..अर्थात भारताच्या मदतीने अमेरिका चीनला रोखू शकेल असे मानणे हा अवास्तव कल्पनाविलास झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सात वर्षांपूर्वी याच महिन्यात अमेरिकी काँग्रेससमोर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिका संबंधांतील ऐतिहासिक अवघडलेपण दूर करून हे संबंध नव्या उंचीवर नेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्याआधी दोन वर्षे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात भारत-अमेरिका संबंधांच्या पायवाटेस हमरस्त्याचे स्वरूप दिले. नंतर मोदी यांनी हा हमरस्ता अधिक रुंद केला आणि ताज्या भेटीत त्याचे रूपांतर द्रुतगती मार्गात होईल याची तजवीज केली. जनरल इलेक्ट्रिकबरोबर भारतात विमान इंजिने बनवण्याचा झालेला करार, मायक्रॉन कंपनीबरोबर गुजरातेत सेमीकंडक्टर कारखाना उभारणी, भारतास अत्याधुनिक ड्रोनपुरवठा, अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांस भारतीय बंदरांत दुरुस्तीची मुभा, अहमदाबाद आणि बंगळूरु येथे अमेरिकेच्या दूतावासांची उभारणी इत्यादी अनेक करारमदार मोदी यांच्या या भेटीत झाले. त्यामुळे त्यांचा हा दौरा सर्वार्थाने यशस्वी ठरला असे म्हणता येईल. आपल्याइतकीच अमेरिकेसही या दौऱ्याच्या यशाची इच्छा आणि उत्सुकता होती. तेव्हा या दौऱ्यानंतर भारत-अमेरिका संबंधांचे सौहार्द पर्व अधिक सुखद असेल यात शंका नाही.
याची गरज होती. याचे कारण आपल्याकडे अमेरिकेशी संबंध ठेवण्याबाबत एक प्रकारचा चोरटेपणा आढळतो. अमेरिका म्हणजे चंगळवादाचे प्रतीक, अमेरिका म्हणजे निरंकुश भांडवलशाही इत्यादी समाजवादी कल्पना अजूनही आपल्या रक्तात असल्याने उघडपणे अमेरिकेचा हात धरणे आपल्याकडे टाळले जाते. अलीकडच्या काळात मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा असे धैर्य दाखवले. तथापि त्यांचा काँग्रेस पक्ष तितका धैर्यवान नव्हता. त्यामुळे सिंग यांच्या अमेरिका-धोरणाचा हवा तितका परिणाम झाला नाही. मोदी यांच्याबाबत असे झाले नाही. मोदी म्हणजेच भाजप अशी स्थिती असल्याने मोदींच्या धडाकेबाज निर्णयांस पक्ष आडवा आला नाही. सरकार आणि पक्ष एकमताने आणि एकदिशेने मार्गक्रमण करीत असल्याने मोदी यांच्या काळात अमेरिकी संबंधांस अधिक उठाव आला. एके काळचा आपला जागतिक आधारस्तंभ असलेला सोव्हिएत रशिया इतिहासाच्या रेटय़ाखाली दुभंगून जात असताना आणि शेजारी चीनसारखे संकट आ वासून समोर उभे राहत असताना अमेरिकेशी दोस्तीचा हात पुढे न करणे हा वेडेपणा ठरला असता. तो मोदी सरकारने केला नाही. त्यात अमेरिका आणि आपण या दोहोंसमोर चीनचे आव्हान आहे. त्यामुळे आपणास जितकी अमेरिकेची गरज आहे तितकीच आवश्यकता अमेरिकेस आपली आहे. हे परस्परावलंबित्व उभय देशांतील संबंधांस अधिक मजबूत करणारे ठरते. अर्थात भारताच्या मदतीने अमेरिका चीनला रोखू शकेल असे मानणे हा अवास्तव कल्पनाविलास झाला. चीनची राजकीय वृत्ती आणि आर्थिक कुवत लक्षात घेता त्या देशास रोखता येणे केवळ अशक्य. या वास्तवाची जाणीव अमेरिकेसही असणार. तथापि आशिया खंडात चीनला पर्याय म्हणून एखादा सशक्त, आकाराने मोठा देश अमेरिकेस आपल्या बाजूस हवा होता. आपण अमेरिकेची ती गरज पूर्ण करीत असल्याने अमेरिकी प्रशासन सहज आपल्या बाजूने वळले. अशा तऱ्हेने उभय बाजूंची निकड असल्यामुळे मोदी यांचा बहुचर्चित अमेरिका दौरा यशस्वी ठरला.
त्या यशाच्या निकडीमागील आणखी एक कारण म्हणजे उभय देशांत आगामी वर्षांत होऊ घातलेल्या निवडणुका. अमेरिकेत नुसते हिंदू नव्हे तर हिंदूत्ववादी हिंदू मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्या मतांची गरज अध्यक्ष जो बायडेन यांस निश्चितच आहे. तेव्हा मोदी यांस मिठीत घेताना बायडेन यांच्या डोळय़ासमोर ही मते नसतील असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल. त्याचप्रमाणे मोदीही आगामी वर्षांत निवडणुकांस सामोरे जातील. त्या वेळी अमेरिकेकडून आणलेले गुंतवणुकीचे डबोले मतदारांवर प्रभाव टाकण्यास खचितच उपयोगी ठरेल. तथापि यात एक मेख आहे. ती अशी की अमेरिकेतून भारतात काय काय आणले याचा उपयोग मोदी यांस भारतीय मतदारांस आकृष्ट करण्यासाठी होईल हे निश्चित. पण बायडेन यांना मोदी-मिठी किती फळेल याबाबत मात्र साशंकता आहे. गेल्या निवडणुकांच्या आधी अशाच अमेरिका दौऱ्यात मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात उंचावून ‘‘अगली बार ट्रम्प सरकार’’ अशी हाक दिली होती, हे अनेकांस स्मरेल. त्याचे पुढे काय झाले आणि ट्रम्प यांस त्या दौऱ्याचा किती उपयोग झाला हे दिसलेच. बायडेनबाबांबाबतही तसे काही होणार नाही, असे मानण्याचे कारण नाही. आताच आपल्या चिरंजीवाच्या प्रतापामुळे, हंटर बायडेन याच्यामुळे, अध्यक्ष बायडेनबाबांसमोर अडचण निर्माण झालेलीच आहे. तीत मोदी यांचे असे जंगी स्वागत केल्यामुळे हिंदूत्ववादी नसलेले हिंदू बायडेन यांच्यावर नाराज दिसतात. ही नाराजी भारतीय माध्यमांनी झाकायचा कितीही प्रयत्न केला तरी दिसून आलीच. तेव्हा हिंदूत्ववादी हिंदू आणि हिंदूत्ववादी नसलेले हिंदू यांच्यातील द्वंद्व बायडेनबाबांच्या किती कामी येते ते कळेलच.
या दौऱ्यात अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या संयुक्त बैठकीस मोदी यांनी संबोधले. त्यात त्यांनी आपली दहशतवादास आळा घालण्याची आंतरराष्ट्रीय मंचावरची नेहमीची टाळीची धून सादर केली. दहशतवाद हा विषय निर्गुण-निराकार असा. त्याच्या बाजूने कोणी बोलणे अशक्यच. सर्वानाच तो नकोसा. पण तरी प्रत्येकाचा त्यास कमीअधिक छुपा पाठिंबा असतोच. वरवर मात्र सगळेच दहशतवादाचा बीमोड करण्यावर एकमताने उभे राहणार. वास्तविक मोदी यांच्या विचारपरिप्रेक्ष्यात दहशतवाद म्हणून जे काही अभिप्रेत आहे त्याचा कर्ताकरविता ही अमेरिकाच आहे. बायडेनबाबांच्या पूर्वसुरींच्या संरक्षण सल्लागारांनीच तर तत्कालीन अध्यक्षांस इस्लामी धर्मवाद्यांस प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले. सोव्हिएत रशियाच्या डाव्या लालभाईंना रोखणे हा त्यामागचा विचार. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ ते ‘अल कईदा’ व्हाया तालिबान या साऱ्या इस्लामी दहशतवादी संस्थांच्या निर्मितीसाठी अमेरिकेची फूस तरी होती वा त्या देशाचे सक्रिय साहाय्य तरी होते. असे असताना त्या देशाच्या प्रतिनिधीगृहात बोलताना दहशतवाद रोखण्याची गरज व्यक्त करणे म्हणजे कसाई उद्योग प्रतिनिधींसमोर अहिंसा आणि शाकाहारावर प्रवचन देणे. दोन घटका बऱ्या जातात. पण हाती काही लागत नाही. अमेरिकेनेच दहशतवादाविरोधात भूमिका घेतली तर प्रचंड शस्त्रास्त्र उद्योगाचे दुकान सुरू कसे राहील? अर्थात असल्या समारंभीय वातावरणात असले श्लेष काढणे व्यर्थ. सगळाच माहौल नुसता उत्सवी!
त्याच उत्सवी उत्साहात पंतप्रधानांनी तोटक्या पत्रकार परिषदेत दोन प्रश्नांस तरी उत्तरे दिली ते बरे झाले. तेवढे तर तेवढे! लोकशाही भारतीयांच्या रक्तातच कशी आहे इत्यादी विधाने त्यांनी केली. ती खरीच. पण प्रश्न वातावरणाबाबत होता, रक्ताभिसरणाबाबत नाही. उत्सवी वातावरणात अशा तपशिलांस महत्त्व नसते. हा उत्सव भारतीय दूरचित्रवाणी माध्यमांतून उतू जात होता. ते पाहताना भारताच्या प्रगतीबाबत इतक्या साऱ्या अमेरिकावासी भारतीयांस इतकी माहिती आहे हे पाहून अनेक नेटिव्ह भारतीयांचे डोळे भरून आले असतील. तथापि मागास अमेरिकेत राहण्यापेक्षा हे भारतीय मग भारताच्या प्रगतिगंगेत डुबकी मारण्यासाठी भारतात का येत नाहीत, हा प्रश्न. पण अशा उत्सवी वातावरणात तो विचारणे अयोग्य. मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वसंध्येस आषाढ लागला. पण अद्याप आषाढाचा पाऊस सोडा; पण आकाशात आषाढाचे ढगही नाहीत. आषाढातील या अमेरिकावारीने प्रगतीचा आणि खरा पाऊसही पडेल ही आशा.