केरळची सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषत: शैक्षणिक स्थिती पाहता तेथील दुहेरी नरबळीचा प्रकार अधिकच लाजिरवाणा आणि धक्कादायक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकविसाव्या शतकातील वर्तमानात कोणत्याही प्रदेशात असे काही घडणे हे मागासतेच्या गांभीर्याची जाणीव करून देणारे ठरते. यातून जो विरोधाभास समोर येतो त्याचे विश्लेषण आणि त्यावरील उपाय हे दोन्ही राजकारणापासून दूर ठेवणे किती अगत्याचे आहे याची जाणीव ही घटना करून देते..

केरळात जे घडले ते केवळ त्या राज्यालाच नव्हे तर देशाला काळिमा फासणारे आहे. भौतिक प्रगतीसाठी कोणी तरी कोणाला तरी नरबळी देण्याचा सल्ला देतो आणि असा नरबळी दिला गेल्यानंतरही सांपत्तिक स्थिती सुधारत नाही म्हणून काही दिवसांच्या खंडानंतर आणखी एका महिलेचे शिर धडावेगळे केले जाते; इतकेच नव्हे तर बळी घेतल्या गेलेल्या महिलेचे मांस विधीपूर्वक खाल्ले गेल्याचे आढळते, हे सारेच शब्दातीत भयानक म्हणायला हवे. त्यातही देशातील सुशिक्षित जनतेचा अर्क असलेल्या राज्यात एकविसाव्या शतकात हा प्रकार घडावा हे शिक्षणाचा संबंध सुसंस्कार आणि सभ्यता यांच्याशी असतोच असे नाही, हे दर्शवणारे ठरते. या राज्यात गेली काही वर्षे साम्यवादी सत्तेवर आहेत. हे डावे स्वत:स नेहमीच वैचारिकतेबाबत इतरांपेक्षा उजवे मानतात. वैयक्तिक आयुष्यात त्यातील अनेक जण तसे असतातही. परंतु या वैयक्तिक बुद्धिमत्तेचे, साधनशुचितेचे प्रतिबिंब त्यांच्या शासन व्यवस्थेत पडतेच असे नाही. किंबहुना त्याच्या अभावाचीच उदाहरणे अधिक. साम्यवादाचा उगम असलेल्या सोव्हिएत रशियात स्टालिनपासूनच्या राजवटीचा इतिहास असो, कंबोडियातील पॉल पॉटच्या काळात ‘ख्मेर रूज’ राजवटीतील अत्याचार असोत, आधुनिक साम्यवादाचा उद्गाता गणलेल्या माओ झेडाँगच्या काळातील चिनी अत्याचार असोत वा आपल्याकडे पश्चिम बंगालात डावे सत्तेवर असताना दिसलेली दंगलराजची उदाहरणे असोत. साम्यवाद्यांच्या राजवटींचा इतिहासही कराल हुकूमशहाप्रमाणे रक्ताळलेला आहे, हे नाकारता येणारे नाही. तेव्हा साम्यवादी केरळातील या नृशंस हत्याकांडाबद्दल केंद्रातील सत्ताधारी भाजपने मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना टीकेचे लक्ष्य केले असले तरी त्यास इलाज नाही. सध्याच्या ध्रुवीय राजकारणात हे असे होणे अपरिहार्य. त्याचबरोबर असा हीन प्रकार भाजप-शासित राज्यात झाला असता तर डावे आणि माध्यम-स्नेही पुरोगाम्यांनी कसे आकाशपाताळ एक केले असते याचेही दाखले दिले जाणे क्रमप्राप्त. तथापि ही राजकीय कुंपणे ओलांडून केरळात जे काही झाले त्याची दखल घ्यायला हवी. 

याचे कारण केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षर राज्य आहे आणि ते पुढारलेले गणले जाते. या राज्याचा इतिहास हा अल्पसंख्य स्थलांतरितांना सामावून घेण्याचा. त्यामुळे इस्लाम धर्मीय आणि ख्रिश्चन हे दोन धर्मीय या राज्यात प्राधान्याने आढळतात. त्यातही ‘सीरियन ख्रिश्चन’ या ख्रिस्ती धर्माच्या स्वतंत्र शाखेची मुळे या राज्यात चांगलीच रुजली. तथापि या दोन धर्मीयांतील संघर्षांचा फारसा इतिहास केरळात नाही. म्हणजे मुसलमान आणि ख्रिस्ती यांत दंगली झाल्याचे आढळत नाही. या दोन धर्मीयांनी केरळच्या भिन्न प्रांतास आपले म्हणणे हे कारण यामागे असावे. पण त्याच वेळी हिंदू-मुसलमान आणि हिंदू-ख्रिश्चन यांच्यातील संघर्षांचे विपुल दाखले आढळतील. यातही ज्या ज्या प्रांतात हिंदू- मुसलमान- ख्रिश्चन हे एकमेकांवर आर्थिक व्यवहारांत अवलंबून होते त्या प्रांतात धार्मिक संघर्ष नाही. पण ज्या ज्या प्रांतात हे आर्थिक बंध अस्तित्वात नाहीत वा पुसले गेले तेथे मात्र धार्मिक संघर्षांचा विद्वेष पसरल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर ताजे नरबळी प्रकरण घडले ते थिरुवल्लाजवळील कोझेंचेरी तालुक्यातील एलंथूर येथे. हे खेडे या धार्मिक/वांशिक संघर्षांबाबत अनभिज्ञच दिसते. म्हणजे अशा धार्मिक/वांशिक संघर्षांचा इतिहास या परिसरास नाही. तसेच आर्थिकदृष्टय़ाही हा परिसर विपन्नावस्था, दारिद्रय़ यासाठी ओळखला जातो, असेही नाही. म्हणूनच येथे जे घडले ते अधिक चिंताजनक ठरते.

या गावातील कोणा मोहम्मद शफी ऊर्फ रशीद नामक कुडमुडय़ा धर्मविद्याकाराने स्थानिक वर्तमानपत्रात स्वत:बाबत जाहिरात केली. आपण कोणालाही श्रीमंत करू शकतो, असा त्यातील दावा पाहून भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांनी या रशीदला गाठले. तुमच्या धनसंपत्तीच्या मार्गास नरबळीच्या रक्तिशपणाची गरज आहे, असे या कुडमुडय़ा रशीदने या दाम्पत्यास सांगितले असता तिघांनी मिळून गावात लॉटरी तिकिटे विकणाऱ्या महिलेस घरी बोलावले आणि तिची विधिवत हत्या केली. यातील रशीद जसा कुडमुडय़ा उद्योगी तसा सिंगदेखील कुडमुडय़ा वैद्य. जडीबुटी विकणे, मालीश सेवा इत्यादीवर त्याचा चरितार्थ. मसाजसाठी अनेकांचे घरी येणे-जाणे असल्याने यात तसे काही वेगळे आढळले नाही. परंतु एका हत्येनंतरही आर्थिक स्थिती न सुधारल्याने या दम्पतीने पुन्हा रशीदशी संपर्क साधला. तेव्हा ग्रहांची सावली इत्यादी बकवास कारण पुढे करत या रशीदने सिंग दम्पतीस आणखी एक नरबळी देण्याचा सल्ला दिला. कहर म्हणजे या दोघांनी तो मानला आणि तिघांनी मिळून आणखी एका लॉटरी विक्रेत्या महिलेस घरी आणले. तिचीही पहिलीसारखीच हत्या केली आणि तिच्या शरीराचे ५५ तुकडे करून अंगणात पुरले. या महिलेच्या शरीराचा काही भाग या उभयतांनी खाल्ला असावा असा दाट संशय असून त्या संदर्भात पुरावे आढळू लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यातील पहिली हत्या खपून गेली कारण सदर महिलेच्या आगेमागे कोणी नसावे. तथापि दुसऱ्या बळीच्या आप्तेष्टांनी पोलिसांत ही महिला हरवल्याची तक्रार केल्याने तिचा शोध सुरू झाला आणि मोबाइलचा माग काढत पोलीस या दम्पतीच्या घरापर्यंत पोहोचले. या सिंग यांच्या शेजाऱ्याने लावलेल्या व्हिडीओ कॅमेऱ्यात संबंधितांच्या प्रतिमा मिळाल्याने हे सारे प्रकरण उघडकीस आले. अंगणातून या दोन महिलांचे मृतदेहही पोलिसांनी खणून काढले. त्यातूनच या महिलांचे काही अवयव खाल्ले गेले असावेत असा पोलिसांचा वहीम तयार झाला.

हे भयानक आहे आणि केरळातील साक्षरता, आरोग्यदायी जीवनशैली आदींचा विचार करता त्याची भयानकता अधिकच वाढते. एकविसाव्या शतकातील वर्तमानात कोणत्याही प्रदेशात असे काही घडणे हे मागासतेच्या गांभीर्याची जाणीव करून देणारे ठरते. यातून जो विरोधाभास समोर येतो त्याचे विश्लेषण आणि त्यावरील उपाय राजकारणविरहित करणे किती अगत्याचे आहे याची जाणीव ही घटना करून देते. देशातील अत्यंत धनाढय़ ज्या शहरांत निवास करतात त्या मुंबईतील धर्मस्थळात गर्दी अधिकाधिक वाढते, कोणाही बाबा-बापूच्या कच्छपि लागून मन:स्वास्थ्य शोधणाऱ्यांत दिवसागणिक वाढ होते आणि केरळसारख्या सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या प्रदेशांत हे असे नरबळी दिले जातात हे वास्तव झोप उडवणारे. केरळातील स्थानिकांपैकी घरटी एक परदेशस्थ असतात. या परदेशस्थांकडून मोठय़ा प्रमाणावर पैसा येतो. परिणामी अन्य राज्यांच्या तुलनेत तेथे आर्थिक स्थैर्य आढळते. तरीही या राज्यातील आर्थिक विषमता काळजी वाटावी अशी असल्याचे आतापर्यंत विविध पाहण्यांतून दिसून आले आहे. मातृसत्ताक पद्धती अवलंबणाऱ्या केरळात महिलांच्या मासिक पाळीतील आरोग्याबाबत राज्यातील साक्षरतेच्या तुलनेत म्हणावी तितकी जागरूकता नाही, असेही आढळून आले आहे. अशा परिस्थितीत सधन केरळात हे घडत असेल तर अन्यत्र काय घडू शकेल याची कल्पनाही करवत नाही. या प्रकारातील मुख्य आरोपींतील एकाचे आडनाव सिंग असे आहे. त्या अर्थी हा इसम स्थानिक नसावा. पण तरीही केरळच्या भूमीत येऊन असे करावे असे त्यास वाटले यातून त्याच्या मूळच्या प्रांताचा जसा पराभव आहे तशीच तीत केरळसारख्या आधुनिक राज्याची देखील हार आहे.

‘गॉड्स ओन कंट्री’ असे केरळ स्वत:स म्हणवतो. पर्यटकांस आकृष्ट करण्यासाठी वगैरे ही शब्दयोजना ठीक. पर्यटकांसाठी ते तसे असेलही. पण त्याच वेळी पायाभूतादी सुविधांत अत्यंत पुढारलेल्या राज्यांत अद्यापही इतकी मागासता असेल तर केवळ जाहिरातीने वास्तव बदलणार नाही. हे सत्य सर्वास लागू होते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial human sacrifice case the meat kerala human embarrassing shocking ysh
Show comments