डॉमिनिक लापिएर हे इतिहासातला नेमका भाग गोष्टीवेल्हाळपणे मांडणाऱ्यांपैकी! ते इतिहासकार नव्हते, तरीही अल्पबुद्धी टीकाकारांकडे त्यांना दुर्लक्ष करावे लागलेच..

लापिएर यांच्या भारत-दर्शनामुळे राग येत नाही. तर आपलेच आपण आपणास सर्व विसंवादासह अधिक लोभस वाटू लागतो..

भारत आणि पाकिस्तान हे एक होते तेव्हाची ही गोष्ट. हा खंडप्राय भूभाग पाहिलेलादेखील नाही अशा सरकारी अधिकाऱ्यांस या प्रदेशावर राज्य करणारे ब्रिटिश सत्ताधीश एका कामगिरीवर दिल्लीत जाण्याचा आदेश देतात. लंडनस्थित या व्यक्तीवर सोपवण्यात आलेली कामगिरी काय? तर भारत आणि पाकिस्तान यांचा अधिकृत नकाशा तयार करणे. मुदत? अवघी पाच आठवडे. त्यानंतर सिरील रॅडक्लिफ हा अधिकारी पुढचे ३५ दिवस अक्षरश: दिवसाची रात्र करून शक्य होईल तो प्रदेश पायी तुडवतो, प्रत्यक्ष पाहातो आणि ९ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपली कामगिरी फत्ते करतो. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र होतो. तेथपासून आजतागायत तुम्ही-आम्ही या भरतभूचा नकाशा पाहातो तो या रॅडक्लिफ यांची निर्मिती आहे हे अनेकांस माहितीही नसेल. या नकाशावरील रेषांमुळे प्रचंड विध्वंस झाला, फाळणी झाली आणि हजारांनी प्राण गमावले हा इतिहास आपणास माहीत असतो. फाळणीमागील राजकारण ठाऊक असते. त्यावरून कोण चांगले कोण वाईट याची मांडणीही आपापल्या मनांत धर्म, जात आदींच्या आधारे सोयीनुसार झालेली असते. पण ज्याने शब्दश: पायपीट करून भारताचा, आणि अर्थात पाकिस्तानचाही, नकाशा तयार केला त्या रॅडक्लिफ यांचे आपणास विस्मरण झालेले असते. ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ हे अप्रतिम पुस्तक रॅडक्लिफ यांची रोमहर्षक कष्टकहाणी सांगतेच पण स्वातंत्र्याच्या मार्गावर अखेरच्या टप्प्यावर काय काय घडले, त्यास कोण कोण जबाबदार होते अशा अनेकांची मानवी कथा आपणांस सांगते. त्या कहाणीचे रसाळ कथाकार डॉमिनिक लापिएर रविवारी निर्वतले. या गोष्टीवेल्हाळ इतिहास लेखकाचे हे कथास्मरण.

वास्तविक इतिहास म्हणजे अगणित ठिपक्यांची रांगोळी. सुदैवाने लापिएर हे इतिहास काळा-पांढरा, नायक-खलनायक, सुष्ट-दुष्ट, चांगला-वाईट अशा बालबुद्धी नजरेतून पाहायची सवय आपणास लागण्याआधीच्या काळातले. त्यामुळे आपल्या मुठीत मावेल इतक्या रांगोळीनिशी त्यांना आपल्याला हव्या त्या प्रतलावर ही ठिपक्यांची कलाकृती चितारली. वास्तविक हे पुस्तक म्हणजे काही भारताच्या फाळणीचा इतिहास नव्हे. त्या अभ्यासकांसाठी ‘ट्रान्स्फर ऑफ पॉवर’चे डझनभर खंड आहेतच. पण इतिहास हा काही केवळ अभ्यासकांसाठी सांगावयाचा नसतो. त्यापलीकडे सज्ञानांचे एक असे जग असते की त्यास संपूर्ण इतिहासात नाही तर काही एक विशिष्ट कालखंडात रस असू शकतो. रिक अ‍ॅटकिन्सन, रिचर्ड ईटन (यांचे ‘इंडिया : इन द पर्शियन एज : १०००- १७६५’ हे पुस्तक भारत अभ्यासकांसाठी अत्यावश्यक वाचन ठरते) विल्यम डॅलरिम्पल, आपले राम गुहा, मनु पिल्लाई आदी अनेक नव्या इतिहासकारांनी आपापल्या प्रतलावर ही लहान-मोठी इतिहास रांगोळी रंगवली. डॉमिनिक लापिएर हे यांतील आद्य. जेव्हा इतिहास सांगणे तितके धोकादायक नव्हते, आपापल्या अभ्यासात जे काही दिसले-भावले ते ते सांगायची मुबलक मुभा होती त्या काळात लापिएर यांनी लेखन केले. वास्तविक त्यांचे गाजलेले ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ हे तसे अलीकडचे पुस्तक. ऐंशीच्या दशकातले. तेही सहलेखकाच्या साथीने त्यांनी लिहिलेले. पण ते गाजले ते त्यांनी इतिहासाचा जो तुकडा निवडला त्यामुळे. लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन झालेले आहे. स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही. असा हा काळ. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधींच्या हत्येने या पुस्तकापुरता तो संपतो. पण लापिएर ज्या शैलीने ही कहाणी सांगतात, ती अभ्यासक आणि सामान्य रसिक दोहोंस आपल्याबरोबर पुढे पुढे नेत जाते. त्यात मनमौजी भारतीय संस्थानिक जसे येतात तसे गोरे साहेबही मुबलक संख्येने येतात. पंजाबातील काही महाराजांचा ‘पुरुषत्व’ मिरवण्याचा सोस जसा त्यातून समोर येतो तसा सिमल्यात साहेबांच्या उन्हाळी राजधानीसाठी नेटिव्ह मजुरांनी सोसलेल्या हालअपेष्टाही ठळकपणे येतात.

 कोणत्याही इतिहासाचे कोणतेही एक पुस्तक सर्वसमावेशक आणि परिपूर्ण असूच शकत नाही. लापिएर यांचे पुस्तकही त्यास अपवाद नाही. पण लेखक इतिहासाचा कोणता तुकडा कथनासाठी निवडतो आणि त्याची कथनशैली कशी आहे यावर लेखकाचे डावे-उजवेपण ठरते. लापिएर उजवे ठरतात या मुद्दय़ावर. त्यांचे ‘सिटी ऑफ जॉय’ हे याचे आणखी एक उदाहरण. लौकिकार्थाने तो इतिहास नाही. पण तरीही कोलकात्यातील सायकल-रिक्षा चालकांच्या आयुष्य-कहाणीचा तो सामाजिक इतिहास ठरतो. वास्तविक ही कहाणीही नवीन नाही. आपल्या बिमलदांनी ‘दो बिघा जमीन’मध्येही ती उत्कटपणे मांडलेली आहे. पण लापिएर ती आणखी पुढे नेतात. एका अमेरिकी डॉक्टरास कोलकात्यात आलेला अनुभव त्याची ही कहाणी. लापिएर यांच्या मते सत्यकथा. पण कल्पिताइतकी अद्भुत. त्यात गरिबांच्या पाचवीस पुजलेला वर्गसंघर्ष आहे, वर्णभेद आहे आणि धर्मभेद तर आहेच आहे. उत्कृष्ट परदेशी अभ्यासकाच्या नजरेस कोलकाता कसे दिसेल तसे ते लापिएर यांस दिसले. पण त्यांची मांडणी हे वैशिष्टय़. काही परदेशी लेखकांचा एक वर्ग भारतीय वास्तव हे या प्रदेशास कमीपणा आणण्याच्या हेतूने मांडत असल्यासारखे वाटते. लापिएर यांचे लेखन तसे नाही. ते भारतीय होऊनच लिहितात. आपल्या सरावलेल्या नजरेस जे दिसत नाही वा ‘रोज मरे..’ वास्तवाने आपण ज्याकडे नकळतपणे डोळेझाक करतो ते स्थल-व्यक्ती-काल विशेष लापिएर यांच्या लेखनातून अलगद आणि अलवारपणे समोर येते. त्यामुळे त्यांच्या भारत-दर्शनामुळे राग येत नाही. तर आपलेच आपण आपणास सर्व विसंवादासह अधिक लोभस वाटू लागतो. भारत-पाकिस्तानप्रमाणे इस्रायल-पॅलेस्टिन संघर्षांवरचे लापिएर यांचे ‘ओ जेरुसलेम’ हे पुस्तकही तितकेच महत्त्वाचे. वैज्ञानिक अंधश्रद्धांप्रमाणे समाजावर ऐतिहासिक अंधश्रद्धांचाही मोठा पगडा असतो. लापिएरसारखा लेखक या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न डोळसपणे करतो. म्हणून तो मोठा ठरतो.

 लापिएर मूळचे फ्रेंच. म्हणजे सांस्कृतिकदृष्टय़ा आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचे स्पर्धक. तरीही त्यांच्यावर ब्रिटिश-धार्जिणेपणाचा आरोप झाला. लापिएर त्यांस उत्तर देण्याच्या फंदात पडले नाहीत. निर्बुद्धांचे रडगाणे आणि तक्रार या दोहोंकडे दुर्लक्षच करायचे असते आणि ते कसे करायचे हे लापिएर दाखवून देतात. त्यांच्या पुस्तकावर बंदीचीही मागणी झाली. ते कसे अमुक-तमुक द्वेष्टे आहेत हेदेखील काहींनी छाती पिटत सांगितले. या सगळय़ाचा परिणाम ना लापिएर यांच्यावर झाला ना त्यांच्या पुस्तकांच्या लोकप्रियतेस त्यामुळे ओहोटी लागली.

आजही भारतविषयक सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’चाच उल्लेख होतो. पण लापिएर या लोकप्रियतेच्या झगमगाटातही कधी अडकले नाहीत. कोलकात्यावरील आपल्या पुस्तकातून मिळालेल्या स्वामित्व रकमेतला निम्मा वाटा त्यांनी त्या शहरांतील क्षयरोगग्रस्त सायकलरिक्षाचालकांच्या आरोग्यासाठी खर्च केला. त्यातून हजारो जणांस उपचार मिळाले. त्या अर्थाने म्हणजे ते त्यांच्या ‘भारतीय’ टीकाकारांपेक्षा अधिक ‘भारतीय’ आणि धर्मविरोधीपणाचा आरोप करणाऱ्यांपेक्षा अधिक ‘धार्मिक’ ठरतात. ‘फ्रीडम’मध्ये एके ठिकाणी लॉर्ड माऊंटबॅटन निराश होतात. त्यांच्या निराशेचे कारण असते बॅरिस्टर महंमद अली जिना यांचा आडमुठेपणा. इतका उच्चविद्याविभूषित, कमालीचा सुसंस्कृत, प्रकांड बॅरिस्टरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लंडन येथील ‘इन्स’ न्यायालयात वकिली करणाऱ्या जिना यांच्या मनाची कवाडे इतकी करकचून बंद कशी

हा प्रश्न लॉर्ड माऊंटबॅटन यांना पडतो, असे लापिएर लिहितात. जिना फक्त निमित्त. अशी बंद कवाडे घेऊन जगणारे अनेक असतात याचा प्रत्यय पुढे लापिएर यांनाही आला असेल. तथापि त्यांच्या लिखाणामुळे ही बंद कवाडे उघडण्यास निश्चित मदत होते. कवाडांची कडी काढणाऱ्या या कथाकाराच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.

Story img Loader