खंबीर नेतृत्वाची कसोटी प्रतिकूल परिस्थितीमध्येच लागत असते, पण यश आणि लोकप्रियता यांचे कथानक रुजले, की उत्तरदायित्वाची फिकीर कोण करतो?
भूगर्भाविषयी संशोधनाच्या विशाल परिघात अजूनही किती तरी अज्ञात क्षेत्रे अभ्यासायची बाकी आहेत. ते जोवर होत नाही, तोवर या एका नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेविषयी आणि वेळेविषयी अंदाज व्यक्त करणे दुरापास्तच आहे..
भूगर्भ संशोधक आणि भूकंप विश्लेषकांच्या वर्तुळामध्ये या नैसर्गिक आपत्तीविषयी एक वाक्य प्रचलित आहे : प्राणहानी भूकंपामुळे नव्हे, सदोष इमारतींमुळे होत असते! तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाबाबत हेच म्हणता येईल. तुर्कस्तानच्या दक्षिणेला आणि सीरियाच्या उत्तरेला ६ फेब्रुवारीच्या पहाटे झालेल्या भीषण भूकंपाने घेतलेल्या बळींची अधिकृत संख्या शुक्रवापर्यंत २० हजार पार पोहोचलेली होती. या भागातील तीव्र थंडी आणि ढिगाऱ्याखाली अन्नपाणी व इतर कोणत्याही मदतीविना अडकून राहिलेल्यांची संख्या पाहता, मृतांचा आकडा आणखी किती तरी वाढण्याची शक्यताच अधिक. हा भूकंप या शतकातला आतापर्यंतच्या सर्वात विध्वंसक भूकंपांपैकी एक ठरतो. युद्ध आणि यादवीने विदीर्ण झालेल्या सीरियाच्या उत्तर भागात यामुळे मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी होणे हे समजण्यासारखे आहे. परंतु तुलनेने किती तरी अधिक सधन आणि सुस्थिर असलेल्या तुर्कस्तानमध्ये ज्या प्रकारे विध्वंस दिसून आला आणि अजूनही दिसतो आहे, ते आकलनापलीकडचे आहे.
तुर्कस्तान हा बऱ्यापैकी भूकंपप्रवण देश. तेथील भूकंपविषयक जाणिवा प्रगल्भ आहेत. या देशात जेथे नागरीकरण झाले किंवा विस्तारत आहे, तेथे भूकंपरोधक इमारतींची उभारणी कायद्याने अनिवार्य ठरते. ६ फेब्रुवारी रोजी झालेला भूकंप ७.८ रिश्टर क्षमतेचा म्हणजे मोठा होता. त्यानंतर आलेल्या पश्चातधक्क्यांपैकी एक जवळपास मूळ भूकंपाइतकाच मोठा म्हणजे ७.२ रिश्टर क्षमतेचा होता. या दुहेरी धक्क्यांमुळे तुर्कस्तानच्या दहा प्रांतांमधील अनेक शहरांत इमारती पत्त्याच्या बंगल्यागत कोसळल्या. पण याही ठिकाणी विरोधाभास असा, की काही इमारती कोसळून उद्ध्वस्त झाल्या, तर काही मात्र निश्चल उभ्या राहिल्या. याचा अर्थ भूकंपरोधक बांधकाम संहितेचे पालन करणाऱ्या इमारती बचावल्या, उर्वरित कोसळल्या. तुर्कस्तानातील भूकंपविनाशाची कारणे वैज्ञानिक आणि मानवी अशी दोन्ही आहेत. तरीदेखील एका भूकंपग्रस्त शहराचा दौरा करत असताना तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तैयिप एर्दोगान यांनी ‘जे झाले ते झाले. ही सारी नियतीची करणी..’ अशी प्रतिक्रिया दिली आणि सारे काही नियतीवर सोडून दिले. ‘काही शहरांमध्ये मदत उशिराने पोहोचली हे खरे. तरीदेखील इतक्या मोठय़ा आपत्तीसाठी तयारीत राहणे शक्य नाही,’ ही त्यांची सबबवजा कबुली पुरेशी जोरकस नव्हती.
तीन खंडीय भूस्तर परस्परांना रेटत आहेत अशा सांध्यावर तुर्कस्तान वसलेला आहे. येथे दोन विभंगरेषा प्राधान्याने सक्रिय आहेत. उत्तर अनातोलियन आणि पूर्व अनातोलियन. उत्तर अनातोलियन विभंगरेषा इस्तंबूल शहरानजीक आहे आणि येथून जवळच इझमित येथे १९९९ मध्ये झालेल्या भूकंपाने १७ हजारांचा बळी घेतला होता. त्या भूकंपाचा फटका इस्तंबूल शहरालाही बसला होता. त्यामुळे बहुतेक भूगर्भ शास्त्रज्ञांचे या विभंगरेषेकडे अधिक लक्ष असते. तुलनेने नुकत्याच झालेल्या भूकंपास कारणीभूत ठरलेली पूर्व अनातोलियन विभंगरेषा अलीकडच्या इतिहासात तितकी सक्रिय नव्हती. शिवाय या भागात ज्ञात इतिहासात ६ रिश्टरपेक्षा मोठय़ा क्षमतेचे भूकंप झालेले नाहीत. त्यामुळेच परवाच्या भूकंप तीव्रतेमुळे भूगर्भ शास्त्रज्ञही चकित झाले. यानिमित्ताने भूकंपाचे भाकीत वर्तवण्याच्या मर्यादांची उजळणी व्हावी. इतर अनेक क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक प्रगती उत्तरोत्तर नवनवी क्षितिजे गाठत असताना, या क्षेत्रात मात्र २० वर्षांपूर्वी जशी परिस्थिती होती, त्यापेक्षा फार प्रगती झालेली नाही. परवाच्या भूकंपक्षेत्रात (कारामानमारास) कधी तरी ६.८ पर्यंत रिश्टर क्षमतेचा भूकंप होईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर इतकी होती. भूकंपतीव्रतेच्या गणितात एका रिश्टर अंकाची वाढही प्रभावक्षेत्रात १० पटींची आणि विध्वंसक ऊर्जेत ३२ पटींची वृद्धी करू शकते. जपानमध्ये २०११ मध्ये झालेल्या भूकंपाचा अंदाज होता, पण तीव्रतेविषयीची गणिते चुकली. भूगर्भाविषयी संशोधनाच्या विशाल परिघात अजूनही किती तरी अज्ञात क्षेत्रे अभ्यासायची बाकी आहेत. ते जोवर होत नाही, तोवर या एका नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेविषयी आणि वेळेविषयी अंदाज व्यक्त करणे दुरापास्तच आहे.
ही झाली प्रस्तुत भूकंपाची वैज्ञानिक बाजू. आता थोडे मानवी बाजूविषयी. या देशात गेली २० वर्षे एर्दोगान यांची निरंकुश सत्ता आहे. २०१७ पासून त्यांनी हट्टाने अध्यक्षीय पद्धती तुर्कस्तानात राबवली. विशेष म्हणजे २००२ मध्ये एर्दोगान पहिल्यांदा सत्तेवर आले, त्यालाही भूकंपाची पार्श्वभूमी होती. इझमित भागात १९९९ मध्ये आलेल्या भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्यात तत्कालीन तुर्की राजवट सपशेल अपयशी ठरली. २००१ मध्ये तेथे मंदीसदृश परिस्थिती होती. त्या वेळच्या तीव्र सरकारविरोधी लाटेवर स्वार होऊन एर्दोगान यांचा ‘जस्टिस अॅण्ड डेव्हलपमेंट’ पक्ष तुर्की कायदेमंडळात दोन तृतीयांश बहुमत प्राप्त करून सत्तेवर आला. एर्दोगान यांच्या सत्ताग्रहणानंतर सर्वाधिक भर बांधकाम क्षेत्रावर देण्यात आला. तुर्कस्तानभर मोठय़ा व उंच इमारती, रस्ते, पूल, निवासी आणि व्यावसायिक संकुले उभी राहिली. या बांधकामांची कंत्राटे एर्दोगान यांच्या मर्जीतल्या मोजक्या कंपन्यांना वाटली गेली हे विशेष उल्लेखनीय आहे. तुर्कस्तानात या भूकंपात तब्बल सहा हजार इमारती जमीनदोस्त झाल्या, त्यांतील बहुतेक एर्दोगान काळात बांधलेल्या होत्या असे अनेक पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. भूकंपाआधीपासून तुर्कस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. तिथे चलनवाढीचा दर ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भूकंप पुनर्वसनाच्या जबाबदारीमुळे ती आणखी डबघाईला येऊ शकते. येत्या जून महिन्यात तुर्कस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार होती. विरोधकांना एकजुटीची संधी मिळू नये यासाठी एर्दोगान यांच्या सल्ल्याने ती मे महिन्यातच घेतली जाईल. परंतु आता भूकंपामुळे किमान दहा प्रांतांमध्ये एर्दोगान यांनी आणीबाणी जारी केल्यामुळे, या भागातील जनतेला बहुधा आपत्तीतून सावरण्याआधीच मतदानासाठी उभे राहावे लागेल!
भूकंपग्रस्त प्रांतांमध्ये एर्दोगान यांचा पारंपरिक मतदार आहे. या मतदाराचा भ्रमनिरास होऊ नये यासाठी एर्दोगान दौरे काढत आहेत. पण त्यामुळे मदतकार्य सुरळीत झाले असे दिसून येत नाही. मदत आणि पुनर्वसनाच्या बाबतीत तेथील सरकारने दाखवलेला अक्षम्य ढिसाळपणा आता ठायीठायी दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे ज्या मोजक्या शहरांत एर्दोगान गेले, तेथे त्यांनी नागरिकांची विचारपूस करण्याचे फारसे कष्ट घेतले नाहीत. त्याचबरोबर नागरिकांनीही त्यांच्या भेटीची दखल घेतली नाही. ज्या इमारती जमीनदोस्त झाल्या, त्यांमधील घरांच्या जाहिरातींमध्ये भूकंपरोधक यंत्रणा बसवल्याचे दावे संबंधित विकासकांकडून करण्यात आले होते. पण अशा जाहिराती त्यांतील दाव्यांचा असत्यपणा दाखवण्यासाठी ट्विटरवरून प्रसृत होऊ लागल्या, तेव्हा भूकंपग्रस्त भागांतील ट्विटर खातीच काही काळ गोठवण्यात आली. सरकारी मदतीमधील ढिसाळपणा दाखवून देणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले. कारण एर्दोगान हे आपत्ती निवारण किंवा निराकरणाऐवजी नियंत्रणावर भर देणाऱ्या नेत्यांपैकी आहेत. यश आणि लोकप्रियता यांचे कथानक एकदा रुजले, की उत्तरदायित्वाची फिकीर करण्याची गरज उरत नाही. खंबीर नेतृत्वाची कसोटी प्रतिकूल परिस्थितीमध्येच अधिक असते. पण एर्दोगान निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले असल्यामुळे इतर बाबींकडे थोडे दुर्लक्ष होणे हे स्वाभाविकच. पलीकडे सीरियामध्ये सारा आनंदीआनंदच. तेथील भूकंपग्रस्त भागावरच सीरियाचे सत्ताधीश बाशर अल असाद यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे उत्तरदायित्वाचाही प्रश्न येत नाही. निसर्गाने झोडल्यानंतर राजाकडेही जाण्याची या दोन्ही देशांतील भूकंपग्रस्तांची चोरी. एकाने प्रजेला सोडले आहे, दुसऱ्याने नियतीच्या करणीकडे बोट दाखवले आहे!