ट्रम्प यांची कथित लोकप्रियता आणि माध्यमांना भुलवण्याची त्यांची हातोटी यांचे रूपांतर अमेरिकी निवडणुकीतील विजयात काही झाले नाही..
‘असतील बेदरकार आणि बेमुर्वतखोर.. आपणास तर विजयी करून देत आहेत ना, मग ठीक’, हा विचारही मागे पडून आता पक्षापेक्षा ट्रम्पच मोठे झाल्याचे त्यांच्याच पक्षात मानले जाते आहे..
पक्षापेक्षा नेता मोठा झाला की काय होते याचा अनुभव अमेरिकेत रिपब्लिकन पक्षास सध्या नक्की येत असणार. अमेरिकेच्या इतिहासात मध्यावधी निवडणुकांत सत्ताधारी पक्षाने मोठय़ा प्रमाणावर जागा गमावल्या नाहीत असे झालेले नाही. त्यात सत्तेवर डेमोक्रॅटिक पक्ष असेल तर पाहायलाच नको. या पक्षाचे अत्यंत लोकप्रिय बराक ओबामा असोत अथवा बिल क्लिंटन. सर्व डेमोक्रॅटिक अध्यक्षांस मध्यावधी निवडणुकांनी छळलेले आहे. आधीच डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्यात अध्यक्षपदी निष्क्रिय, सपाट, अशक्त इत्यादी हिणवले गेलेले जो बायडेन. म्हणजे तर यंदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे पानिपत होणार याची सर्वास खात्रीच होती. अध्यक्षपदाची उर्वरित पुढील दोन वर्षे ‘बिच्चारे बायडेन’ कशी काय घालवणार, त्यांचे हात किती बांधलेले असतील आदी चर्चानी अमेरिकी माध्यमे ओसंडून जात होती. ही अशी डेमोक्रॅटिक धुलाईची इतकी खात्री सर्वास होती याचे कारण समोर होते उच्चरवात अत्यंत आत्मविश्वासाने स्वत:चे डिंडिम पिटणारे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. या माजी अध्यक्षांनी यंदाच्या निवडणुकांत जातीने लक्ष घालून आपल्या पक्षाचे उमेदवार निवडले आणि प्रचंड खर्च करून प्रचाराचा धडाका लावला. या प्रचारधुळीचा महिमा असा की त्यामुळे सर्वत्र रिपब्लिकन पक्षाचेच वातावरण असल्याची खात्री समस्तांस वाटू लागली. रिपब्लिकनांस अभूतपूर्व यश मिळणार हे सर्वानी गृहीत धरले. खुद्द ट्रम्प यांनी तर मतमोजणीदिनी आपल्या ‘मार-आ-लागो’ येथील प्रासादात अमेरिकेतील ज्येष्ठ माध्यमकर्मी, स्वपक्षीय राजकारणी यांच्या निवडक उपस्थितीत जंगी उद्यापनाचे आयोजन केले होते. तथापि मध्यरात्रीपासून या रंगारंग कार्यक्रमाचा बेरंग होऊ लागला आणि शेवटी शेवटी तर ट्रम्प यांच्यावर स्वत:च तेथून काढता पाय घेण्याची वेळ आली. आता रिपब्लिकन पक्षातील धुरीण ट्रम्प यांच्या एकूण अस्तित्वाबाबतच चर्चा करू लागले आहेत.
कारण आपल्या पक्षापेक्षा ट्रम्प यांनी स्वत:ची प्रतिमा मोठी केली याचा साक्षात्कार सर्वानाच होऊ लागला असून पक्ष आता ट्रम्प यांच्यापासून वाचवणे हे त्या पक्षाचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. याचे कारण ज्येष्ठांचे सभागृह सेनेट हे डेमोक्रॅटिक पक्षीयांकडून खेचून घेणे राहिले दूर; रिपब्लिकनांस त्या पक्षात होते तितके संख्याबळ राखणे अवघड जाताना दिसले. कनिष्ठ सभागृहात, म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकनांस घवघवीत यश मिळून बहुमताची खात्री होती. तसे झाले असते तर वयाच्या नव्वदीकडे निघालेल्या आणि तरीही तरुणीच्या उत्साहाने वावरणाऱ्या खाष्ट नॅन्सी पलोसी यांच्या जागी आपल्या पक्षाचा सभापती बसवणे त्यांना सहज शक्य झाले असते. पलोसीबाई २००७ पासून या पदावर असून ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत त्यांनी अध्यक्षांस अक्षरश: भंडावून सोडले होते. त्यामुळे त्यांच्यासह रिपब्लिकनांचा, आणि त्यातही ट्रम्प यांचा, राग असणे साहजिक. पण या रागाचे रूपांतर रिपब्लिकनांच्या विजयात काही त्यांना करता आले नाही. अद्याप या सदनांतील काही निकाल यावयाचे आहेत. पण जे काही लागले त्यावरून ट्रम्प यांच्या विजयाची मजल फार काही दूर जाईल असे दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक २१८ चा आकडा त्यांचा पक्ष कसाबसा मिळवेल अथवा तोही त्यांना गाठता येणार नाही, अशी स्थिती आहे. आणि समजा या सदनात त्या पक्षास बहुमत मिळालेच, तर ते अगदीच तोळामासा असेल, अशी चिन्हे दिसतात. तेव्हा या अशा निवडणुकीय वास्तवामुळे रिपब्लिकन पक्षात एका प्रश्नाची व्यापक चर्चा सुरू दिसते.
या ट्रम्प यांचे करायचे काय, हा तो प्रश्न. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत माध्यम सल्लागार ते या पक्षाचे अनेक आजी-माजी नेते अशा अनेकांनी पक्षास ट्रम्प यांच्या कचाटय़ातून बाहेर काढण्याची गरज व्यक्त केली असून तसे झाले नाही तर या पक्षाचा अध:पात निश्चित आहे, असा त्यांचा इशारा आहे. ट्रम्प यांनी पक्षास अतिउजवीकडे नेले. या पक्षाचा इतिहास असा नाही. अब्राहम लिंकन, पहिल्या महायुद्धाच्या तोंडावर अमेरिकेचे अध्यक्ष असलेले थिओडोर रूझवेल्ट, दुसऱ्या महायुद्धात जगाचेच नेतृत्व करणारे आयसेनहॉवर इत्यादी अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांनी या पक्षाचे नेतृत्व भूषवले. वॉटरगेट प्रकरणामुळे वादग्रस्त झालेले रिचर्ड निक्सन हेदेखील याच पक्षाचे. तथापि रोनाल्ड रेगन यांच्यासारख्या उच्छृंखल व्यक्तिमत्त्वाकडे या पक्षाची सूत्रे गेल्यापासून या पक्षाचा तोल ढळला. तो अधिकाधिक उजवा आणि म्हणून प्रतिगामी होऊ लागला. धर्म, वंश इत्यादी मुद्दे कार्यक्रमपत्रिकेवर आले आणि गर्भपातासारख्या वैयक्तिक आणि वैद्यकीय मुद्दय़ास धर्माच्या कोंदणात बसवले गेले. पुढे धाकटे बुश आणि नंतर ट्रम्प यांनी त्या इस्लाम-द्वेषाची नवी फोडणी देऊन त्या पक्षाची मागासता अधिक झणझणीत केली. आर्थिक विवंचनेत असलेल्यांस बऱ्याचदा धर्म आकर्षित करतो. ट्रम्प यांनी आपल्या काळात या सत्याचा पुरेपूर वापर करीत आर्थिक सुधारणाविरोधी भूमिका घेतली. जागतिकीकरणाच्या रेटय़ात अनेकांचे भले होत असताना विकासाची गंगा ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही त्यांच्या वेदनेस ट्रम्प यांनी धार्मिक आणि आर्थिक प्रतिगामिता अशी दुहेरी जोड दिली. याचा उतारा आपल्याकडे आहे असा त्यांचा दावा. तो सुरुवातीस अनेकांनी गोड मानून घेतला. त्यामुळे ट्रम्प यांची २०१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत सरशी झाली.
पण आपला अध्यक्षीय कार्यकाळ त्यांनी सदुपयोगी लावला असे म्हणता येणार नाही. आपण चांगले काय करू शकतो यापेक्षा विरोधी डेमोक्रॅटिक पक्षीय किती वाईट आहेत याचा कंठाळी प्रचार करणे हेच ट्रम्प करत बसले. त्यात हा गृहस्थ स्वत:च्या आकंठ प्रेमात बुडालेला. त्यातून तो बाहेर यायलाच तयार नाही. स्वत:वर इतके आणि असे अतोनात प्रेम करणाऱ्यास कोणीच दुखावू करू शकत नाही. कारण अशा व्यक्तींभोवती एक अभेद्य कवच असते. ते भेदण्याची ताकद वास्तवामध्ये असतेच असे नाही. त्यामुळेच २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकांत पराभूत झाल्यानंतरही ट्रम्प यांना आपण प्रत्यक्षात जिंकलोच आहोत असे वाटत राहिले. त्यातूनच नंतर ‘कॅपिटॉल हिल’वर हल्ल्याचा तो धक्कादायक प्रकार घडला. वास्तविक तीच वेळ होती रिपब्लिकनांनी ट्रम्प यांस दूर करण्याची. पण त्या वेळी तसे झाले नाही. याचे कारण ट्रम्प यांची कथित लोकप्रियता. ती आपणास निवडणुकीचा भवसागर तरून जाण्यास मदत करेल, अशी आशा रिपब्लिकन बाळगून होते. ‘ट्रम्प असतील बेदरकार आणि बेमुर्वतखोर.. पण आपणास तर विजयी करून देत आहेत ना, मग ठीक’, असा संकुचित विचार रिपब्लिकनांनी केला असणार. त्याचा फटका या निवडणुकांत त्यांच्या पक्षास बसला.
वाटत होते तसे ट्रम्प काही आपणास निवडून आणू शकत नाहीत, या कटू सत्याची जाणीव या निकालांनी रिपब्लिकनांस झाली असून त्यामुळे २०२४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांच्या मागे उभे राहावे किंवा काय याची उघड चर्चा त्या पक्षात झडू लागल्याचे दिसते. त्यामुळेच ट्रम्प यांच्याऐवजी फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस हे त्यांचे आव्हानवीर ठरतील असे दिसते. एकुणातच ट्रम्प यांच्यामुळे पक्ष मोठा होण्याऐवजी ट्रम्प यांनी पक्षाचा उपयोग स्वत: मोठे होण्यापुरताच केला, असा सूर त्या पक्षात व्यक्त होतो. परिणामी ट्रम्प मोठे झाले आणि त्यांचा पक्ष लहान होत गेला.
सध्या अमेरिकी माध्यमे या संघर्षांच्या कथांनी भरलेली दिसतात. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील मॉरीन दौद, ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे जॉर्ज विल, कॅथलीन पार्कर इत्यादी अनेक ट्रम्प आणि रिपब्लिकनांची लक्तरे निर्घृणपणे वेशीवर टांगताना दिसतात. ‘न्यू यॉर्क पोस्ट’ने तर या निवडणुकीच्या निकालाचे वर्णन करणाऱ्या वृत्तांकनास ‘हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल’ या बालगीताच्या धर्तीवर ‘ट्रम्प्टी-ड्रम्प्टी’ असे शीर्षक दिले. तथापि त्यातून ध्वनित होणाऱ्या ‘ऑल फॉल डाऊन’च्या धास्तीने रिपब्लिकनांस भान आले असून ट्रम्प यांचे जोखड झुगारून देण्याच्या त्या पक्षाचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. आत्ममग्न राजकारण्यांस भानावर आणण्यास निवडणुका हाच पर्याय असतो हे अमेरिकी मतदारांनी दाखवून दिले, ते असे.