सावरकरांच्या कथित प्रमादांवर सातत्याने भाष्य करून त्यांच्या टीकाकारांची उंची वाढणार नाही, तसेच उदोउदो केल्याने त्यांच्या अनुयायांच्या राजकारणाची व्याप्तीही वाढणारी नाही..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्वत: जानवे घालून, ते सर्वास दिसेल याची व्यवस्था करून एकविसाव्या शतकात मंदिरांच्या परिक्रमा करायच्या आणि त्या वेळी विज्ञानवादाची कास धरणाऱ्या सावरकरांवर टीका करायची हा दुटप्पीपणा झाला..
‘मी सावरकर नाही, गांधी आहे’ हे राहुल गांधी यांचे विधान ‘सांगे वडिलांची कीर्ति’ या पठडीतील तद्दन मूर्खपणाचे ठरते. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सावरकर आणि त्यांच्या अनुषंगाने वाद निर्माण झाला. त्याची काहीही गरज नव्हती. मुळात त्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सावरकरांस आणण्याची काहीही आवश्यकता नव्हती. प्रश्न होता, सुरत न्यायालयाने दिलेल्या शिक्षेनंतर लोकसभा सचिवालयाने त्वरा करून राहुल गांधी यांस अपात्र ठरवले त्याबाबतचा. यात सावरकर येतात कुठे? आणि गांधी यांचा तरी काय संबंध? आपण या प्रश्नावर लढू, मागे हटणार नाही, इतकेच काय ते राहुल गांधी यांच्या म्हणण्याचे सार. पण सततच्या विजयाची जशी नशा येते तसेच पराजयाचे सातत्यही विजयास कमी लेखण्याचा दंभ निर्माण करते. राहुल गांधी यांचे हे असे झाले आहे. राहुल गांधी हे सावरकर नाहीत, हे जितके खरे तितकेच ते गांधी नाहीत हेही खरे. या देशात गांधी ही ओळख बनलेली आहे ती महात्मापद दिल्या गेलेल्या मोहनदास करमचंद गांधी या नावाची. त्यांचा आणि राहुल यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. ते फिरोज गांधी-राजीव गांधी यांच्या कुटुंबातील. फिरोज गांधी पारशी होते तर महात्मा गांधी गुजराती. तेव्हा सावरकरांस कमी लेखण्याच्या नादात राहुल यांनी गुजराती गांधींच्या वडाची साल आपल्या पारशी अंगास चिकटवण्याचा प्रयत्न केला. हा उद्योग करण्याचे काही कारण नव्हते. ज्याप्रमाणे सावरकर आडनाव धारण करणारी प्रत्येक व्यक्ती ‘त्या’ सावरकरांवर दावा करू शकत नाही त्याप्रमाणे ‘गांधी’ आडनाव लावणारा प्रत्येक इसम महात्मा गांधींशी नाते सांगणारा असतोच असे नाही. या इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची मालकी संपूर्ण समाजाकडे असते. कोणत्या घरात/ धर्मात/ जातीत हे महानुभाव जन्मले तो निव्वळ योगायोग. ना त्या व्यक्तीचा यात काही हात ना त्या व्यक्तीच्या उत्तराधिकाऱ्यांचा. म्हणून प्रौढ समाजात या इतिहासपुरुषांच्या वंशजांनी वाडवडिलांच्या कर्तृत्वावर डल्ला मारू नये आणि इतरांनी त्यांच्या गुणदोषांसाठी वर्तमानातील पिढीस दोष देऊ नये. तथापि इतका किमान विवेकदेखील आपल्या समाजातून सद्य:स्थितीत हरवलेला असल्याने इतिहासपुरुषांचा वापर हा असा होतो.
राहुल गांधी आणि तत्समांस सावरकर खुपतात ते केवळ त्यांच्या कथित माफीपत्रांमुळे. पण हा मुद्दा बाजूला ठेवला तरी सावरकरांनी दाखवलेल्या त्यागाचे काय? वयाच्या केवळ २८ व्या वर्षी ५० वर्षांची सक्तमजुरीसदृश शिक्षा झाल्याचे कानावर आले तरी अनेक बलदंड कोलमडून पडतील. पण सावरकर या शिक्षेस सामोरे गेले. ही शिक्षा त्यांनी १४ वर्षे भोगली. त्यानंतरच्या सावरकरांबाबत राहुल गांधी यांस आक्षेप असेल तर त्यांनी तोपर्यंतच्या सावरकरांचा स्वीकार करावा. इतिहासात होऊन गेलेल्या आणि आता हयातही नसलेल्या व्यक्तींनी त्यांच्या काळात काय केले, काय नाही याचा ऊहापोह त्या इतिहासापासून काही शिकण्यासाठी असेल तर तो क्षम्य म्हणता येईल. येथे ते तसे नाही. सगळय़ाचा उद्देश केवळ उखाळय़ा-पाखाळय़ा काढणे हाच. व्यक्ती ही त्या त्या काळाचे अपत्य असते. तेव्हा जे काही होऊन गेले त्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा ठीक. पण वर्तमानातील राजकारणासाठी इतिहासकालीन व्यक्तिरेखांस दावणीला बांधणे ही शुद्ध दिवाळखोरी म्हणायला हवी. हा प्रमाद त्या इतिहासातील व्यक्तीचे अनुयायी तसेच टीकाकार अशा दोन्ही बाजूंनी होतो. सध्या हेच सतत घडत असल्यामुळे कोणालाच काही त्याचे वाटेनासे झाले आहे. यातून केवळ आपल्या राजकारणाची बाल्यावस्था तेवढी दिसून येते. आपणास इतिहासाच्या वस्तुनिष्ठ, परखड विश्लेषणाची सवय नाही. तसा प्रयत्न आपणास झेपत नाही आणि त्यामुळे तशा बौद्धिक प्रगल्भतेपासून आपण काही योजने तरी दूर आहोत. अशा वेळी इतिहासातील व्यक्तिरेखांचा उपयोग भावना डिवचण्यासाठी न करण्याचा विवेक उभय बाजूंनी दाखवायला हवा. सावरकरांच्या फक्त कथित प्रमादांवर सातत्याने भाष्य करून त्यांच्या टीकाकारांची वर्तमानातील बाजू मोठी ठरणार नाही. तसेच सावरकरांचा उदोउदो केल्याने त्यांच्या अनुयायांच्या राजकारणाची व्याप्तीही वाढणारी नाही. तथापि नायक आणि खलनायक अशा दोनच वर्गात इतिहासातील व्यक्तिरेखांस कोंबण्याची सांस्कृतिक सवय आपल्या समाजाच्या अंगात मुरलेली असल्याने हे असले उद्योग केले जातात. पण त्यातून राजकारणाचे अधिकच मनोरंजनीकरण होते.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अनेकांस दोन वेळा मरावे लागते. एकदा भौतिक. जेव्हा ते देह ठेवतात. या मान्यवरांचे दुसरे मरण हे मरणोत्तर असते. ते या मान्यवरांचे अनुयायी तसेच टीकाकार या दोघांच्या हातून येते. संकुचित भारतीय परिघात हे दुहेरी मरण फार कमी जणांस चुकले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे निश्चितच अशा भाग्यवंतांतील नव्हेत. आपल्याकडील राजकीय दुभंग इतका की अनेकांस त्यामुळे गांधींस ‘महात्मा’ म्हणणे खुपते. लाजेकाजेस्तव ते तसे कदाचित बोलणार नाहीत. पण हे गांधी-विद्वेषाचे सत्य तसे सर्वच जाणतात. त्याचप्रमाणे अन्य काहींस सावरकरांची ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी सलते तर अन्य काहींस त्यांचे हिंदूत्ववादी विचार टोचतात. बरे ज्यांना हे सर्व स्वीकारार्ह आहे त्यांना तरी सावरकर समग्र हवे असतात असेही नाही. सध्या पूजनीय झालेल्या गोमातेची संभावना ‘एक उपयुक्त पशू’ अशी करणारे सावरकर हिंदूत्ववाद्यांसही नकोच असतात. सावरकरांच्या गाय, गर्दभ, डुक्कर आदींबाबतच्या खणखणीत मतांस आज कोणी स्पर्शही करणार नाही. तेव्हा ते पूजनीय मानणे राहिले दूर. आणि दुसरे असे की सावरकरांचे टीकाकार तरी त्यांना यापेक्षा अधिक ‘मानाने’ कोठे वागवतात? राहुल गांधी यांस कथित माफी मागणारे सावरकर नको असतील तर त्यांनी विज्ञानवादी सावरकर आपलेसे करावेत. तेही नाही. स्वत: जानवे घालून, ते सर्वास दिसेल याची व्यवस्था करून एकविसाव्या शतकात मंदिरांच्या परिक्रमा करायच्या आणि त्या वेळी विज्ञानवादाची कास धरणाऱ्या सावरकरांवर टीका करायची हा दुटप्पीपणा झाला. सावरकरांबाबत हिंदूत्ववादीही तोच करतात आणि काँग्रेसीही त्याच मार्गाने पुढे जातात. या दुटप्पी राजकारणाच्या विश्लेषकांची पंचाईत ही हिंदूत्ववाद्यांनी सावरकर सोयीस्करपणे अंगीकारले असे म्हणून त्यांच्यावर टीका करावी तर दुसरीकडे काँग्रेसने तरी गांधी कुठे पूर्णपणे स्वीकारले, हा प्रश्न. याचा अर्थ इतकाच की प्रत्येकास आपापले नायक सोयीस्करपणे वापरून घेण्यातच रस. त्यात प्रत्येक जनसमुदायांनी आपापल्या नायकांची आपापसांत केलेली वाटणी. अशाने हा गुंता अधिकच वाढतो. सध्या तसे झाले आहे.
संपूर्ण विवेक हरवलेल्या आणि त्याची जाणीवही नसलेल्या समाजाचे हे लक्षण. बौद्धिकतेशी काडीमोड घेऊन सतत भावनेच्या पांगुळगाडय़ाच्या आधारे चालण्याची सोयीस्कर सवय लागली की त्या समाजात हे असे होते. ही सवय घालवायची कशी आणि ते करणार कोण, हा खरा प्रश्न. इतिहासात प्रखर बुद्धिवादासाठी ओळखल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग वर्तमानात उभय बाजूंनी अशा भावनाभरीच्या राजकारणासाठी केला जावा यापरते अधिक दुर्दैव ते कोणते?