अनेक मान्यवर ट्विटरवरच व्यक्त होतात ही या माध्यमाची महत्ता; पण नव्या मालकांच्या निर्णयामुळे तेही ‘आंतरराष्ट्रीय शिमगास्थळ’ ठरू शकते..
मस्क यांनी योजलेल्या नव्या उपायांमुळे काही काळ ट्विटरचा महसूल वाढेलही. पण अंतिमत: त्या कंपनीचे नुकसानच होईल..
आपल्या संस्कृतीत ज्याप्रमाणे शिमगा या सणाचे महत्त्व आहे त्याप्रमाणे तसे महत्त्व असलेले ‘उत्सव’ अन्य संस्कृतींतही आहेत. आपापल्या मनांतील भडास, मळमळ, गाळ इत्यादी रिकामी करण्याच्या उद्देशाने या उत्सवांची निर्मिती झाली असावी. हे ‘उत्सव’ संपले की माणसे आपापल्या नियमाधारित जगण्याकडे वळत. त्यामुळे शिमगा वा तत्सम उत्सव सतत बारा महिने असू शकत नाहीत. पण तंत्रज्ञानाच्या विस्ताराने ज्याप्रमाणे बारा महिने किलगड खायची संधी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे समाजमाध्यमांच्या विकसनाने १२ महिने २४ तास तीनही त्रिकाल शिमगा-सदृश उत्सव साजरे करण्याची संधी मानवतेस दिली. ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘टिकटॉक’ ही अशी कायमस्वरूपी शिमगास्थळे. अशांमध्ये अलीकडेपर्यंत समाविष्ट नसलेले, आकाराने लहान आणि तंत्रज्ञानाने सुमार; पण शिमगास्थळाकडे वाटचाल करणारे माध्यमकेंद्र सध्या चर्चेत आहे. ट्विटर हे ते माध्यमकेंद्र इलॉन मस्क या आंतरराष्ट्रीय शिमगापुरुषाने ४४०० कोटी डॉलर्सला विकत घेतले आणि त्यावर वादळ घोंघावण्यास सुरुवात झाली. मस्कने नवी कंपनी हाती आल्या आल्या प्रचंड कर्मचारी कपात केली, जे कर्मचारी या स्थळाचे पावित्र्य, नैतिकता राखण्यास तैनात होते; त्यांनाच सामुदायिक नारळ दिले गेले. या शिमगास्थळी काही महाजनांस विशेष दर्जा होता. तो दर्शवणारी ‘ब्ल्यू टिक’ (निळी ‘बरोबर’ची खूण) या महाजनांच्या नावासमोर असते. मस्कने हा महाजन-दर्जा विकायला काढला. महिना आठ डॉलर्स मोजणाऱ्यास तो सहज मिळेल. हे सर्व आपण करीत आहोत कारण ट्विटरचे अर्थारोग्य पार बिघडलेले आहे, असे त्याचे म्हणणे. ते खरे. पण प्रश्न पैशाचा नाही. ट्विटरचे उद्दिष्ट काय होते, काय झाले आणि काय होऊ घातले आहे या प्रश्नांची उकल करीत गेल्यास खरी समस्या काय ते लक्षात यावे.
उदाहरणार्थ फेसबुक, टिकटॉक, यूटय़ूब वा इन्स्टाग्राम यांच्या तुलनेत ट्विटर हे तंत्रज्ञान आणि माध्यम म्हणून अत्यंत साधे आहे. फेसबुकचे सक्रिय वापरकर्ते आहेत २८० कोटी, टिकटॉक १२० कोटी, यूटय़ूब २०० कोटी, इन्स्टाग्राम १४० कोटी आणि या तुलनेत ट्विटरचे सक्रिय वापरकर्ते आहेत जेमतेम २१ कोटी ७० लाख इतकेच. यावर प्रश्न असा की तरीही ट्विटरची इतकी चर्चा का? त्याचे उत्तर त्याच्या वापरकर्त्यांत आहे. जगातील अनेक राजकारणी, उद्योजक, लेखक, कलावंत, पत्रकार, आपल्यासारख्या देशात सरकारचे आनंददूत उद्योगपती या माध्यमाचा वापर करतात. उर्वरित वापरकर्ते या माध्यमावर येतात ते हे महाजन कोणत्या विषयावर काय म्हणत आहेत हे जाणून घेण्यासाठी. म्हणजे ट्विटरची महत्ता असे अनेक मान्यवर येथे व्यक्त होतात या सत्यात आहे. जॅक डॉर्सी आणि अन्यांकडून या माध्यमाची निर्मिती झाली ती या उद्देशाने. कलात्मकता, वैचारिकता आदींचे मुक्त आंतरराष्ट्रीय व्यासपीठ हवे हा या माध्यमाच्या निर्मितीमागील विचार. लंडनमध्ये शहराच्या मध्यवर्ती स्वप्निल अशा हाइड पार्कच्या विस्तीर्ण उद्यानातील एका कोपऱ्यात दररोज कोणीही कशावरही भाषण देऊ शकतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ही स्वप्नवत अवस्था. सर्व समाज जेव्हा प्रौढ समंजसतेच्या एका विशिष्ट पातळीवर येतो तेव्हा या असल्या उपायांचे मोठेपण कळते. पण ही पातळी जर सुटली आणि कोणीही कसलाही धरबंध न पाळता अत्यंत असभ्यपणे या व्यासपीठाचा वापर करू लागला तर तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा स्वैराचार ठरतो आणि व्यासपीठ आणि चावडी यांतील फरक नष्ट होतो. ट्विटरचे हे असे झाले. चांगले तंत्रज्ञान बेजबाबदारांहाती गेले की असेच होते. परिणामी जगभर या माध्यमांद्वारे कोण काय विचार, संदेश पसरवू पाहतो याची चर्चा सुरू झाली आणि या माध्यमाची स्फोटक क्षमता अनेकांच्या ध्यानात आली. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय, ब्रिटनमध्ये ‘ब्रेग्झिट’साठीचा अपप्रचार इत्यादी उदाहरणांतून हे दिसले. परिणामी या मुक्त व्यासपीठाच्या मुक्ततेचा गैरफायदा कोण, कसा घेत आहे यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आणि ती लक्षात घेत ट्विटरने त्यासाठी विशेष कर्मचारी वर्ग नेमला.
ही कंपनी मस्क याच्या हाती गेली आणि नेमकी याच कर्मचाऱ्यांस मोठय़ा प्रमाणावर कात्री लागू लागली. मस्क स्वत:स आचार/विचारस्वातंत्र्याचा रक्षणकर्ता मानतो. पण त्याच्या विरोधात मतप्रदर्शन करण्यास त्याचा विरोध. मानवतेच्या भल्यासाठी आपण ट्विटर विकत घेतल्याचा त्याचा दावाही असाच. पैशाची गरज आहे म्हणून ‘ब्ल्यू टिक’धारकांस तो शुल्क लावू पाहातो. पण या ‘ब्ल्यू टिक’ला पात्र ठरण्यासाठी काही अटी, प्रक्रिया पार पाडल्या जातात आणि काही निकषांवर आधारित तो निर्णय होतो. व्यक्तींची अधिकृतता, त्या त्या क्षेत्रातील त्याचा अधिकार इत्यादी. पण आता आठ डॉलर फेकले की कोणालाही ही निळी खूण धारण करता येईल. या असल्या उपायांमुळे काही काळ ट्विटरचा महसूल वाढेलही. पण अंतिमत: त्या कंपनीचे नुकसानच होईल. कारण आपापल्या क्षेत्रात काही एक सिद्ध केलेले आणि वाटेल त्या बडबडीने ‘अनुयायी’ मिळवू शकणारे हे एकाच पातळीवर येतील. म्हणजे ‘फेसबुक’चे जे झाले ते या माध्यमाचेही होईल. आंतरराष्ट्रीय शिमगास्थळ. अशा वेळी या माध्यमाचा म्हणून एक स्वतंत्र गुण होता तो नष्ट होईल. एखाद्या उत्पादनाने त्याचा हा अनन्यगुण (यूएसपी – युनिक सेलिंग पॉइंट) गमावला की ते अन्यांतील एक होते. ट्विटरबाबत हेच लक्षात आल्याने जगातील अत्यंत बलाढय़ कंपन्यांनी या माध्यमावर जाहिरात करणे कमी केले आणि काहींनी तर त्या न करण्याचा निर्णय घेतला. बौद्धिक क्रयशक्ती असलेले वापरकर्ते कमी होऊन नुसती निर्बुद्धांची भरताडच वाढणार असेल तर कंपन्यांचा हा निर्णय तार्किकच ठरतो. तेव्हा प्रचारकी, कंठाळी, प्रक्षोभक एकांगी मते मांडणाऱ्यांचीच सद्दी ट्विटरवर तयार होणार असेल तर त्या निळय़ा खुणेसाठीच्या शुल्काची काय मातबरी? त्यामुळे १३०० कोटी डॉलर्सचे कर्ज आणि त्यावर वर्षांला पाच कोटी डॉलर्सचे व्याज भरण्याइतकी आर्थिक क्षमता ट्विटरला मिळणे केवळ अशक्य.
हेच वास्तव आणि त्यातील धोका लक्षात घेऊन युरोपीय देश, अमेरिका आदींनी मस्क आणि ट्विटर यांच्याबाबत कडक भूमिका स्वीकारली. ‘पक्षी मुक्त झाला’ असे मस्कने ट्विटरची मालकी स्वत:कडे आल्यावर म्हटले होते. त्यावर ‘‘पण हा पक्षी आमच्या आकाशात आमच्या नियमांचे पालन करूनच विहरेल’’ असे संबंधित खात्याच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुनावले. याचा अर्थ एकांगी, प्रचारकी, भडक संदेशवहन इतकेच या जागतिक शिमगास्थळी होणार असेल तर ते तसे करू दिले जाणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तर ट्विटर आणि मस्क यांची संभावना ‘असत्याच्या प्रचार-प्रसाराचे सूत्रधार’ अशी केली. अमेरिकी कंपनी असूनही बायडेन यांनी ‘आपला तो बाब्या’ ही वृत्ती दाखवली नाही याकडे दुर्लक्ष केले तरी त्यांच्या म्हणण्यातील मथितार्थाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अर्थात या अशा आंतरराष्ट्रीय शिमगास्थळी आपले पाठीराखे मिरवणाऱ्यांची आणि तसे मिरवणाऱ्यांना मिरवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही, हे खरे. दर्जापेक्षा संख्येला महत्त्व येऊ लागले की असे होणे अपरिहार्यच. आता तर वादग्रस्त सौदी राजघराणे या ट्विटरमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत असल्याचे समोर येते. ही गुंतवणूक ट्विटरची मालकी असलेल्या मस्क याच्या खालोखाल असेल. म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्य, सभ्यता आदी मूल्ये मानणारे ट्विटरच्या कोटय़वधी वापरकर्त्यांचा खासगी तपशील मस्कप्रमाणे सौदीकडेही जाईल या विवंचनेत आहेत.
यानिमित्ताने गंभीर, मूलगामी आदीपेक्षा वावदुकांच्या वटवटीलाच अलीकडे येऊ लागलेले महत्त्व हा चिंतेचा विषय असायला हवा. मस्कसारख्या जातिवंत वावदुकाहाती ट्विटर जाण्याने ही चिंता अधिकच वाढते. अशा वेळी या माध्यमांत किती सहभागी व्हायचे याचा विचार शहाण्यांना तरी करावा लागेल.