आता परिषदच भरणार नसल्यामुळे बाबा-बापू आणि तत्सम काही साध्वी-आचार्याचा हिरमोड होणार असून त्यांच्या ज्ञानामृतांतून अज्ञ भारतीयांस उद्धाराची संधी केंद्राच्या नकारात्मक निर्णयामुळे नाकारली जाणार आहे.

विज्ञान, वैज्ञानिकता आणि छद्मविज्ञान यांच्या बेमालूम सरमिसळणीच्या काळात ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ची परंपरा देदीप्यमान म्हणावी अशी आहे. सुमारे १०८ वर्षांपूर्वी १९१४ साली कोलकाता येथे ‘साहेबा’च्या अमलाखाली या वार्षिक मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन रसायनशास्त्रज्ञ जे. एल. सिमोनसेन आणि पी. एस. मॅकमोहन हे दोन प्राध्यापक या परिषदेचे जनक. पारतंत्र्यात असूनही या देशात विज्ञानदीपक लावायला हवा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत हा त्यांचा यामागील उदात्त विचार. त्यातूनच भारतातील वैज्ञानिकांना एका छत्राखाली वर्षांतून एकदा तरी एकत्र आणता यावे आणि त्यातील चर्वितचर्वणातून विज्ञान संशोधनाला गती यावी हा त्यांचा उद्देश. त्यातून  १९१४ साली कोलकाता या ब्रिटिश अमलाखालील राजधानीसदृश शहरातील ‘एशियाटिक सोसायटी’त या काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. तेव्हाच्या कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी या पहिल्या मेळाव्याचे अध्यक्ष होते. उद्घाटनाचे वर्ष असूनही शंभराहून अधिक वैज्ञानिक आणि विज्ञानाभ्यासक या परिषदेस हजर होते. त्यानंतर दर वर्षी अशी परिषद भरत गेली. तिचा आवेग इतका होता की १९३८ सालच्या सायन्स काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनास रूदरफोर्डसारखा अव्वल वैज्ञानिक अध्यक्ष म्हणून लाभला. दुर्दैवाने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्याआधीच त्यांचे निधन झाले. पण तेव्हापासून या देशी परिषदेत परदेशी वैज्ञानिकांचा सहभाग सुरू झाला. तिचे महत्त्व आणि प्रभाव इतका व्यापक झाला की १९४७ साली स्वातंत्र्याचे वारे वाहत असतानाही त्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात या सायन्स काँग्रेसचे अधिवेशन भरले आणि त्या राजकीय धामधुमीतही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवले.

Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
Navi Mumbai , Science Center ,
नवी मुंबई : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विज्ञान केंद्राचे ९० टक्के काम पूर्णत्वास
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना

त्यानंतर पंतप्रधानांनी या अधिवेशनाचे उद्घाटन करणे, अध्यक्षस्थान भूषवणे याची परंपरा तयार झाली आणि दर वर्षांचे स्वागत या विज्ञान परिषदेने होऊ लागले. स्वत: पं. नेहरू यांची विज्ञाननिष्ठा वादातीत. त्यांच्याच काळात आजच्या अनेक विज्ञानसंस्था उभ्या राहिल्या आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठेने देशातील विज्ञान साक्षरतेस गती आली. त्यांच्याच उपस्थितीत ६३ साली या परिषदेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. डी. एस. कोठारी यांच्यासारखा कडवा विज्ञानवादी आणि शिक्षणतज्ज्ञ या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता. इतक्या वर्षांत जगदीशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रे, विश्वेसरय्या, सी. व्ही. रमन, शांती स्वरूप भटनागर, होमी भाभा, हुमायुँ कबीर, एम. एस. स्वामिनाथन, प्रो. सी. एन. आर. राव, वसंत गोवारीकर अशा एकापेक्षा एक महानुभावांनी या परिषदेचे उद्घाटक वा अध्यक्षस्थान भूषवले. तथापि जवळपास गेल्या १०८ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ २०२४ साली भरणार नाही. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने भारतीय विज्ञानविश्वासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या वार्षिक परिषदेतून अंग काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. पुढील वर्षांची सायन्स काँग्रेस लखनौ येथे भरणार होती आणि तिच्या तयारीबाबत अलीकडच्या काळात अनेकदा माहिती दिली जात होती. पण आयोजकांवर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत केंद्र सरकारने या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ या परिषदेच्या प्रथेप्रमाणे नववर्षांच्या सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेस हजेरी लावणार नाहीत.

वास्तविक पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती असलेली विज्ञान परिषदेची २०१९ साली भरलेली १०६ वी बैठक खूप चर्चिली गेली. तीत पंतप्रधान मोदी सर्वार्थाने चर्चाविषय होते. विज्ञानात नोबेल मिळवणारे अर्धा डझन जागतिक दर्जाचे वैज्ञानिक आणि ३० हजारांहून अधिक देशी विज्ञानवंत या परिषदेस उपस्थित होते. पण ती परिषद गाजली ती ‘नरेंद्र मोदी लहरी’मुळे. न्यूटन, आईन्स्टाईन आदींचे गुरुत्वाकर्षांचे सिद्धांत पूर्णपणे चुकीचे आहेत आणि या गुरुत्वाकर्षणीय लहरींना ‘नरेंद्र मोदी लहरी’ असे नाव दिले जावे, अशी मागणी या परिषदेत केली गेली. इतकेच नव्हे तर दैत्यसम्राट रावण याच्याकडे विविध २४ प्रकारची विमाने होती आणि त्याने सध्याच्या श्रीलंकेत त्या वेळी विमानतळांचे जाळे उभारले होते असेही या विज्ञान परिषदेत सांगितले गेले. तसेच कृत्रिम गर्भधारणा पूर्वीच्या काळात भारतीयांना अवगत होती, अगडबंब डायनोसोर्स ही ब्रह्मदेवाची निर्मिती आणि भगवान विष्णूने तर साक्षात क्षेपणास्त्रे विकसित केली होती इत्यादी मौलिक माहितीही या परिषदेत दिली गेली. एरवीही प्लास्टिक सर्जरीचा उगम भारतात आहे आणि गणेश हे त्याचे दृश्यरूप असा वैज्ञानिक दावा पंतप्रधानांनी विज्ञान परिषदेच्या व्यासपीठावर केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. त्यानंतर यंदाच्या विज्ञान काँग्रेसने तर इतिहास घडवला.

महाराष्ट्राची राज-सांस्कृतिक राजधानी असलेल्या नागपुरात झालेल्या सायन्स काँग्रेसने हळदी-कुंकूच आयोजित केले होते. तीत सहभागी महिला वैज्ञानिकांची खणा-नारळाने ओटी भरली गेली किंवा काय आणि पुरुष वैज्ञानिकांसाठी कीर्तन महोत्सव होता किंवा काय, याचा तपशील हाती नाही. पण त्यानंतर आता लखनौ येथील संभाव्य विज्ञान परिषदेकडे समग्र भारतवर्ष डोळे लावून बसले होते. या परिषदेत भारतीय नद्यांच्या पाण्याची आंतरिक स्वच्छता, आण्विक होरपळीवर गोमय लेपाचा उपाय अशा काही वैश्विक विषयांवर मार्गदर्शन होईल अशी अनेकांस आशा होती. त्यावर विज्ञान खात्याने पाणी ओतले. आता ही विज्ञान परिषदच भरणार नाही. त्यामुळे बाबा-बापू आणि तत्सम काही साध्वी-आचार्याचा कमालीचा हिरमोड होणार असून अज्ञ भारतीयांस त्यांच्या ज्ञानामृतांतून उद्धाराची संधी केंद्राच्या या नकारात्मक निर्णयामुळे नाकारली जाणार आहे. विज्ञान परिषदांपासून सरकारने कायमच लांब राहायचे की हा निर्णय यंदापुरताच याचा खुलासा अद्याप झालेला नाही. भारतीयांत ठासून भरलेल्या विज्ञानप्रेमावर केंद्राच्या या निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार असल्याने अशा परिषदांतून सरकार कायमचेच अंग काढून घेणार नाही, अशी आशा. तसे झाल्यास भारतीय वैज्ञानिकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावे, चंद्रयान प्रक्षेपणाचा मुहूर्त कोणती ग्रहदशा पाहून कसा काढावा इत्यादी प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे लवकरात लवकर मिळतील अशी व्यवस्था केंद्रीय विज्ञान मंत्रालय करेल, ही आशा. नपेक्षा महासत्तापदाचा मार्ग अधिक खडतर होण्याचा धोका संभवतो.

कदाचित असेही असेल की ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ या नावातच तिचे मरण असावे. एक नव्हे तर दोन दोन मृत्युयोग या नावात दिसतात. पहिला म्हणजे इंडियन. जाज्वल्य भारतात हे मिळमिळीत इंडियन कसे काय खपून घेतले जाईल?  इतकी वर्षे ते सहन झाले. पण नव्या भारतात जुनी इंडियन राहणे नाही. दुसरे म्हणजे विज्ञान परिषदेत ‘काँग्रेस’ असावी? यापरते अधिक मोठे कोणते पाप नाही. या पापास शांत नाही आणि उताराही नाही. काँग्रेसमुक्त भारताची हाक आपल्या सर्वोच्च नेत्यांनी दिलेली असताना हे वैज्ञानिक कोण टिकोजीराव लागून गेले की आपल्या नावात अजूनही ते काँग्रेस जिवंत ठेवण्याचे औद्धत्य करतात. अशी सांस्कृतिक बदफैली करणाऱ्या सायन्स काँग्रेसला मूठमाती देऊन तीस नवीन रूपात आणण्याचा विचार कदाचित या निर्णयामागे असावा. या नव्या रूपातील, नव्या रंगातील आणि नव्या ढंगातील विज्ञान परिषदेच्या यज्ञयागाची घोषणा लवकर व्हावी. तोपर्यंत हे क्षेत्र तरी ‘काँग्रेसमुक्त’ झाले याचा आनंद आपण साजरा करू या.

Story img Loader