..हुकूमशाही मार्गाने दुसरा क्रमांक गाठता येतो. पण दोन आणि एक यांतील अंतर या मार्गावरून जाणाऱ्यांस कापता येत नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबर महिना चीनमध्ये तसाही देशप्रेमदर्शनाचा. पण गेली दहा वर्षे हे देशप्रेम ओतप्रोत भरून वाहून जाऊ लागले आहे. याची सुरुवात होते १ ऑक्टोबरच्या राष्ट्रदिन निमित्ताने आठवडाभराच्या राष्ट्रीय सुट्टीने. या काळात घरोघर राष्ट्रध्वज लावले जातात. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चिनी राष्ट्रविजयाच्या मालिका दाखवल्या जातात. नेटफ्लिक्ससदृश चिनी वाहिन्या हे सर्व मोफत करतात. गावोगाव राष्ट्रप्रेमाचे संदेश देणारे खेळे असतात. इतिहासात चीन किती महान होता आणि भविष्यात तो आणखी किती महानतम होणार आहे, याच्या कथांची सर्वत्र पारायणे होतात. याच्या जोडीला अध्यक्ष क्षी जिनिपग यांची वचने. क्षींनी विविध विषयांवर केलेले मतप्रदर्शन, मौलिक विचार, आंतरराष्ट्रीय समुदायास उद्देशून केलेली भाषणे आणि चीनला महासत्ता, सर्वोत्तम देश इत्यादी इत्यादी ते कसे करणार आहेत याचे मार्गदर्शन, पठण विविध व्यासपीठांवरून या काळात केले जाते. गेली दहा वर्षे हे सर्व अधिकाधिक जोमाने सुरू असले तरी या सगळय़ांचा उत्साह यंदाच्या वर्षी अधिकच होता. याचे कारण दर पाच वर्षांनी भरणारी चिनी साम्यवादी पक्षाची राष्ट्रीय परिषद. याआधी २०१७ साली ती भरली. त्या वेळी क्षी यांच्या राजवटीची फक्त पहिली फेरी संपली होती. तोपर्यंतच्या चिनी घटनेनुसार कोणाही व्यक्तीस अध्यक्षपदी फक्त दोन कार्यकाळांपुरतेच राहण्याची मुभा होती. पण २०१८ साली क्षी जिनिपग यांनी घटनादुरुस्ती करून देशाच्या भवितव्याच्या आड येणारा हा मागास नियम काढून टाकला. देशास महानपदी न्यावयाचे असल्याने क्षी आता तहहयात चीनचे नेतृत्व करू शकतात. साहजिकच त्यानंतरच्या, म्हणजे यंदाच्या परिषदेत क्षी जिनिपग यांची सलग तिसऱ्यांदा चीनच्या अध्यक्षपदी निवड केली गेली.

ही औपचारिकता होती. गेल्या रविवारी, १६ ऑक्टोबरास चिनी सत्ताधारी पक्षाची राष्ट्रीय परिषद सुरू झाली. ती २३ ऑक्टोबरास संपली. तिची सुरुवात झाली क्षी यांच्या भाषणाने. आपल्या जवळपास दोन तासांच्या मार्गदर्शनात क्षी यांनी चीन विविध क्षेत्रांत किती गगनभरारी घेत आहे याचे वर्णन तर केलेच पण त्याचबरोबर तैवानादी मुद्दय़ांवर आपल्या लष्करी डरकाळय़ाही फोडल्या. हाँगकाँग आपल्या ताब्यात आल्यापासून तेथील जनता किती खूश आहे हे त्यांनी सांगितले; पण त्याचबरोबर आता तैवानी जनतेस तसेच खूश करण्यापासून आपणास कोणीही (म्हणजे अमेरिका) रोखू कसे शकत नाही, हेदेखील नमूद केले. सत्ताधारी पक्षाच्या या पंचवार्षिक परिषदेस पक्षाचे २३०० प्रतिनिधी उपस्थित असतात. साम्यवादी पक्षाचे आयोजन भव्य असते. अगदी टाचणीएवढीही चूक होणार नाही याची पुरेपूर खात्री आयोजक घेतात. डोळे दिपवणारे व्यासपीठ, कडकडीत शिस्त, कडेकोट सुरक्षा आणि सुरक्षारक्षकांची डोळय़ात भरेल अशी उपस्थिती, एकसारख्या रंगसंगतीच्या पेहरावातील प्रतिनिधी अशा वैद्यकीय स्वच्छतेच्या वातावरणात ही परिषद भरते. उपस्थित २३०० जणांतून २०० जणांची मध्यवर्ती समिती निवडली जाते. या २०० जणांस पर्याय असावा म्हणून आणखी १७० जणांचा ‘ब संघ’ निवडला जातो. हे २०० जण मग पक्षाचा २५ सदस्यीय पॉलिटब्यूरो निवडतात. या २५ जणांतून निवड केली जाते फक्त सात जणांच्या स्थायी समितीची. हे सात जण म्हणजे चीनमधील अतिशक्तिशाली महाजन. विविध विषयांचे प्रमुख. आणि या सगळय़ांच्या वर सरचिटणीसपदी असलेले क्षी जिनिपग. साम्यवादी राजवटीत त्या पक्षाचा सरचिटणीस हे सर्वोच्च पद. म्हणजे एखादी व्यक्ती कम्युनिस्ट पक्षाची सरचिटणीस आहे या नात्याने त्या देशाच्या अध्यक्षपदी असते. क्षी जिनिपग हे तसे अध्यक्ष. याच्या जोडीला क्षी यांच्याकडे आणखी एक तिसरेही पद आहे. मध्यवर्ती लष्करी आयोगाचे ते अध्यक्ष. म्हणजे लष्कराचे सरसेनापती. या तीनही पदांवर रविवारच्या बैठकीत आणखी पाच वर्षांसाठी क्षी जिनिपग यांची एकमताने निवड केली गेली. देशास महान, अढळपदी न्यावयाचे असल्याने हे अटळ होते. यानंतर चिनी सत्ताधारी पक्षाची पंचवार्षिक परिषद एकदम २०२७ साली भरेल. लक्षणे अशी की २०१७, २०२२ सालच्या परिषदांत जे घडले त्याचीच पुनरावृत्ती आणखी पाच वर्षांनी होणाऱ्या परिषदेत होईल.

एकविसाव्या शतकातील विश्वापुढे साध्या वेशातील दोन हुकूमशहांचे मोठे आव्हान आहे. दोघेही साम्यवादी मार्गाने पुढे आले. रशियाचे व्लादिमिर पुतिन आणि चीनचे क्षी जिनिपग. दोघांनीही आपापल्या देशांवर मजबूत पकड घेतली आणि पहिल्या काही सत्ता-आवर्तनांनतर लगेच सत्ता पुनरावृत्तीस अडथळे आणणारी मर्यादा काढून टाकली. दोघेही त्यामुळे तहहयात आपापल्या देशांचे नेतृत्व करू शकतात. दोघेही आपापल्या देशांस पुन्हा एकदा गतकालीन वैभव देऊ इच्छितात. या सगळय़ाचा कहर म्हणजे हे दोघेही एकमेकांचे चांगले दोस्त आहेत आणि आंतरराष्ट्रीय मंचावर हा याराना मिरवण्यात त्यांना काही अयोग्य वाटत नाही. दोघांनीही आपापल्या देशांत आसपासच्या अनेक विरोधकांस ‘गायब’ केले. त्यांचे नक्की काय झाले हे दोन्हीही देशांस ठाऊक नाही. जगाचे दुर्दैव असे की या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था सांप्रतकाळी उत्तमावस्थेत नाही आणि आपापल्या नागरिकांचे लक्ष फाटक्या अर्थव्यवस्थेकडे जाऊ नये यासाठी हे दोघेही आपापल्या नागरिकांस राष्ट्रवादाचे प्यालेच्या प्याले पाजू लागले आहेत. कोणत्याही हुकूमशाही राजवटीत राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद, राष्ट्राभिमान यांचे मिश्रण हे राष्ट्रीय पेय असते. या दोन्ही देशांत हे पेयपान २४ तास सुरू राहील अशीच व्यवस्था आहे. चीनमध्ये तर ‘क्षी यांची अमृतवचने’ अशा प्रवचनांचीही व्यवस्था करण्यात आली असून अध्यक्षांच्या मुखातून पाझरणारा प्रत्येक ज्ञानकण टिपून घेतला जाईल याची खबरदारी घेतली जाते. १९५० च्या कालखंडात साम्यवादी नेते माओ झेडाँग यांनी सांस्कृतिक क्रांती केली. त्यानंतर त्या देशाच्या साम्यवादी लालीत झेडाँग यांच्याच तालमीत तयार झालेल्या डेंग क्षियाओिपग यांनी भांडवलशाही बेमालूमपणे मिसळत एक वेगळाच रंग निर्माण केला. हे दोन आधुनिक चीनचे भाग्यविधाते. पण क्षी जिनिपग हे या दोघांची कामगिरी पुसून चीनचा सर्वोच्च नेता म्हणून इतिहासात आपली नोंद व्हावी या प्रयत्नात आहेत. चीनचा महानतम नेता अशी स्वत:ची टिमकी त्यांनी स्वत:च वाजवलेली आहे. तथापि आपल्या मायदेशातील घरांवर पुन्हा एकदा सोन्याची कौले बसवण्याच्या त्यांच्या मार्गात तूर्त एक अडचण आहे.

चीनची आकसती अर्थव्यवस्था ही ती अडचण. गेली दोन वर्षे या अर्थव्यवस्थेचे आकसणे सुरू असून सध्या तिचा वेग जेमतेम तीन टक्के इतकाच आहे. तो कधीही तिनाच्या खाली जाईल अशी परिस्थिती. करोनाने या अर्थव्यवस्थेची मोठी धूप झाली हे खरे. पण तीमागे करोनापेक्षा करोनाच्या हाताळणीतील आडमुठेपणा हे मोठे कारण आहे. परिणामी चिनी निर्यातीचा वेग मंदावला असून देशांतर्गत विस्तारातही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. अर्थव्यवस्थेवर काळे ढग जमू लागले की कोणताही हुकूमशहा आपले हुकमी अस्त्र बाहेर काढतो. राष्ट्रप्रेम नावाच्या या अस्त्राचा दुरुपयोग कसा होतो हे रशियाचे पुतिन दाखवून देतच आहेत. त्यांस आता चीनच्या क्षी जिनिपग यांची जोड मिळेल असे दिसते. पुतिन यांनी आधी क्रीमिया आणि नंतर युक्रेनचा घास घेणाऱ्या कारवाया केल्या. जिनिपग यांच्या चीनने हाँगकाँग पचवलेले आहेच. आता ते तैवान गिळंकृत करू इच्छितात. या दोघांचाही शत्रू समान. तो म्हणजे अमेरिका. या लोकशाहीवादी दैत्यापासून आपापले देश वाचवण्याचे मोठे आव्हान या दोघांसमोर आहे. चीन आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेस मागे टाकणे हे त्यांचे ध्येय. एके काळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या साम्यवादी रशियाचेही हेच स्वप्न होते. त्याचे काय झाले हे दिसतेच आहे. जिनिपग तेच स्वप्न घेऊन पुढे जाऊ इच्छितात. हुकूमशाही मार्गाने दुसरा क्रमांक गाठता येतो. पण दोन आणि एक यांतील अंतर या मार्गावरून जाणाऱ्यांस कापता येत नाही. ही हुकूमशाहीची हद्द क्षी जिनिपग ओलांडणार का या प्रश्नाच्या उत्तरात जागतिक शांतता आणि अर्थातच आपली डोकेदुखी दडलेली आहे.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial dictatorship russia president vladimir putin president xi jinping america amy
Show comments