..विम्बल्डन टेनिस स्पर्धेतला कार्लोस अल्काराझचा विजय आणि त्याहीपेक्षा नोव्हाक जोकोविचचा पराभव समाजासाठी विशेष ठरतो, तो अशा कारणांमुळे..
बँका वा वित्तसंस्थांबाबत इंग्रजीत ‘टू बिग टु फेल’ अशा अर्थाचा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ असा की काही काही संस्था इतक्या मोठय़ा होतात की त्यांचे अपयशी होणे परवडणारे नसते. काही व्यक्तींबाबतही हे लागू होते. तथापि अशी अवस्था आल्यावर त्या संस्थांस वेसण घालणे आणि इतक्या मोठय़ा झालेल्या व्यक्तींचा पराभव करणे ही काळाची गरज बनते. व्यक्तींबाबत तर हे सत्य अधिक. याचा अर्थ असा अजिबात नाही की अशा व्यक्तींच्या गुणांची काही क्षती झालेली असते वा दुर्गुणांनी उचल खाल्लेली असते. या व्यक्ती गुणवान असतातच. तथापि बराच काळ पराभवाची कटू चव चाखावी न लागल्याने या व्यक्ती अजेय आहेत असे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यास वाटू लागते आणि कालौघात ही व्यक्तीदेखील अजेय असल्यासारखी वागू लागते. ही त्या व्यक्तीइतकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक त्या व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा. टेनिस या रम्य राजस खेळाबाबत ती वाजू लागलेली होती. कोणतीही महत्त्वाची स्पर्धा असो. विजेतेपद जणू नोव्हाक जोकोविच याच्या नावे राखीव असल्यासारखे चित्र अलीकडच्या काळात निर्माण झाले होते. एकच एक जोकोविच याचे सर्व स्पर्धा जिंकत जाणे त्याच्यासाठी अभिमानास्पद असेलही. त्याची विजिगीषू वृत्ती आणि वयाची चाळिशी चार वर्षांवर आली तरी तरुणांस लाजवेल अशी तडफ या बाबी जोकोविच याच्यासाठी व्यक्ती म्हणून निश्चितच अभिमानास्पद. पण एक खेळ म्हणून टेनिसबाबत मात्र ते निश्चितच तसे नव्हते. जोकोविच अजेय वाटण्यातून खेळ पराभूत होण्याचा धोका होता. रविवारी अत्यंत रोमहर्षक लढतीत कार्लोस अल्काराझ या जेमतेम विशीतल्या तरुणाने अनुभवसंपन्न जोकोविच यास हरवले आणि हा धोका टळला. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग असतो आणि खेळात जे काही घडते ते त्या चौकोनापुरतेच मर्यादित नसते. खेळ हा समाजापासून विलग करता येत नाही. म्हणून अल्कराझ याच्या विजयाचे आणि त्याहीपेक्षा जोकोविच याच्या पराजयाचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे.
कारण त्यास हरवणारा अल्कराझ स्वत:च्या पायावर उभे राहण्यास जेमतेम शिकला असेल-नसेल त्या वर्षी जोकोविच टेनिसच्या विजेतेपदाच्या प्रभावळीत विराजमान झाला. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि जोकोविच हे समकालीन. अल्कराझ याच्या पिढीस टेनिस म्हणजे काय हे उमजायच्या आधीपासून हे त्रिकूट टेनिसच्या महत्त्वाच्या सामन्यांचे विजेतेपद आपापसात वाटून घेत राहिले. हे तिघेही गुणवत्तेत समसमान. एखाद्या सुताचा फरक. त्यामुळे या तिघांतील कोणी एकच एक अंतिम विजयी ठरेल असे छातीठोकपणे सांगणे अवघड होते. राम गणेश गडकरी यांनी टिळक आणि आगरकर यांच्यातील बौद्धिक स्पर्धेचे वर्णन ‘आकाशातील तेज:पुंज नक्षत्रांची शर्यत’ असे केले होते. टेनिस खेळाबाबत ते या तिघांस तंतोतंत लागू होते. त्यामुळे खेळातील स्पर्धा कमालीची चुरशीची होत असे आणि त्या तिघांतील गुणवत्तेच्या सीमारेषा उत्तरोत्तर वाढत. तथापि विविध कारणांनी या त्रिकोणातील फेडरर आणि नदाल हे कोन दूर झाले आणि टेनिस कोर्टवर उत्तुंग गुणवत्तेचा जोकोविच हा एकच एक खेळाडू उरला. नदाल आणि फेडरर या दोघांच्या तुलनेत जोकोविच शारीरिकदृष्टय़ा सक्षम. त्यामुळे तो अधिक टिकला. त्याचे हे अधिकचे टिकणे टेनिसच्या खेळास मारक ठरते की काय अशी स्थिती निर्माण झाली.
कारण टेनिसमध्ये एकमेव नरसिंह जोकोविच आणि बाकी समोर नुसते बछडेच बछडे. त्यातील अनेकांत उद्याचा वाघ होण्याची क्षमता होती वा आहे. पण वर्तमानातील आव्हानांवर मात करण्यास भविष्यातील आश्वासकता उपयोगी पडत नाही. या सत्याचा आविष्कार टेनिस मैदानावर गेली वर्ष-दोन वर्षे दिसू लागला होता. यासाठी अर्थातच जोकोविच यास दोष देणे अजिबात योग्य नाही. त्याची गुणवत्ता वादातीतच. पण टेनिससारख्या विलोभनीय खेळातील जगज्जेत्याकडे केवळ विजेतेपदाच्या गुणवत्तेपेक्षा अधिक काही असावे लागते. ते फेडरर आणि नादाल या दोघांकडे मुबलक होते. त्यामुळे निवृत्तीनंतरही अनेकांस त्यांच्याच खेळाची उणीव आजही जाणवते. ‘‘जोकोविच मोठाच आहे; पण..’’ याच सुरात टेनिस-प्रेमी अजूनही बोलतात ते याचमुळे. त्यांच्या विधानांतील या ‘पण’मध्ये जोकोविच याच्या मर्यादा दिसून येतात. त्यात जोकोविचचे अतिरेकी धर्मप्रेम आणि विज्ञानदुष्ट वृत्ती! धर्मप्रेम हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा. तथापि या धर्मप्रेमापोटी जोकोविचसारखी अत्यंत अत्युच्चपदी गेलेली व्यक्ती करोनाच्या साथीत प्रतिबंधक लस घेण्यास विरोध दर्शवते त्या वेळी हा मुद्दा केवळ वैयक्तिक राहात नाही. तो सामाजिकदृष्टय़ा धोक्याचा ठरतो. जोकोविच असा झाला होता. करोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत तो इतका दुराग्रही की त्यासाठी त्या काळात चार महत्त्वाच्या स्पर्धापैकी ‘ऑस्ट्रेलियन ओपन’वर पाणी सोडण्यास त्याने कमी केले नाही. त्या वेळी ‘लोकसत्ता’ने ‘अवैज्ञानिकाचे तिमीर जावो’ (१७ जानेवारी २०२२) या संपादकीयाद्वारे जोकोविचसारख्या आदर्शवत् खेळाडूच्या विज्ञानद्रोही वागण्याचा समाचार घेतला होता.
कोणत्याही समाजास, मग तो परंपरावादी पौर्वात्य असो वा आधुनिक पाश्चिमात्य. विजयानंतर मिजास मिरवणाऱ्यापेक्षा मार्दव राखणारेच अधिकाधिकांत हवेहवेसे होतात. त्याचमुळे विजयानंतर शर्ट काढून त्याचे भिरभिरे करणाऱ्या सौरव गांगुलीपेक्षा पराभवही हसतमुखाने स्वीकारणारा महेंद्रसिंग धोनी अधिक लोकप्रिय होतो, अधिक टिकतो आणि स्वत:च्या महानतेच्या खाणाखुणा करणाऱ्या, दोन्ही हात वर-खाली करून प्रेक्षकांस टाळय़ा वाजवा असे सांगणाऱ्या जोकोविचपेक्षा स्नेहल फेडरर आणि चेहऱ्यावर शारीरिक वेदना न लपवणारा नदाल अनेकांस जवळचा वाटतो. खेळाडूची मैदानावरील कामगिरी त्यास सर्वोत्कृष्टतेच्या सर्वोच्च पायरीवर नेऊन ठेवते हे खरेच. पण महानतेचा टप्पा गाठण्यासाठी ‘सितारोंके आगे जहाँ और भी है’ या वास्तवाची जाणीव असावी लागते. जोकोविच यास ती होती वा नव्हती याचा निवाडा करता येणे अशक्य. पण त्याच्या वर्तनातून ती प्रतीत होत नसे हे निश्चित. त्यामुळे तो जिंकावा असे वाटणाऱ्यांपेक्षा ‘याला कोणी तरी आता हरवावे’ अशी भावना असणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढू लागली होती. वास्तविक गेल्याच महिन्यात झालेल्या ‘फ्रेंच ओपन’मध्ये आव्हानवीर आणि उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या अल्कराझची जी अवस्था जोकोविचसमोर झाली त्यामुळे तर तो अधिकच अजेय वाटू लागला. एखाद्याच्या विचारांध चाहत्यांस असे वाटणे गैर नाही. पण सदर व्यक्तीने असे वाटून घेणे हे शेवट जवळ आल्याचे लक्षण.
विम्बल्डनच्या अंतिम फेरीने याच कालातीत सत्याची सर्वास जाणीव करून दिली. ‘‘तू मला गवतावरील स्पर्धेत हरवू शकशील असे वाटले नव्हते’’ हे जोकोविच याने अल्कराझ यास उद्देशून केलेले विधान त्याच्या पराजयाची किती नितांत गरज होती, हे दर्शवते. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ या शारीरिक कसोटी पाहणाऱ्या खेळात इतकी गुणवत्तापूर्ण कामगिरी इतका प्रदीर्घ काळ करणे, दोन डझनांहून अधिक विजेतेपदे पटकावणे, विम्बल्डनसारख्या स्पर्धात दहा दहा वर्षे पराभूत न होणे हे सगळे जोकोविचचे गुणविशेष अचाट आणि अतिमानवीयच! पण म्हणूनच मर्त्य मानवाप्रमाणे त्याचा पराभव होणे ही काळाची गरज होती. कोणा एका खेळातच नव्हे, अन्यत्रही अजेय भासणाऱ्यांचा पराजय होणे आवश्यक असते. टेनिसपुरती का असेना पण ती गरज पूर्ण करणाऱ्या अल्कराझचे अभिनंदन.