केजरीवालांनी धर्माचे तेल इतके सुयोग्य प्रमाणात अंगास चोपडलेले आहे की ते प्रतिस्पर्ध्याहाती लागत नाहीत, हे ‘नोटांवर लक्ष्मी/गणपती’तून दिसले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..ही मागणी अमान्य- आणि मान्यही- करण्यात भाजपची अडचण. राहुल गांधींच्या जानवे-दर्शनापासून धर्म उघडय़ावर आला आहे, त्यातील हा पेच नेमका गुजरात निवडणुकीच्या तोंडावर!

चलनी नोटांवर गणपती आणि/वा लक्ष्मी यांच्या प्रतिमा छापण्याची मागणी करून ‘आम आदमी पक्षा’चे अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजप तसेच समस्त राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी केली असे म्हणावे लागेल. एकमेकांशी वाद सुरू असताना त्यातील एकाने अचानक दुसऱ्यास ‘‘तू हल्ली पत्नीस मारहाण करतोस का,’’ असा प्रश्न विचारून गांगरून टाकण्यासारखा हा प्रकार. या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देणे अशक्य. पण ‘नाही’ असे द्यावे तर त्यातून ‘म्हणजे पूर्वी मारझोड करीत होतास’ असा अर्थ निघण्याचा धोका. वादविवादात प्रतिस्पर्ध्यास अडचणीत आणणाऱ्या चतुर व्यक्तीसारखे केजरीवाल यांचे वर्तन असते. नोटांवर गणपती/लक्ष्मी यांच्या प्रतिमा छापण्याची त्यांची मागणी ही या माळेतली. ती उघड मान्य करणे अवघड. समजा भाजपने ती मान्य केलीच तरी त्या ‘यशा’चे श्रेय ‘आप’ला मिळणार. म्हणजे या देवतांच्या प्रतिमेचा भाजपच्या प्रतिभा-संवर्धनास काही उपयोग नाही. पण म्हणून उघडपणे ही मागणी फेटाळावी तर केजरीवाल पुन्हा भाजपच्या हिंदूत्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्यास रिकामे. यांतील मधला मार्ग काढायचा तर मग केजरीवाल यांच्यावर अन्य काही आरोप करीत राहणे आवश्यक. या गणपती/लक्ष्मीच्या पेचात अडकलेली आपली मान सोडवण्यासाठी भाजप नेमके हेच करताना दिसतो. प्रचारकर्त्यांची, समाजमाध्यमी जल्पकांची तगडी फौज हाती असल्याने भाजपस या प्रयत्नात यश येईलही. पण इतके दिवस देवाधिदेवांचा आशीर्वाद ज्या भाजपस होता त्या भाजपकडून या देव-देवतांना आपल्याकडे वळवण्याचा ‘आप’चा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला हे भाजप समर्थकांसही नाकारता येणारे नाही. हा धडा आहे. धर्मादी मुद्दे राजकारणाच्या धबडग्यात किती आणावेत, खरे तर मुळात ते आणावेतच का हा यातील कळीचा मुद्दा.

याचे कारण असे की बंद दरवाजाच्या आड सीमित राहायला हवेत असे विषय राजकारणाच्या चावडीवर एकदा का यायला सुरुवात झाली की ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ असे काही राहात नाही. सर्वच उघडय़ावर येते. गेल्या काही निवडणुकांत याची प्रचीती येते. राहुल गांधी यांचे जानवे-दर्शन, केजरीवाल यांनी ‘हनुमान चालीसा’ मुखोद्गत असल्याचे दाखवून देणे, ममता बॅनर्जी यांनी देवी-पाठ म्हणून दाखवणे इत्यादी उद्योग यातूनच आले. बरे, या मंडळींना ‘तसे’ करायला लावले म्हणून भाजपने अभिमान मिरवायचा म्हटले तर त्यावर केजरीवाल यांची ही गणपती/लक्ष्मी मुद्रेची मागणी. यातून दिसते ते इतकेच की राजकारण एकदा का भावनेच्या प्रवाहात वाहू दिले की प्रवाहपतित होण्याखेरीज पर्याय राहात नाही. केजरीवाल यांनी गणपती/लक्ष्मीबाबत मागणी केल्या केल्या काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी ‘मग आंबेडकर यांची प्रतिमा का नाही’ असा प्रश्न विचारला. तो अजिबात अवास्तव नाही. याचे कारण नोटा छापण्याचा अधिकार ज्या संस्थेस आहे त्या रिझव्‍‌र्ह बँकेची स्थापनाच मुळी झाली ती डॉ. बाबासाहेबांनी रुपयाच्या मूल्यासंदर्भात केलेल्या मागणीमुळे. शिवाय ते स्वत: उच्च कोटीचे अर्थशास्त्री होतेच. तेव्हा मनीष तिवारी यांची मागणी अयोग्य नाही. सध्या भाजपच्या वळचणीखाली कोपऱ्यात उभे असलेले रामदास आठवले यांच्या नजरेतून ही मागणी सुटलेली असावी. अन्यथा ते या मागणीस तातडीने पाठिंबा देते. पाठोपाठ आपापल्या राजकीय/ सामाजिक निष्ठांच्या नुसार कोणाकोणाची छायाचित्रे नोटांवर असावीत याची मागणी वाढतच जाईल, यात शंका नाही.

याआधीही अनेकदा केजरीवाल यांनी धार्मिक मुद्दे हाताळण्यातील आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्यामुळे या अशा मुद्दय़ांवर भाजप जितक्या यशस्वीपणे काँग्रेसला कानकोंडे करू शकतो तितक्या प्रमाणात केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’ला तो खिंडीत पकडू शकत नाही. विख्यात गायक, सुधारणावादी चळवळीतील सक्रिय आणि टोकाच्या हिंदूत्ववादविरोधी भूमिकेसाठी ओळखला जाणारा कलाकार टी. एम. कृष्णा याच्या कार्यक्रमास काही महिन्यांपूर्वी हिंदूत्ववाद्यांकडून आक्षेप घेतला गेल्यावर या कार्यक्रमाचे यजमानपद सांभाळण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. म्हणजे त्यांनी हिंदूत्ववाद्यांस दुखावले. पण त्याआधी दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्दय़ावर याच हिंदूत्ववाद्यांकडे पाहात शाहीनबागेत कित्येक दिवस सुरू असलेल्या आंदोलनाकडे केजरीवाल यांनी पाठ फिरवली. पण तरी हा शाहीनबाग परिसर केजरीवाल यांच्यामागे उभा राहिला. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री. पण दिल्लीतील ‘जेएनयू’त विद्यार्थ्यांना मारझोड होत असताना, ‘टुकडे टुकडे गँग’चा वाद होत असताना त्यावरही केजरीवाल यांनी मौन पाळले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी ‘आप’च्या व्यासपीठावर या ‘टुकडे टुकडे गँग’ला थारा दिला नाही. म्हणजे ‘ते’ आणि ‘आपण’ अशी दुही निर्माण करून तीवर राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यात ‘आप’ सापडत नाही. कुस्ती सामन्यात एक मल्ल अंगास तेल चोपून आल्यास ज्याप्रमाणे त्याला पकडणे प्रतिस्पर्ध्यास अवघड जाते, त्याप्रमाणे केजरीवाल यांचे राजकारण राहिलेले आहे. धर्माचे तेल त्यांनी इतके सुयोग्य प्रमाणात अंगास चोपडलेले आहे की ते प्रतिस्पर्ध्याच्या हाती लागतच नाहीत. आणि पंचाईत अशी की तरीही त्यांच्या अंगावर धर्माध राजकारण केल्याचे डाग नाहीत. म्हणून ते धार्मिक आणि निधर्मी अशा दोहोंच्या गटांत एकाच वेळी सुखेनैव संचार करू शकतात.

केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी नेमकी हीच अडचण आहे. तीदेखील गुजरात निवडणुकांच्या तोंडावर. त्यामुळे भाजप आणि ‘आप’ यांतील संघर्ष अधिकच चिघळणार हे नक्की. याआधी महाराष्ट्रात कमालीचे मारक आणि म्हणून यशस्वी ठरलेले ‘ईडी’ अस्त्र ‘आप’वरही चालवले गेले. दिल्ली सरकारातील आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरेंना अडकवल्याच्या बातम्या आल्या. पण याबाबत ‘आप’ने ठोकलेली बोंब आणि त्यांनी केलेला कांगावा इतका गगनभेदी होता की तोच जास्त विश्वसनीय वाटला. परिणामी ‘आप’ नेत्यांवर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप राजकीयदृष्टय़ा काही तितके फलदायी ठरले नाहीत. ‘आप’समोर सारखे नाक खाजवले गेल्याने तो पक्ष उलट अधिक मोठा झाला. एखाद्या बलवंत गजराजास य:कश्चित मुंगीने वात आणावा तद्वत ‘आप’चे राजकारणही भाजपसाठी कटकट ठरू लागले आहे. 

भ्रष्टाचाराच्या भ्रामक पिंजऱ्यात अडकवता येत नाही, पुरोगामी, लिब्टार्डू वा शहरी नक्षलवाद्यांत गुंतवता येत नाही आणि दुर्लक्ष करून तर अजिबात चालत नाही, अशी ही ‘आप’ची चाल. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांत ती अधिकच रंगणार. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘रेवडी’चा मुद्दा उपस्थित झाला हा काही योगायोग नाही. पंजाबात काही प्रमाणात मोफत वीज, महिलांना मोफत बस प्रवास, दिल्लीत गरिबांसाठी स्वस्त औषधालये, शिक्षण इत्यादी ‘आप’ने वाटलेल्या रेवडय़ा मतदारांनी गोड मानून घेतल्या. वर ‘आप’च्या पारडय़ात भरभरून मतेही दिली. गुजरातमध्येही याच खेळास मतदार भुलले तर काय घ्या, असा प्रश्न तेथील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांस पडल्यास गैर ते काय? दिल्लीत जे चालले ते ज्येष्ठांना अयोध्या यात्रेस घेऊन जाण्याचे आश्वासन केजरीवाल गुजरातेतही देत आहेत. आपल्या वृद्ध-मातापित्यास देवदर्शनासाठी खांद्यावरून वाहून नेणाऱ्या पुराणातील श्रावणबाळाचा हा आधुनिक राजकीय अवतार. आता अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शन आश्वासनास ‘रेवडी’ कसे ठरवणार, हाही प्रश्नच. या साऱ्यास किती फळे येतात ते गुजरातेत दिसेलच. पण या श्रावणबाळाच्या गुगलीने प्रस्थापितांस गांगरून टाकले आहे हे नक्की.