.. विधान परिषदेचे सदस्यत्व असो वा अन्य शेतीविषयक परिषदा. नाधोंनी या कामातून शेतीचे प्रश्न शहरापर्यंत आणले आणि त्या प्रवासात त्यांची कविताही सर्वदूर पसरली..
मराठी कवींची अडचण दुहेरी असते. एक म्हणजे एखाद्या कवितेचे जोपर्यंत लोकप्रिय गाणे होत नाही, तोपर्यंत त्या कवीकडे वाचकांचे म्हणावे तितके लक्ष जात नाही. आणि दुसरी अडचण अशी की एखाद्याच्या कवितेची फारच गाणी झाली तर तो कवी म्हणून कमअस्सल मानला जायला लागतो. या अडचणींतून फारच कमी कवी त्याच्या/तिच्या काव्यशीलावर एकही ओरखडा न उमटता सहीसलामत सुटतात. ना.धों. महानोर हे त्यातले एक. ते नुसते सहीसलामत सुटलेच इतके नाही, तर ते आणि त्यांची कविता दोघेही नंतरच्या काळात मोठे होत गेले. वास्तविक या अस्सल मातीतल्या कवीचा पहिला कवितासंग्रह ‘रानातल्या कविता’ आला १९६७ साली. पण नाधोंना घराघरात नाव मिळवून दिले त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी आलेल्या ‘जैत रे जैत’ने. नाधोंचा मोठेपणा असा की ते ‘जैत रे जैत’च्या आधीही कवी होते आणि नंतरही शेवटपर्यंत कवीच राहिले. जंगलातून, रानातून, मातीच्या रस्त्यातून, शेतीच्या बांधावरून, आबादानी करणाऱ्या पावसातून, जमिनीतून उगवणाऱ्या हिरव्या कोंबातून स्वत:चे स्वतंत्र घराणे निर्माण करणारा हा कवी आता आपल्यातून गेला. उन्हाळय़ातल्या एखाद्या घामट संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी चिपचिपणाऱ्या वातावरणात अचानक धुवाधार पाऊस यावा आणि या रात्रभर पडलेल्या पावसाने आपल्या शिवारात काय काय बदलले याचा शोध सकाळी घेतला जावा, तसे आपले नाधोंच्या निधनाने होणार आहे. त्यांच्या कवितेच्या वर्षांवाने आपल्या सांस्कृतिक शिवारात नक्की काय झाले?
असे अजिबातच नाही की नाधोंच्या कवितेत उगवेपर्यंत आपल्या कवितांत निसर्ग नव्हता. केशवसुतांच्या कवितेत तो होता. बालकवी तर निसर्गकवीच. बाकीबाब बोरकरांच्या कवितेतील गोव्यातल्या निसर्गाने त्याआधीही आपणास नादावलेले होतेच. त्या निसर्गाचे वेगळे विभ्रम इंदिराबाईंच्या कवितेतूनही आपण अनुभवलेले असतात. या सगळय़ाच्या आधी भावगीतांच्या काळातही नाघंची शीळ रानावनांतून गेलेली असते. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतही निसर्गाचे धारानृत्य आपण पाहिलेले असते. पण नाधोंची कविता आणि हे सर्व मान्यवर यांच्या कवितेतील निसर्ग यात मूलभूत फरक आहे. या सर्वाच्या कवितेत निसर्ग येतो. असतो. काही काळ रेंगाळतो. आणि पावसाची सर काही काळाने जावी तसा जातोही. त्याचाही आनंद आहेच. पण नाधोंच्या कवितेतल्या निसर्गाला ‘देह’ आहे आणि तो देह त्यांची कविता नैसर्गिकपणे भोगतो. कवी म्हणून नाधों जे झाले ते तसेच समोर मांडतात. मराठी कवितेस नाधोंच्या कवितेचा बसलेला धक्का हा होता. कारण त्यांची कविता.. ‘‘झाडांना फुटले डोळे, मावे न रूप डोळय़ात । मांडय़ात घोळ कवळून ती स्तब्ध उभी ऐन्यात’’ असे सरळ सांगते. किंवा त्यांच्या कवितेतला निसर्ग ‘‘डोळे थकून थकून गेले, पाखरासारखा येऊन जा। रान भलतंच भरात, जरा पिकात धुडगूस घालून जा’’, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून टाकतो.
नाधोंची कविता असे करू शकली कारण ती जन्मली तीच मुळी शेतात. शेतमजुराच्या पोटी जन्मलेल्या नामदेवास जमीन कसतानाच कविता गवसली. धूळभरली. मातकट. मराठी सारस्वतांच्या अंगणात तिला स्थान मिळावे म्हणून नाधोंनी तिच्यावरची धूळ झटकली नाही की तिला नागर अंगडय़ा-टोपडय़ात बसवले नाही. नाधोंच्या कवितेचे, आणि पर्यायाने आपण मराठी वाचकांचे, सुदैव असे की मुंबई-पुण्यालगतच्या प्रकाशकस्नेही वातावरणापासून दूर असूनही नाधोंच्या कवितेतल्या गंधाची दखल साहित्य व्यवहाराने घेतली. त्यातल्या नावीन्याचे, अस्सलतेचे रास्त कौतुक झाले आणि चित्रपटांच्या एरवी कामापुरतेच जवळ करणाऱ्या जगाने तिला दाद दिली. ‘जैत रे जैत’चा जन्म हा त्यातून झाला. या गाण्यातले काव्य अस्सल करकरीत आहे कारण आधी धून बांधून त्यावर शब्द बेतलेले नाहीत. मंगेशकर कुटुंबीय, डॉ. जब्बार पटेल अशा अनेकांच्या एकत्र बैठकीत त्यांना फक्त प्रसंग सांगितले गेले आणि नाधोंची कविता अ-नागर भावना ‘अंगात माझिया भिनलाय ढोलिया’ म्हणत ‘भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालते’ तशी बोलू लागली. आपल्याकडे एखाद्यास एकात कशात मोठे यश मिळाले की पाठोपाठ त्याच साच्यातल्या मूर्तीची मागणी जोमात होते. नाधोंच्या बाबतही ती झाली. तशी अन्य काही गाणी त्यांनी लिहिलीही. पण ‘जैत रे जैत’पेक्षा त्यांच्या कवितेस मोठे यश मिळाले ते ‘माझ्या आजोळच्या गाणीं’नी. त्याआधीही मराठी लावणीत ‘‘बुगडी माझी सांडली गं’’, अशी तक्रार केली गेली, ‘‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’’ असा शाप दिला गेला, ‘‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’’ अशी मागणी केली गेली. पण नाधोंची लावणी ‘‘राजसा जवळि जरा बसा’’ असे सांगते आणि लताबाई ती गाताना ‘ब’ आणि ‘सा’ असे गातात की ती हाताला धरूनच खाली बसवते. ‘‘त्या दिशी करूनि दिला विडा, टिचला माझा चुडा.. कहर भलताच’’ हे मान्य करायला आणि सांगायलाही ती लाजत नाही.
कवी म्हणून नाधों फार भाग्यवान. कारण अत्यंत योग्य टप्प्यावर पुलं, शरदराव पवार, गोविंदराव तळवलकर अशी साहित्य-संस्कृती व्यवहारात दबदबा असलेली एकापेक्षा एक मोठी व्यक्तिमत्त्वे त्यांच्याकडे आकृष्ट झाली. अशांतील शरदराव सोडले तर पुलं, गोविंदराव इत्यादींचा ग्रामीण जगण्याशी संबंध तसा कमीच. या सर्व महानुभावांचे पळसखेडला नाधोंकडे येणेजाणे जसजसे वाढले तसतशी मध्यमवर्गीय घरांत नाधोंच्या कवितेची ऊठबसही वाढली. मराठीतील नागरकेंद्री साहित्यव्यवहारास तोपर्यंत कथाकथनामुळे शंकर पाटील, त्यातही अधिक चिकित्सकांस रा. रं. बोराडे वगैरे मोजकेच साहित्यिक माहीत. कवितेत त्याआधी ग्रामीण भाग तसा कडेकडेनेच आलेला. अशा वातावरणात रांगडय़ा भावना धसमुसळय़ा शब्दांत व्यक्त करणारी नाधोंची कविता लोकप्रिय न होती तरच नवल. तोपर्यंत ‘‘आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना। गाभुळय़ा चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना’’ असे काही कवितेने सांगितलेले नव्हते. नाधोंची कविता हे जगणे घेऊन आली. एरवी शेली, कीट्स, वर्डस्वर्थ वगैरेंमधे रमणारे आणि मराठीत कधी आलेच तर विंदा, गदिमा, बैठकांपुरते पाडगावकर यांच्या पलीकडे फार न जाणारे गोविंदराव नाधोंची ‘प्रार्थना दयाघना’ छापू लागले. हा नाधोंच्या कवितेचा मोठेपणा. नागर संस्कृतीत नारायणराव सुव्र्यानी जी नवीनच काव्यजाणीव आणली तिचा ग्रामीण आविष्कार नाधोंनी आपल्याला दिला. हे दोघेही एकाच काळात असावेत ही त्या काळाची गरज होती. काळ हा काव्यास कसे कारण देतो, त्याचे हे उदाहरण.
त्याच काळामुळे नाधों हे वाङ्मयेतर कार्यातही स्वत:स गुंतवू शकले. शरदरावांच्या साहचर्यामुळे मिळालेले विधान परिषदेचे सदस्यत्व असो वा अन्य शेतीविषयक परिषदा. नाधोंनी या कामातून शेतीचे प्रश्न शहरापर्यंत आणले आणि त्या प्रवासात त्यांची कविताही त्यावर स्वार होऊन सर्वदूर पसरली. त्यांचे ते शेतात असणे हे शेतासाठी आणि त्यांच्या कवितेसाठी असे परस्पर पूरक होते. त्यामुळे नाधोंचा दबदबा वाढला आणि कवितेचेही कौतुक झाले. तरी नाधों आणि त्यांची कविता बदलले नाहीत. शहरी आयुष्यातही ते ग्रामीण राहिले आणि भव्य प्रसिद्धी, थोरामोठय़ांची वर्दळ असूनही आपल्या ग्रामीण परिसरात ते आसपासच्यांपासून तुटले नाहीत. ही अशी आहे तसे राहण्याची कला त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा एक लोभस भाग बनून गेली. जसे ते, तशीच त्यांची कविता. हे असे होते तेव्हा कलाकार आणि त्याची अभिव्यक्ती यांत एकतानता येते. नाधोंबाबत ती होती. त्यांची ‘‘नुक्ते आले न्हाण, रानवाऱ्याला उधाण’’ असे सांगणारी ‘गोरे ऊन’, ‘पिसाट राघू’, ‘क्षितिजाचे डोळे’, ‘रातझडीचा पाऊस’, अशी ऐंद्रीय अनुभवांनी, नाधोंचा शब्द वापरायाचा तर, ‘लदबदलेली’ शब्दकळा काव्यप्रेमींवर नेहमीच गारूड होऊन राहिली. हे गारूड अखेपर्यंत होते आणि त्यांच्यानंतरही ते राहील. अशी हमी देता येते कारण साधारण ६०-७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या ‘रानातल्या कविता’ आजही वाचाव्याशा वाटतात. शहरीकरणाच्या रेटय़ात माणसांच्या आयुष्यातले रान जसजसे नामशेष होत जाईल तसतशी नाधोंच्या कवितेची मुळे आपल्या मनांत अधिकाधिक खोलवर रुजतील.
स्वत: हे असे खोल मातीत रुजलेले नाधों पत्नीच्या निधनानंतर मात्र हलले होते. एखादा वृक्ष अचानक उन्मळून पडतो की काय असे वाटावे तसे! या काळात फोनवर कधी बोलताना असो वा पत्राद्वारे संपर्क साधताना, नाधोंकडून पत्नीचा उल्लेख आवर्जून होई आणि त्यांना हळवे करून जाई. ‘लोकसत्ता’शी त्यांचा विशेष स्नेह होता. काहीही काम नसताना सहज म्हणून ते फोन करत आणि अनेक गोष्टींवर मनमोकळे बोलत. त्यात वयाचे अंतर नसे आणि ‘माझे ऐकून घ्या’ असा सूर तर अजिबात नसे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या संपर्कात राहणे हवेहवेसे वाटे. आता ते सारेच इतिहासजमा झाले म्हणायचे! पण त्यांनीच लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे ‘‘फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले’’ हे आहे तोपर्यंत सर्व काव्यगंधीयांच्या मनात हे ‘‘राजस एक पाखरू भिरभिरते’’ राहील. नाधोंच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.