विरोधकांना गेल्या काही वर्षांत सोसाव्या लागलेल्या वेदना खऱ्या असल्यामुळे भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याची त्यांची भावनाही खरी आहे.
केवळ अंत:प्रेरणा ही जशी अंतिम विजयाची प्रेरणा असू शकत नाही; तसेच केवळ एकत्र येण्याची भावना ही भाजपस हरवण्यासाठी पुरेशी नाही..
प्रमुख विरोधी पक्षांच्या भाजप-विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांची भाजपने खिल्ली उडवणे साहजिक. ‘‘भाजप-विरोध हा या सर्वाचा एकमेव डिंक आहे,’’ असे मत भाजपने या संदर्भात व्यक्त केले. ते गैर नाही. आणि त्याहीपेक्षा असे काही करण्यातही काही अजिबात गैर नाही. एके काळी खुद्द भाजपने केवळ काँग्रेसविरोध या एका कारणासाठी अनेक भिन्न विचारधारी पक्षांशी सत्तासोबत केली. भाजपस आज अस्पृश्य असलेले डावे किंवा समाजवादी म्हणवून घेणारे विश्वनाथ प्रताप यांच्याशी भाजपने सत्तेसाठी उजळ माथ्याने हातमिळवणी केलेली आहे. यात एके काळी भाजपनेच पाकिस्तानवादी अथवा फुटीरतावादी ठरवल्या गेलेल्या मेहबूबा मुफ्तींशी केलेली सत्तासंगत विचारांत घेतली नाही तरी काँग्रेसविरोधासाठी भाजपने अन्यांशी घरोबे केले हे सत्य लपवू म्हणता लपणारे नाही. एके काळी भारतीय राजकारणाचा धृव असलेल्या काँग्रेसची जागा सद्य:स्थितीत भाजपने सर्वार्थाने घेतलेली आहे. तेव्हा भाजपने त्या काळी जे काँग्रेसविरोधात केले ते आज भाजपविरोधात काँग्रेस वा अन्य काही पक्ष करीत असतील तर त्यात अजिबात काहीही आक्षेपार्ह नाही. आणि तसेही अलीकडे राजकारण आणि विचारधारा, नैतिकता यांचा संबंध काय, हा मुद्दा आहेच. भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करणारे नितीश कुमार जसे बिहारात सत्ता मिळत असेल तर ज्याप्रमाणे भाजपने गोड मानून घेतले तसेच अन्यपक्षीय अनेक गणंगांनाही त्या पक्षाने दत्तक घेतले. तेव्हा भाजपप्रणीत-आघाडी वा भाजप-विरोधकांचे एकत्र येणे याकडे तात्त्विक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागील राजकीय शक्याशक्यतांचा विचार करायला हवा.
कारण त्या वेळी जसे काँग्रेस पाडावासाठी केवळ विरोधकांचे एकत्र येणे पुरेसे नव्हते त्याचप्रमाणे आज भाजपस सत्ताच्युत करण्यासाठी विरोधकांनी एकमेकांचे हात हातात घेणे पुरेसे नाही. नितीश कुमार यांनी लालु-पुत्रासह राहुल गांधी वा मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणे, अरविंद केजरीवाल आणि नितीश कुमार यांच्यात चर्चा होणे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांना त्यांच्या घरी जाऊन भेटणे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी तृणमूल ममता बॅनर्जीना दीदी म्हणत साद घालणे इत्यादी इत्यादी होत असले तरी ते तितकेच पुरणारे नाही. विरोधी पक्षीयांस भाजपविरोधात एकत्र येण्याची निकड वाटू लागली आहे हे खरे. पण या गरजेचे रूपांतर तडजोडीत किती होऊ शकते किंवा होते की नाही यावर या भेटीगाठींचे फलित अवलंबून असेल. केवळ अंत:प्रेरणा ही जशी अंतिम विजयाची प्रेरणा असू शकत नाही; तसेच केवळ एकत्र येण्याची भावना ही भाजपस हरवण्यासाठी पुरेशी नाही. यशासाठी अंत:प्रेरणेस जमिनीवरील कष्ट तसेच थंड डोक्याने स्वत:च्या बलस्थानांची तसेच मर्यादांची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा अंगी असावा लागतो. यातील दुसरा घटक विशेष महत्त्वाचा. याचे कारण विरोधकांतील प्रत्येक पक्षास आपण एकहाती भाजपस पराभूत करू शकतो, अशा फुशारक्या मारणे आवडते. या अशा फुकाच्या शड्डू ठोकण्याच्या सवयीमुळे दोन घटका बऱ्या जातात. पण त्यामुळे पराजयाचा अंधार काही संपुष्टात येऊ शकत नाही.
विरोधकांच्या ऐक्याचा हा अंधार संपुष्टात आणावयाचा असेल तर त्यासाठी काँग्रेसला अधिक सहनशील व्हावे लागेल. याचे साधे कारण असे की विरोधकांच्या संभाव्य आघाडीतील बहुतेक पक्ष हे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे स्पर्धक आहेत. जसे की पश्चिम बंगालात तृणमूल वा बिहारात नितीश कुमार यांचा जनता दल. हे सर्व पक्ष एके काळच्या काँग्रेसच्या महावृक्षास लागलेल्या पारंब्यांतून उगवलेले! काळाच्या ओघात काँग्रेसच्या मूळ खोडास निष्क्रियतेच्या वाळवीने पोखरले. त्यामुळे अनेक प्रांतांत एके काळच्या काँग्रेसी विचारधारेच्या या पक्षांनी आपापला जम बसवला. उदाहरणार्थ शरद पवार यांचा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी. अशा मूळ काँग्रेसी जनुकांच्या पक्षांनी भाजपविरोधी मतांस आकृष्ट केले हे नाकारता येणार नाही. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष वा अन्य काही याची उदाहरणे. या मंडळींमुळे मूळची अशक्त झालेली काँग्रेस अधिकच खंगली. तथापि या काँग्रेस-जनुकीय पक्षांचा दमसास पुढच्या कालखंडात सुटला वा ते आपापल्या विचारधारांशी प्रामाणिक राहिले नाहीत. त्यातील काहींनी प्रसंगी खुद्द भाजपशी हातमिळवणी केली किंवा कधी काँग्रेसला पडद्यामागून अपशकुन केला. हे सर्व राजकारण तात्कालिक होते. तात्पुरत्या फायद्याकडे पाहायची सवय झाली की जे होते ते या सर्व राजकीय पक्षांचे झाले. ते ना धड समर्थ काँग्रेस-पर्याय म्हणून उभे राहिले ना त्यांनी भाजपविरोध ‘जम के’ केला. तथापि ऑक्टोपसप्रमाणे दशभुजांच्या भाजपची मजल जेव्हा या सर्वास गिळंकृत करण्यापर्यंत गेली तेव्हा हे सर्व खडबडून जागे झाले आणि भाजपविरोधात काही हालचाल करण्याची गरज त्यांस वाटली. तेव्हा या मंडळींच्या सध्याच्या राजकीय हालचालींमागचे हे वास्तव आहे. यात विरोधकांच्या दृष्टीने जमेची बाब इतकीच की या मंडळींना गेल्या काही वर्षांत सोसाव्या लागलेल्या वेदना खऱ्या असल्यामुळे भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याची त्यांची भावनाही खरी आहे. काँग्रेस आणि भाजप यांतील फरकही एव्हाना या मंडळींस लक्षात आलेला आहे. काँग्रेस आपल्या विरोधकांस त्या वेळी केवळ राजकीयदृष्टय़ा पराभूत करत होता, पण भाजपचा विजय राजकारणाच्या पलीकडे जातो आणि त्याचा परिणाम वैयक्तिकही होतो. तसेच काँग्रेसपेक्षा किती तरी अधिक ‘परिणामकारकपणे’ भाजप केंद्रीय यंत्रणा विरोधकांविरोधात वापरू शकतो याचाही प्रत्यय या सर्वास एव्हाना आलेला आहे. या सर्वामुळे भाजपविरोधात उभे राहण्याची या सर्वाची निकड प्रामाणिक आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यक ठरते, यात संदेह नाही.
हे सत्य मान्य केल्यावर यातील किती जणांस ‘फोडण्यास’ भाजप यशस्वी होतो यावर या आघाडीचे अस्तित्व अवलंबून असेल. या आघाडीस काहीही किंमत, महत्त्व देण्याची गरज नाही असे भाजप कितीही म्हणत असला तरी वास्तव तसे नाही, हे सर्व जाणतात. अनेक राज्यांत भाजपविरोधकांत समझौता झाला आणि मतविभाजन खरोखरच टळू शकले तर आगामी निवडणूक निश्चितच एकतर्फी होणारी नाही. एके काळी काँग्रेस अजेय असताना त्या पक्षाचे यश ज्याप्रमाणे विरोधकांत मतविभागणी घडवून आणण्यातील यशापयशावर अवलंबून होते; त्याप्रमाणे भाजपचे आजचे यशदेखील त्या पक्षास मिळणाऱ्या मतांपेक्षा विरोधकांची मते किती फुटतात यावर अवलंबून असेल. भाजपस मिळणाऱ्या मतांचे प्रमाण ३८ टक्के इतके आहे. याचा साधा अर्थ असा की उर्वरित ६२ टक्के मते ही भाजपची नाहीत. ती सर्व विरोधकांची असतीलच असे नाही. पण विरोधक ती मिळवू शकतात, हे नक्की. तेव्हा सध्या विरोधकांचा प्रयत्न आहे तो या उर्वरित मतांची फाटाफूट वा वजाबाकी टाळण्याचा. तो त्यांनी प्रामाणिकपणे केला आणि सक्तवसुली संचालनालय/ आयकरादी खात्याच्या कारवाई झंझावातात हे सर्व टिकून राहिले तर २०२४ चा निकाल कोणास गृहीत धरता येणार नाही. हे सत्य अन्य कोणास पटेल न पटेल; पण भाजप नेतृत्व ते निश्चित जाणतो. म्हणूनच विरोधकांच्या एकीस कमी लेखण्याचा वा दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न. हे विरोधकांसही कळते. पण वळते का, हा प्रश्न. तसे ते वळणार असेल तर या प्रयत्नांत त्यांना सातत्य राखावे लागेल. सुरुवात झाली ते ठीक; सातत्यही राहणार का ते आता दिसेल.