इम्रान यांनी गतवर्षी नॅशनल असेम्ब्ली आणि लोकशाहीची घडी कांगावखोरपणा करून विस्कटण्याचा प्रयत्न केला. यंदा त्यांचा तोच खेळ न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुरू आहे..

इम्रान यांना या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा चंग शरीफ सरकारने बांधलेला दिसतो. परंतु ही चाल त्यांच्यावरच उलटू शकते..

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Anuj Thapan, High Court, Salman Khan, Anuj Thapan latest news
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण : आरोपी अनुज थापनचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही – उच्च न्यायालय
nitin gadkari expresses important views about devendra fadnavis on social media
फडणवीसांच्या शपथविधीनंतर नितीन गडकरींनी मांडले मत… म्हणाले,…

इम्रान खान या गृहस्थामध्ये थोडी जरी हिंमत आणि प्रतिष्ठा शाबूत असती, तर गेले काही महिने त्यांनी अटकेपासून सातत्याने पळ काढला नसता. त्यांच्या वकिलांनी पाकिस्तानातील बहुतेक सर्व उच्च न्यायालयांमध्ये अटक टाळण्यासाठी विनंत्या-आर्जवे केलेली आहेत. तेथील खटले न्यायदान प्रक्रियेच्या नित्य वेगाबरहुकूम सुरूच आहेत. पण स्वत:च्या हवेलीला इम्रान खान यांनी छोटय़ा किल्ल्याचे रूप दिले असून, तेथे त्यांचे समर्थक-पित्ते इम्रान यांच्याभोवती कवच करून उभे आहेत. पाकिस्तानी पोलीस व निमलष्करी दलांना अटकेचे हुकूम मिळाल्यास आपल्यापर्यंत पोहोचता येऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. यात रेटारेटीत त्यांचेच समर्थक जखमी होऊ शकतात वा जीवही गमावू शकतात. पण इम्रानसारख्या आत्मकेंद्री व तितक्याच भेकड नेत्यांना स्वत:च्या जिवाची जितकी भीती असते, तितकीच दुसऱ्याच्या जिवाविषयी तुच्छता आणि अनास्था असते. इम्रान अटक टाळत आहेत याचे एक कारण तुरुंगात गेल्यास आपले काही बरेवाईट निश्चित होईल, अशी त्यांची खात्री झाली आहे. पाकिस्तानात शाहबाझ शरीफ यांचे सरकारही त्या देशातील इतर अनेक हिंस्र गणंगांना सोडून इम्रानसारख्या पळपुटय़ा राजकारण्याच्या मागे लागते, यातून त्या सरकारच्या आकलनातील मर्यादा आणि हतबलता लक्षात यावी.

एके काळी क्रिकेट विश्वचषकामध्ये इम्रान यांनी त्यांच्या क्रिकेट चमूला कोंडीत सापडलेल्या वाघासारखे प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडण्याचे आव्हान केले होते. या ‘वाघा’चा आज ससा झाला असून, हे ससोबा बिळात गेल्यानंतर मात्र कांगावखोर कोल्हेकुई सुरू करतात! इम्रान यांना कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूक लढू द्यायची नाही, असा शाहबाझ शरीफप्रणीत आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. परंतु या भानगडीत इम्रान खान यांच्या लोकप्रियतेमध्ये आपण भरच घालतो हे समजण्याइतका परिपक्वपणा धाकटय़ा शरीफमियाँमध्ये नाही. त्यांच्या आघाडी सरकारमधील दुसरे नेते, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे तरुणतुर्क प्रमुख बिलावल भुत्तो यांना विविध मार्गानी अमेरिकेमध्ये जाऊन तेथे काश्मीर प्रश्न उकरून काढण्यापलीकडे दुसरे काहीच साधत नाही. हल्ली अशा पाकिस्तानी काश्मीररुदनाला अमेरिकेत प्रेक्षकही मिळत नाहीत, हे त्यांना कोण सांगणार? एकीकडे शाहबाझ-बिलावल आणि दुसरीकडे इम्रान, तिसरीकडे लष्कर आणि चौथीकडे मोकाट धर्मतत्त्ववादी असा हा एकाच वेळी विनोदी वाटणारा परंतु त्या देशातील राजकारणाला विदीर्ण करणारा चतुष्कोन.

हे सगळे अशा परिस्थितीत सुरू आहे, जी पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासात असाधारण आणि अभूतपूर्व ठरते. आर्थिक कंबरडे मोडलेल्या या देशात वीज, इंधन, अन्नधान्य, भाजीपाला यांचे भाव गगनाला भिडले आहेत आणि भरमसाट कर्जावरील व्याज परतफेडीच्या दुष्टचक्रात हा देश पुढील काही वर्षे अडकून पडण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. मुळात फुटकळ कृषी उत्पादनांच्या निर्यातीपलीकडे या देशाकडे अर्थार्जनाचा भक्कम असा स्रोत कधीही उपलब्ध नव्हता. करोना महासाथ, युक्रेन युद्ध आणि काही महिन्यांपूर्वी या देशातील अनेक भागांत आलेला भीषण पूर या तिहेरी संकटांमुळे लाखोंपुढे आजचा दिवस तग धरणे हेदेखील आव्हानात्मक ठरत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी खरेतर सर्व राजकारण्यांनी एकत्र यायला हवे आणि तेथील सत्ताकारणाचा अघोषित खांब असलेल्या लष्करी व्यवस्थेने याला सक्रिय पाठिंबा द्यायला हवा. परंतु पाकिस्तानी राजकीय नेते आणि लष्करशहांकडे तशी राजकीय परिपक्वता अजिबात नाही. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला अधिकाधिक खड्डय़ात घालण्याच्या प्रयत्नात आहे आणि या भानगडीत स्वत:ही खड्डय़ात सरकत आहे! इम्रान खान यांनी गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या; परंतु ती कामगिरी संशयातीत ठरली नव्हती. पाकिस्तानी लष्कराने मतदान प्रक्रियेतच हस्तक्षेप करून इम्रान यांना सर्वाधिक जागा मिळतील असे पाहिले हा आरोप सार्वत्रिक होता. परंतु इम्रान खान तरीही सत्तारूढ झाले. पाकिस्तानातील दोन प्रमुख राजकीय पक्ष – पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी – यांनी आलटूनपालटून चालवलेल्या बजबजपुरीला विटलेल्या जनतेने इम्रान आणि त्यांच्या तेहरीक- ए- इन्साफ पार्टीला काही आशा-अपेक्षा बाळगून स्वीकारले. इम्रान हे शब्दचतुर आहेत. भावनेला हात घालतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही लोभसवाणे. तशात क्रिकेट जगज्जेतेपदही त्यांनीच मिळवून दिल्यामुळे सुरुवातीला त्यांच्याविषयी सहानुभूती होती. पण कांगावखोरीचा अर्क सत्तेत आल्यानंतरही विरला नाही, उलट मुरलाच अधिक!

इम्रान यांच्या भूमिकालोलकाची दोलने तरी किती असावीत? पाश्चिमात्य शैक्षणिक संस्कार झालेल्या या गृहस्थाने पुढे धर्मतत्त्ववाद्यांची तळी जाहीरपणे उचलून धरण्यास सुरुवात केली. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची सुरुवातीला मदत घेतल्यानंतर आयएसआय प्रमुख नेमण्याच्या खेळात त्यांच्यावरच कुरघोडी करण्याचा प्रकारही इम्रान यांनी करून पाहिला. लष्कराचा पाठिंबा ओसरला, विरोधक एकत्र आले नि सत्तास्थान खिळखिळे होत आहे असे दिसल्यावर थेट अमेरिकी कटाचा सिद्धान्त त्यांनी आळवून पाहिला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात विरोधकांच्या एकीसमोर पार्लमेंटमध्ये सत्ताच्युत झाल्यानंतर ‘लष्कराच्या खेळी’चा पाठ पुन्हा एकदा सादर झाला. या व्यक्तीची विश्वासार्हता त्यामुळे शाहबाझ-बिलावल यांच्यापेक्षाही खालच्या पातळीवर उतरलेली आहे. सत्तेत असताना सरकारी नजराणा म्हणून अदा झालेल्या चीजवस्तूंची परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. आणखीही काही आरोप दाखल झाले आहेत. पाकिस्तानात हे काही नवे नाही. बहुतेक राजकारण्यांवर ते सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर वेगवेगळय़ा कारणांस्तव खंडीभर गुन्हे दाखल होतच असतात. पण इम्रान यांचे वेगळेपण असे की अशा गुन्ह्यंसंदर्भात पोलीस वा न्यायालयीन चौकशांना सामोरे जाण्याचीही त्यांची तयारी वा हिंमत दिसत नाही. चौकशीसाठी पोलीस आले, की समर्थकांना गोळा करून स्वत:चा बचाव करून घ्यायचा, शिवाय आपल्यामागे अजूनही पाठिंबा भक्कम कसा आहे याचे प्रदर्शन करायचे हे जवळपास ठरून गेलेले आहे. गतवर्षी त्यांनी  तेथील मध्यवर्ती कायदेमंडळ (नॅशनल असेम्ब्ली) आणि लोकशाहीची घडी कांगावखोरपणा करून विस्कटण्याचा प्रयत्न केला. यंदा तोच खेळ न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुरू आहे. इम्रान हे करू शकतात, कारण आपल्याला मिळणाऱ्या पाठिंब्याची धास्ती विरोधकांना वाटते हे ते ओळखून आहेत. इम्रान यांच्या लाहोरच्या घरातून स्फोटके मिळाली वगैरे आरोप शरीफ सरकारकडून केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत इम्रान यांना या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा चंगच शरीफ सरकारने बांधलेला दिसतो. परंतु ही चाल त्यांच्यावरच उलटू शकते, कारण आपल्यावर अन्याय झाला असा आक्रोश करत रस्त्यावर उतरणे यात इम्रान खान माहिर आहेत. ते असे उतरले की शरीफ सरकारचा धीर सुटतो. लोकशाही आणि निवडणुकीच्या मार्गाने इम्रान यांचा सामना करण्याची शरीफ यांची हिंमत नाही. असा हा विचित्र तिढा आहे.

या भानगडीत पाकिस्तानातील जिहादी आणि धर्मतत्त्ववादी अधिक शिरजोर व सक्रिय होतील ही भारतासाठी खरी डोकेदुखी ठरते. यासाठी बंदोबस्तात्मक उपाययोजना करत असतानाच, धर्मतत्त्ववादी वगळता इतर घटकांशी चर्चेचे मार्ग सुरू राहतील, ही खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. पाकिस्तानात लोकशाही जितकी टिकेल, तितके तेथील सरकार स्वत:च्या कृत्यांसाठी जगाला आणि भारताला काही प्रमाणात उत्तरदायी राहील. अन्नान्नदशेतील पाकिस्तानला धान्य व औषधे यांच्या रूपाने मदत करण्याची संधी मिळाली, तर भारताने ती डावलू नये. पाकिस्तानातील लष्करशहा आणि लष्करी नेतृत्वाशी आपण चर्चा करत राहिलो होतो. त्याचे फलित काय निघाले यावर काथ्याकूट करण्यापेक्षा, चर्चाच थबकली तर काय होऊ शकते याचे भान राखलेले केव्हाही हितकारकच!

Story img Loader