हाला हा धडा मिळायला नको होता. तो मिळाला याचे दु:ख आहे. म्हणून तुमची माफी. म्हणून बा चित्त्यांनो.. शक्य असेल तर परत फिरा रे.. घराकडे अपुल्या..