हरयाणात धर्माच्या मुद्दय़ावर दंगल होते आणि मुंबईजवळ रेल्वे पोलीस मुसलमानांस लक्ष्य करतो. यात कोण चूक, कोण बरोबर असे करण्याने हाती काहीही लागणार नाही..
धर्म, जात, वर्ण अशा मुद्दय़ांवर सत्ताधीशांनी किती हवा तापवावी याचे भान असणे सामाजिक सौहार्दासाठी आवश्यक असते. हे सर्व घटक एका अर्थी नैसर्गिक. म्हणजे ते निवडण्याचा अधिकार व्यक्तीस नसतो. जन्माला येतानाच प्रत्येक व्यक्ती धर्म, जात आणि वर्ण घेऊन जन्माला येत असते. म्हणून जी गोष्ट निवडण्याचा अधिकार व्यक्तीस नाही तीबाबत ‘गर्व से’ म्हणण्यासारखे काय? पण तरीही या मुद्दय़ावर डोकी भडकावण्याचे उद्योग वर्षांनुवर्षे सुरू आहेत आणि भरल्या डोक्यांनी-भरल्या पोटांनी तो करणारे; दोन्हींची वानवा असणाऱ्यांची डोकी फुटणे थांबावे यासाठी निष्क्रिय आहेत. ही निष्क्रियता नव्याने जाणवण्याचे कारण म्हणजे सोमवारी जयपूर-मुंबई रेल्वेतील हत्याकांड. यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने चार जणांचे हकनाक प्राण घेतले. त्यात एक त्याचा वरिष्ठदेखील आहे. या चौघांचे प्राण या जवानाने घ्यावेत असे काही घडले होते असे नाही. तरीही या जवानाने चार जणांस हकनाक गोळय़ा घातल्या. आता सदरहू जवान कसा मनोरुग्ण आहे, त्यास निद्रानाश कसा आहे, तो उपचाराधीन कसा होता इत्यादी तपशील सरकारी यंत्रणेकडून अहमहमिकेने या हत्याकांडाच्या कथानकात सारला जाईल. तो सत्य असेलही. हा कर्मचारी मनोरुग्ण असेल आणि झोप न मिळाल्याने त्याचे मानसिक संतुलन खचलेही असेल. त्याबाबत संशय घेण्याचे कारण नाही आणि त्यामुळे त्या आघाडीवर चिंतेचेही कारण नाही. त्याचे मनोव्यापार पुन्हा रुळावर आणण्याइतका आपली वैद्यकीय व्यवस्था निश्चितच सक्षम आहे. तेव्हा प्रश्न त्याच्यावरील उपचार, त्यांची सत्यासत्यता यांचा नाही.
तर त्याच्या आजाराचे एक अंग त्या वेळच्या ध्वनिचित्रफितीतून समोर आले त्याबाबत आहे. यात तो मारल्या गेलेल्यांस आणि ते मारले जाणे पाहणाऱ्यांस उद्देशून काही विधाने करतो. ‘‘या देशात राहावयाचे असेल तर मोदी, योगी आणि ठाकरे ही तीन नावे घेणे आवश्यक आहे’’, अशा अर्थाचे त्याचे विधान या चित्रफितीतून ऐकू येते. या घटनेस आता २४ तास उलटून गेले. पण या चित्रफितीबाबत सुरक्षा यंत्रणांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. ‘कोणतेही’ याचा अर्थ या ध्वनिचित्रफितीची सत्यता त्यांनी नाकारलेली नाही. हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे. ही ध्वनिचित्रफीत खरी आहे, असे प्रमाणपत्र तर या सुरक्षा यंत्रणा देऊ शकत नाहीत. तसे देणे म्हणजे वातावरणातील धार्मिक ताणतणावाचे अस्तित्व मान्य करणे. तितका प्रामाणिकपणा आणि हिंमत आपल्या सुरक्षा यंत्रणांकडून अपेक्षिणे हा वेडा आशावाद झाला. तथापि ही ध्वनिचित्रफीत असत्य आहे, असेही या यंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. तशी खरोखरच ती असती तर ती असत्यता सिद्ध करण्यासाठी आपल्या यंत्रणांनी जिवाचे रान केले असते. तसे काही अद्याप तरी झालेले नाही. तेव्हा हे ध्वनिचित्रमुद्रण खरे आहे असे मानण्यास हरकत नाही. या प्रकरणाचे गांभीर्य या ध्वनिचित्रमुद्रणाच्या खरेपणात आहे. तसेच ते आहे त्याने घेतलेल्या बळींत. त्यातील दोन मुसलमान धर्मीय आहेत. याचा अर्थ या मनोरुग्णाच्या गोळीबाराच्या कृतीमागे निश्चित एक विचार आहे. हा विचार सदर मारेकरी शब्दांतून तर व्यक्त करतोच. पण स्वधर्मप्रेम सिद्ध करता करता तो अन्य धर्मीय प्रवाशांस गोळय़ा घालतो. हे भयानक गंभीर आहे. ही घटना धावत्या रेल्वेत घडली. म्हणजे मारले गेलेले काही धार्मिक चर्चेत सहभागी होते आणि त्यामुळे मारेकऱ्याच्या धर्मभावनांस ठेच लागली, त्यातून त्याने हत्या केली असे काही घडलेले नाही. डोळय़ांना जे इस्लाम-धर्मीय ‘वाटले’ त्यांना त्याने गोळय़ा घातल्या. सदर मारेकरी मनोरुग्ण असल्याचे सांगितले जाते. ते खरेच असेल. पण हत्येनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करण्याइतके शहाणपण त्याच्या ठायी होते. तसेच हा गोळीबार वेगवेगळय़ा डब्यांत जाऊन त्याने केला, असेही दिसते. म्हणजे रागाच्या एका तीव्र झटक्यातून त्याने स्वैर गोळीबार केला असे घडलेले नाही. यातून समोर येणारा अर्थ स्वच्छ दिसतो.
तो म्हणजे इस्लाम धर्मीयांविरोधात त्याचा असलेला राग. धर्म ही पूर्णपणे वैयक्तिक बाब असते आणि त्यामुळे कोणत्या धर्माविषयी ममत्व बाळगावे आणि कोणाविषयी नाही, हा पूर्णपणे ज्याचा-त्याचा प्रश्न हे खरे. परंतु म्हणून अन्य धर्मीयांविरोधात हिंसेचा अधिकार इतर धर्मीयांस नसतो हेही त्याच वेळी खरे. सदर प्रकरणातील मारेकऱ्याने तसा तो अधिकार स्वत:कडे घेतला आणि परधर्मीयांची हत्या केली. अलीकडे नाशिकजवळ अशाच भिन्न धर्मीयाची हत्या झाली. हा भिन्न धर्मीय गोमांस वाहून नेत असल्याचा वहीम होता. अशा संशयावरून उत्तर प्रदेशात, गुजरातेत अनेकांनी प्राण गमावले. यात किती प्रकरणी संशय खरा असल्याचे आढळले हा प्रश्न आहे. त्याच वेळी अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काही ठोस उपाय योजले गेल्याचेही दिसले नाही. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जेव्हा पहिली हत्या झाली तेव्हाच सरकारने काही ठोस कृती केली असती तर आगामी हत्या निश्चितच टळू शकल्या असत्या. तसे न झाल्याने काही विशिष्ट धर्मीयांची हत्या केल्यास फारसे काही बिघडत नाही, अशा प्रकारचा संदेश दिला गेला आणि त्यामुळेच पुढील घटनांतील मारेकऱ्यांची भीड चेपली गेली. जयपूर-मुंबई रेल्वेत बेछूट गोळीबारातून अश्रापांचे प्राण घेणाऱ्याच्या मानसिक स्वास्थ्याविषयी संशय न घेताही त्याची कृती वातावरणात किती विखार भरलेला आहे याचे दर्शन घडवते.
अमेरिका, युरोपातील काही देश आदी ठिकाणी गेल्या काही वर्षांत ‘व्हाइट सुप्रीमिस्ट’ मानल्या जाणाऱ्यांकडून हत्या केल्या जात आहेत. व्हाइट सुप्रीमिस्ट म्हणजे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे मानणारे आणि म्हणणारे वर्णवर्चस्ववादी गौरवर्णीय. प्राधान्याने गौरवर्णीयांच्या प्रदेशात आफ्रिकी, आशियाई यांस जगण्याचा अधिकार नाही, असे यांस वाटते. अमेरिकेत गेल्या वर्षांत ज्या काही हत्या, हत्याकांडे झाली त्यातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक हत्यांस ‘गर्व से कहो गौरवर्णीय है’ मानणारे जबाबदार असल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते. युरोपातील काही देशांतही हा प्रकार घडू लागला असून या अतिरेकी गोऱ्यांस नवनाझीवाद्यांची जोड मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे तेथील परिस्थिती तर अधिक गंभीर. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे स्वत:च ‘व्हाइट सुप्रीमिस्ट’ असलेले महाभाग निवडले गेल्यापासून या हिंसाचारात वाढ झाली. किंबहुना त्यास एक प्रकारचे नैतिक समर्थन मिळू लागले. अमेरिकेत याच्या जोडीला सहज उपलब्ध शस्त्रे या वृत्तीचे गांभीर्य अधिकच वाढवतात. कोणीही उठतो आणि गोळीबार करू शकतो. न्यूझीलंडसारख्या एरवी शांतताप्रिय देशानेही या गौराभिमान्यांच्या हिंसाचाराचा अनुभव घेतला.
या पार्श्वभूमीवर आपल्याकडे खरे तर अधिकाधिक खबरदारी बाळगली जाणे अत्यावश्यक. तिकडे हरयाणात धर्माच्या मुद्दय़ावर दंगल होते आणि मुंबईजवळ रेल्वे पोलीस मुसलमानांस लक्ष्य करतो. यात कोण चूक कोण बरोबर असे करत बसल्यास हाती काहीही लागणार नाही. कोणा एका समाजाचे सर्व बरोबर आणि एकाचे सर्व चूक असे कधीच नसते. हा सारासार विचार करून राजकीय/ सामाजिक धुरीणांनी धर्मविद्वेषास किती सैल सोडायचे याचा विचार करायला हवा. अन्यथा आज रेल्वेत जे घडले ते उद्या रस्त्यावर घडण्यास फार वेळ लागणार नाही.